|| निखिल बेल्लारीकर

मानवी संस्कृतीच्या उत्कर्षात घोड्यांचे मोठेच योगदान आहे. भारतात ‘अश्वमेध’ होता, त्याअर्थी घोडे होतेच. पण घोड्यांचा भारतातील विकास मात्र मध्ययुगापासून सुरू झाला आणि प्रामुख्याने राजपूत व मराठा या लढवय्या समाजांनी घोड्यांच्या रुबाबामध्ये भर घातली… घोडा हा प्राणी भारतीय संस्कृतीचाही भाग झाला. अश्वांचा भारतीय इतिहास फक्त लढाईचा नाही. व्यापारापासून प्रेमापर्यंतचे सारे रंग त्यात मिसळले आहेत. त्यांचा आढावा घेताना मारवाडी घोड्याची महती सांगणारा हा ग्रंथ…

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार

 

मानवी संस्कृतीचा इतिहास घोड्याविना पूर्ण होऊच शकत नाही. गेल्या चारएक हजार वर्षांपासून ते सध्याच्या यंत्रयुगातही काही संस्कृतींचे घोडे घोड्यावाचून अडून राहते. भारतीय इतिहासाच्या गुंतागुंतीतील घोड्याच्या प्रवासाचा आढावा घेणे ही अतिशय किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. परंतु लंडन विद्यापीठातून इतिहासात पीएच. डी. केलेल्या डॉ. यशस्विनी चंद्र यांनी हे आव्हान अतिशय उत्तमरीत्या पेलले आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात भारतातील घोड्यांबद्दल विविधांगी माहिती असून, दुसऱ्या भागात राजस्थानातील- त्यातही विशेषत: राजपूत संस्कृतीच्या योद्धाकेंद्रित परिप्रेक्ष्यातून दिसून येणारे घोड्यांचे अनन्यसाधारण महत्त्व व तिसऱ्या भागात वाळवंटी  पर्यावरणाशी घोड्यांचे आणि तद्वलंबी जनसमूहांचे नाते कथन केलेले आहे.

पूर्वपीठिका

अनेक दंतकथा, पुराणकथा तसेच शिल्पे, चित्रे इत्यादींच्या माध्यमातून डॉ. चंद्र भारतीय जनमानसातील घोड्याचा मागोवा घेतात. दुर्दैवाने भारतीय उपखंडात प्रत्यक्ष उत्खननात इ. स. पू. १००० च्या आधीचे घोड्याचे अवशेष खूप कमी सापडले असले तरी ‘उच्चै:श्रवसा’सारख्या कैक वैदिक आणि पौराणिक कथांमधून काहीएक कल्पना नक्कीच येते. अश्वमेध यज्ञासारखी प्रथा किंवा युद्धांच्या अनेक कथा पाहता प्राचीन भारतात घोड्याचे धार्मिक व सामरिक परिप्रेक्ष्यातील महत्त्वाचे स्थान स्वयंस्पष्टच आहे. इसवी सनाच्या सुरुवातीच्या आसपास भारतात रथांचा वापर जवळपास संपला आणि घोडेस्वारीचे युग सुरू झाले. मध्य आशियाई तुर्की आक्रमणांपूर्वी कैक शतके अगोदर गुप्त साम्राज्यातही अश्वारूढ धनुर्धारी सैन्याचा वापर होत असे, हेही डॉ.चंद्र सप्रमाण दाखवतात.

इ. स. १००० नंतर अश्वविषयक सर्वच प्रकारचे उल्लेख अनेक पटीने जास्त सापडतात. इस्लामी आक्रमकांसोबतच अरब, इराणी आणि मध्य आशियाई घोड्यांचे व्यापारीही मोठ्या संख्येने मध्य आशियातून खुष्कीच्या मार्गाने आणि इराक व इराणहून जलमार्गाने भारतात येऊन घोड्यांची विक्री करू लागले. उत्तरेकडील दिल्लीतील सुलतानांसारखे शासक किंवा दक्षिणेकडील बहामनी सुलतान, पुढे आदिलशाही-निजामशाही-कुतुबशाही सुलतान आणि विजयनगर, होयसळ इत्यादी राजे घोड्यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते. या अवलंबित्वाची कारणे अनेकविध होती. भारतात उत्तम प्रतीचे घोडे पैदा होत नाहीत, या अर्धसत्य समजुतीचाही यात मोठा वाटा होता. मार्को पोलो, निकितिन, अब्दुल वसाफ आदींसारखे कैक परदेशी प्रवासी हे ‘भारतातील घोड्यांचा खुराक, भारतीय हवामान, इ. अनेक घटकांचा एकत्रित दुष्परिणाम म्हणून भारतातील घोड्यांचा दर्जा खालावतो,’ असे नमूद करतात. परंतु तेच बल्बनसारखा सुलतान हा मंगोलांनी मध्य आशियाई घोड्यांचा पुरवठा थांबवल्यावर सिंध, पंजाब इ. प्रांतांतील घोड्यांचा आपल्या लष्करात सर्रास वापर होत असल्याचे नमूद करतो तेव्हा या समजुतीत फारसे तथ्य नसल्याचे दिसून येते. भारतीय आणि परदेशी घोड्यांचे अनेकांगी तौलनिक विश्लेषण या पुस्तकात बऱ्याच ठिकाणी येते. प्राणिशास्त्रासारख्या वरकरणी वस्तुनिष्ठ वाटणाऱ्या गोष्टींमागील अनेक छुपे पूर्वग्रह डॉ. चंद्र ज्या खुबीने उलगडतात, ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

घोड्यांचा व्यापार हा मध्ययुगीन भारतातील अर्थव्यवस्थेचा एक अतिमहत्त्वाचा भाग होता. भारताबाहेरून दरवर्षी कित्येक हजारोंनी घोड्यांची आयात केली जाई. हे घोडे भारतात पोहोचायला कैक महिने लागत. या प्रदीर्घ प्रवासात कैक घोडे दगावत. विशेषत: जलमार्गाने येणाऱ्या घोड्यांचा मृत्यूदर बराच जास्त असे. तत्कालीन शासकांची घोड्यांची गरज इतकी मोठी, की या मेलेल्या घोड्यांचेही निम्मे पैसे व्यापाऱ्यांना दिले जात. घोड्यांनी प्रवासात दंगा करू नये म्हणून त्यांना जखडून ठेवीत. अल्प प्रमाणात त्यांचे रक्तही काढत असत. असे अनेक अत्याचार सोसून हे घोडे अखेरीस भारतात येत. खुष्कीच्या मार्गे आलेले मध्य आशियाई अर्थात तुर्की घोडे आणि जलमार्गे आलेले अरबी घोडे यांमध्ये तुलनात्मकरीत्या अरबी घोडे जास्त उच्च समजले जात.

घोड्याचा भारतातील परिसंचार

भारतीय उपखंडाच्या विविध भागांत आढळणाऱ्या घोड्यांची व अश्वसंस्कृतीची तपशीलवार माहितीही डॉ. चंद्र यांनी दिली आहे. विशेषत: मणिपूर आणि आधुनिक पोलो खेळाचा परस्परसंबंध मुळातूनच वाचण्याजोगा आहे. काठेवाड, सिंध, राजस्थान, पंजाबचा काही भाग आणि तराई प्रदेश, तिबेट, झंस्कार आणि मणिपूर या बऱ्याच मोठ्या प्रदेशांत विविध प्रकारचे घोडे आढळतात. सद्य:काळात या प्रदेशांतील महत्त्वाच्या अश्वजाती अजूनही टिकून आहेत. परंतु ज्या देशी भीमथडी घोड्यांच्या पाठीवरून मराठ्यांनी पेशावर ते तंजावर आणि गुजरात ते बंगाल इतक्या मोठ्या भूभागावर लीलया संचार केला, ज्या घोड्यांवर आधारित अनेक म्हणी व वाक्प्रचार आजही मराठीत रूढ आहेत, जी घोडी मराठेशाहीचा एक मोठा आधारस्तंभच होती- ती भीमथडी दख्खनी घोड्यांची जात आज नामशेष झालेली आहे. अन्य जातींप्रमाणे भीमथडीची नेमकी वैशिष्ट्ये आज सांगता येत नाहीत हे दु:खद सत्य डॉ. चंद्र मांडतात. मराठ्यांचा राज्यविस्तार आणि त्यातील घोड्यांचे महत्त्वाचे स्थान, पुरुषच नव्हे तर बायजाबाई शिंद्यांसारख्या स्त्रियांनाही असणारी घोड्यांची उत्तम जाण आणि मराठ्यांच्या अश्वारूढ युद्धपद्धतीची उर्वरित भारताने घेतलेली दखल इत्यादींची त्रोटक, परंतु रोचक चर्चा लेखिका करतात. मराठ्यांच्या घोडदळाबद्दल खूप सखोल संशोधन व्हायला हवे, हे त्यातून स्पष्टच दिसते.

मुघलोत्तर भारताच्या अश्वसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीच्या तुलनेत मध्य आशिया व अरेबियातून होणारी घोड्यांची आयात कमी झाली आणि बहुतांश घोड्यांचा पुरवठा भारतातूनच होऊ लागला. घोड्यांची पैदास करण्यात मराठे शासक, विविध राजपूत राज्ये, रामपूरचे नवाब आदींचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. मुघलोत्तर काळात बहुतांशी फक्त उच्चवर्गीय सरदार व सत्ताधीशच परकीय- त्यातही अरबी घोडी वापरत. सैनिक मात्र बहुतांशी देशी घोडीच वापरत. आणि लहान चण असूनही चिवटपणात देशी घोडी कुणालाही हार जाणारी नव्हती. शीख राजा रणजितसिंगाचा अपवाद वगळता परदेशी घोड्यांची मागणी घटली. या बदलाचा रोचक परामर्श डॉ. चंद्र घेतात.

मुघलांच्या इतिहासाचे, अश्वसंस्कृतीचेही उत्तम वर्णन पुस्तकात आढळते. मुघल इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांमध्येही घोड्यांची महत्त्वाची भूमिका दिसून येते. ‘आईन-इ-अकबरी’ यासारख्या ग्रंथातून मुघलांचे अश्वविषयक धोरणही दिसते. बहुतांश सैन्यासाठी तुर्की घोडे, तर उच्चवर्गीय सरदार-मनसबदार आणि राजकुटुंबीयांसाठी अरबी घोडे असा एकूण त्याकाळी  खाक्या होता. प्रत्येक सैनिकामागे किती घोडे असावेत, ते कोणत्या जातीचे असावेत, त्यांच्यावर शासन पुरस्कृत शिक्का असावा, घोड्यांच्या निगराणीत उणेपणा आढळल्यास दंड करावा, इ. अनेक बारकावे त्यातून समजतात. त्याखेरीज किमती भेटवस्तू म्हणूनही विशिष्ट लक्षणयुक्त घोडे एकमेकांना द्यायची तेव्हा प्रथा होती. या अश्वप्रेमाचा धागा शेवटचा नामधारी बादशहा बहादुरशाहपर्यंत कसा जातो, हे मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

या पुस्तकाचा बराच मोठा भाग राजस्थानातील अश्वसंस्कृती व पर्यावरण यांच्या तपशीलवार विवेचनाने व्यापला आहे. कैक दंतकथा, उदा. पाबूजी, ढोला-मारू इ.द्वारे राजपूत समाजाच्या भूतकाळाचा उत्तम मागोवा त्यात घेतलेला आहे. राजस्थानातील समाजांच्या सर्व पातळ्यांवर घोड्यांचे महत्त्व मोठे होते. त्यातही उच्चकुलीन राजपूत समाजात आणखीनच जास्त. प्रतिष्ठित राजपूत होण्याकरता घोडेस्वारीचे ज्ञान आणि राजपूत शासकांच्या पदरी मोठे घोडदळ असणे आवश्यक असे. राणाप्रताप आणि त्यांचा घोडा चेतक यांची कथा प्रसिद्धच आहे. बिकानेरचा एक जुना शासक जैतसिंग याने बाबरपुत्र मिर्झा कामरानला हरवल्याची कथा सांगणाऱ्या एका काव्यात कवीने तब्बल १०९ घोड्यांचे नावासह वर्णन केल्याचे डॉ. चंद्र नमूद करतात तेव्हा घोड्याला असणारे महत्त्व आणखीनच अधोरेखित होते. किशनगढ, कोटा इत्यादी राजपूत राज्यांत बहरलेली चित्रकला, त्यामधील घोड्यांचे चित्रण व त्यातील अनेक बारकावे- उदा. आयाळ, रंग, ठिपके इ. द्वारे पुस्तकातील अनेक चित्रांमधूनही याचा उत्तमरीत्या प्रत्यय येतो. अश्वचिकित्सापर ‘शालिहोत्र’ ग्रंथांमधील काही मजेशीर गोष्टी- उदा. घोड्यांचे ब्राह्मण-क्षत्रियादि वर्णांत विभाजन वाचून तत्कालीन सामाजिक परिस्थितीच्या अश्वचिकित्सेवरील प्रभावाचीही कल्पना येते.

अश्वसंस्कृतीचा विचार करताना घोड्यांचे मोतद्दार, नालबंद, खिदमतगार इत्यादी निम्नवर्गीयांचे एक वेगळेच चित्र पुस्तकातून उभे राहते. त्याखेरीज भाट, चारण, बंजारे आणि अफगाण पोविंदा या समाजगटांच्या सामाजिक स्थित्यंतरांबद्दलही लेखिकेचे विचार मननीय आहेत. राजस्थानातील अनेक जातींचे लोक घोड्यांच्या व्यापारात भाग घेत आणि समाजात त्याद्वारे आपले महत्त्व टिकवीत. परंतु ब्रिटिश प्रभावाखाली कैक राजपूत राज्यांनी या घटकांना चोर-दरोडेखोर ठरवले, त्यांच्या उपजीविकेची साधने त्यांच्यापासून हिरावून घेतली. ब्रिटिशपूर्व समाजातील एक महत्त्वाचा दुवा असलेले हे लोक नव्या व्यवस्थेने फटकारले गेले. ब्रिटिशांच्या पूर्वग्रहापोटी असे कैकजण देशोधडीला लागले. या शोकांतिकेस बहुतांशी ब्रिटिश पूर्वग्रहच जबाबदार आहेत, हे डॉ. चंद्र यांनी उत्तमरीत्या दाखवले आहे.

उपसंहार

ब्रिटिश पूर्वग्रहांचा फटका भारतातील माणसांबरोबरच घोड्यांनाही बसला नसता तरच नवल! भारतात आपली सत्ता दृढमूल झाल्यावर घोड्यांच्या पैदाशीकडे ब्रिटिशांनी लक्ष पुरवायला सुरुवात केली. त्यांचे सुरुवातीचे अनेक प्रयत्न फसलेही. तत्कालीन इंग्लंडमधील थरोब्रेड जातीच्या घोड्यांचा बराच प्रभाव ब्रिटिशांवर होता. भारतीय जातींच्या तुलनेत हा घोडा अधिक उंच व वजनदार असे. आकारगंडाने पछाडलेल्या ब्रिटिशांना त्यापुढे भारतातील घोडे लहान वाटत. या पूर्वग्रहापोटी भारतातील हवामानास उत्तम अनुकूलित असलेल्या भारतीय अश्वजातींकडे दुर्लक्ष करून त्यांनी थरोब्रेड, अरबी इत्यादी घोडेच जास्त पसंत केले. याचा थेट परिणाम म्हणजे आजही भारतातील अश्वशर्यतींमध्ये देशी जातींचे घोडे खेळवले जात नसल्याची खंत डॉ. चंद्र व्यक्त करतात. स्वत: अश्वपटू असल्याने त्यांना यासंबंधात प्रत्यक्ष अनुभवही आहे. कैकजणांच्या प्रयत्नांतून देशी घोड्यांच्या काही जाती टिकून राहिल्या; परंतु कैक जाती नामशेषही झाल्या.

दळणवळणातील सुधारणांमुळे दैनंदिन जीवनातील घोड्यांचे महत्त्व कमी कमी होत गेले. तथापि अगदी १९५० च्या दशकापर्यंत मुंबईत इराणी व्यापारी घोडे विकत असल्याची आठवण डॉ. चंद्र नमूद करतात तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. आजही राजस्थानच्या काही दुर्गम भागांतील रहिवाशी घोड्यांचा वापर करतात. परंतु एकुणात अश्वशर्यती आणि मोजक्या हौशी धनिकांचा अपवाद वगळता अश्वसंस्कृती आजमितीस झपाट्याने लयाला चालली आहे. या सद्य:स्थितीत लुप्तप्राय, परंतु परवा-परवापर्यंत आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या संस्कृतीच्या कल्पनातीत समृद्धीची काहीएक कल्पना हे पुस्तक वाचून येते, यातच या पुस्तकाचे यश सामावलेले आहे.

nikhil.bellarykar@gmail.com