ब्रिटन आणि युरोपभर तब्बल २८३ पुस्तकालयांची वितरण साखळी असलेल्या ‘वॉटरस्टोन्स’ने त्यांच्या स्थापनेला ३० वर्षे झाली त्या वर्षी- म्हणजे २०१२ सालापासून ‘बुक ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. ‘वॉटरस्टोन्स’च्या वाचन व्यवहाराचे केंद्र मुख्यत: ब्रिटन असले, तरी युरोप आणि जगभरचे वाचक या ‘बुक ऑफ द इयर’ या पुरस्काराकडे लक्ष ठेवून असतात. या वर्षी गेल्या सात वर्षांतला शिरस्ता मोडत या पुरस्कारासाठी दोन पुस्तक-लेखकांची निवड करण्यात आली असून त्यांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. त्याचीच ही बुकबातमी! लेखक-चित्रकार चार्ली मॅकेसी यांची सध्या गाजत असलेली चित्रमय कादंबरी- ‘द बॉय, द मोल, द फॉक्स अ‍ॅण्ड द हॉर्स’ आणि पर्यावरणाविषयी कळकळीने केलेल्या ग्रेटा थनबर्गच्या भाषणांचे पुस्तक ‘नो वन इज टू स्मॉल टु मेक अ डिफरन्स’ या पुस्तकांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली असून ग्रेटाला तिच्या पुस्तकासाठी ‘ऑथर ऑफ द इयर’, तर मॅकेसी यांच्या पुस्तकाला ‘बुक ऑफ द इयर’ म्हणून गौरविण्यात आले आहे. मॅकेसी यांचे पुस्तक- त्याच्या शीर्षकातच अंतर्भूत असलेल्या पात्रांची कहाणी सांगत वाचकाला सहसंवेदनेची जाणीव करून देते, तर ग्रेटाचे पुस्तक म्हणजे तिने पर्यावरणस्नेही जगासाठी केलेले कळकळीचे आवाहनच आहे. त्यामुळे ‘वॉटरस्टोन्स’कडून या निवडीचे वर्णन ‘चांगल्या आणि दयाळू जगासाठी हाक..’ असे केले आहे! बुजुर्ग कादंबरीकार मार्गारेट अ‍ॅटवूड यांची यंदाची बुकर विजेती ‘द टेस्टामेंट’, लेखक रॉबर्ट मॅकफार्लेन्स यांची कादंबरी ‘अंडरलाइन’ आणि कॅण्डिस कार्ती-विलियम्स या नवलेखिकेची सध्या चर्चेत असलेली ‘क्विनी’ ही कादंबरीही ‘बुक ऑफ द इयर’च्या शर्यतीत होती.