सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन हा एकोणिसाव्या शतकातील कलंदर ब्रिटिश अधिकारी. भ्रमंतीचं वेड आणि अज्ञाताचा-गूढाचा शोध, त्यातून स्वत:पर्यंत पोहोचण्याची आंतरिक ऊर्मी यांनी भारलेला. त्याच ऊर्मीने तो पश्चिम भारतात, तिथून मक्का व पुढे पूर्व आफ्रिकेत प्रवास करतो. बर्टनचा हा प्रवास व त्या दरम्यान त्याला भेटलेली माणसं, त्या त्या ठिकाणची संस्कृती व या सर्वाचा त्याच्या मनावर पडलेला प्रभाव, हे सारं ही कादंबरी कवेत घेतेच; पण बर्टनच्या प्रवासाच्या निमित्ताने ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहतवादी धोरणाची चिकित्साही करते.. त्यामुळेच बर्टनवरील आजवरच्या इतर लिखाणापेक्षा ही कादंबरी वेगळी ठरते..

देशांतर्गत सामाजिक आणि राजकीय घटनाक्रमांचा परिपाक म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यातून जर्मनीच्या आसऱ्याला येणाऱ्या लोकांसाठी सद्य:परिस्थितीत जर्मनीनं अंगीकारलेलं ‘विल्कोमेन्स्कूल्टूअर’, म्हणजेच स्वागत-संस्कृती सर्वविदित आहेच, पण गेली अनेक दशकं जर्मनी हे स्थलांतरितांसाठी नंदनवन ठरलं आहे. तुर्की कामगारवर्ग असो किंवा सर्बिअन, हन्गेरिअन, झेक किंवा रशियन स्थलांतरित, अरबी, इराकी किंवा सीरियन शरणार्थी- सर्वाना इथे उदार आश्रय मिळालेला आहे. मात्र, जर्मन जनजीवनाशी तादात्म्य पावण्यासाठी त्यांना जर्मन भाषा शिकावी लागते. जर्मनीची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक पाश्र्वभूमी यांचा परिचय या स्थलांतरितांना करून दिला जातो, रोजगारासाठी शिक्षण आणि संधी उपलब्ध होतात. आयुष्याशी दोन हात करण्याची नवी ताकद मिळते आणि विचारशक्तीलाही चालना मिळते. बदलत्या सामाजिक ताण्याबाण्यांचं आकलन हा अशा नवीन साहित्यिकांच्या ऊर्मीचा मूलस्रोत असतो. याच समूहांतून जर्मन ही मातृभाषा नसलेले, पण ज्ञानभाषा असलेले अनेक सिद्धहस्त साहित्यिक आणि प्रतिभाशाली कलावंत तयार होत असतात, जर्मनीच्या समृद्ध साहित्य-परंपरेत मोलाची भर घालत असतात, जर्मनीचं साहित्यविश्वही त्यांचं खुल्या दिलानं स्वागत करतं. प्रमाणभाषा, सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक संदर्भ या मुद्दय़ांवर ऊहापोह करून लेखनाचं वर्गीकरण न करता, केवळ सबळ साहित्यिक मूल्यांना महत्त्व देणारा हा प्रगत वाचक आणि समीक्षक आहे.

स्थलांतरित, विस्थापित, निर्वासित, राजकीय शरणार्थी- संबोधनं अनेकविध आहेत, भागधेय एकच. उभय समाजांतील भिन्नभिन्न संस्कृती, परंपरा, भाषा, धार्मिक व राजकीय संकल्पना यांचा अन्योन्याश्रय दैनंदिन जीवनचय्रेसाठी आणि सर्जनशीलतेसाठीही वरदान ठरू लागला आहे.

वानगीदाखल, समकालीन जर्मन साहित्यविश्वात मानाचं स्थान मिळविणारी काही अ-जर्मन बिनीची नावं म्हणजे फेरीडून झायमोग्लू, हतीस अक्यून (तुर्कस्तान), तेरेझिया मोरा (हंगेरी), निनो हरातीश्विली (जॉर्जिया), साशा स्तानिशिच (बोस्निया), योको तावाडा (जपान) आणि अब्बास खिदर (इराक). त्यातही, इलिया त्रोयानोव हे नाव परखड टीकाकार, विख्यात विचारवंत आणि साहित्यिक म्हणून जर्मन साहित्य क्षेत्रात खास मान्यता पावलं आहे. १९६५ साली बल्गेरियामध्ये त्याचा जन्म झाला. १९७२ मध्ये युगोस्लाविया आणि इटलीच्या मार्गानं त्याचं कुटुंब जर्मनीच्या राजकीय आश्रयाला आलं ते निर्वासित म्हणून. नंतर केनिया, नरोबी आणि पारि अशी भटकंती झाल्यावर म्युनिक विद्यापीठात त्यानं कायदा आणि मानववंशशास्त्राचा अभ्यास केला. मध्येच अल्पविराम घेऊन त्यानं आफ्रिकी साहित्याला वाहिलेल्या दोन प्रकाशन संस्था काढल्या आणि समकालीन आफ्रिकी साहित्याचं संकलन, आफ्रिकी साहित्याचा जर्मनमध्ये अनुवाद अशी अनेक आव्हानं त्यानं लीलया पेलली. १९९६ ते २००६ या काळात त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली. वाचकांनी उचलून धरलेलं त्याचं पहिलं पुस्तक म्हणजे ‘दी वेल्ट् इस्ट् ग्रोऽस उंड् रेटुंग् लाऊऽअर्ट् अ्यूबरआल्’ (जग विशाल आहे आणि सुटका दबा धरून बसली आहे.) त्याच्या कुटुंबाला निर्वासित आणि राजकीय शरणार्थी म्हणून आलेले विदारक अनुभव तो या पुस्तकात विदित करतो. नंतर त्यानं एक विज्ञान कादंबरी लिहिली. मग एक रिपोर्ताज कादंबरी, त्याच्या मूळ मातृभूमीला दिलेल्या भेटीवर आधारित मनाचा ठाव घेणारं हे वृत्तांकन. आत्मवृत्ताची किनार असलेली प्रवासवर्णनं, प्रवासवृत्तान्त, प्रवास-दैनंदिनी अशा मार्गावरून त्याची साहित्यिक यात्रा सुरू झाली.

१९९९ मध्ये इलिया भारतात आला आणि इथल्या बहुपेडी संस्कृतीच्या मनोरम जाळ्यात गुरफटला, मग अनेक र्वष त्यानं इथं वास्तव्य केलं. त्याच्या ‘अलाँग द गँजस’ या मूळ जर्मन पुस्तकाचा प्रवाही इंग्रजी अनुवाद प्रख्यात लेखक रणजीत होस्कोटे यांनी केला असून पेंग्विन बुक्स इंडिया यांनी २००५ साली तो प्रसिद्ध केला. फिलीप ब्योम यांनी अनुवादित केलेले त्याचे ‘द लॅमेन्टेशन्स ऑफ झेनो’ हे पुस्तक (मूळ जर्मन- ‘आईस् टाऊ’) नुकतेच वर्सो बुक्स, न्यूयॉर्क यांनी प्रसिद्ध केले आहे. त्रोयानोवने भारतीय इंग्रजीतील प्रसिद्ध लेखक रणजीत होस्कोटे यांच्यासमवेत दोन पुस्तकांचं सहलेखन केलं. पहिलं आहे- ‘काम्फ् आबझाऽगऽ’ आणि दुसरं, अलीकडे लिहिलेलं ‘कॉन्फ्लुएन्सेस- फरगॉटन हिस्टरिज फ्रॉम ईस्ट अ‍ॅण्ड वेस्ट’. आज आपण परिचय करून घेणार आहोत इलिया त्रोयानोवच्या ‘द कलेक्टर ऑफ वर्ल्डस्’ (मूळ जर्मन- ‘देअर वेल्टेन्झाम्लर’) – म्हणजेच ‘विश्वांचा संग्राहक’ या कादंबरीचा. या पुस्तकाबद्दल त्रोयानोवला २००६ साली लाईपत्सिग ग्रंथ संमेलनाचं बहुमानाचं पारितोषिक मिळालं. या पुस्तकाचा विक्रमी खप झाला आणि इंग्रजी भाषांतराच्या प्रतीही हातोहात विकल्या गेल्या.

या कादंबरीचा नायक आहे सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन- भ्रमंतीचं वेड आणि अज्ञाताचा-गूढाचा शोध, त्यातून स्वत:पर्यंत पोहोचण्याची आंतरिक ऊर्मी यांनी भारलेला. वीसपेक्षा अधिक भाषांवर बर्टनचं प्रभुत्व होतं. वात्सायनाचे ‘कामसूत्र’ या प्राचीन भारतीय ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करून त्यानं तत्कालीन इंग्लंडला हादरवून सोडलं होतं. लष्करातील अधिकारी, लेखक, संशोधक, भूगोलतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, कवी, उत्कृष्ट वक्ता, राजकीय मुत्सद्दी असे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. साहसी, धडाडीचा आणि रंगेल वृत्तीचा. पुरातत्त्व अभ्यासक, गूढवादी, देखणं, आकर्षक तरीही एक वादग्रस्त, वादळी, अविजित व्यक्तिमत्त्व. वेशांतरात तरबेज, उत्तम योद्धा; शीघ्रकोपी, अहंमन्य अन् विक्षिप्तही.

इलियानं या व्यक्तिरेखेच्या पायावर आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर घटनाक्रमांची एक रंजक आरास मांडली आहे. भ्रमंती हा रिचर्ड बर्टन आणि इलिया या दोघांचा स्थायीभाव, दोघेही व्यासंगी आणि चौफेर मेधावी, तरीही अवलिया आणि कलंदर शोधयात्री. त्यामुळे साहित्यकृतीच्या पातळीवरचा हा आत्मीय संबंध अजूनच गहिरा झाला असावा. अशा व्यक्तिमत्त्वाच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांना कल्पनेच्या आवरणाने नटवत जाणारी ही सौष्ठवपूर्ण कादंबरी रोचक आणि रंजक आहे, कारण प्रत्येक प्रकरणात निवेदनाचं परिप्रेक्ष्य बदलतं ठेवलं आहे. रिचर्ड बर्टन आणि त्याच्या प्रवासात त्याला भेटत जाणाऱ्या व्यक्तिरेखा या नकरेषीय बिंदूंनी या कादंबरीची मांडणी केली आहे. ही समकेंद्री कथात्मकता सखोल होत जाते ती या कादंबरीतील कथासूत्राच्या जोडीनं येणाऱ्या ब्रिटिश वसाहतवादाच्या विश्लेषणानं.

या कादंबरीचा पट विस्तीर्ण आहे. पहिल्या प्रकरणात नौकरराम हा बर्टनचा भारतीय नोकर लेखनिकाला बर्टनसाठी काम करणं कसं महाकठीण आहे, याची दु:खद कहाणी रसभरीत वर्णन करून सांगतो. स्थानिक भाषा आणि चालीरीती जाणून घ्यायला बर्टन किती उत्सुक होता, हे या संभाषणातून कळून येतं. ‘‘दुसऱ्या माणसाच्या जगात प्रवेश करायची कला त्याला जात्याच अवगत होती,’’ असं नौकरराम त्या लेखनिकाला सांगतो. लेखनिक त्याच्या परीनं ही माहिती अजून खमंग बनवतो. त्रोयानोवला कथाकथनाचं तंत्र चांगलंच अवगत आहे. त्यामुळे स्वत:च्या शोधात निघालेल्या बर्टनचं व्यक्तिमत्त्व आपल्याला भुरळ घालत राहातं.

दुसऱ्या प्रकरणात मक्केमध्ये कादी (शारीच्या न्यायालयातला न्यायाधीश), राज्यपाल आणि शारी मिळून बर्टनच्या हाजीचा लेखाजोखा घेतात. इथे त्रोयानोव अत्यंत चलाखीनं ओट्टोमान अधिकाऱ्यांच्या संवादातून हज यात्रा करण्यात बर्टनचा अंतर्गत हेतू काय होता, हे शोधण्याचा प्रयत्न करतो. १८५३ साली रिचर्ड बर्टन मक्केच्या वारीला गेला तेव्हा तो मुस्लीम नसल्याची शंकाही कुणाला आली नाही. त्याआधी त्यानं इस्लाम धर्माच्या श्रद्धेय तत्त्वांचा परिपूर्ण अभ्यास केला होता. मुस्लीम रीतिरिवाज, आचारविचार आणि व्यावहारिक सामाजिक नियम अंगीकृत केले होते. वेशांतर परिपूर्ण व्हावं म्हणून स्वत:ची सुंताही करून घेतली होती. एक संशयात्मा अधिकारी म्हणतो, ‘‘बर्टनचा सगळ्याच गोष्टींवर विश्वास आहे आणि कशावरच नाही, त्यामुळे त्याला मौल्यवान हिऱ्यासारखे पलू पाडणं शक्य आहे.’’ बर्टनच्या व्यक्तिमत्त्वातलं अंतिम सत्य इथे कुठे तरी दडलेलं आहे. ‘स्व’च्या अविरत शोधात निघालेला हा मनस्वी यात्रिक- अनाम दिशांचा अक्षय प्रवासी!

१९ व्या शतकात ब्रिटिश अधिकाऱ्यांना आफ्रिकेची सफर घडवून आणणारा सिदी मुबारक बॉम्बे हा गाईड अखेरच्या प्रकरणात भेटतो आणि बर्टन व त्याच्या शोधमोहिमेतील साहसी थरारकथा झान्जिबारच्या मित्रमंडळाला चवीनं रंगवून सांगतो. या शोधयात्रेत झालेल्या हल्ल्यात एक सोमाली भाला बर्टनच्या दोन्ही गालांतून आरपार गेला होता. त्या शोधमोहिमेचं वृत्तांकन इथे केलेलं आहे. पर्वतराजी, घाटवाटा, डोंगरदऱ्या, अरण्यप्रदेश यांची एक विलोभनीय मालिका आपल्या अंत:चक्षूंसमोर कथेच्या बरोबरीने सरकत राहते आणि हा वाचनानुभव अधिकच साजरा करून टाकते.

बर्टनची पत्नी इझाबेल ही व्यक्तिरेखा या कल्पित कादंबरीत फार उठावाने सामोरी येत नाही; पण खरं तर तिची धूसर सावली या साहित्यकृतीवर आहे. १८९० मध्ये रिचर्ड बर्टनचा मृत्यू झाला तेव्हा त्याची बदनामी होऊ नये म्हणून तिनं त्याची काही वैयक्तिक कागदपत्रं जाळून टाकली. काही कामप्रक्षोभक उताऱ्यांचे अनुवाद, रोजनिश्या, काही नोंदी, कविता, पत्रं आणि त्यानं आयुष्यभर केलेल्या सगळ्या प्रवासांतली गुपितं पोटाशी धरून सांभाळणारी अप्रकाशित हस्तलिखितं. या शोधयात्रिकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा कंगोरा अग्नीच्या मुखी पडला आणि कायम अनोळखीच राहिला. इलिया त्रोयानोवनं नेमका हाच कच्चा दुवा उचलला आणि बर्टनच्या आयुष्याचा आलेख रेखताना कल्पना आणि सत्य यांची मनोज्ञ गुंफण करून कथानकातल्या रिक्त जागा तो भरत गेला आणि एक काल्पनिक कहाणी त्यानं जिवंत करून टाकली. त्रोयानोवनं बर्टनचं प्रभावी व्यक्तिमत्त्व दमदारपणे रेखाटलं आहे. अनेक संभाषणं, घटना, विचार आणि व्यक्तिरेखा पूर्णत: काल्पनिक आहेत, तर काही वास्तवाच्या अनुषंगाने रेखाटलेल्या आहेत. सत्य कुठे संपतं आणि काल्पनिक विश्व कुठे सुरू होतं याची चाहूल लागू नये, इतकी ही वीण घट्ट आणि एकजीव गुंफलेली आहे.

विल्यम हॉब्सनच्या इंग्लिश भाषांतरानं मूळ संहितेला पुरेपूर न्याय दिला आहे. या कादंबरीत इलियाच्या व्यक्तिगत आयुष्याचे स्पष्ट कवडसे आहेत. इलिया त्रोयानोवमध्येही अनेक विश्वं नांदत आहेत. बल्गेरिअन आणि इंग्रजी भाषा बोलत मोठा झालेला इलिया नरोबीला जर्मनभाषिक शाळेत गेला आणि आता तो लेखन करतो तेही जर्मनमध्येच आणि राहतोही जर्मनभाषिक देशांत. हिल्डं डोमिन या अतिशय संवेदनशील ज्यू-जर्मन कवयित्रीनं एका कवितेत म्हटलं आहे –

‘माणसाला दूर निघून जायला जमलं पाहिजे

आणि तरीही जमायला हवं

एखाद्या झाडासारखं तगणं,

मुळं मातीतच राहून गेल्यासारखं-

भवताल पुढे सरकत असावं

आणि आपण स्तब्ध- रोवल्यासारखे.’

गेल्या काही दशकांतलं जर्मनीतलं साहित्य वाचलं, की प्रामुख्यानं या ओळी आठवतात.

  • ‘द कलेक्टर ऑफ वर्ल्डस्’
  • मूळ लेखक : इलिया त्रोयानोव
  • इंग्रजी अनुवाद : विल्यम हॉब्सन
  • प्रकाशक : फेबर अ‍ॅण्ड फेबर
  • पृष्ठे : ४५४, किंमत : (हार्डकव्हर- १९७५ रु., पेपरबॅक- ७५४ रु.)

 

– जयश्री हरी जोशी

snehjayam@gmail.com