|| सचिन रोहेकर

अभ्यासपूर्वक आणि दीघरेद्देशी गुंतवणुकीसाठी वॉरेन बफे एखादी कंपनी कशी निवडतात? याचे काही मासले.. 

भांडवली बाजाराची तऱ्हाच अशी आहे की, काही क्षणांत होत्याचे नव्हते तो करू शकतो. अशा या बाजारावर प्रतिष्ठित वर्तन, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि स्वयंशिस्तीच्या नियमांनी काबू ठेवणारी काही सत्प्रवृत्त मंडळीही आहेत. भांडवली बाजारातील गुंतवणुकीतून वैयक्तिक गुंतवणूकदाराला सदाचाराने चांगला पैसा कमावता येतो आणि तो टिकवताही येतो, हे या मंडळींनी दाखवून दिले आहे. हा वस्तुपाठ घालून देणारा संपत्तीचा थोर शोधकर्ता म्हणजे- वॉरेन बफे!

गुंतवणुकीसाठी बफे यांनी निवडलेली कंपनी म्हणजे आषाढातील घनमेघांनी दाटलेल्या आभाळासारखी असते. आभाळ पाऊस होऊन धरणीला भिडतो तसे बफे त्या कंपनीला भिडतात. इतरांसाठी अगोचर, ते पाहू शकणारी दृष्टी बफेंकडे आहे. इतरांसाठी अकल्पित असा त्यांनी डाव लावावा आणि बाजी मारून नेऊन सगळ्यांना अचंबित करावे, अशी ही ‘बफेबाजी’ सर्वज्ञात आहे. या बफेबाजीचे प्रातिनिधिक वीस मासले ‘इनसाइड द इन्व्हेस्टमेंट्स ऑफ वॉरेन बफे : ट्वेन्टी केसेस्’ या पुस्तकरूपात पुढे आले आहेत. येफेई लू या अनुभवी गुंतवणूकदाराने केलेले हे विश्लेषण आहे आणि मुख्य म्हणजे, ते बफे कुळातलेच (‘व्हॅल्यू इन्व्हेस्टर’- मूल्यप्रेरित गुंतवणूकदार) विश्लेषक आहेत. अमेरिकेबाहेरचे, म्हणजे ‘शेअरहोल्डर्स व्हॅल्यू मॅनेजमेंट एजी’ या फ्रँकफर्टमधील प्रतिष्ठित कंपनीत त्यांचे गुंतवणूक व्यवस्थापक असणे हा त्यांचा आणखी एक विशेष.

१९५७ ते आजतागायत बफे यांनी ज्या कंपनीला हात घातला तिचे सोने केले. त्यांनी निवडलेल्या कंपन्यांनी जगातील सर्वाधिक नफाक्षम व प्रभावी कंपन्या म्हणून आज नाव कमावले आहे. पण ते करीत असलेली गुंतवणूक योग्यच आहे हे ते कसे माहीत करून घेतात? उभरत्या आणि मोठी भरारी घेऊ शकणाऱ्या कंपनीला हेरण्याची बफे यांची कला काय आहे? या कलेचे इतरांना अनुकरण शक्य आहे काय? या प्रश्नांचा वेध येफेई लू यांनी समर्थपणे घेतला आहे. त्यामुळे बफेंविषयीच्या आधीच मुबलक उपलब्ध साहित्यातील ही एक मोलाची भर ठरते. खुद्द बफे यांची भागधारकांना उद्देशून पत्रे, त्यांची गुंतवणूक कंपनी ‘बर्कशायर हाथवे’चे वार्षिक अहवाल हे गुंतवणुकीचे धडे गिरविणारा पाठय़क्रमच आहेत. परंतु त्यात गुंतवणूक तत्त्वज्ञानाची चर्चा असते, प्रत्यक्ष गुंतवणूकपूर्व ते करीत असलेली तयारी, देत असलेला वेळ आणि श्रमाची माहिती अभावानेच मिळते. लू यांनी ही महत्त्वाची उणीव भरून काढली आहे. वस्तुनिष्ठ माहितीच्या विश्लेषणातून त्यांनी बफे यांच्या २० लक्षणीय गुंतवणुकींचा वेध घेतला आहे. सीज् कॅण्डीज, द वॉशिंग्टन पोस्ट, गेईको, कोका-कोला, यूएस एअर, वेल्स फार्गो, आयबीएम यांसारख्या नावाजलेल्या कंपन्यांतील या गुंतवणूकी आहेत.

बेंजामिन ग्रॅहम हे खरे तर मूल्यप्रेरित गुंतवणूकशास्त्राचे कुलगुरूच! समभागाची किंमत आणि गर्भित मूल्य यांतील तफावतीकडे त्यांनी सर्वप्रथम लक्ष वेधले. त्यांचे पट्टशिष्य असलेल्या बफे यांच्या गुंतवणुकीचेही हेच सारसर्वस्व बनले. मूल्यात्मक गुंतवणूकशास्त्राच्या वापराने घडणाऱ्या किमयेचा साक्षात्कारी नमूना ते बनले. बहुचर्चित नियम-तत्त्वे त्यांनी नाकारली व स्वत:ची गुंतवणूक तत्त्वे तयार केली आणि त्यांचे विनातडजोड पालन केले. जितकी अधिक जोखीम, तितका परतावाही मोठा हे त्यांना कधीच पटले नाही. लाभ-जोखीम यांचे पारडे हाती धरून काटय़ाचा तोल कोणत्या बाजूने झुकेल, याचा अचूक अंदाज हे त्यांच्या गुंतवणुकीचे वैशिष्टय़ होते. त्याचप्रमाणे ‘स्टार्ट अर्ली’ हे पुस्तकी पांडित्य सर्वानाच लागू पडते असे नाही; बफेबाजीत तरी याला महत्त्व नाही. परंतु ‘स्टे इन्व्हेस्टेड ऑल द टाईम’ हा त्यांचा गुंतवणूकमंत्र राहिला. गुंतवणूक केली तर ती दीघरेद्देशीच हवी, हे या पुस्तकात अभ्यासलेल्या त्यांच्या सर्व गुंतवणुकींमधील सामाईक वैशिष्टय़ आहे.

याचा अर्थ, बफे यांनी नेमस्त पंथ निवडला असा नव्हे. प्रवाहाच्या विपरीत हटके निर्णय घेण्याचे धाडस बफेंकडेही होते. पेन्सिल-पट्टीने नकाशे-आरेखन व सर्वेक्षणाचा व्यवसाय कालबाह्य़ ठरत असताना आणि मानवी श्रमाची जागा घेणारे तंत्रज्ञान विकसित झाले असताना, बफे यांनी ‘सॅनबोर्न मॅप’ कंपनीत १९५७ साली गुंतवणूक केली. गुंतवणूकदार म्हणून बफे यांच्या कारकीर्दीची ती सुरुवातच होती. ओढय़ातून शेतीसाठी पाणी ओढण्यासाठी विजेवर चालणारे पंप आले असताना मरणप्राय जुनी विंड मिल प्रणाली बनविणारी ‘डेम्प्स्टर मिल कंपनी’ बफे यांनी घेणेही वेडेपणाच मानला गेला होता तेव्हा. मात्र आजचे वर्तमान हे भविष्याचे दिशादर्शन करू शकते हे त्या कंपन्यांच्या इतिहासात डोकावून बफे यांनी ताडले होते. त्यासाठी बफे यांनी कंपन्यांचे ताळेबंद नीट चाचपून-पारखून घेतले. भविष्यातील बदलांतून होणाऱ्या फायदे-तोटय़ांपेक्षा वर्तमान इतिहासाचा कालसापेक्ष अर्थ लावणे त्यांच्यालेखी अधिक महत्त्वाचे होते. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या कंपन्यांनी आधीची दहा वर्षे सलगपणे व सातत्यपूर्ण नफा आणि महसूलवाढीची कामगिरी केलेली असावी, हा निकष त्यांनी कटाक्षाने पाळलेला दिसून येतो. मिळेल तितकी वस्तुनिष्ठ माहिती वेगवेगळ्या स्रोतांतून मिळविणे, तिचे विश्लेषण करणे आणि त्यातून आलेल्या निष्कर्षांवर काहीही झाले तरी अढळ श्रद्धा राखणे अशी त्यांची पद्धत. त्यांच्या यशाचे मूळ हे या पद्धतीत आहे.

बफे यांचे गुंतवणूकपूर्व संशोधन म्हणजे नेमके काय, याचाही ऊहापोह लू यांनी या पुस्तकात केला आहे. उदा. प्रति टन- प्रति मैल वाहतुकीतून महसूल, प्रति हजार टनाच्या मालवाहतुकीतून उत्पन्न, सेवेचे ग्राहक समाधानाचे गुणांक, वगैरे रेल्वे मालवाहतूक करणाऱ्या कंपनीच्या मापनाच्या कसोटय़ा कोण तिऱ्हाईत गुंतवणूकदार कशाला तपासून पाहील? परंतु ‘बर्लिग्टन नॉर्दन सँटा फे’ या कंपनीत पैसा टाकण्यापूर्वी बफे यांनी कंपनीचे जाहीर झालेले आणि सर्वासाठी खुले आर्थिक ताळेबंद पाहिलेच, शिवाय कंपनीचे काही वर्षांचे वार्षिक अहवालही नजरेखालून घातले. कंपनीचे सर्व व्यवहार्य परिमाणे आणि त्याकाळी प्रचलित रस्ते मालवाहतुकीला मात देत तुलनेत किफायतशीर असलेली रेल्वे वाहतूक प्रबल बनेल, हे त्यामागे गणित होते.

‘अमेरिकन एक्सप्रेस’ ही बफे यांची पहिली हाय-टेक गुंतवणूक आहे. नीरव मोदीसदृश ‘सॅलड ऑइल’ घोटाळा अमेरिकन एक्सप्रेसबाबत घडला. १९६३-६४ मध्ये या घोटाळ्याने कंपनीचा पिच्छा पुरवला होता. तिच्या न्यू जर्सीस्थित एका छोटय़ा उपकंपनीतहे १५ कोटी डॉलरच्या गैरव्यवहाराचे कुभांड रचले गेले होते. कंपनीच्या प्रतिष्ठेला बट्टा लागला, समभागाची किंमत ६० डॉलरवरून ३५ डॉलरवर आली. बफे यांनी अमेरिकन एक्सप्रेसची या पाश्र्वभूमीवर खरेदी केली हे खरेच; परंतु प्लास्टिक मनी हे भविष्यातील चलन व दीघरेद्देशी व्यवसाय बनेल ही दूरदृष्टीही या गुंतवणुकीमागे होती. त्याचप्रमाणे ‘कोका कोला’तील १९८८ सालातील गुंतवणूकही तिच्या उत्पादनांचा आंतरराष्ट्रीय विस्तार आणि देशोदेशी वाढत्या उपभोगाच्या पुढे आलेल्या वस्तुनिष्ठ आकडेवारीच्या विश्लेषणाअंती बफे यांनी केली. त्यानंतर चार-पाच वर्षांतच, १९९३ साली कोका कोलाचा भारतात ‘पारले’च्या ब्रॅण्ड्सवर ताबा मिळवून पुनर्प्रवेश झाला, हे लक्षात घ्यायला हवे.

कंपनीचा वार्षिक अहवाल जरी गुंतवणूकपूर्व अन्वेषणाचा महत्त्वाचा स्रोत असला तरी त्यातून सर्वच गोष्टी उमजत नाहीत. विशेषत: बफे यांच्या माध्यम क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत ही बाब प्रकर्षांने स्पष्ट होते. तसेच मिळतील तितके समभाग ते दणकून खरेदी करतात. बफे यांनी ज्या कंपनीत हात घातला त्या कंपनीचे ते सर्वात मोठे भागधारक बनले हेही ध्यानात घेतले पाहिजे. त्या कंपनीच्या संचालक मंडळात स्थान, प्रसंगी आपल्या इच्छेनुरूप त्या कंपनीचे अंशत: नियंत्रण शक्य बनेल असाच त्यांच्या गुंतवणुकीमागचा उघड हेतू असे.

जर एखाद्या कंपनी अथवा उद्योग क्षेत्राविषयी गुणात्मक माहिती अनुपलब्ध असेल तर अशी गुंतवणूक विचारातही घ्यायची नाही, हे त्यांचे कायम धोरण राहिले. आकर्षक पर्याय असतानाही बफे हे भारतातील गुंतवणुकीपासून दूर राहिले, त्याचे कदाचित हे एक कारण असावे. अशाच माहिती उपलब्धतेच्या अभावी वा आधी केलेल्या गुंतवणुकींतून मिळविलेली तालीम आणि तज्ज्ञता म्हणा, बफे यांच्या गुंतवणुकी काही ठरावीक उद्योग क्षेत्रापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. विमा-वित्तीय सेवा कंपन्या, माध्यम आणि समजण्यास सर्वात सोप्या ब्रॅण्डेड ग्राहकोपयोगी उत्पादन कंपन्या यातच त्यांची अधिकाधिक गुंतवणूक राहण्यामागे हे कारण आहे. ‘आयबीएम’ ही त्यांच्या नेहमीच्या सवयीपेक्षा वेगळी गुंतवणूक. तीही २०११ सालातील. ‘अ‍ॅपल’चा त्यांच्या गुंतवणूक ताफ्यातील समावेश तर त्याहून नंतरचा आहे. १९६८ मध्ये त्यांना त्यांच्या सवयीच्या वर्गवारीत गुंतवणुकीची कोणतीही संधी दिसून आली नाही, तेव्हा आपल्या तत्त्वांशी तडजोड करण्यापेक्षा भरपूर फायद्यात असलेली भागीदारी संस्था विसर्जित करणे त्यांनी पसंत केले. सुमारे सहा दशके बफे नुसतेच बाजारात तग धरून आहेत असे नाही तर दमदार फोफावत जात जगातील अव्वल पाच श्रीमंतांमध्ये त्यांनी स्थान पटकावले आहे.

बफे यांनी आजवर काय केले आणि छोटय़ा गुंतवणूकदारांनी त्यातून कशाचा बोध घ्यावा, हेही लू यांनी सूचित केले आहे. मात्र, बफे यांची पुढची चाल काय, भारतात ते सुप्तपणे गुंतवणूक करीत आहेत काय, वगैरे प्रश्नांची उत्तरे त्यात नाहीत. खुद्द बफेही त्यांच्या मुलाखतीत भविष्याविषयी संकेत अथवा भाष्य करणे टाळतात. तथापि त्यांच्या चाली या भविष्याचे सूचन करतात. तिमाहीला अब्जावधी डॉलरची बाजार उलाढाल असणारे बफे गेले पाच-सहा महिने स्वस्थ-सुस्त आहेत. बाजार निर्देशांक मात्र नवनवीन शिखरे सर करीत चालला आहे. असे कसे काय? बफेंच्या बर्कशायर हाथवेकडील रोकडीने साचत साचत १११ अब्ज डॉलरचा विक्रमी आकडा गाठला आहे. ही रक्कम म्हणजे आपल्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजसह आणखी दोन-चार कंपन्यांवर मालकी मिळविता येईल इतकी आहे! ती खर्च करून बाजारातून नवी खरेदी करण्याइतके आकर्षक काही राहिलेले नाही अथवा असलेच तरी ते खूप चढय़ा किमतीला घेणे बफे यांना अप्रस्तुत वाटत असावे काय? २००७ व १९९९ साली बाजारमंदी येण्यापूर्वीही बफे यांची गंगाजळी अशा रग्गड रोकडीने फुगली होती. प्राप्त परिस्थितीत शहाण्यांना योग्य त्या धडय़ासाठी बफेबाजीचा हा इतका संकेत पुरेसा ठरावा.

  • ‘इनसाइड द इन्व्हेस्टमेंट्स ऑफ वॉरेन बफे: ट्वेन्टी केसेस’
  • लेखक : येफेई लू
  • प्रकाशक : हार्पर बिझनेस
  • पृष्ठे : २९३, किंमत : ५९९ रुपये

sachin.rohekar@expressindia.com