निर्मितीपासून अस्मितेच्या शोधात असलेल्या पाकिस्तानचा आजवरचा रसातळाच्या दिशेने झालेला प्रवास मांडणारं हे पुस्तक..

‘पाकिस्तान : कोर्टिग द अबीस’ या पुस्तकात सध्याच्या पाकिस्तानचे वर्णन करताना लेखक तिलक देवशेर यांनी हिंदी लेखक यशपाल यांच्या ‘पर्दा’ (पडदा) नावाच्या कथेशी तुलना केली आहे. या कथेचा नायक चौधरी पीर बक्ष एका मामुली सरकारी नोकराचा अशिक्षित नातू असतो. लग्नानंतर त्याला बायको, पाच मुले आणि आईसह शहरातील कामकरी वसाहतीत लहानसे घर भाडय़ाने घेऊन राहावे लागते. मोठय़ा मुश्किलीने हातातोंडाची गाठ पडत असली तरी मध्यमवर्गीय संस्कारांमुळे गरिबी लपवण्यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते. मात्र घर चालवण्यासाठी त्याला पंजाबी खान नावाच्या सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. ते फेडता न आल्याने एके दिवशी खान त्याच्या दारात येऊन वसुलीसाठी तगादा लावतो. पण बक्ष पैसे देण्याच्या स्थितीत नाही हे पाहून खान चिडतो आणि रागाच्या भरात बक्षच्या घराच्या दारावरील पडदा ओढून काढतो. आतले  दृश्य पाहून त्याला व शेजाऱ्यांना बक्षच्या गरिबीची कल्पना येते. घरच्या महिलांकडे धड लज्जारक्षणापुरते कपडेही नसतात. आजवर या पडद्यामागे बक्षची अब्रू लपून राहिलेली असते. मात्र तो पडदा दूर हटल्यानंतर जे वास्तव समोर येते आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांसमोर नाचक्की होते, तिने बक्ष इतका हादरून जातो, की खान गेल्यावर तो पडदा पुन्हा दारावर लावण्याचे भान किंवा त्राणही त्याच्यात उरत नाही. त्याचा खोटा सन्मान कायमचा उद्ध्वस्त झालेला असतो.

हे वर्णन पाकिस्तानला अत्यंत चपखलपणे लागू होते. जगातील आठव्या क्रमांकाचे मोठे लष्कर आणि अण्वस्त्रांच्या पडद्यामागे पाकिस्तानचे दारुण वास्तव लपून राहिले आहे. पीर बक्ष जसा अशिक्षित होता तशीच पाकिस्तानची बहुसंख्य जनता अडाणी असून त्या देशात शिक्षणाच्या आघाडीवर खरोखरच आणीबाणी आहे. बक्षचे पोराबाळांचे लटांबर आणि पाकिस्तानची फुगलेली लोकसंख्या यांच्यात साम्य आहे. या लोकसंख्येला योग्य शिक्षण दोऊन, क्षमता विकसित करून, रोजगार पुरवून तिचा देशाच्या उभारणीत वापर करण्यात पाकिस्तान कमी पडले आहे. बक्षची पैसे कमावण्यातील असमर्थता आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत साधम्र्य आहे. तर बक्षच्या कर्जाची तुलना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, अमेरिका व अन्य देशांकडून घेतलेल्या कर्जाशी करता येईल. ज्या दिवशी पाकिस्तानच्या सेनादलांचा पडदा फाटेल त्या दिवशी पाकिस्तानचे भयाण वास्तवही जगापुढे तसेच नागवेपणाने उभे असेल, असे लेखक म्हणतात.

पाकिस्तानविषयीची सर्वसाधारण पुस्तके केवळ राजकारण, लष्करी सत्ता, दहशतवाद आणि काश्मीर-प्रश्न इतक्यापुरतीच मर्यादित असतात. पण देवशेर यांचे हे पुस्तक त्या पलीकडे जाऊन पाकिस्तानच्या निर्मितीमागील प्रेरणा, त्याचा आजवरचा प्रवास, एक देश म्हणून ओळख शोधण्याची धडपड, दहशतवादाचा स्वत:वरच उलटलेला भस्मासुर या बाबींचा धांडोळा तर घेतेच; पण त्याबरोबरीने तेथील संस्थात्मक रचनेचा अभाव, पायाभूत सुविधांच्या उभारणींकडील दुर्लक्ष, शिक्षण क्षेत्राची सतत हेळसांड केल्याने निर्माण झालेली कडेलोटाची अवस्था, ऊर्जेची (वीज, इ.) कमतरता, दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करणारा पाणीप्रश्न, लोकसंख्येचा स्फोट आणि रोजगारांची मारामार, अर्थव्यवस्थेची दयनीय अवस्था या साऱ्यांचाही अत्यंत सखोलपणे वेध घेते. त्यामुळेच माजी गुप्तहेर आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयातील निवृत्त विशेष सचिव तिलक देवशेर यांचे हे पुस्तक वेगळे ठरते.

पाकिस्तानचे निर्माते महम्मद अली जीना यांच्या काळात तो देश (वरकरणी का होईना) काहीसा मुक्त विचारांचा होता. जीनांच्या कल्पनेतील पाकिस्तान हा मुस्लिमांसाठीची वेगळी भूमी होता, इस्लामी राष्ट्र नव्हता. मात्र जीनांच्या निधनानंतर लगेचच पाकिस्तानने इस्लामी राष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू केला, असे देवशेर यांनी लिहिले आहे. इस्लामच्या मूळ तत्त्वांचे विकृतीकरण आणि त्यांचा लावलेला चुकीचा अन्वयार्थ हीच पुढे पाकिस्तानची विचारधारा बनली. अन् आपणच कसे या विचारधारेचे खरे रक्षणकर्ते आहोत, हे दाखवण्याची अहमहमिका तेथील लोकनियुक्त सरकारे आणि लष्करी हुकूमशहा यांच्यात लागली आहे. पंजाबी मुस्लिमांचा सर्वच क्षेत्रांतील वरचष्मा, अन्य प्रांतीय व भाषिक अस्मितांचे दमन यातूनच स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली आणि सिंधी, बलुची व अन्य समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन संघर्ष सुरू झाला. मुस्लिमांमधीलच शिया व सुन्नी पंथांतही सशस्त्र संघर्ष (सेक्टरियन व्हायोलन्स) उभा राहून त्यात अनेकांचे प्राण गेले.

पुढे याच अनुषंगाने लेखकाने पाकिस्तानमधील मुलकी प्रशासन आणि लष्कर यांच्यातील संबंधांचे विवेचन केले आहे. १९७१ च्या युद्धातील पराभवानंतर झुल्फिकार अली भुट्टो, कारगिल  युद्धानंतर नवाझ शरीफ आणि अबोटाबाद येथील कारवाईत अमेरिकेने ओसामा बिन लादेन याला मारल्यानंतर असिफ अली झरदारी या तीन नेत्यांना लष्कराचे पंख कापण्याची संधी मिळाली होती. मात्र त्यांनी ती गमावली, असेही लेखकाने नमूद केले आहे. लष्कराचे कट्टर इस्लामीकरण आणि दहशतवाद्यांशी साटेलोटे या बाबी पाकिस्तानला महागात पडल्या आहेत. देशाच्या स्वतंत्र अस्तित्वापैकी निम्म्या काळात लष्करी हुकूमशाही होती. फ्रेंच सुधारणावादी तत्त्वज्ञ व्हॉल्टेअर यांचे एक वचन येथे तंतोतंत लागू होते. ते म्हणजे- ‘व्हेअर सम स्टेट्स हॅव अ‍ॅन आर्मी, प्रशियन आर्मी हॅज अ स्टेट’. त्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये लष्कर इतके प्रभावी आहे, की त्या देशाकडे लष्कर आहे म्हणण्यापेक्षा पाकिस्तानी लष्कराकडे देश आहे असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरते, याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे. अमेरिकेतील  ९/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर अमेरिकेने काहीसे नियंत्रण आणण्यास सुरुवात केली असली आणि पाकिस्तानने वायव्य सरहद्द प्रांतातील दहशतवाद्यांविरुद्ध मोहिमा राबवल्या असल्या तरी पाकिस्तानी लष्कर, आयएसआय ही हेरसंस्था आणि दहशतवाद्यांचे संबंध हे जगातील उघड गुपित आहे.

मात्र या सर्व विवेचनापेक्षा पुस्तकातील ‘द वीप अ‍ॅनलिसिस’ हा विभाग वेगळा व महत्त्वाचा आहे. ‘वीप’(हएएढ) म्हणजे वॉटर, एज्युकेशन, इकॉनॉमी व पॉप्युलेशन या इंग्रजी शब्दांची आद्याक्षरे घेऊन केलेले संक्षिप्त रूप. त्यात पाकिस्तानमधील पाणीप्रश्न, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या या संदर्भात खोलवर विश्लेषण आहे. या एकेका विषयावर पुस्तकात स्वतंत्र प्रकरण आहे. पाकिस्तानच्या अस्तित्वाला अन्य कोणत्याही घटकापेक्षा या घटकांकडून अधिक धोका असल्याचे लेखकाने अधोरेखित केले आहे. पाकिस्तानमध्ये २०३५ सालापर्यंत तीव्र पाणीटंचाई भेडसावू लागेल. देशात पाण्याची साठवण करण्यासाठी पुरेशी धरणे नाहीत आणि असलेले पाणी नियोजनपूर्वक वापरण्याची व्यवस्था नाही. शिक्षण विकास निर्देशांकानुसार जगातील १२० देशांत पाकिस्तानचा ११३ वा क्रमांक लागतो. सरकारी शाळा आणि मदरसांमधील शिक्षणक्रम कट्टर धार्मिक असून त्याचा जागतिक शिक्षणव्यवस्थेशी मेळ नाही. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत रचनात्मक दोष मोठे आहेत. सरकार व नागरिकांची बचत आणि कर्जाचे प्रमाण यात मोठी दरी आहे. लोकसंख्येचा स्फोट हा आणखी एक मुद्दा. वास्तविक व्यवस्थित हाताळणी केली तर ती जमेची बाजू ठरू शकते. पण आज तरी पाकिस्तानसाठी ती हाताबाहेर चाललेली समस्या आहे.

त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील भारत, अफगाणिस्तान, चीन व अमेरिका या देशांशी असलेल्या संबंधांचा आढावा घेतला आहे. त्यात भारताबरोबर अनाठायी बरोबरी साधण्याची (त्यातही लष्करी बाबतीत) धडपड, अफगाणिस्तानात वर्चस्व स्थापित करण्याचे प्रयत्न, अडीनडीला कामी येणारा मित्र म्हणून चीनशी दोस्ती, तर अमेरिकेवरचे अवलंबित्व हेच पाकिस्तानच्या परराष्ट्र संबंधांचे सूत्र राहिले असल्याचे  लेखकाने अधोरेखित केले आहे.

एकूणच निर्मितीपासून अस्मितेच्या शोधात असलेल्या पाकिस्तानचा आजवरचा रसातळाच्या दिशेने झालेला प्रवास या पुस्तकात यथायोग्य मांडला आहे.

पाकिस्तान : कोर्टिग द अबीस

  • लेखक : तिलक देवशेर
  • प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
  • पृष्ठे : ४५०, किंमत : ५९९ रुपये

sachin.diwan@expressindia.com