निखिल बेल्लारीकर

साहित्यसंकेतबद्ध असूनही कैक मध्ययुगीन संस्कृत काव्ये नजीकच्या भूतकाळातील इतिहास व त्यातील इस्लामी सत्ता व मुसलमान समाज यांबद्दल अनेक पातळ्यांवर विस्तृतपणे व्यक्त होतात, हे सप्रमाण दाखवून देणाऱ्या पुस्तकाविषयी…

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा
Prepared primary textbooks in 52 vernacular languages of 17 states so that students have access to all study materials in their mother tongues
आपल्या बोलीतून शिकता यावे म्हणून..

संस्कृत साहित्य- त्यातही काव्ये म्हटली की, सर्वसाधारणपणे ललित वाङ्मयच बहुतांशी नजरेसमोर येते. कल्हणासारखे काही अपवाद वगळता संस्कृत काव्य आणि इतिहास हे जणू विरुद्धार्थी शब्द असावेतशी प्रतिमा जनसामान्यांतच नव्हे, तर अभ्यासकचमूतही बऱ्याच अंशी दृढमूल आहे. शिवाय भारतातील इस्लामी सत्ता व मुसलमान समाजाच्या इतिहासाची मुख्य साधने ही अरबी व फारसी भाषांत असल्याने संस्कृत साहित्याद्वारे त्यांवर काही प्रकाश पडू शकत नाही, असाही अनेकांचा समज आहे. अमेरिकेतील रटगर्स विद्यापीठातील प्राध्यापक ऑड्री ट्रश्कं यांनी त्यांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘द लँग्वेज ऑफ हिस्टरी : संस्कृत नॅरेटिव्ह्ज ऑफ मुस्लीम पास्ट्स’ या पुस्तकात वरील दोन्ही गैरसमजांचे विस्तृतपणे खंडन केले आहे. साहित्यसंकेतबद्ध असूनही कैक मध्ययुगीन संस्कृत काव्ये नजीकच्या भूतकाळातील इतिहास व त्यातील इस्लामी सत्ता व मुसलमान समाज यांबद्दल अनेक पातळ्यांवर विस्तृतपणे सांगतात, हे ट्रश्कं यांनी सप्रमाण दाखवून दिलेले आहे. त्याकरिता त्यांनी इ.स. ११९०-१७२१ या जवळपास सव्वापाचशे वर्षांत रचल्या गेलेल्या अनेक काव्यांचा परामर्श घेऊन त्यांतील अनेकपदरी ऐतिहासिक ताणेबाणे उलगडून दाखवलेले आहेत.

मुहम्मद बिन कासिमपासून अनेक इस्लामी आक्रमक भारतावर चाल करून आले. त्यांतील कैक जण फक्त लुटारू होते, तर अनेकांनी भारतातील अनेक ठिकाणी सत्ताही स्थापन केली. भारतीय उपखंडाच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक स्थितीत यामुळे अनेक दूरगामी परिणाम झाले. तत्कालीन भारतीयांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेक काव्ये, शिलालेख आदींमधून उलगडतो. भारतातील पहिले इस्लामी राज्य स्थापन होण्याआधी मुसलमानांचा उल्लेख धार्मिक अंगाने फारसा होताना दिसत नाही. म्लेच्छ, यवन, तुरुष्क, ताजिक आदी सर्वसाधारणपणे परकीयत्व दर्शविणाऱ्या शब्दांनीच त्यांचा बहुतांशी उल्लेख होतो. पण यालाही अपवाद आहेतच. विशेषत: ‘कालचक्रतंत्र’सारख्या बौद्ध ग्रंथात (इ.स. ११ वे शतक) इस्लाम धर्माच्या मूलतत्त्वांचे अगदी तपशीलवार वर्णन येते. त्या तुलनेत पहिल्या इस्लामी स्वारीचा अनुभव असलेल्या सिंध प्रांतातील ‘देवलस्मृती’सारख्या ग्रंथात ‘घरवापसी’ची चर्चा होऊनही इस्लामबद्दल विशेष विश्लेषण येत नाही. संस्कृत वाङ्मय म्हटले की, बहुतांशी ब्राह्मणनिर्मित ग्रंथच विचारात घेतले जातात, मात्र जैन आणि बौद्ध परंपरेतील संस्कृत ग्रंथांचा विशेष विचार होताना दिसत नाही. याकडे लक्ष वेधून इस्लामची तपशीलवार चर्चा आणि निषेध व्यक्त करणारा पहिला भारतीय ग्रंथ हा बौद्ध धर्मपरंपरेतील असल्याचे प्रा. ट्रश्कं दाखवून देतात.

भारतात इस्लामी सत्ता दृढमूल झाल्यावर साहजिकच पूर्वीपेक्षा जास्त तपशिलात इस्लामची दखल घेणे भाग पडले. बहुतांशी लढाया व तद्नुषंगिक राजकीय स्थित्यंतरे यांच्या अनुषंगाने तसे उल्लेख संस्कृत काव्यात येतात. यांपैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे घोरी-चौहान युद्धे होत. इ.स. ११९०-१२०० च्या दरम्यान जयानक नामक चौहानांच्या दरबारी कवीने पृथ्वीराज चौहानाच्या तराई येथील लढाईत मुहम्मद घोरीवरील विजयावर ‘पृथ्वीराजविजय’नामक काव्य लिहिले. चौहान-घोरी संघर्षात शेवटी पृथ्वीराजाची हत्या करण्यात येऊनही या काव्यात मात्र त्याचा उल्लेख येत नाही. घोरी सत्तेचे वेगळेपण जयानक अनेक प्रकारे अधोरेखित करतो- मग ते देवळे पाडणे असो किंवा सैनिकांनी घोड्यांचे रक्त प्राशन करणे असो अथवा ‘रानटी पक्ष्यांसारख्या’ फारसी भाषेचे वर्णन असो. घोरीकृत अत्याचारांच्या तपशिलात जाऊनही जयानक इस्लाम धर्माबद्दल विशेष व्यक्त होत नाही. याबद्दलचे पुस्तकातील विवेचन मुळातूनच वाचण्याजोगे आहे.

दक्षिण भारतातही याची उदाहरणे पाहावयास मिळतात. इ.स. १३७१ मध्ये नवीनच स्थापन झालेल्या विजयनगर साम्राज्यातील कंपनरायाने मदुराईच्या सुलतानाचा पराभव करून तो प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला. त्याची राणी गंगादेवी हिने या प्रसंगावर ‘मधुराविजय’नामक काव्य लिहिले. संस्कृत साहित्यातील स्त्रीलेखकांचे प्रमाण मुळातच अल्प असल्याने हे काव्य आणखीच उल्लेखनीय ठरते. मदुराई सुलतानाखेरीज कंपनरायाची कांचीच्या संबुवराय या हिंदू राजाशी लढाईही यात वर्णन केलेली आहे. मदुराईत तुलुष्क (तुर्क) लोकांनी केलेला हिंदू धर्माचा ºहास, पूर्वी मलिक काफूरने केलेली नासधूस आदींबद्दल सांगून अखेरीस कंपनराय एका दैवी तलवारीने सुलतानाला यमसदनी पोहोचवतो, त्याचे वर्णन ‘मधुराविजय’मध्ये येते. यातही मुसलमानांबद्दल परकीयत्व दर्शवणारे शब्द वापरूनही इस्लामबद्दल मात्र चर्चा येत नाही. याखेरीज काही ठिकाणी विशिष्ट मुसलमानांची स्तुतीही आढळते. नयचंद्रकृत ‘हम्मीर’ महाकाव्यात ‘महिमासाही’ या मुसलमान योद्ध्याची तुलना सच्च्या क्षत्रियाशी केलेली आढळते.

इतरांच्या तुलनेत गुजरातमधील जैन काव्यांत मात्र इस्लामची आणि एकूणच इस्लामी सत्तेचीही चर्चा केलेली आढळते. इ.स. १३०५-४९ मध्ये रचलेल्या ‘प्रबंधचिंतामणी’, ‘प्रबंधकोश’, ‘विविधार्थकल्प’ आदी ग्रंथांतून खिलजी सत्तेच्या गुजरातमधील आक्रमणांचे तपशीलवार वर्णन येते. यातच एके ठिकाणी ‘मखतीर्थयात्रा’ म्हणून हज यात्रेचा, तर इस्लामी सत्ताकाळाचा सरळच ‘अनार्यराज्य’ असा उल्लेख येतो. इस्लामी आक्रमणांमध्ये झालेले मूर्तिभंजन आणि एका मुसलमान सरदाराने जैन मंदिराच्या पुनर्बांधणीत केलेली मदत या दोन्ही परस्परविरोधी घटनाही यात येतात. इस्लामी आक्रमणांमागील कारणही ‘कलियुग’ या सदराखाली ढकललेले पाहायला मिळते. काश्मिरी ‘राजतरंगिणी’ या ग्रंथातही असे वैविध्यपूर्ण पैलू पाहावयास मिळतात. या नावाचे ग्रंथ फक्त कल्हणच नव्हे, तर त्यानंतर जोनराज आणि श्रीवर यांनीही इ.स. १५ व्या शतकात रचले. यात काश्मीरचा इतिहास बऱ्याच तपशिलात वाचावयास मिळतो. यातच खजिन्यासाठी मूर्तिभंजन करणारा हर्ष नामक राजाही दिसतो, तसेच झैन-उल-अबिदीनसारख्या सहिष्णू राजाची विष्णूशी तुलनाही केलेली आढळते. श्रीवर कवी मुसलमानांना सैद, मौसुल आदी संज्ञांनी संबोधतानाच काश्मीरमधील इस्लामचे वाढते प्राबल्य आणि राजकीय कृपेकरिता गोमांस खाणाऱ्या व्यापाऱ्यांचाही उल्लेख करतो. श्रीवरकृत ‘राजतरंगिणी’त कुराण, शुक्रवारची साप्ताहिक प्रार्थना आदींबरोबरच म्लेच्छदर्शनासारख्या संज्ञेने इस्लामचा होणारा उल्लेखही रोचक आहे. हिंदू हा धर्मवाचक उल्लेखही त्याच्या लिखाणात आलेला दिसतो. अशा उल्लेखांची फक्त ‘उच्चजातीय असुरक्षितता’ अशी एकांगी संभावना प्रा. ट्रश्कं करतात.

मुघल साम्राज्य आणि जैन साधू यांचे परस्परसंबंध अभ्यासक वर्तुळात ज्ञात असले, तरी सामान्यत: प्रकाशात येत नाहीत. पद्मासागर, हीरविजय, देवविमल आदी अनेक जैन साधू अकबरापासून शाहजहानपर्यंत मुघल दरबारी होते. त्यांनी त्यांच्या मुघलांशी आलेल्या संबंधांबद्दल बऱ्याच विस्ताराने लिहिलेले आहे. त्याचाही प्रा. ट्रश्कं उत्तम परामर्श घेतात. प्रामुख्याने श्वेतांबर पंथातील तपगच्छ आणि खरतरगच्छ उपपंथांचा यात समावेश होतो. हे संबंध बहुतांशी सलोख्याचे असल्यामुळे पर्युषण पर्वात मांसाहारबंदी, काही पवित्र तळ्यांत मासेमारीला बंदी आदी आदेश मुघल दरबाराकडून दिले गेले. त्यामुळे यातील कैक ग्रंथांत मुघलांची स्तुती असणे क्रमप्राप्तच होते, उदा. देवविमलकृत ‘हीरसौभाग्य’ या ग्रंथात दिल्ली प्रदेशाची तुलना कुबेरनगरीशी केलेली आहे. एक विशेष रोचक गोष्ट म्हणजे, यात बादशहापेक्षा जैन साधूंचे नैतिक श्रेष्ठत्व उच्चतर असल्याच्या कैक कथा सापडतात. इतकेच नव्हे, तर किमान एकदा तरी अबुल फजलला हीरविजय नामक साधू हा इस्लामपेक्षा जैन धर्म श्रेष्ठ असल्याचे पटवून देतो, असाही उल्लेख सापडतो! याखेरीज कैक मुघल दरबारी इतिहासांचेही संस्कृत भाषांतर या जैन साधूंनी केलेले आढळते. काही ठिकाणी जैनांचे प्रतिस्पर्धी म्हणून ब्राह्मणांचा नकारार्थी उल्लेखही येतो.

याखेरीज प्रा. ट्रश्कं आणखी एका प्रकारच्या काव्यसंभाराकडे लक्ष वेधतात; तो म्हणजे- इस्लामी सत्ता सार्वभौम असताना त्यांमधून आपले स्वतंत्र राज्य तयार करणाऱ्या राजवटींमध्ये रचलेली काव्ये. बागलाणातील राजपूत राजांबरोबरच मराठेशाहीच्या आश्रयाने रचल्या गेलेल्या काव्यांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. बागलाणात रचलेल्या ‘राष्ट्रौढवंश’सारख्या महाकाव्यात राजकीय गोष्टींवरच जास्त भर दिलेला दिसतो. मराठेशाहीत रचलेल्या संस्कृत काव्यांत ‘शिवभारत’, ‘परमानंदकाव्य’, ‘पर्णालपर्वतग्रहणाख्यान’ आदींचा समावेश होतो. अन्य काव्यांप्रमाणेच ‘शिवभारता’तल्या द्वैताचेही विश्लेषण करताना मात्र प्रा. ट्रश्कं यांच्याकडून काही गफलती झाल्याचे दिसते. त्याशिवाय त्यांनी काही बेफाट विधानेही केलेली आहेत, उदा. शिवछत्रपतींच्या क्षत्रियत्वाबद्दल ‘सध्याही अनेकांना संशय’ असल्याचे विधान कोणत्याही आधाराविना त्यांनी पृष्ठ क्र. १५९ वर केले आहे. शिवाय ‘शंभूराजचरित’ हे काव्य छत्रपती संभाजी महाराजांविषयी असल्याचे त्या नमूद करतात, परंतु ते काव्य शंभूजी नामक तत्कालीन नंदुरबारच्या देसायाबद्दल आहे.

एकुणात, इस्लामी सत्तांबद्दलचे कोणते उल्लेख एखाद्या संस्कृत काव्यात येतात, त्यामागील सामाजिक, राजकीय व धार्मिक संदर्भचौकट काय असते, याचे विश्लेषण या पुस्तकात उत्तमरीत्या आलेले आहे. लेखिकेचा स्वत:च्या राजकीय मतांना इतिहासलेखनात लादण्याचा काही ठिकाणचा प्रयत्न सोडल्यास, उद्धृत केलेल्या पुराव्यांसाठी हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.

nikhil.bellarykar@gmail.com