बुकबातमी : वाचण्याचं दुकान वाचलं, वाढलं!

जॉर्डन देशाची राजधानी अम्मान. तिथं ‘महाल अल् मा’ नावाचं पुस्तकांचं दुकान आहे.

Bookshop in Jordan
महाल अल् मा’ नावाचं पुस्तकांचं दुकान

जॉर्डन देशाची राजधानी अम्मान. तिथं ‘महाल अल् मा’ नावाचं पुस्तकांचं दुकान आहे. दुकानाच्या मालकाचं नाव हम्ज़्‍ो अल्मायता. ही माहिती इंग्रजी वाचणाऱ्यांच्या जगापासून एरवी किती तुटलेली वाटते! म्हणजे त्या दुकानात काही इंग्रजी पुस्तकंही आहेत, वगैरे ठीक; पण म्हणून जगभरचे तीनशेहून अधिक, इंग्रजी किंवा अन्य (इटालियन वगैरे) भाषांतली पुस्तक वाचणारे वाचनप्रेमी या दुकानाबद्दल हळवे होऊन, किमान दहा डॉलर ते दोन हजार डॉलर या दुकानाच्या आणि दुकानदाराच्या भल्यासाठी पाठवून देताहेत, अल्पावधीत १८ हजार डॉलरहून अधिक निधी या  दुकानाला मिळतो आहे, असं कशाला होईल?

ते झालं अलीकडेच. इंटरनेटवरल्या ‘क्राऊडफंडिंग’मुळे – म्हणजे इंटरनेट-बघ्यांच्या गर्दीकडून (क्रेडिट अथवा डेबिट कार्डाद्वारे, विश्वासार्ह मध्यस्थामार्फत) पैसे जमवण्यामुळे- हे झालं; पण पुस्तकांची अनेक दुकानं तोटय़ातच सुरू असतात. मदत याच दुकानाला कशी? त्याचं असं झालं, की हम्ज़्‍ो मध्यंतरी खूप आजारी पडला. काही महिने दुकानाकडे दुर्लक्ष झालं. दुकानाची पडझड झाली, शिवाय भाडं थकलं. हम्ज़्‍ो हताश. मग लंडनला शिकून परतलेला आणि सध्या जॉर्डनमध्ये ‘वजह प्रोजेक्ट’ ही स्वयंसेवी संस्था चालवणारा हुसेन अलाझत मदतीला आला. त्यानं सुरेखसं आवाहन इंटरनेटवर लिहिलं आणि ‘इंडीगोगो’ नामक एका क्राऊडफंडिंग-मध्यस्थी करणाऱ्या संकेतस्थळामार्फत पैसे जमवणं सुरू केलं. हळवेपणानं लोकांनी पैसे दिले.

का हळवे झाले लोक? याची कारणं आहेत : (१) पुस्तकांचं हे दुकान दिवसरात्र, २४ तास सुरू असतं (२) हम्ज़्‍ो  ३६ वर्षांचा आहे आणि त्याला पत्नी व पाच मुलं आहेत, पण तो दुकानातच राहतो. दुकानात आल्यागेल्याशी अगदी मित्रत्वानं गप्पा मारतो, चहाबिहा पाजतो. (३) अम्मानच्या मध्यवर्ती भागात, ‘रोमन कारंज्या’समोरच असलेल्या या दुकानात परदेशी पर्यटकांची वर्दळ पूर्वापार आहे. (४) वाचनसंस्कृती रुजावी, उगाच भडकावू पुस्तकं न वाचता तरुणांनी साहित्याचं वाचन करावं, विश्वसाहित्याकडे जावं, अशी हम्ज्मेची तळमळ निर्विवाद आहे!

एप्रिलअखेरीस १८,३१३ डॉलर जमले, त्यातून आता हे दुकान ‘दुरुस्त’ होऊन पुन्हा सेवा देऊ लागलं आहे. या खटाटोपामुळे हम्ज्मेचं फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि वर्डप्रेसवर पदार्पण झालं, ही आणखी एक बरी बातमी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mahal al ma bookshop in jordan