स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांवर त्यातही मुस्लीम महिलांवर असलेली अनेक सामाजिक बंधने झुगारून रशीद जहान स्वत:च्या अटींवर जगली. तिने टीकेची तमा न बाळगता सामाजिक वास्तव आपल्या लेखनातून, नाटकांतून जगापुढे मांडले.

डॉ. समीना दलवाई

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

दिल्लीतील लेखिका रक्षंदा जलिल यांनी ‘अ रिबेल अ‍ॅण्ड हर कॉज’ हे पुस्तक लिहिले आणि भारतीय इतिहासातील विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले एक झळाळते व्यक्तिमत्त्व- डॉक्टर रशीद जहान लोकांसमोर आणले. पाच पिढय़ांपूर्वी डॉक्टर, लेखक, कम्युनिस्ट अशा विविध भूमिका जगलेली रशीद जहान आज एक आश्चर्य भासते. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश साम्राज्याचा सुवर्णकाळ सुरू होता आणि भारतीयांना स्वातंत्र्याचे वेध लागले होते. उत्तर भारतातील मुस्लीम समाज एकीकडे मातबर अशरफ घराणी आणि दुसरीकडे साम्राज्यवादाने नागवलेले कारागीर यांत विभागला होता. सर सय्यद अहमद यांनी मुस्लीम मुलांसाठी अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीची स्थापना केली. मुलींच्या शिक्षणाबद्दल मात्र अनास्था होती. तेव्हा शेख अब्दुल्लाह आणि बेगम वाजिद जहान या दाम्पत्याने अलिगढमध्ये पहिली मुलींची शाळा काढली. परदानशीन मुली बंद बैलगाडीतून शाळेत येत. लोक त्यांना घाबरवत म्हणून लवकरच वसतिगृहही सुरू करण्यात आले. 

रशीद जहान ही त्यांची मुलगी. ती याच शाळेत शिकली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ती महाविद्यालयीन शिक्षणासाठी लखनौला गेली. फक्त मुलींचे महाविद्यालय, पण त्यात वाचन, खेळ, पोहणे हे सर्व जोरात चाले. लखनौमधल्या दोन वर्षांत तिच्यातील आत्मविश्वास वृिद्धगत झाला आणि ती  स्वावलंबी झाली. त्यानंतर तिने दिल्लीला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. अलिगढ सोडतानाच तिने आईला सांगितले होते, ‘मला आता बाहेरच्या जगात फिरताना, शिकताना पडदा पाळणे जमले नाही, तर माफ कर.’ आईनेही मान्य केले. इतक्या बुद्धिमान लेकीला बांधून ठेवणे तिलाही रुचले नसतेच. डॉक्टर झाल्यावर रशिद जहानने स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून अनेक लहान शहरांत काम केले. तेव्हा तिला भारतातील बायकांची भयंकर परिस्थिती समजली. त्यांचे आजार व दु:ख तिने जवळून पाहिले. लेखनातून मांडले.

तिच्या कथांमध्ये अनेक वर्गातील स्त्रिया भेटतात. उच्च वर्गातील तहजीब आणि भाषा तिच्या लेखनात जेवढी लीलया प्रतिबिंबित होते, तेवढय़ाच सहजतेने ती कामगार वर्गाच्या भाषेतही लिहिते. मंटोच्या आधी रशीद जहानने वेश्यांना आपल्या कथांच्या नायिका बनवले होते. उदा.: ‘वोह’ कथेमध्ये दोन स्त्रिया, त्यातली एक शिक्षिका आणि दुसरी सिफीलिसची लागण झालेली वेश्या या एकमेकींना भेटतात आणि सुरुवातीच्या अवघडपणानंतर गप्पा करू लागतात. तिच्या नाटकात दोन बेगमा, सख्ख्या बहिणी एकमेकींशी गप्पा मारताना दिसतात. नवऱ्यांची न संपणारी हवस, सततची गर्भारपणे, अवघड व वेदनादायक बाळंतपणे, शिवलेली गर्भाशये आणि पोरांचे लटांबर या सर्वावर भाष्य करतात. उच्चवर्गीय स्त्रियांचे जनानखान्यातले जीवन पडद्याआडच बरे, हे तिला मान्य नव्हते. या दृष्टीआडच्या सत्याला तिने साहित्य बनविले. तिचे हे नाटक १९३२ मध्ये ‘अंगारे’ या वादग्रस्त संग्रहात प्रसिद्ध झाले. चार तरुण लेखकांनी मिळून प्रकाशित केलेले हे पुस्तक चांगलेच गाजले. त्यामुळे एका बाजूला प्रखर समाजचित्रण करणाऱ्या लेखनाला चालना मिळाली, तर दुसऱ्या बाजूला उर्दू जगतात कल्लोळ माजला, वर्तमानपत्रात अश्लील साहित्य म्हणून टीका झाली. पुस्तकावर बंदीची मागणी झाली. इंग्रज सरकारने ती मान्यही केली.

‘अंगारे’मधील दोन साथी पुढे मोठे लेखक झाले आणि त्यांनी ‘तरक्की पसंद मुस्सानाफीन ए हिंदू’ म्हणजेच ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन’ची स्थापना केली. या संघटनेशी फैज अहमद फैज, मुल्कराज आनंद, मुन्शी प्रेमचंद यांसारखे भारतातील अनेक मोठे लेखक जोडले गेले. सआदत हसन मंटो व इस्मत चुगताईही याच प्रवाहातले.

‘अंगारे’चा तिसरा लेखक होता साहिबजादा महमूद जफर. उमराव घराण्यातला असल्यामुळे शालेय शिक्षणापासूनच त्याचे इंग्लंडमध्ये वास्तव्य होते. तरुणपणी देशप्रेमामुळे त्याला इंग्रजांचा तिटकारा वाटू लागला. शिक्षण पूर्ण झाल्यावर लखनऊला परतला तेव्हा चांगले उर्दू लिहिता येत नसल्यामुळे अस्वस्थ झाला. त्याने ‘अंगारे’साठी खूप प्रयत्नपूर्वक कथा लिहिली. या काळात रशीद जहान त्याला भेटली आणि तो तिच्या प्रेमात पडला. त्यांनी लग्न केले आणि आयुष्यभर एकमेकांना साथ दिली. सायप्रस आणि चिनार वृक्षासारखे प्रेम – एकमेकांच्या सोबत वाटचाल परंतु एकमेकांच्या छायेत अडकून गुदमरायचे नाही. कम्युनिझममधील एकता, समता, बंधुता या तत्त्वांकडे आकर्षित होऊन त्यांनी राजकीय लढय़ांत भाग घेतला. महमूदने तर आपली सर्व मालमत्ता, जमिनी कुळांमध्ये वाटून टाकल्या.

अंगारेच्या लेखकांमधील एकटीच स्त्री म्हणून रशीद जहानला तीव्र रोषाचा सामना करावा लागला. तिला ‘अंगारेवाली’ म्हणून संबोधले जाऊ लागले. नाक कापून टाकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. तिच्या वडिलांच्या शाळेला ‘रंडीखाना’ म्हटले गेले. परंतु आई-वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि सर्वच जण शांतपणे आपले काम करत राहिले.

गंमत म्हणजे इस्मत चुगताई रशीद जहानच्या आई-वडिलांच्या शाळेत शिकत होती, तेव्हा रशीद जहान दिल्लीला राहायची. अचानक ती उगवायची. रात्रीच्या ट्रेनने एकटीच प्रवास करून! कधी तिच्याबरोबर एखादी निश्राप मुलगी असे, जिला नातेवाईकांच्या लैंगिक छळापासून सोडवायला हिने पळवून आणलेली असे. सकाळी आई-वडिलांशी बंद खोलीत खलबते करून त्या मुलीला त्यांच्याकडे सोडून रशीद आपा पुन्हा रात्रीच्या ट्रेनने परत रवाना. वसतिगृहातल्या मुलींची ती हिरो होती. कधी राहायला आली तर चर्चा, वादविवाद होत. ‘अंगारे’ प्रसिद्ध झाले आणि त्यावर खूप टीका झाली. तेव्हा वसतिगृहातील सर्व जणींनी ठरवले, आपण स्वत: वाचायचे. एका रात्री सगळय़ा एकत्र बसल्या. खिडक्या पडदे बंद केले आणि लालटेनच्या उजेडात चोरून आणलेली एक कॉपी वाचून काढली. पुस्तक सर्वाना फार आवडले आणि ‘अश्लील’ तर काहीच सापडले नाही.

इस्मत चुगताईसारखी रशीद जहान पूर्ण वेळ लेखिका नव्हती. तिच्या लेखनात तो सफाईदारपणा व लेखन कौशल्य नव्हते. पण तिच्या लेखनाचा हेतूच मुळी सत्य परिस्थिती मांडणे, हाच होता आणि तिचे सर्व लेखन अस्वस्थ करणारे होते. १९३६ मध्ये तिचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला त्याचे नाव होते ‘औरत’. ज्यात ‘औरत’ नावाचे नाटकही होते. नवऱ्याकडून लैंगिक रोगाची लागण झालेली एक स्त्री त्याला शेवटी घराबाहेर काढते, असे त्याचे कथासूत्र होते. ‘आसिफ जहानची सून’ या कथेत एका सभ्य घराण्यातील तरुण स्त्रीचे बाळंतपण नातेवाईक स्त्रियांच्या गराडय़ात आणि जुनाट दु:खदायक पद्धतीने पार पडते आणि लगेचच नवजात बालिकेला तिच्या आत्याच्या मुलाची नवरी म्हणून निश्चित करण्यात येते.

नंतरच्या काळात रशीद जहान नाटय़लेखिका झाली आणि ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ची  (इप्टा) अविभाज्य घटकही झाली. ‘इप्टा’साठी तिने अनेक नाटके लिहिली. कथा लिहून छापण्यासाठी वाट बघा, मग लोकांनी वाचायची अपेक्षा. नाटक ताबडतोब स्टेजवर सादर करता येत होते. तिने रेडिओ शोसुद्धा लिहिले. फाळणीच्या काळात तिने धार्मिक तेढ वर्गीय शोषण यावरही लेखन केले. कधीतरी एकदा ‘इप्टा’च्या नाटकाला गेली आणि स्टेजवर कलावंतांचे फाटके कपडे बघून दिग्दर्शकाला म्हणाली ‘काय रे हे?’ तो उत्तरला, ‘आपल्याकडे हेच कपडे आहेत. नवीन घ्यायला पैसे कुठले?’ ती म्हणाली, ‘चल माझ्याबरोबर.’ घरी जाऊन आपल्या कपाटांतून सगळे भारी कपडे, खऱ्या जरीच्या साडय़ा उचलून देऊन टाकल्या. अगदी नवऱ्याची लग्नातली शेरवानी देखील. हे कपडे मग पुढची अनेक वर्षे इप्टाची मालमत्ता होते. ते अनेक नाटकांत वावरले.

रशीद जहान आयुष्य आपल्या मर्जीने, आपल्या हिमतीवर जगली. तिला समाजाचा रोष सहन करावा लागला, तसेच खूप प्रेमही लाभले. आई-वडील, बहिणींनी माया केली, नवऱ्याने साथ दिली आणि मित्रमंडळी, फॅन क्लब तर अफाटच! इस्मत चुगताई म्हणत, ‘मला रशीद आपासारखे व्हावे वाटे. ती कशी बिनधास्त होती आणि आपले म्हणणे ठासून जोरात मांडत असे.’

शबाना आझमींना मी त्या रशीद जहानला ओळखतात का, असे विचारले. त्यांचे आई- वडील कैफी आझमी व शौकत बेगम हेही कम्युनिस्ट विचारसरणीचे कलाकार होते. त्या म्हणाल्या, ‘अर्थात! अत्यंत रोमांचकारी होतं तिचं व्यक्तिमत्त्व. एकदा आमच्या घरी आली आणि अब्बांचा चौकडीचा कुर्ता बघून म्हणाली, हा छान दिसतोय. मी घालणार हा. आणि लगेच कपडे बदलून तो कुर्ता घालून निघूनही गेली पुढच्या मीटिंगला. सदा व्यग्र असायची ना..’

महमूदचा स्निग्ध, शांत स्वभाव आणि रशीद जहानचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व लेखक, कलाकार, क्रांतिकारी यांनी त्यांचे घर सतत भरलेले असे. दोघेही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य असल्यामुळे कम्यूनसारखी जीवनप्रणाली होती.

रशीद जहानचा अंत अवघ्या ४६व्या वर्षी झाला. तिला कर्करोगाने ग्रासले आणि आपण यातून वाचणार नाही हे तिला कळून चुकले. पण तिला रशियाहून पत्रे आली. ‘कॉम्रेड, आमच्याकडे उपचारांसाठी या. मॉस्कोच्या नामवंत रुग्णालयात दाखल व्हा. आम्ही तुम्हाला बरे करू,’ तिने विचार केला, चला जगाची सफर तर होईल. आणि महमूदला रशिया बघायला मिळेल. कम्युनिस्टांची मक्का असलेला सोव्हिएत युनियन! दोघांनी मग युरोपातील अनेक देशांतून भटकंती केली. तिची तब्येत खालावत होती आणि शरीराचे हाल वाढत होते. पण चित्त मात्र प्रसन्न होते. मॉस्कोला पोहोचल्यावर उपचार सुरू झाले. तेव्हा तिथल्या डॉक्टरांना म्हणाली, ‘मी तुमची कॉम्रेड आणि डॉक्टर आहे. मला तसे वागवा. काय इलाज करताय त्याची चर्चा माझ्याशी करा.’ त्यांनी ते मान्य केले. खूप झुंज देऊनही कर्करोग नियंत्रणात आला नाही. जुलै १९५२ मध्ये तिचा मृत्यू झाला. महमूद पुढे तीन वर्षे रशियात राहिला. या काळात त्याने तेथील समाज आणि राजकारणाचा अभ्यास केला.

पुढच्या पिढय़ांना आश्चर्य वाटावे, असे हे आयुष्य. आपल्यात बदल शक्य झाला नाही की आपण समाजाला, काळाला दोष देतो. पण व्यक्तीच समाज घडवते, काळ बदलते हे ध्यानात ठेवले तर आपणही छोटी-छोटी क्रांती करू शकतो.

 ‘अ रिबेल अ‍ॅण्ड हर कॉज’

लेखिका : रक्षंदा जलिल

प्रकाशक : विमेन अनलिमिटेड

पृष्ठे : २४८, किंमत : ३९५ रु .