अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते.

‘धिस परफेक्ट डे’ लेखक : फिलिप के. डिक पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक : मायकल जोसेफ, लंडन पृष्ठे : ३२०; किंमत (सध्या): ७८६ रु.

|| आकाश नवघरे

अर्धशतकापूर्वीच्या या पुस्तकाच्या कथानकाचं साम्य अलीकडल्या ‘मेट्रिक्स’ चित्रपट-त्रयीशी जाणवेलही; पण नायक चिप आणि भोवतालचे लोक यांची ही गोष्ट वाचताना आजच्याही बऱ्याच गोष्टी आठवू शकतात… 

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते.

‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली सार्वत्रिक समजूत आहे. अशी मंडळी आढळल्यास त्याची माहिती तत्काळ तुमच्या पर्यवेक्षकाला द्यावी लागते. मग पर्यवेक्षक तशी सूचना संगणकाला देतो आणि मग संगणक या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढची कारवाई करतो.

‘धिस परफेक्ट डे’मधला संगणक सर्वव्यापी आहे. संगणकाची थेट पाळत सर्वांच्या आयुष्यावर आहेच, पण लोकही आपल्या आयुष्यातल्या लहानसहान घडामोडी पर्यवेक्षकांच्या जाळ्यामार्फत संगणकाला सांगतात. त्यांना ते बंधनकारक असतेच; पण त्यात कुणाला काही वावगेही वाटत नाही. तसे केल्याने आपण आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी, संरक्षणासाठी आवश्यक पाऊल उचलतो आहोत, असे मानण्याची पद्धत आहे. अशा गोळा केलेल्या माहितीच्या आधारे लोकांना औषध दिले जाते. फक्त रोगट लोकांनाच नव्हे, तर ‘त्या’ असाध्य रोगापासून वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला नियमित काळाने संगणकाने लिहून दिलेले औषध घ्यावेच लागते.

हा कोणता रोग? स्वत:चे स्वतंत्र विचार मनात येणे हाच रोग. ज्याच्या मनात असे विचार येतील, तो रोगी. व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारणारा, स्वातंत्र्यविषयक विचार मनात आणणारा, चार जणांपेक्षा निराळे काही हवे वाटणारा… सगळेच रोगी. ‘आपल्याला पर्यवेक्षकाची खरेच गरज आहे काय?’ असा विचार ज्यांच्या मनात डोकावतो, तेही रोगीच. 

या यंत्रणेमध्ये संगणकाजागी सरकार कल्पून पाहा… ‘संगणक’विरोधी भूमिका घेणे वा ‘संगणका’वर टीका करणे या साध्या गोष्टींकरता तुमच्यावर ‘अर्बन नक्षल’ वा ‘देशद्रोही’ असा शिक्का  मारला जात असून तुमच्यावर ‘उपचार’ केले जात आहेत अशी कल्पना करून बघता येईल. असो. तर, संगणकाने निवडलेले हे ‘असाध्य रोगी’ आपल्या समाजाचे प्रचंड नुकसान करू शकतात, हेही कादंबरीतल्या लोकांना पटलेले दिसते. संगणकाने सांगितलेले मुकाट्याने आचरणात आणणे हा आपला स्वभाव आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण हा आपला स्वधर्म इतक्या दोन गृहीतकांवर लोकांचे संपूर्ण आयुष्य बेतलेले दिसते.

डिस्टोपियन कथांचा आवाका पाहता ‘धिस परफेक्ट डे’मध्ये फारसे नावीन्य नाही. डिस्टोपिया आणि कृत्रिम आनंद या दोहोंची सांगड घालणाऱ्या, आल्डस हक्सलेच्या ‘ब्रेव्ह न्यू वल्र्ड’ची आठवण येतेच; पण या सरधोपट डिस्टोपियन जगाची आजच्या जगाशी आढळणारी साम्ये मात्र झोप उडवणारी आहेत. कधी तरी कुणाच्या तरी डोक्यात एकीकरणाचा विचार येतो आणि तो कुणी एक सबंध जगाला आणि विविधतेला सपाट करून एका छत्रछायेखाली खेचून आणतो. मग त्या अखिल समाजाला एक कुटुंब म्हणून संबोधले जाते. एक राष्ट्र, एक भाषा, एक कर, एक निवडणूक, एक नदी, एक धर्म अशा घोषणांची आठवण अनेकांना असेलच! 

‘धिस परफेक्ट डे’मधला कुटुंबसंस्थापकही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘कार्ल माक्र्स’मधला ‘माक्र्स’ आणि ‘येशू ख्रिस्ता’मधला ‘ख्रिस्त’ या दोहोंचा उल्लेख कादंबरीतल्या ‘कुटुंबा’चा संस्थापक म्हणून येऊन जातो. समाजावरील धर्माचा पगडा आणि साम्यवादाची एकहाती शासनप्रणाली या दोहोंच्या हातमिळवणीतून किती भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची उडती कल्पना वाचकांना यावी असा लेखिकेचा मानस दिसतो.

कादंबरीतले संपूर्ण जग ज्या महाकाय संगणकाद्वारे चालवले जाते, त्याचे नाव आहे युनिकॉम्प. राष्ट्रांच्या सरहद्दी नष्ट झालेल्या या जगात पूर्वीचे देश फक्त ‘प्रभाग’ म्हणून उरलेले दिसतात. त्यांचेही नव्याने नामकरण झालेले दिसते! भारत आता ‘आयएनडी २६११०’ अशा, तर अमेरिका ‘यूएसए ६०६०७’ अशा नावाने ओळखली जाते. नागरिकांनी कोणत्या देशात राहायचे हे ठरवण्याचा अधिकारही युनिकॉम्पलाच आहे. कुणी आयुष्यात कोणते काम करायचे हेही तोच ठरवतो. एखाद्याचे लग्न होणार की नाही, एखाद्याला अपत्य असावे की नाही, फार काय, एखाद्याला लैंगिक संबंध ठेवता येतील की नाही… सगळे सगळे निर्णय युनिकॉम्पच्याच हाती. मरण? अहं, तेही तोच ठरवतो. वयाच्या बासष्टाव्या वर्षी प्रत्येकाने मरायचे हे युनिकॉम्पने ठरवलेले आहे. तुमचे स्वत:चे नाव? तेही तुम्ही तर नाहीच, तुमचे आईबापही ठरवू शकत नाहीत. स्त्री-पुरुषांसाठी मोजकी चार-चार नावे ठरवण्यात आली आहेत. तीही औपचारिकताच! खरी ओळख म्हणजे व्यक्तीचे ठरीव नाव अधिक त्या व्यक्तीच्या हातात सतत असणाऱ्या – असावेच लागणाऱ्या – कड्यावर कोरलेला नंबर. नावांक ऊर्फ ‘नेम्बर’. नागरिकाचे जणू नावच असलेला नंबर. तो मात्र युनिक- एकमेव- आपल्या ‘आधार क्रमांका’सारखा!

‘धिस परफेक्ट डे’मधल्या पुरुषांना दाढीमिश्या येत नाहीत, तसेच महिलांना स्तनही नसतात. त्या जगातील सर्व महिला-पुरुषांचा रंग आणि शरीराची बांधणी जवळपास सारखीच असते. सर्वांचे रक्तगट सारखे असतात. कुणाचेही अवयव कुणालाही रोपणासाठी देता येतात. सर्वांचे अन्न समान असते – केक आणि सोडा. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. हवामानावर संपूर्ण नियंत्रण मिळवलेले असल्याने पोशाखात वैविध्य नाही. पीपीई किटसारखे, अगदी पातळ असे, समान रंगाचे कपडे सर्व जण घालतात. समानता हा यामागचा हेतू आहेच, पण शारीरिक भेदांपोटी वाया जाणारा भाकड वेळ वाचवून उत्पादनक्षमता वाढवण्याचाही हेतू आहे. हा हेतू सफल होऊन सर्वत्र मूर्तिमंत समता अवतरलेली दिसते. सर्व लोक एकमेकांना बंधुभगिनी मानतात. इतरांच्या उपयोगी पडण्यातला आनंद अनुभवतात. चोहीकडे आनंदाचे वातावरण असते. कुणालाच कुठलीच चिंता सतावत नाही. युनिकॉम्पने आखल्याप्रमाणे लोक ‘कुटुंबाच्या भल्यासाठी’ आयुष्य सुरळीतपणे जगत राहतात.

डिस्टोपियन कादंबरी आणि इतके आनंदाचे वातावरण असा प्रश्न पडला का? या आनंदाला कारणीभूत असते, ते सुरुवातीला उल्लेखलेले औषध. हे औषध ज्ञानेंद्रियांच्या संवेदना मंदावते. तुमच्या सर्व शारीरिक आणि मानसिक गरजा, भावना यांवर औषधामार्फत संगणक नियंत्रण मिळवतो. त्यानेच ही अभूतपूर्व समानता साधली जाते. समानता साध्य न झाली, तर औषधाची मात्रा वाढवली जाते. शरीरात काही वेगळेपणा असेल तर तो कमी करण्यासाठी, लिंगांनुसार संप्रेरके कमीजास्त करून समागमाची प्रेरणा फक्त शनिवारपुरती मर्यादित ठेवण्यासाठी, अपत्यसंभवासाठी, आणि अखेर बासष्टाव्या वर्षीच्या नियोजित मरणासाठी – उपचार अनेक, औषध एक! ‘पाकिस्तानात जा!’, ‘सत्तर वर्षांत काय केले?’, ‘एका घराण्याने वाट लावली…’ अशा अनेक घोषणांप्रमाणेच ‘शनिवारी समागम’, ‘बुधवारी पर्यवेक्षक’, ‘आजारापासून परिवाराला वाचवणे हेच कर्तव्य’ अशा अनेक घोषणा आणि त्यांनी बांधून घातलेले लोक.

कादंबरीचा नायक चिप मात्र थोडा वेगळा निपजतो. चिपचा एक डोळा वेगळा असतो- हिरव्या रंगाचा. चिपचे आजोबा त्याला त्याच्या या वेगळेपणाची सतत जाणीव करून देत राहतात. चिपचे शरीर बहुधा गर्भावस्थेतच औषधांशी लढायला शिकलेले असावे, असे त्याला सांगत राहतात. हळूहळू आपल्यासारखे बरेच लोक असल्याचे चिपच्या लक्षात येऊ लागते. त्यातूनच त्याचा वैचारिक प्रवास सुरू होतो. संगणकाने ठरवलेल्या नावाव्यतिरिक्त नावे ठेवणे, ‘लायलॅक’नामक स्त्रीच्या प्रेमात पडणे, तंबाखूची शेती करणे, तंबाखू खाणे… या सर्व गोष्टींमुळे चिपला ‘अगदी जिवंत असल्यासारखे’ वाटू लागते. आपल्यावरच्या नियंत्रणांची चीड येऊ लागते. या नव्या मित्रांच्या गुप्त चर्चांमध्ये तो सहभागी होतो. अभिनय करायला शिकून औषधाची मात्रा कमी करून घेतो. एका बेटावर पळण्यात यशस्वी होतो.

पण तिथे जाऊनही त्याला त्याच्या मनातले आयुष्य जगता येते का?

अमेरिकेने क्युबाच्या चहूबाजूंनी आवळलेल्या नाड्या, दोन वेळच्या अन्ननिवाऱ्याची सोय करण्यातच खर्ची पडणारी लोकांची ताकद, महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे अशा बेताने रंगवले जाणारे आयपीएलचे सामने आणि इतर चविष्ट बातम्या, पनामा-पँडोरा-लखीमपूर… अशा कोणत्याही घटनांचा वा पुराव्यांचा स्पर्शही न होणारे टेफ्लॉन-कोटेड कुटुंबप्रमुख… अशा प्रतिमा मनाशी येत राहाव्यात, असा पुढचा घटनाक्रम आहे.

‘मेट्रिक्स’ चित्रपटत्रयीच्या कथेची बीजं या पुस्तकात असावीत की काय, असं वाटण्याइतकी साम्यं दोन्हींच्या कथानकांत आहेत. सर्वशक्तिमान संगणक, त्याच्या आधिपत्याखालचं कृत्रिम जग, नायकाला ते जग खोटं असल्याची जाणीव, आणि मग त्यानं काही जणांच्या मदतीनं त्या प्रभावाखालून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं. व्हच्र्युअल जगातल्या ट्रेंड्सच्या प्रभावाखालून बाहेर पडण्यासाठी फेसबुक-गूगलपासून खासगी माहिती जपून ठेवणारे लोक आठवले? असो!

कादंबरीच्या शेवटी चिपच्या बंडाला काही प्रमाणात यश मिळते. कृत्रिमरीत्या नियंत्रित केलेले वातावरण जाऊन त्याला प्रथमच भर दिवसा पडणारा पाऊस दिसतो. पण पुढे आशेचा प्रकाश आहे का? बंडाचे फळ काय? तर व्यवस्थेने दिलेली कचकड्याची, तथाकथित ‘सुरक्षितता’ही संपली आहे आणि अन्न-वस्त्र-निवाऱ्यासाठीचा नवा संघर्ष समोर उभा आहे…  स्वातंत्र्य हवे की सुरक्षितता हवी, या सनातन प्रश्नापाशी ‘धिस परफेक्ट डे’ घेऊन जाते.

anaoghare@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The question of freedom security the matrix film akp

Next Story
व्यवस्थेचीच ‘जुगाड’बाजी
ताज्या बातम्या