अतुल भातखळकर

सर्वसमावेशकतेमुळेच हिंदू संस्कृती आजही टिकली असून जैन, बुद्ध व हिंदु संस्कृती मूलत: एकच, असे म्हणणे मांडणाऱ्या पुस्तकाविषयी..

Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?
Nitin Gadkaris development speed is limited in his second term as MP compared to the first five years
पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा खासदारकी भूषविताना गडकरींच्या विकास गतीला मर्यादा

परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाल्यानंतर राजकारणात आलेले आणि आता तृणमूल काँग्रेसवासी झालेले पवन के. वर्मा यांनी जी अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली त्यापैकी एक म्हणजे ‘द ग्रेट हिंदु सिव्हिलायझेशन : अचीव्हमेंट, निग्लेक्ट, बायस अ‍ॅण्ड द वे फॉरवर्ड’. देशातील हिंदुत्ववादी, प्रखर राष्ट्रवादी अशांनी जे मुद्दे वर्षांनुवर्षे तत्कालीन वैचारिक प्रवाहाच्या विरोधात जाऊन पुराव्यांसह मांडले ते कसे अचूक आहेत, हे वर्मा यांनी स्पष्टपणे दाखवून दिले आहे.

देशात हजारो वर्षांपूर्वीपासून हिंदु संस्कृती अस्तित्वात होती, हे त्यांनी अनेक संदर्भग्रंथांच्या मदतीने सिद्ध केले आहे. आर्याच्या आक्रमणाचा जो सिद्धांत मांडला जातो तोदेखील लेखकाने खोडून काढला आहे. त्यासाठी त्यांनी इतिहासकार डॉ. उिपदर सिंग (माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची कन्या) यांच्या पुस्तकाचा हवाला दिला आहे. तसेच जगातील अन्य अनेक इतिहासकार आर्य आक्रमणाच्या सिद्धांताच्या विरोधात कसे लिहितात, याचे दाखले दिले आहेत. हिंदु संस्कृती विचाराने कशी श्रेष्ठ होती, हे त्यांनी महाभारत, भगवद्गीता, उपनिषद, पुराण यांच्या श्रेष्ठत्वाच्या आधारे अधोरेखित केले आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून हिंदु संस्कृती विज्ञान, कला, मीमांसा, विचार, तर्कवाद, शिल्पकला यासह विविध विषयांमध्ये किती उच्च कोटीला पोहोचली होती, याचे दाखले लेखकाने दिले आहेत.

अनेक संस्कृती संपल्या, मात्र हिंदु संस्कृती कायम आहे, कारण या संस्कृतीत सर्व प्रकारचे विचार समाविष्ट करून घेण्याची क्षमता आहे, असे विश्लेषण ते मांडतात. महात्मा गांधी यांनी त्यांच्या ‘हिंदू स्वराज्य’ या पुस्तकात हिंदु संस्कृती हजारो वर्षांपासून टिकली, पुढेही टिकेल असे म्हटल्याचा दाखला दिला आहे. हजारो वर्षांपासून आक्रमणे होऊनही हिंदु संस्कृती टिकली यामागे केवळ नवा विचार प्रस्थापित करणे आणि नव्या विचारांची स्वीकारार्हता एवढीच कारणे आहेत, हे लेखकाचे म्हणणे अपुरे वाटते. मुळात हिंदु संस्कृतीची रचनाच पाश्चिमात्य देशांतील संस्कृतींसारखी राजसत्तेवर अवलंबून न राहता त्यापलीकडे जाऊन केलेली आहे. आर्याचे आक्रमण, हिंदु संस्कृती नावाची संस्कृतीच नव्हती, हे दावे आणि सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनाला विरोध करणारे डावे ‘नामवंत इतिहासकार’ कसे चुकीचे आहेत, हे लेखकाने दाखवून दिले आहे. रोमिला थापर, अमर्त्य सेन अशा नामवंतांच्या युक्तिवादाचा त्यांनी पुराव्यासहित प्रतिवाद केला आहे. अमर्त्य सेन यांनी येथे हिंदु संस्कृती नव्हती, परंतु जैन, बुद्ध संस्कृती होती व प्राचीन संस्कृती होती हे नकळत मान्य केले आहे. जैन, बुद्ध संस्कृती आणि हिंदु संस्कृती मूलत: एकच आहेत, असे लेखकाचे म्हणणे आहे. देशात ‘राष्ट्र’ ही कल्पनाच नव्हती हे डाव्या व पाश्चिमात्य इतिहासकारांचे म्हणणे लेखकाने सपशेल खोडून काढले आहे. आद्य शंकराचार्यापासून अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला असून, या देशात हजारो वर्षांपासून हिंदु संस्कृती व राष्ट्रभावना अस्तित्वात होती, हे लेखकाने पटवून दिले आहे.

हिंदु संस्कृतीवर मुस्लीम आक्रमकांनी मोठा आघात केला. त्यांनी संस्कृतीचा, शिल्पकलेचा कसा विध्वंस केला, हे या पुस्तकात उदाहरणासह स्पष्ट करण्यात आले आहे. एवढेच नाही तर इस्लामचा विचार मूलत: हिंदु संस्कृतीच्या म्हणजेच काफिरांच्या विरोधातील होता, हा युक्तिवाद सर्व प्रकरणांत केल्याचे दिसते. तसेच इस्लामचे आक्रमण हे आक्रमण नव्हतेच हा डाव्या इतिहासकारांचा लाडका सिद्धांत त्यांनी खोडून काढला आहे. मुस्लीम आक्रमणावेळी देशातील संतांची भूमिका, त्यांची कामे, योगदान याचे सुंदर विवेचन केले आहे. ब्रिटिशांच्या सत्ता स्थापनेनंतर मॅकलॉने देशातील शिक्षण पद्धतीत इंग्रजीत लिखाण आणि शिकवणे आवश्यक असल्याचे बिंबवले. त्यामागे ब्रिटिशांचा कुटिल डाव होता, हे सिद्ध करण्यासाठी लेखकाने अनेकांची अवतरणे देत ब्रिटिशांचे कारस्थान निदर्शनास आणले आहे. ब्रिटिश सांगतील तेच योग्य असे सांगणारा वर्ग निर्माण करणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. हे करत असतानाच १८५७च्या आधी काही ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटी स्थापन करून या देशातील विचार, शिक्षण, वैदिक विचार याचे गुणगान जगासमोर आणण्याचा कसा प्रयत्न केला होता, हेसुद्धा लेखकाने दाखवून दिले आहे.

ब्रिटिशांनी देशावर वैचारिक आक्रमण केल्यामुळे भारताच्या झालेल्या नुकसानीचा आढावा लेखकाने घेतला आहे. परंतु ब्रिटिशांनी देशाचे आर्थिक शोषण करून १८५७ पूर्वी जगाच्या निर्यातीत २५ टक्के वाटा असणाऱ्या देशाला पूर्णत: दरिद्री करून टाकले, याचा उल्लेखही लेखकाने केलेला नाही. देशाच्या अधोगतीत या घटकांचा मोठा वाटा असताना लेखकाने याची साधी दखलही घेतली नाही, हे आश्चर्यकारक तर आहेच परंतु त्यामुळे विश्लेषण अपुरे राहिले आहे.

ब्रिटिशांमुळे देशात निर्माण झालेल्या समस्यांचा ऊहापोह करताना ज्यांनी प्रारंभीपासून हा विचार मांडला त्या संघपरिवारावर आणि भारतीय जनता पक्षावर लेखकाने तोंडसुख घेतले आहे. परंतु विचारांच्या आधारावर संघपरिवारातील एक-दोन मान्यवरांचे वैचारिक मूल्यमापन करण्याची गरज होती. स्वा. सावरकर यांच्या विचारांचे कौतुक विशिष्ट मर्यादेपर्यंत केले आहे. केवळ सरस्वती नदीच्या अस्तित्वावर एक परिसंवाद जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आयोजित केल्यानंतर तेथील डाव्यांनी किती गोंधळ घातला हे लेखकाने लिहिले आहे. एक परिसंवाद आयोजित केला तर इतका गोंधळ घातला जाऊ शकतो, तर हा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात किती चुकीच्या, खोटय़ा गोष्टी लिहिल्या जाऊ शकतात याचा विचार लेखकाने करणे आवश्यक होते. अर्थात संघ, भाजपच्या विचारांशी संबंधित नसलेल्या आणि इतक्या विद्वान व्यक्तीकडून हे पुस्तक यावे, हे स्वागतार्ह आहे. 

‘द ग्रेट हिंदु सिव्हिलायझेशन : अचिव्हमेंट, निगलेक्ट, बायस अ‍ॅण्ड द वे फॉरवर्ड’

लेखक : पी. के. वर्मा

प्रकाशक : वेस्टलॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि.

 पृष्ठे : ४०३,  किंमत : ७९९रु.