|| पंकज भोसले

समाजमाध्यमांवर कोणत्याही विषयावर मत ओकणारी, व्याख्यानं वगैरे देत फिरणारी या पुस्तकाची निवेदिका ‘तू काय करतेस’ या प्रश्नामुळे संभ्रमित होणारी… त्याहीपेक्षा, बहिणीचं बाळंतपण आणि भाचीचा मृत्यू यांचं दु:ख थेट वाचकाला भिडवणारी!

mukta barve dances on naach ga ghuma trending marathi song
Video : सातासमुद्रापार ‘नाच गं घुमा’! मुक्ता बर्वेचा परदेशात जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
Salman Khan house firing incident
Salman Khan Firing Case : पनवेलमध्ये वास्तव्य, वांद्र्यात रेकी आणि पोर्तुगालमधून धमकी, गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा
Prajakta mali put her mothers name said its mandatory to put mother's name after your name decision by Aditi Tatkare
‘प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी’ ऐतिहासिक निर्णयानंतर अभिनेत्रीने लावलं आईचं नाव, पोस्ट शेअर करत म्हणाली…

जग व्यापण्याचे फसवे बुडसमाधान देणाऱ्या ऑरकुटकालीन सोसापासून ते फेसबुक-ट्विटर-व्हॉट्सअ‍ॅप-इन्स्टा आदी समाजमाध्यमांनी गेल्या दीड दशकात टप्प्याटप्प्याने व्यक्तीच्या जगण्याला अंकित करण्यास सुुरुवात केली. त्या चक्रात एकटा सामान्य माणूसच गुंतला नाही, तर भाषावहनाचे मुख्य काम करणाऱ्या कवी-लेखकांच्या अख्ख्या पिढीला या नव्या व्यासपीठांवरून संकरित वाणाची शब्दमांडणी करावी लागली. दहा-वीस वर्षांपूर्वी तरी कवी किंवा लेखक स्वत:चं आत्मभान, वस्तुभान आणि विश्वभान वाचकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करीत होता. आता त्याला समाजमाध्यमांवरील अस्तित्वभानही जागृततेने तेवत ठेवण्याची गरज निर्माण झाली, इतपत बदल झाला. स्मार्टफोन आणि माध्यमफलाटांची गर्दी झाल्यानंतर सुमारांची सद्दी अपेक्षित होतीच पण ‘बुद्धिकृमींचा कुचमुक्काम’ आणि ‘कुचकिड्यांची मेंदूवस्ती’ ही अवस्थाही नकळत किती व्यापत गेली, हे पाहणे साकल्याने विचार करणाऱ्यांना विषयखाद्य ठरू शकेल. अन् तसा विचार करताना क्लिप्स, इन्स्टापोस्ट्स, फेसबुक थ्रेड्स, टिकटॉक पिलावळ, ट्विटर मौक्तिके, व्हॉट्सअ‍ॅप पिंग्ज, मॅसेंजर शिळोपा आदींमध्ये कित्येक तास-मिनिटांचा बेहिशेबी चुराडा करून बधिरतेची परमोच्च पातळी गाठण्याचा क्रम दिसामाजी होत असल्यास ‘नो वन इज टॉकिंग अबाउट धिस’ ही कादंबरी वाचता येऊ शकेल. समकालीन सर्वमनावर पगडा पाडणाऱ्या माध्यमांमुळे तयार झालेल्या भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. भाषाभ्यासासह माध्यमकालीन स्व-ज्ञानाची अज्ञानावस्था कमी करण्याची क्षमता तिच्यात आहे.

पॅट्रिशिया लॉकवूड ही हाडाची कवयित्री. पण लिहिता येते म्हणून फेसबुक-ट्विटरमधून भावबधिऱ्या कवितांचा ‘पो’ टाकत ‘काव्य-खोखो’ हंगाम बहरवणाऱ्या सांप्रतकालीन काव्यकुळात ती बसत नाही. तिच्या ट्विटरवरील कविता पारंपरिक- रूढीबाज काव्याला बट्टा लावणाऱ्या किंवा ‘बट्ट’ या मलक्षेपक अवयवावरून स्फुरलेल्या असू शकतात. २००४ सालापासून कवयित्री म्हणून ढीगभर अमेरिकी मासिकांत आणि कवी-लेखकांचा ‘मक्का’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘न्यू यॉर्कर’मध्ये झळकून झाल्यानंतर तिने २०११ साली गंमत म्हणून आपली मादक मौक्तिकाव्याला (सेक्स्टिंग्ज) ट्विटरवर झळकवले. ट्विटरवरून सुरू झालेल्या ‘पलंगकाव्या’ने आणि त्यात योजलेल्या उपमा-अलंकारांच्या पसाऱ्याने लोकप्रियतेच्या पायऱ्या तिने झरझर पार केल्या. आर्थिक कारणांमुळे कॉलेजची पायरीही चढू न शकलेल्या या कवयित्रीला ही लोकप्रियता आणि त्यातून बहरलेली तल्लख प्रतिभा कामी आली. त्यामुळे जगभरात काव्यलेखनाच्या कार्यशाळेत व्याख्याती म्हणून भटकंती करण्याची संधी तिला लाभली. ‘बलून पॉप आउटलॉ ब्लॅक’, ‘रेप जोक’, ‘मदरलॅण्ड फादरलॅण्ड होमलॅण्डसेक्शुअल्स’ ही तिच्या कवितासंग्रहांची नावे पाहिली, तरी त्यातील शब्दऐवजाची कल्पना येऊ शकेल. अमेरिकेतील बलात्कार आणि स्त्रीविरोधी लैंगिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरील, स्वानुभवावर बेतलेली ‘रेप जोक’ ही कविता ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांवरून बरीच पसरली होती. अर्ध्या दशकापासून छोटुकली वाक्ये, छटाकभर परिच्छेद आणि कविता यांमुळे ‘ट्विटर सेलिब्रेटी’ बनलेल्या या लेखिकेने काही वर्षांपूर्वी ‘हाऊ डू वी राइट नाऊ?’ हे गमतीशीर भाषण केले होते. (मुद्रित स्वरूपात ते ऑनलाइन उपलब्ध आहे.) त्यात तिने समाजमाध्यमांमुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत व्यापत चाललेला वेळ आणि त्यातील दृश्यमालिका, कृत्य, चमत्कृतीपूर्ण वाक्यरचना आपल्या आयुष्याला कसा आकार देत आहेत, यावर भाष्य केले होते. अन् या भाषणात तिने आपले माध्यमांवर व्यसनाधीन पातळीवरचे अस्तित्वही कबूल केले होेते. माध्यमांमुळे होणाऱ्या आवश्यक-अनावश्यक ज्ञानस्फोटात आपली दुनिया पाठीवर घेऊन लिखाण कसे करायचे, याबाबतचे लॉकवूडचे चिंतन म्हणजे ‘नो वन इज टॉकिंग अबाउट धिस’ ही कादंबरी. शीर्षकाला ती सर्वार्थाने जागते. कारण खरेच इतकी शब्द प्रायोगिकता कुठल्याही कादंबरीचा निवेदक योजू शकणार नाही. 

कादंबरीचा अर्धा नभाग निवेदिकेच्या अ-कथनाचा. ट्विटर, फेसबुकवरील पोस्ट इतका दीड परिच्छेदांच्या दुनियेत सामावणारा. त्यात पाहिलेल्या चमत्कारिक चित्रफिती- भित्तिपत्रे- संदेश यांच्या नोंदी आहेत. सुरुवातीची पंधरा-वीस पाने थांग लागणार नाही इतके हे परिच्छेद आक्रमण करू लागतात. निवेदिकेकडून काय सांगितले जात आहे, याचा पत्ता त्यातल्या तपशिलांतून येऊ लागला, की मग इथला प्रवास तितका असह्य होत नाही. ‘लाल रंगाचे तोंड’ असलेल्या हुकूमशहा राष्ट्राध्यक्षावर केलेल्या विनोदातून तो परिच्छेद कुणाविषयी आहे, याचा उलगडा जसा लागायला लागतो. अमेरिकेतील राजकीय, सामाजिक घटनांकडे अतितिरकस नजरेतून पाहण्याचा लॉकवूडचा अट्टहास समजू लागतो. हे सारे कल्पनेच्या तीरावरचे खेळ नसून समाजमाध्यमांतून भवतालावर होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांचे वृत्तांकन असल्याचे लक्षात येते. उदाहरणार्थ जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवंशीयाला गोऱ्या पोलिसाने निर्घृणपणे मारल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने जगभरात बातमी म्हणून, अमेरिकेतील समतावाद्यांसाठी आंदोलनइंधन म्हणून आपल्याला माहिती असते. पण समाजमाध्यमात या घटनेवर जे तिरकस कवित्व होऊ शकते, ते लॉकवूडची निवेदकच करू जाणे. (अर्थात जॉर्ज फ्लॉइडच्या घटनेचा कोणताही संदर्भ न देता हे साधले आहे.) समाजमाध्यमातून सतत काही थरारक, अचंबित करणारे, कधीच न घडलेले दु:खद प्रसंग चवीने पाहण्याची आपल्याला इतकी सवय केली आहे की, एखाद्याचा मृत्यू ‘सोहळा’ म्हणून पाहण्यासाठी आपल्या उत्सुकतेचा बिंदू कायम वरच्या रेषेत असतो. त्या बोथटपणाची मधली स्थिती लॉकवूडने अचूक पकडली आहे.

यात सर्वज्ञानी, सर्वविहारी आणि भाषेवर सर्वोत्तम प्रभुत्व असलेली लॉकवूडची निनावी निवेदिका (अगदी तिच्याचसारखी) ऑस्ट्रेलियापासून युरोपातील विविध देशांत व्याख्याने देण्यासाठी फिरते. त्याबाबतचा चिमूटभर संदर्भ आरंभीच्या भागात वाचायला मिळतो. ‘पोर्टल’ म्हणजेच इंटरनेटवर ती सातत्याने पडीक असल्यामुळे तिचे तिथले जगव्यापी बुडसमाधानी उद्योग अव्याहत सुरू राहतात. आपण तिला ओळखतो ते तिच्या समाजमाध्यमांवरच्या फेरफटक्यांच्या वर्णनाने. ती त्यात भावाच्या, बहिणीच्या, आईने केलेल्या ‘टेक्स्टिंग्ज’च्या तपशिलांना ओतून या अन्य पात्रांची माहिती देत राहते. समाजमाध्यमांवर कोणत्याही विषयावर मत ओकण्यास त्या विषयातील तज्ज्ञच असावे लागत नाही, या न्यायाने तत्त्वज्ञान, भांडवलशाही, इतिहास-भूगोल, राजकारण, समाजकारण, सिनेमा-संगीत, साहित्य आणि जगभरात घडलेल्या चित्र-विचित्र घटनांच्या बातम्यांवर व्यक्त होणारी लॉकवूडच्या निवेदिकेची पारखी नजर वाचकाला आवडू लागते. ती विषयांना फरफटत, भरकटत नेत असली तरी प्रचंड शब्दखेळ आणि दहाएक ओळींच्या आतच संपणारा पोस्टरूपी मुद्दा दमदार वाटायला लागतो. मासला म्हणून हा परिच्छेद घेऊ.

Politics! The trouble was that they had a dictator now, which, according to some people (white), they had never had before, and according to other people (everyone else), they had only ever been having, constantly, since the beginning of the world. Her stupidity panicked her, as well as the way her voice now sounded when she talked to people who hadn’t stopped being stupid yet.

 यासारख्या शेकडो स्मार्ट परिच्छेदांनी कादंबरीचा पहिला भाग रंगला आहे. त्यात निवेदिकेला ‘पोर्टल’वर दिसणाऱ्या, सतत नवे ओतणाऱ्या गोष्टी आहेत. काही छायाचित्रे आहेत, काही जगावेगळ्या बातम्या आहेत. भावंडांबाबत लहानपणी केलेल्या जीवघेण्या उनाडक्याही आहेत. शिवाय इंटरनेटमध्ये बुडालेल्या अवस्थेत  ‘तू काय करतेस?’ या नवऱ्याच्या प्रश्नावर इथे तासच्या तास नक्की आपण काय करीत होतो, आत्ता काय करणार आहोत या संभ्रमावस्थेत उत्तरच न देता येऊ शकणारी स्थिती आहे. दहा प्रकरणांच्या या कादंबरीत पहिल्या भागात छोट्या परिच्छेदांची मोकाट सात प्रकरणे आहेत. दुसऱ्या भागातील तीन प्रकरणे ‘कथानक’ या घटकाला बांधतात. निवेदिकेच्या गरोदर बहिणीच्या होऊ घातलेल्या बाळाला दहा लाखांत एकास होणारा दुर्धर आजार असल्याचे तपशील येथे येऊ लागतो. त्यानंतरही निवेदनातील विनोदाची मात्रा कमी होत नाही. पण काय घडणार आहे, याची जाणीव वाचकाला होऊ लागते. आपल्या चिमुकल्या भाचीबाबत- नेमाडेंच्या ‘कोसला’तील ‘मनी’वर्णनाला साजेशा- अत्यंत नाजूक आणि धारदार मनोभूमिकेत जाऊन केलेली विस्तारित वर्णने अवघडून टाकतात. नेमाडे मनीच्या इवल्याशा गर्भालयाचा संदर्भ देतात, तर इथे लॉकवूडची निवेदिका भाचीच्या वेगळ्याच अवयवाचा विचार करीत राहते. विनोदाचा अखंड मारा झेलल्यानंतर ‘ट्रॅजिकॉमेडी’च्या नव्या अध्यायाला वाचकाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे लागते.

पॅट्रिशिया लॉकवूडच्या दोन बहिणींची बाळंतपणे अलीकडच्या वर्षांत तिच्या कुटुंबावर आघात करणारी होती. या दोन्ही बहिणींची पुढले काही महिने सांत्वनसोबत करणाऱ्या लॉकवूडने आत्मानुभव, नेटानुभव यांद्वारे शब्दांचा ‘मॅजिक मुहल्ला’ घडविला आहे. इंटरनेटवरच्या संकल्पना, माध्यमात सर्रास वापरली जाणारी लघुभाषा यांच्याशी परिचय असणे, ही या मुहल्ल्यात वावरण्याची पहिली अट आहे. ती पूर्ण केली की तिथे नादभटकंती सर्वात सोपी आहे. याशिवाय माध्यमाश्रित जगातही लेखक-कवी भाषेचा प्रवाह जपण्याचा आणि त्याला फुलविण्याचा आपापल्या परीने कसा प्रयत्न करीत आहेत, याचे उदाहरण म्हणूनही या कादंबरीकडे पाहता येईल.

pankaj.bhosale@expressindia.com

((