scorecardresearch

परिचय : ‘दुजेविण’ अनुवाद..

इटालियन भाषा स्वत:मध्ये भिनवताना आलेल्या अनुभवाचं वर्णन ‘दरवाजा’ या रूपकातून त्यांनी केलं आहे.

झुम्पा लाहिरी या अमेरिकेतच वाढलेल्या भारतीय पिढीच्या प्रतिनिधी, हा झाला भूतकाळ. गेली सुमारे १२ वर्ष त्यांची आणखी निराळी ओळखही आहे : इटालियन भाषेत लिहिणाऱ्या, त्या भाषेत वा भाषेतून इंग्रजीत अनुवादही करणाऱ्या लेखिका! ‘इटालियन भाषा आत्मसात करण्याचं मनावर घेतलं ते वयाच्या चाळिशीनंतर’- अशी कबुली देणाऱ्या लाहिरींकडे गेल्या सुमारे दीड दशकात इटालियन साहित्याच्या वाचन- चिंतन- लेखन आणि अनुवाद अशा चौफेर अनुभवाची शिदोरी जमा झालेली आहे. त्या शिदोरीवर आधारलेलं नवं पुस्तक : ‘ट्रान्स्लेटिंग मायसेल्फ अ‍ॅण्ड अदर्स’ अलीकडेच आलं आहे.

साहित्यानुवाद हा विषय शिकवण्यासाठी इटलीतून अमेरिकेत परतल्यानंतर हे पुस्तक साकारलं. इटालियन भाषा स्वत:मध्ये भिनवताना आलेल्या अनुभवाचं वर्णन ‘दरवाजा’ या रूपकातून त्यांनी केलं आहे. दरवाजा बरीच वर्ष उघडला नव्हता, तो करकरतो. एखादं समृद्ध (भाषा)दालन दरवाजाआड बंद असतं, पण दरवाजाच दालन उघडण्याची सोयसुद्धा असतो. भाषा तुम्हाला एका अंगानं, एकाच विचारव्यूहाला कुरवाळत शिकता येत नाही, हे या दहा प्रकरणांच्या पुस्तकातली इतर प्रकरणं सांगतात. डॉमिनिको स्टारनोने या लेखकाच्या कादंबऱ्यांपाशी लेखिका बरीच रेंगाळते, कारण तिनं स्टारनोने यांच्या तीन कादंबऱ्या (टाइज, ट्रिक आणि ट्रस्ट) अनुवादित केल्या आहेत. लेखिका एका ठिकाणी अडकत नाही. ती समकालीन साहित्य वाचते, स्त्रीवादी साहित्य वाचतेच पण गेल्या शतकातलं आणि त्याहीआधीच्या रोमन साम्राज्याच्या काळातलंही साहित्य वाचते. त्यामुळेच या पुस्तकात मध्येच, ओव्हिडच्या मेटामॉफरेसिसमधल्या ‘नार्सिसस आणि (त्याच्यावर भाळलेली) इको’ या मिथकाच्या दोन निरनिराळय़ा उपलब्ध अनुवादांच्या चिकित्सेचं एक प्रकरण आहे. त्याहीपुढे, मुसोलिनीच्या फॅसिस्ट राजवटीला विरोध करणाऱ्या अँटोनिओ ग्रामशी या ‘कम्युनिस्ट’ असा शिक्का बसलेल्या पण मूलत: स्वातंत्र्य-समतावादी चिंतकाच्या ‘प्रिझन डायरीज’च्या इंग्रजी अनुवादांमध्ये अनुवादकांचे पूर्वग्रह आले का, याची तपासणी लेखिकेनं केली आहे.

अनुवादकाला पडणारे किंवा न पडणारे साधे प्रश्न लेखिका खुबीनं अधोरेखित करते. ‘होणं’ म्हणावं की ‘घडणं’ म्हणावं, त्या शब्दांचं आपापलं वजन कसं जोखावं, हा प्रश्न तिला एकाच ओळीच्या दोन उपलब्ध अनुवादांमुळे पडला आहे. किंवा आणखी एका प्रकरणात, लॅटिनमध्ये ‘भविष्यवाचक धातुसाधित’ (फ्यूचर पार्टिसिपल) इंग्रजीत आणायचं कसं, हा तिच्याचपुढला पेच आहे आणि ‘अशावेळी इंग्रजीपेक्षा लॅटिनला जवळची इटालियनच आपली वाटली’ अशी कबुलीही तिनं दिली आहे. पण अशा सूक्ष्म प्रश्नांभोवती हे पुस्तक घुटमळत नाही. अनुवादाविषयीची वाचकाची समज किंवा त्याचं चिंतन वाढवणारं हे पुस्तक ठरतं. साहित्यानुवाद हा स्वत:ला भावलेल्याच साहित्यकृतीचा करावा, हा धडा तर अव्यक्तपणे वाचकाला मिळत राहातोच. पण स्वत:च्याच इटालियन कादंबरीचा इंग्रजी अनुवाद करतेवेळी मूळ इटालियन कादंबरीची सुधारित प्रत कशी तयार झाली आणि ‘त्यापुढलं स्वातंत्र्य मी इंग्रजीत घेतलं नाही’ हे वाचकाच्या गळी उतरवून लेखिका, अनुवादानं किती स्वैर असावं याचाही वस्तुपाठ देते. स्टारनोनेच्या कादंबऱ्या अनुवादित करताना लेखिकेला काही शब्दरूपं इंग्रजीत आणण्यासाठी स्वातंत्र्य घ्यावं लागलं, तेव्हा तिनं मूळ लेखकाची मसलत घेतल्याचा उल्लेख आदल्या कुठल्याशा प्रकरणात होता, तो आता महत्त्वाचा वाटू लागतो.

म्हणजे एकंदरीत, अनुवादकांसाठीचं पाठय़पुस्तक ठरणार का हे? पहिलं उत्तर ‘नाही’ आणि मग थोडा विचार करून सुचणारं उत्तर ‘हो’. लेखिकेन आत्मलक्ष्यी लिखाणासारखं हे पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाची लय स्वत:शी आणि ओघानं वाचकाशी संवाद साधणारी आहे. ‘अनुवाद कसा करावा’ हे काही या पुस्तकातून मिळणार नाही. पण अनुवादकानं कसं असावं, हे मात्र उमगेल. ‘दुजेविण अनुवादु’ ही आत्मलीन उन्मनी अवस्था अध्यात्मातच असू शकते, हे खरं. अनुवाद करताना कुणीतरी दुजा हवा, मग दुजाभाव मिटवण्याचा सायास हवा. अशी मीतूपणाची बोळवण झाल्यावर अनुवादक ‘स्वातंत्र्य’ विसरला तरी बिघडत नाही, अशा अवस्थेतप्रत वाचकाला आणून हे पुस्तक संपतं.

मराठीतील सर्व बुकमार्क ( Athour-mapia ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Introduction about translating myself and others book zws

ताज्या बातम्या