करोनाकाळात मदतकार्य करणाऱ्या सोनू सूद यांच्याप्रमाणेच सामाजिक विषयांवर लेखन करणारे आणि मानवी हक्क कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे हर्ष मंदर यांच्याही कार्यालयावर त्याच कारणांसाठी छापे घालण्यात आले असले, तरी ‘लॉकिंग डाउन द पुअर’ हे टाळेबंदी काळात मजुरांच्या झालेल्या हालांना वाचा फोडणारे त्यांचे पुस्तक डिसेंबर २०२० मध्ये प्रकाशित झालेले होते. नवे, २०२१ च्या ऑगस्टात आलेले ‘धिस लॅण्ड इज माइन, आय अ‍ॅम नॉट ऑफ धिस लॅण्ड’ हे ४२२ पानी पुस्तक नागरिकत्व दुरुस्ती कायदा  (सीएए)आणि ‘राष्ट्रीय नागरिक नोंदवही’ (एनआरसी) यांचा आसामातील उगम, वाटचाल, सद्य:स्थिती आणि परिणाम यांविषयी आहे.  हर्ष मंदर आणि नवशरण सिंग हे त्याचे संपादक आणि पुस्तकाच्या चार विभागांत मिळून ४० हून अधिक लेखक. यापैकी अनेक लेख वृत्तपत्रे, इंटरनेट आधारित वा छापील नियतकालिके यांत पूर्वप्रकाशित झाले आहेत. हे पत्रकारांचे, मानवी हक्कांचा अभ्यास करणाऱ्या वकिलांचे लेख. शिवाय आसामच्या ‘मिया पोएट्री’ प्रकारातील काही कविताही पुस्तकात आहेत. मात्र ‘जेंडर्ड एक्स्ल्यूजन्स’ हा महिलांवरील अन्याय मांडणारा वर्णा बालकृष्णन आणि नवशरण सिंग यांचा लेख, तसेच ‘द वे फॉरवर्ड’ हा लेख (लेखक मोहसीन आलम भट, अब्दुल कलाम आझाद आणि हर्ष मंदर) असा अप्रकाशित आणि महत्त्वाचा ऐवजही पुस्तकात आहे. १९५१ पासून सुरू झालेल्या या प्रश्नाची अनेक लेखांमध्ये विखुरलेली- त्यामुळे विविधमुखी- मांडणी अन्य लेखांमधून झालेली आहेच, पण त्या मांडणीला आकार या दोन लेखांनी दिला आहे. न्यायप्रक्रिया पारदर्शक करा, अपीलेट न्यायालयांची संख्या आणि त्यांची तत्परता वाढवा, ‘फॉरेनर्स ट्रायब्यूनल’मध्ये निर्वासित कायद्यास अनुकूल बदल करा, ‘पुरावे’ याची व्याख्या तसेच नियम यांना मानवी चेहरा द्या, ‘प्रतीक्षागृहांतील न-नागरिक’ म्हणून बंदिवासात ठेवलेल्यांसाठी बंदिगृहांमध्ये किमान सुविधा तरी द्या, विशेषत: बालकांच्या हक्कांचे उल्लंघन करणे टाळा, नैसर्गिकीकरणाने नागरिकत्व या प्रक्रियेचा विचार करा अशा तपशीलवार सूचना ‘द वे फॉरवर्ड’ या लेखात आहेत. पुस्तकाची प्रस्तावना आणि उपोद्घात, दोन्ही लिहिताना हर्ष मंदर यांचा सूर राज्ययंत्रणेला तिच्या कर्तव्यांची जाणीव करून देण्याचा आहे. मात्र हाच सूर राज्ययंत्रणाविरोधी असल्याचा (गैर)समज काही निवडक ओळींद्वारे पसरवला जाऊ शकतो.  विशेषत: उपोद्घात लिहिताना, केवळ ‘सीएए’ नव्हे तर केंद्र सरकारचे अन्य काही नवे कायदेही गरीबविरोधी असल्याचे कसे दिसून येते, याचा समाचार मंदर यांनी घेतला आहे. अर्थात, या मतांच्या पलीकडे पुस्तकाला संदर्भमूल्यही आहेच.