वृत्तवाहिन्यांना लोक गांभीर्याने घेत असतात. परंतु तेथील अनेक कार्यक्रमांत किमान सभ्यतेचाही अभाव दिसतो. बोलावलेल्या पाहुण्यांना बोलूच न देणे, त्यांचे बोलणे मधूनच तोडणे, आपणांस हवे तेच त्यांनी म्हणावे यासाठी दबाव आणणे यातून वादविवादाच्या चांगल्या परंपरेस नख लावले जात आहे, याचेही भान अनेकांना नसल्याचे दिसून येते.
‘बीबीसी’ वाहिनीवरील ‘टॉप गिअर’ या अत्यंत लोकप्रिय आणि आर्थिकदृष्टय़ा यशस्वी अशा कार्यक्रमाचे सादरकत्रे जेरेमी क्लार्कसन यांना काढून टाकण्याचा धक्कादायक निर्णय बीबीसीच्या व्यवस्थापनाने घेतला असून, त्यातून आजच्या अर्थकारणातही काही मूल्यांचे मोल पैशाने होत नसते हेच या वाहिनीने दाखवून दिले आहे. जेरेमी क्लार्कसन ही काही साधी असामी नाही. ‘टॉप गिअर’ ही मोटारींविषयीची साप्ताहिक मालिका. वास्तवतेच्या अंगाने जाणारी. जगभरातील १७० देशांमध्ये पाहिली जाणारी. तिचा जन्म १९७७ चा. पण तेरा वर्षांपूर्वी बीबीसीने ती नव्या स्वरूपात सादर केली. तेव्हापासून जेरेमी क्लार्कसन या मालिकेचे सादरकर्ते आहेत आणि आज या मालिकेला जी सुमारे ३५ कोटी प्रेक्षकसंख्या आहे ती केवळ त्यांच्यामुळेच आहे, असे म्हटले तर त्यात अणुमात्र अतिशयोक्ती नाही. अनेक जण तर त्यांच्याशिवाय या कार्यक्रमाची कल्पनाही करू शकत नाहीत. असे असताना बीबीसीने त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. बीबीसी ही काही धर्मादाय संस्था नाही. ती सरकारी वाहिनीही नाही. तसे असते तर त्यांना फायद्या-तोटय़ाची पर्वा नाही असे म्हणता आले असते. कारण जगभरातील अनुभव तसाच आहे. परंतु बीबीसी एका विश्वस्त संस्थेद्वारे व्यावसायिक पद्धतीने चालविली जाते. अशा संस्थेत ताळेबंद तगडा असणे महत्त्वाचेच असते. क्लार्कसन यांना वगळण्याने त्या ताळेबंदावर परिणाम होणार हे माहीत असतानाही बीबीसीच्या व्यवस्थापनाने ते केले. तेव्हा त्यामागील नेमका मूल्यविचार समजून घेणे हे आपल्यासाठीही महत्त्वाचे आहे.
या क्लार्कसन-नारळ प्रकरणास कारणीभूत ठरली ती क्लार्कसन यांच्या मेंदूत शिरलेली हवा. त्यात त्यांचीही काही चूक नाही. चूक आहे ती अहम् नामक विषाणूची. कोणाच्याही मेंदूस या विषाणूची बाधा झाल्यास त्याच्या डोक्यामध्ये निर्वात पोकळी निर्माण होते. मात्र ती फार काळ टिकत नाही. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार तेथे आपोआपच हवा जाते. काही रुग्णांमध्ये हवेऐवजी खुर्ची जाते, पद वा सत्ता जाते. क्लार्कसन यांच्याबाबतीत तेथे लोकप्रियतेची हवा गेली. सध्याचा काळ हा तुरंतकाळ आहे आणि दूरचित्रवाणी हे या काळास अनुरूप असेच माध्यम आहे. ते साध्या साध्या माणसांनाही तुरंत सेलेब्रिटी बनवून टाकते. एकदा दूरचित्रवाणीच्या पडद्यावर वारंवार तुमचे श्रीमुख दिसू लागले की प्रेक्षकांशी तुमचा अतिपरिचय होतो. एरवी अतिपरिचयाने अवज्ञा होते. येथे अवज्ञेस अवसरच मिळत नसल्याने माणूस नाइलाजाने सेलेब्रिटी बनून जातो. एव्हाना प्रेक्षकांतही सहवासाने प्रेम निर्माण झालेले असते. अशा वेळी तो माणूस लोकप्रिय बनण्यास वेळ लागत नाही. हे रोजच आपण पाहत असतो, अनुभवत असतो. दूरचित्रवाणीवरील चर्चेच्या तासाभराच्या कार्यक्रमात ज्यांना बोलण्यास मोजून ३० सेकंद वेळ मिळतो असे लघुपत्रकारही थोर विचारवंत वा तज्ज्ञ म्हणून मानले जातात म्हटल्यावर वृत्तवाहिन्यांचे संपादक आणि वृत्तनिवेदक हे साक्षात् अ‍ॅरिस्टॉटलच गणले जाऊ लागल्यास त्यात नवल नाही. पण आश्चर्य याचे की त्यांनाही खरोखरच आपण अ‍ॅरिस्टॉटल आहोत, आपली पत्रकारिता पुलित्झरविजेती आहे असे वाटू लागते. ज्यांनी लोकांचे डोळे नीट उघडायचे तेच डोक्यामागे दोन्ही हात घेऊन मिटल्या डोळ्यांनी आपण जग जिंकल्याची स्वप्ने पाहू लागतात. काहींची ही भ्रमिष्टावस्था तर येथवर पोचते की या देशात अकलेचे अर्णव आणि नतिकतेचे सागर काय ते आपणच असून आपण म्हणजेच देश आहोत असे त्यांना वाटू लागते. अहम्चा फुगा फुगला की बेडकीलाही आपण बल असल्याचा भ्रम होतो त्यातलीच ही गत. असे लोक कालांतराने खूपच कर्कश होऊ लागतात. बाकी सारे भिकारबुद्धी असे समजून येता-जाता सहकाऱ्यांवर खेकसू लागतात. प्रसंगी अंगावर धावून जातात. रोजच्या ताणाने अर्धमेली झालेली पत्रकारमंडळी आणि त्यांना आंग्ल भाषेत शिव्या देऊन आपल्या सुसंस्कृततेचा परिचय करून देणारे संपादक हे तर आपल्याकडील अनेक वृत्तवाहिन्यांच्या संपादकीय बैठकीतील दैनंदिन चित्र आहे. क्लार्कसन यांची लोकप्रियता या विचारवंतांहून लाख पटीने जास्त. त्यामुळे त्यांची धाव मारहाणीपर्यंत जाते. कार्यक्रमातील एका भागाच्या चित्रीकरणाप्रसंगी रात्री गरम भोजन मिळाले नाही म्हणून त्यांनी एका निर्मात्याला सर्वासमक्ष मारहाण आणि शिवीगाळ केली. बीबीसीने त्यांच्यावर जी कारवाई केली तिचे हे तात्कालिक कारण होते. वस्तुत: ही वेळ आधीच यावयास हवी होती.
क्लार्कसन यांच्या लोकप्रियतेचे गमक त्या कार्यक्रमाचा आशय, चित्रीकरण आणि संपादन यांत जेवढे आहे, तेवढेच ते त्यांच्या निवेदनातही आहे. त्यांचे बोलणे कोटय़वधी लोकांना आवडते याचे कारण त्यात त्या कोटय़वधी लोकांच्या मनातील उजव्या, सनातनी भावनांचे प्रतिबिंब असते. पारंपरिक विचारसरणीला कुरवाळणारे त्यांचे विनोदी वाग्टोले मानवी मनातील आदिम भावनांना गुदगुल्या करीत असले तरी त्यांना कोणी सभ्य म्हणणार नाही. संपावर गेलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील ३१ हजार कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर फासावर दिले पाहिजे असे म्हणणे, तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांना ‘मूर्ख एकाक्ष’ असे म्हणणे, वर्ण आणि वंशावरून टुकार विनोद करणे हे सभ्यतेच्या कोणत्याही मर्यादेत बसत नाही. भारताविषयीचे, येथे येणाऱ्या प्रत्येकाला हगवण होते, हे त्यांचे विधान याच ना-लायकीचे होते. त्या-त्या वेळी अशा विधानांवरून वाद झाले. अनेकदा क्लार्कसन यांना, त्यांच्यावतीने बीबीसीला माफी मागावी लागली. परंतु त्यातून त्यांनी कोणताही धडा घेतला नाही. बीबीसीनेही ते खपवून घेतले आणि त्यामुळेच क्लार्कसन यांची मजल आपल्या सहकाऱ्याला मारहाण करण्यापर्यंत गेली. या वेळी मात्र बीबीसीने त्यांची गय केली नाही. क्लार्कसन यांना निलंबित करून त्यांच्या कराराचे नूतनीकरण न करण्याचा बीबीसीचा निर्णय, त्यांची लोकप्रियता पाहता वादग्रस्त ठरणाराच होता. बीबीसीमधील डाव्यांमुळे त्यांना जावे लागले अशी टीका आता होत असून, त्यांना पुन्हा कार्यक्रमात घ्यावे यासाठी काही चाहत्यांनी इंटरनेटवरून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या चाहत्यांमध्ये पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या कन्येचाही समावेश आहे. बीबीसीने क्लार्कसन यांची पुनस्र्थापना न केल्यास आपण उपोषण करू अशी धमकीच तिने दिली आहे. ती ११ वर्षांची आहे आणि क्लार्कसनकाका हे तिच्या वडिलांचे मित्र आहेत. तेव्हा तिने काकांना वाचविण्याचा प्रयत्न करावा हा तिच्या वयाचा दोष मानावा लागेल. डेव्हिड कॅमेरून यांनी मात्र अशा प्रकारचे आक्रमक आणि असभ्य वर्तन सहन करता कामा नये अशीच प्रतिक्रिया दिली आहे.        
सातत्याने चित्रवाणी पडद्यावर येणाऱ्या तथाकथित सेलेब्रिटींनी तर याबाबत अधिक जागृत असले पाहिजे. ही अपेक्षा काही फार मोठी नाही. दूरचित्रवाणीचा परिणाम लोकमानसावर मोठय़ा प्रमाणावर होत असतो. वृत्तवाहिन्यांना लोक अजूनही गांभीर्याने घेत असतात. परंतु तेथील अनेक कार्यक्रमांत किमान सभ्यतेचाही अभाव दिसतो. चर्चेस पाचारण केलेल्या पाहुण्यांना बोलूच न देणे, त्यांचे बोलणे मधूनच तोडणे, आपणांस हवे तेच त्यांनी म्हणावे यासाठी दबाव आणणे यातून वादविवादाच्या चांगल्या परंपरेस नख लावले जात आहे, याचेही भान अनेकांना नसल्याचे दिसून येते. खेदाची बाब ही की अशा वावदूकांच्या गावठी आवृत्त्याही गावगन्ना निघू लागल्या आहेत. त्या आताशा मनोरंजन वाहिन्यांतही दिसू लागल्या आहेत. क्लार्कसन प्रकरणाने त्यांच्या मेंदूची वायुबाधा दूर झाली नि लोकप्रियता म्हणजे मनमानी करण्याची सनद नाही हे त्यांना समजले तरी हे प्रकरण कामास आले असे म्हणता येईल.