|| परिणीता दांडेकर

संस्कृती नदीच्या काठानं बहरतात आणि सांस्कृतिक संचितसुद्धा नदीमुळे वाढतं.. मग ते काव्य असो, संगीत किंवा गोष्ट असो.. नदी नदीसारखीच वागणार, याची शहाणीव देणारं हे संचित कुठल्याही आपत्ती-काळात बळ देणारंच ठरतं!

या पंधरवडय़ाचा लेख खरं तर भूजल व्यवस्थापनावर होता. भूजल म्हणजे भारताची खरी जीवनरेखा, जी जमिनीवरून नाही तर जमिनीखालून वाहते. भूजलाचा विचार करताना मला नेहमी ज्ञानदेवांचा ‘कानडा वो विठ्ठलू’ अभंग आठवतो-

‘पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे।

उभाचि  स्वयंभू असे।

समोरा कीं पाठीमोरा न कळे।

ठकचि पडिलें कैसें॥’

हे भूजल दिसून येत नाही, याचा उगम कळत नाही, अंत कळत नाही आणि तरीही या ‘कानडय़ा’ भूजलाचा अदृश्य वरदहस्त आपल्यावर आहे. तुकोबांनी प्रतिभेची तुलना जमिनीतून उगम पावणाऱ्या झऱ्याशी उगीच नव्हती केली. ‘तुका म्हणे झरा। आहे मूळीचाचि खरा॥’ ही ओळ मी पहिल्यांदा वाचली पुलंच्या रवीन्द्रनाथ टागोरांवरील भाषणात. टागोरांनी आपली पहिली, नव्या वाटा शोधणारी कविता लिहिली तिचे नाव ‘निर्झरेर स्वप्नभंग’. टागोर तेव्हा विशीत होते आणि त्यांनी म्हटले आहे की, ही कविता त्यांच्यासाठी एक उगम ठरली. निर्झरेर स्वप्नभंग एका बांधात कोंडून पडलेल्या झऱ्याच्या मुक्तीचे गीत! यानंतर टागोरांनी नदी, झरे, त्रिभुज प्रदेश यावर विस्मयकारी लेखन केले. जेव्हा त्यांची प्रतिभा नवी वाट शोधायची, तेव्हा तिथे नदीच अवतीर्ण व्हायची. त्यांची पहिली कथा म्हणजे ‘घाटेर कथा’: गंगेच्या घाटाची गोष्ट. ‘मुक्तधारा’ हे १९२२ मध्ये लिहिलेले नाटक तर एका वाहत्या, नांदत्या नदीला बांधल्यानंतर आपण कशाकशाला मुकतो याचा दस्तऐवज आहे. आजदेखील ‘मुक्तधारा’ आपल्या काळाच्या पुढचे ठरेल. गुरुदेवांनी नदीवर अनेक कविता लिहिल्या; काहींमध्ये ते पद्म्ोच्या विस्तीर्ण रूपाचे कौतुक करतात, पण म्हणतात की ही कुलीन नदी, जिच्या धमन्यांमधून गंगेचे राजवर्खी पाणी वाहते ती मला आपली नाही वाटत. मला आपली वाटते ती संथाल मुलींबरोबर बडबड करणारी, कुठलेही उच्च संस्कार नसलेली गावातली बारकी कोपई नदी! १९४२ मध्ये लिहिलेली गुरुदेवांची शेवटची कविता ‘जन्मदिने’ त्यांच्या निधनाच्या अगदी काही महिने आधीची.

‘माझ्या आयुष्याला नदीने पोसले आहे.

या धमन्यांमधून उंच पर्वताचे पाणी वाहते आणि जगण्याची पठारे नदीच्या गाळाने समृद्ध झाली आहेत.’  रवीन्द्रनाथ अनेक अर्थानी नदीचे कवी. पद्मा, इच्छामती, कोपई, मयूराक्षी, जमुना, अनेक नदय़ा त्यांच्या साहित्यात येत-जात असतात.

बंगाल- म्हणजे बंगालचा भूभाग, ज्यात बांगलादेशदेखील येतो- हा जगातील सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आणि सुंदरबन हे जगातील सगळ्यात मोठे सलग खारफुटीचे जंगल. हा भाग शतकानुशतके नदय़ांनी घडवला. बंगालच्या नावातच पाणी आहे. इथे सगळ्याच कलांवर नदीची छाप नसती तर नवल. बंगालीत सत्तरच्या वर ‘रीव्हरीन’ म्हणजे नदीभवतालच्या कादंबऱ्या आहेत. शेकडो कविता, लोकगीतं, ‘मनसामंगल’सारख्या गोष्टी, हे नदी आणि तिच्या माणसांभोवती फिरतात. १९५०-७० च्या काळात तर नदीवर आधारित अनेक कादंबऱ्या आणि कवितासंग्रह येत गेले. जिबनानंदा दास हे कवी जाऊनच आता ६५ वर्षे झाली; पण आजही अनेक बंगाली तरुणांना त्यांच्या कविता पाठ आहेत, त्याची भाषांतरं होतात, नवी गीतं होतात. यातल्या बहुतांश कविता नदीजवळच्या. ‘रूपोशी बांगला’ या कवितासंग्रहात त्यांनी म्हटले आहे-

‘मी परतेन धनश्रीच्या तीराला, याच बंगालमध्ये

माणूस म्हणून नाही तर

कदाचित शालिक पक्षी बनून

किंवा येईन तीक्ष्ण डोळ्याचा ससाणा बनून.

पण परतेन इथेच,

बंगालच्या विस्तीर्ण नदय़ांमध्ये, शेतांमध्ये,

याच भूमीत जिला जालंगीच्या लाटा सदैव

स्पर्श करत राहतात..’

जिबनानंदांच्या कवितेत मासे होते, पक्षी होते, बदकं होती, भाताचे प्रकार होते, पाऊल पडल्यावर अद्भुत गंध येणाऱ्या नदीकाठच्या गवताच्या अनेक प्रजाती होत्या.

याच काळात बंगालमध्ये एक अत्यंत महत्त्वाची कादंबरी लिहिली गेली- ‘तिताश : एकटी नदीर नाम’, म्हणजे ‘तिताश नावाची नदी’. जेव्हा बहुतांश साहित्य ‘भद्रलोक’ म्हणजे उच्चवर्णीय साहित्यिक लिहीत होते तेव्हा एका नदीच्या, तिच्या जीवांच्या आणि तिच्या तीराने राहणाऱ्या मालो मासेमारांच्या उदयास्ताची गोष्ट लिहिली एका मालो मासेमार तरुणाने! याचे नाव होते अद्वैत मल्लाबर्मन. ‘तिताश’ प्रकाशित होण्याआधीच अद्वैतचा वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी मृत्यू झाला. पण त्याने मागे ठेवलेली ही कादंबरी आजही अनेकांना एका नदीची विविध रूपे दाखवत असते, एखाद्या निष्णात कवी-तत्त्वज्ञ-डॉक्टरसारखी. ऋत्विक घटकांनी यावर ‘तिताश : एकटी नदीर नाम’ हा जगप्रसिद्ध चित्रपट बनवला.

जगभरात नदीच्या भोवती साहित्य आणि कला बहरल्या. अमेरिकेत मार्क ट्वेनने मिसिसिप्पी नदीला वेगवेगळ्या बाजूंनी समजून घेतले आणि सांगितले. ट्वेन स्वत: चार वर्षे मिसिसिप्पी नदीवर बोट चालवत होता, जसे रवीन्द्रनाथ जवळपास एक दशक पद्म्ोवर हाऊसबोटसारख्या नौकेत राहिले. मिसिसिप्पीचे साहित्य अमेरिकेत अनेक शहरं प्राणपणाने जपतात. या नदीने हा खंडप्राय देश खूपशा प्रमाणात घडवला. एक भौगोलिक अस्तित्व म्हणूनच नाही, तर या नदीचे सांस्कृतिक लागेबांधेही अफाट आहेत.. आपल्या गंगेसारखे!

खास अमेरिकी असे संगीत ‘ब्ल्यूज’, विशेषत: ‘डेल्टा ब्ल्यूज’, ‘जाझ’, ‘सोल’, ‘हिपहॉप’, ‘गॉस्पेल’ हे अनेक अर्थानी मिसिसिप्पी नदीच्या तीराने घडत गेले. यात नितांत गरिबीत वाढलेल्या कुशाग्र आफ्रिकन- अमेरिकी संगीतकारांचा आणि गायकांचा मोठा भाग होता आणि आहे. १९२७ मध्ये मिसिसिप्पी नदीला प्रलयंकारी पूर आला, तिच्याभोवती बांधलेल्या भिंती खचल्या आणि पाणी आधी कृष्णवर्णीयांच्या वस्त्यांमध्ये गेले. या प्रसंगावर अनेक गाणी लिहिली गेली आणि ती शेकडो गाणी आजही ऐकली जातात.

का महत्त्वाचे आहे हे सगळे? कारण इतिहास आणि आठवणी जिवंत ठेवण्याचे अनेक मार्ग असतात. नदीचे आणि तिच्या भोवतालाचे सांस्कृतिक दस्तावेजीकरण (कल्चरल डॉक्युमेंटेशन) जेव्हा अभ्यासकी शोधनिबंधांच्या बरोबरच गाणी, गोष्टी या स्वरूपामध्ये  होते, तेव्हा तो दुवा जिवंत होतो आणि पुढे पुढे जात राहतो.

अमेरिकेत जसे ‘मिसिसिप्पी ब्ल्यूज’ तसेच आपल्याकडे भातियाली. भातियाली म्हणजे खास नदीच्या नावाडय़ांची गाणी. यात वाद्यं नाहीत, खास ठेका नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे श्रोतृवर्ग नाही. नावाडी आपल्याच तालात भाटी म्हणजे ओहोटीला नावेत ही गाणी म्हणत असतो. नदीची जितकी जाण या गाण्यातून दिसते तितकी खचितच पुस्तकात आढळेल. काझी नझरुल इस्लाम यांची एक भातियाली म्हणते-

‘एकुलभांगे, ओकुल गोरे, ए तो नादिर खेला

सकाल बेलार आमिर रे भाय, फोकीर संध्या

बेला’

म्हणजे एका तीराला पोखरत दुसऱ्या तीराला समृद्ध करणं ही तर नदीची तऱ्हाच आहे. या ओळीत फक्त कविता नसून बंगालच्या नदय़ांचे सत्य आहे. ‘मिसिसिप्पी ब्ल्यूज’ची गाणी अनेक अर्थाने याच जातकुळीची. ही कष्टकऱ्यांची गाणी. लालित्य यातून तावून-सुलाखून गळून पडले आहे आणि शहाणीव किंवा तळपणारे सत्य तेवढे शिल्लक आहे.

भारतातील प्रत्येक भागात आपल्या नदीच्या गोष्टी आहेत. आसामला ब्रह्मपुत्राने घडवले. या नदीला इथे ‘बोर लुईत’ म्हणतात. इथेदेखील या प्रदेशाची कला नदीभोवती फिरते. अनेक गटांना, धर्माना आणि समूहांना एका धाग्यात बांधले आहे ते या महाकाय ‘रेडरिव्हर’ म्हणजे बोर लुईतने.

दक्षिणेत कावेरी ही स्वत:च एक राज्य आहे. संगम साहित्यात सगळीकडे कावेरीचा संदर्भ सापडतो. सिलापद्दीकारम या महाकाव्याला तर कावेरीचे काव्य म्हणता येईल इतके नदीचे चोख संदर्भ यात येतात. तमिळनाडूमध्ये आजही साजरा केला जाणारा ‘आदिपेरुक्कु’ म्हणजे कावेरीच्या पहिल्या पाण्याचा उत्सव, याची वर्णने या दीड हजार वर्षे जुन्या काव्यात येतात.

पंजाबमधल्या नदय़ांभोवती तर गोष्टींची आणि लोककथांची रेलचेल आहे. चेनाब म्हणजे प्रेमाची नदी. सोहनी-महिवाल, हीर-रांझा, लला-मजनू या आजही ऐकल्या जाणाऱ्या गोष्टीमध्ये नदीचे स्थान अढळ आहे. वरिस शाह म्हणतो की, चेनाब-तीरीच्या झांग गावात हीरला जेव्हा विष देण्यात आलं, तेव्हा नदीने आपला मार्ग बदलला आणि झांगला तिने झिडकारलं. म्हणून मग, ‘कृष्णेकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ या गोविंदाग्रजांच्या (अपूर्ण) खंडकाव्यातल्या ओळीप्रमाणेच, चेनाबकाठी झांग आता उरले नाही.

महाराष्ट्रातही श्लोक, स्तोत्र आणि माहात्म्य सोडून नदी आणि पाण्याच्या अनेक जिवंत ओव्या आहेत, गोष्टी आहेत, गाणी आहेत. जोतीराव फुलेंसारख्या द्रष्टय़ाचे पाण्याबद्दल मौलिक चिंतन आहे.

 आज या सगळ्याचा काय उपयोग?

नदी पुनरुज्जीवन फक्त नकाशातून, आकडेमोडीतून आणि नव्या योजनांमधूनच साध्य होत नाही. नदीबरोबर, पाण्याबरोबर आपलं नातं होतं आणि या नात्याने आपल्याला समृद्ध केलं होतं. हे फक्त स्तुतिसुमनं उधळणारं तोंडदेखलं नाही, तर अवघड परिस्थितीत एकमेकांशी भांडत का होईना एकत्र राहणारं जिवंत नातं होतं. उद्या, २२ मार्च रोजी जागतिक जल दिवस. आपण सगळेच कोविड-१९ मुळे काहीसे भांबावलेले आहोत. असे असताना आपल्या भूमीची आणि नदय़ांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न आपल्याला कदाचित एक नवा रसरशीत अनुभव देऊ शकेल, एक दुवा जिवंत करू शकेल.

लेखिका ‘साउथ एशियन नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ या ‘ना नफा’ संस्थेसाठी काम करतात.

      ईमेल : parineeta.dandekar@gmail.com