व्यंगचित्रकारांना दिसलेले डॉ. आंबेडकर..

उन्नमती सुंदर हे तरुण अभ्यासक असून ते सध्या जेएनयूमध्ये पीएच.डी.चा अभ्यास करत आहेत.

|| अविनाश कोल्हे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर १९३२ सालापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत- म्हणजे १९५६ सालापर्यंत भारतातील इंग्रजी वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेल्या व्यंगचित्रांचे विश्लेषणात्मक संकलन असलेल्या पुस्तकाविषयी..

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार वसंत सरवटे ‘व्यंगचित्र’ या शब्दाला ‘हास्यचित्र’ असा पर्यायी शब्द सुचवत असत. तो शब्द जरी फारसा रुळला नसला, तरी सरवटेंना यातून जे सांगायचे होते ते महत्त्वाचे होते. व्यंगचित्रांतून फक्त व्यंगच दाखवली जातात, असे ‘व्यंगचित्र’ या शब्दातून ध्वनित होते, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच ‘व्यंगचित्र’ऐवजी ‘हास्यचित्र’ म्हणावे, असा त्यांचा आग्रह होता. सरवटेंचे विवेचन फक्त हास्य निर्माण करणाऱ्या चित्रांपुरते योग्य जरी असले, तरी राजकीय व्यंगचित्रांबद्दल तसे म्हणता येत नाही. राजकीय व्यंगचित्रांत व्यंगचित्रकाराने एक भूमिका घेतलेली असते. त्यातून त्या व्यंगचित्रकाराची राजकीय समज व्यक्त होते. म्हणूनच व्यंगचित्रकार कोणाची टिंगल करतो, कशी करतो वगैरे मुद्दे आपसूकच महत्त्वाचे ठरतात.

हे विवेचन लक्षात घेतले म्हणजे मग मार्क्‍सवादी व्यंगचित्रकार ओ. व्ही. विजयन आणि अशी ठसठशीत राजकीय भूमिका नसलेले (म्हणूनच कदाचित मध्यमवर्गाचे लाडके झालेले) आर. के. लक्ष्मण यांच्या कामात जमीन-अस्मानचा फरक का दिसून येतो, हे लक्षात येते. हे सांगण्याचे कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेले ‘नो लाफिंग मॅटर : द आंबेडकर कार्टून्स १९३२-१९५६’ हे पुस्तक! हे पुस्तक म्हणजे डॉ. आंबेडकरांवर १९३२ सालापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत- म्हणजे १९५६ सालापर्यंत भारतातील इंग्रजी वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेल्या व्यंगचित्रांचा संग्रह होय. तरुण अभ्यासक उन्नमती स्याम सुंदर यांनी संपादन केलेल्या या पुस्तकात सुमारे १२२ व्यंगचित्रे आहेत. संपादक सुंदर यांनी प्रत्येक व्यंगचित्राला विस्तृत संपादकीय टिपण दिले आहे.

उन्नमती सुंदर हे तरुण अभ्यासक असून ते सध्या जेएनयूमध्ये पीएच.डी.चा अभ्यास करत आहेत. १९४७ साली मुलांसाठी सुरू झालेल्या ‘चंदामामा’ या तेलुगू भाषिक मासिकात प्रसिद्ध झालेली कला, हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. ते आंबेडकरवादी अभ्यासक असून त्यांची व्यंगचित्रे roundtableindia.co.in या संकेतस्थळावर नेहमी प्रकाशित होत असतात. २०१२ साली शालेय पुस्तकात असलेल्या बाबासाहेबांवरील व्यंगचित्रावरून गदारोळ उडाला होता. या व्यंगचित्रामुळे बाबासाहेबांची बदनामी होते, असे आरोप झाले. हे व्यंगचित्र के. शंकर पिल्ले यांनी काढले होते. या व्यंगचित्राबद्दल मे २०१२ मध्ये संसदेत चर्चा झाली होती. याबद्दल अहवाल देण्यासाठी मनमोहन सिंग सरकारने प्रा. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली. थोरात समितीच्या अहवालानुसार ते वादग्रस्त व्यंगचित्र काढण्याचा निर्णय घेतला गेला. तेव्हा काही अभ्यासकांनी आविष्कारस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आज अशी स्थिती आहे की, ते व्यंगचित्र पुस्तकात नाही.

हा वाद चच्रेत होता, तेव्हा उन्नमती सुंदरला वाटले, की एका व्यंगचित्रावरून एवढा वाद होतो तर अशी किती व्यंगचित्रे आहेत- ज्यात बाबासाहेब आहेत? या शोधाचे फळ म्हणजे प्रस्तुत पुस्तक. यासाठी सुंदरला सुमारे चार वर्षे अभ्यास करावा लागला. ठिकठिकाणच्या इंग्रजी वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन जुने अंक बघावे लागले. हे पुस्तक फार वेगळे आहे. अशी पुस्तके महात्मा गांधी, पंडित नेहरू, वगैरे नेत्यांबद्दल उपलब्ध आहेत. बाबासाहेबांवर हे एकमेव पुस्तक आहे.

‘नो लाफिंग मॅटर’ला तरुण दलित अभ्यासक सूरज येंगडे यांची प्रस्तावना आहे. यात येंगडे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. त्यांच्या मते, हे पुस्तक म्हणजे बाबासाहेबांचे राजकीय चरित्र होऊ शकते; फक्त येथे चरित्रकार कुंपणाच्या पलीकडे उभे आहेत. हे निरीक्षण खरे आहे. याचे कारण या पुस्तकात ज्यांची व्यंगचित्रे बघायला मिळतात, ती सर्व कलाकार मंडळी सवर्ण आहेत. मात्र हे मान्य करताना ज्या काळातील ही चित्रे आहेत, त्या काळाकडे लक्ष दिले पाहिजे. ही व्यंगचित्रे १९३२ ते १९५६ या काळातील आहेत, जेव्हा सवर्ण समाजाने पुरेशा प्रमाणात पुरोगामी मूल्ये पचवली नव्हती. आज अशी व्यंगचित्रे काढणे त्यामानाने बरेच अवघड आहे. याचा अर्थ दलित-सवर्ण यांच्यातील दरी पूर्णपणे बुजली असा अर्थातच नाही. पण तेव्हाचा विखार आज नाही, हे मान्य व्हायला हरकत नसावी. दुसरे म्हणजे, बाबासाहेबांनी अनेकदा गांधीजींच्या, काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतल्या होत्या, त्यांच्यावर जबरदस्त टीका केली होती. परिणामी सवर्णाच्या मनांत बाबासाहेबांबद्दल किंतू होते, हे नाकारता येत नाही.

बाबासाहेब १९१७ साली भारतात परतले आणि १९२४ साली मुंबईत ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली. येथून त्यांचे सार्वजनिक जीवन सुरू होते. पण देशातील इंग्रजी वृत्तपत्रांनी बाबासाहेबांची दखल १९३० ते १९३२ च्या दरम्यान इंग्लंडमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदांनंतरच घ्यायला सुरुवात केली. याचे साधे कारण म्हणजे गोलमेज परिषदांत बाबासाहेबांनी अनेक वेळा गांधीजींना जबरदस्त विरोध केला होता. महात्मा गांधींसारख्या नेत्याला विरोध करणारा हा कोण, म्हणत इंग्रजी वृत्तपत्रांनी बाबासाहेबांची तेव्हापासून दखल घ्यायला सुरुवात केली, ती त्यांचा डिसेंबर १९५६ मध्ये मृत्यू होईपर्यंत.

संपादक सुंदरने या पुस्तकाची रचना कालानुक्रमे केली आहे. यातील पहिले व्यंगचित्र ३० जुलै १९३२ रोजी ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेले आहे, तर शेवटचे व्यंगचित्र २५ सप्टेंबर १९५६ रोजी ‘नॅशनल हेराल्ड’मध्ये प्रकाशित झालेले आहे. थोडक्यात, बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाची वर्षे व्यंगचित्रांच्या माध्यमातून पकडली आहेत आणि यात उच्चवर्णीय मानसिकता कशी व्यक्त झाली आहे, हे जवळपास प्रत्येक पानातून सांगितले आहे. अर्थात, प्रत्येक व्यंगचित्राबद्दल संपादकाचे हे मत ग्रा धरता येणार नसले, तरी एकुणात व्यंगचित्रांतून बाबासाहेबांकडे तेव्हाचा सत्ताधारी वर्ग कसा बघत होता, याचा ऊहापोह आहे. संपादकाची अशी पक्की धारणा आहे, की सर्व व्यंगचित्रकारांनी बाबासाहेबांना जाणीवपूर्वक एक छोटा, कटकटी करणारा नेता दाखवले आहे. बाबासाहेबांना कधी रडणारे मूल दाखवले आहे, कधी साडी नेसलेली स्त्री, तर कधी जमिनीवर बसलेल्या आश्रितासारखे दाखवले आहे. हे निरीक्षण बऱ्याच अंशी योग्य असले, तरी या पुस्तकातील काही व्यंगचित्रे या निरीक्षणाला छेद देणारी आहेत.

गोलमेज परिषदेपासून सर्वाना प्रतीक्षा होती ती इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅक्डोनाल्ड यांच्या ‘जातीय निवाडय़ा’त काय असेल, याची. त्यासंदर्भातील व्यंगचित्रात एका बाजूला बाबासाहेब इतर अनेक भारतीय नेत्यांबरोबर जमिनीवर बसलेले आहेत, तर समोर इंग्रज सरकारचे भारतमंत्री सर सॅम्युएल होअर कोंबडीच्या रूपात अंडे उबवत असल्याचे दाखवले आहे. भारतीय नेत्यांत बाबासाहेबांबरोबर मुस्लीम समाजाचे मौलाना शौकत अली, शिखांचे मास्टर तारासिंग वगैरे बसलेले दाखवले आहेत. जमिनीवर बसलेले हे सर्व नेते ‘जातीय निवाडय़ा’त काय असेल, कोणाला काय व किती मिळाले असेल, याबद्दल सारख्याच प्रमाणात उत्सुक आहेत. फक्त बाबासाहेबच जमिनीवर बसलेले आणि इतर नेते खुच्र्यावर बसलेले दाखवले असते, तर आक्षेप घेता आला असता. इतर अनेक व्यंगचित्रांत मात्र संपादक म्हणतात तसा उच्चवर्णीय आकस दिसतो. उदाहरणार्थ पृ. ३४२ वर दिलेले ‘फिल्म इंडिया’त डिसेंबर १९५१ मध्ये प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र. हे व्यंगचित्र इरान या व्यंगचित्रकाराचे आहे. त्या काळी भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी जोरात सुरू होती. बाबासाहेबांचा शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन आणि डॉ. अशोक मेहतांचा समाजवादी पक्ष यांची युती होती. ही युती दणदणीत बहुमत मिळवेल असा आशावाद होता. त्या संदर्भात हे व्यंगचित्र बघितले पाहिजे. यात अशोक मेहता आरामात लोळत पडले असून बाबासाहेबांना हुकूम देत आहेत, की त्यांनी काँग्रेसला हाकलून द्यावे. या व्यंगचित्रातील पात्रांचे रेखाटन, त्यांची बसण्याची ढब वगैरेतून तेव्हाची सत्तेची समीकरणे समजतात. अशोक मेहतांचा समाजवादी पक्ष देशभर लोकप्रिय होता. त्या तुलनेत बाबासाहेबांचा पक्ष नव्हता. काँग्रेस पक्षाला या दोन शक्तींच्या राजकीय युतीची भीती होती. म्हणून बैलाच्या रूपातील पंडित नेहरू कुत्र्याच्या रूपातल्या बाबासाहेबांना- ‘मलाही थोडेसे खाऊ द्या’ अशी विनंती करत आहेत. यात अंतिम सत्ता समाजवादी पक्षाच्या हाती आहे, असे सूचित केले आहे. ज्या प्रकारे डॉ. मेहता आरामात पहुडले आहेत, त्यावरून त्यांना निवडणुका जिंकण्याबद्दल कमालीचा आत्मविश्वास होता हे दिसून येते.

बाबासाहेबांच्या विरोधात या प्रकारचा आकस जरी सुरुवातीला असला, तरी नंतर खास करून घटना समितीचे काम पूर्ण झाल्यावर आणि बाबासाहेबांना ‘आधुनिक मनू’ म्हणायला लागल्यानंतर यात बदल झालेला दिसतो. नंतरच्या अनेक व्यंगचित्रांत सुटाबुटातले बाबासाहेब दिसतात. हा बदल समजून घेतला पाहिजे.

nashkohl@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Well known cartoonist vasant sarwate dr b r ambedkar akp

Next Story
विशलिस्ट
ताज्या बातम्या