ऑस्ट्रेलियातल्या समाजशास्त्रज्ञ डेबोरा ल्युप्टन, अमेरिकी ‘एफडीए’ (अन्न-औषध प्रशासन)चे माजी प्रमुख डॉ. स्कॉट गॉटलिएब आणि अमेरिकेतल्या मिनसोटा विद्यापीठातील ‘मिनसोटा डिझाइन सेंटर’चे प्रमुख टॉम (थॉमस) फिशर यांचे अभ्यास-विषय निरनिराळेच. यापैकी गॉटलिएब यांचे पुस्तक अमेरिकेतील वैद्यकीय सेवांची, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची जी काही धरसोड वृत्ती दिसली त्यावर टीका करताना ‘अमेरिकी व्यवस्था महासाथीचा सामना करण्यास पुरेशी नाही’ अशी साधार, तपशीलवार कबुली देणारे आहे. ‘अनकंट्रोल्ड स्प्रेड- व्हाय कोविड- १९ क्रश्ड द यूएस अ‍ॅण्ड हाउ वी कॅन डिफीट द नेक्स्ट पँॅडेमिक’ हे या पुस्तकाचे नाव.

प्रा. ल्युप्टन या समाजविज्ञानाच्या भूमिकेतून करोना काळाची छाननी करतात. मानव आणि मानवेतरांचे संबंध या काळात बदलले, मुखपट्टी ही सामाजिक शिस्त म्हणून पाळताना समाजातील तसेच व्यक्तिगत तगमग दिसून आली, त्याहीपेक्षा राज्ययंत्रणा आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा यांच्या विषयीच्या अपेक्षांचे पुनरावलोकन समाजाने केले हे त्यांचे निष्कर्ष ऑस्ट्रेलियातील त्यांच्या निरीक्षणांवर आधारित असले, तरी ते केवळ ऑस्ट्रेलियापुरते निश्चितच नाहीत! त्यांनी संपादित केलेल्या ‘कोविड सोसायटीज- थिअरायझिंग द करोनाव्हायरस क्रायसिस’ या आगामी पुस्तकात अन्य सहकाऱ्यांचेही लेख आहेत. तिसरे पुस्तक मात्र अद्याप आकार घेते आहे. त्याची घोषणा झाली असली, तरी मुखपृष्ठ तयार नाही. ‘डिझाइन इन अ पोस्ट-पँडेमिक वर्ल्ड  ’या त्या पुस्तकाचा भर आहे तो घरून काम करण्याची सक्ती/ सोय/ सवय यांवर. ‘दोनतृतीयांश अर्थव्यवस्था घरून काम करूनही चालू शकते. कार्यालयीन इमारतींचा फेरवापर आपण करू शकतो’ असे त्याचे लेखक टॉम फिशर यांचे म्हणणे. आणखीही अनेक पुस्तके कोविडविषयी निघतील, पण या तिन्ही पुस्तकांत निराशेतून आशेकडे जाणारे धडे आहेत, एवढे नक्की!