शहाजहानने प्रियपत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ताजमहालासारखी अलौकिक कलाकृती उभारली. मात्र, उत्तरायुष्यात शहाजहानची परवड झाली. या सर्व इतिहासाची साक्षीदार होती त्याची कन्या जहाँआरा. तिची प्रेमकथा याच ताजमहालाच्या साक्षीने फुलली.
मुघल सम्राट शहाजहानने मुमताजच्या आठवणींनी व्याकूळ होऊन ताजमहालासारखी अप्रतिम कलाकृती आग्य्रात उभारली. मात्र, त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. त्याच्या पोटच्या पोरानेच, औरंगजेबाने, त्याचा घात करून त्याला सम्राटपदावरून दूर करत अंधारकोठडीत लोटले. पित्याची ही दारुण अवस्था अनुभवली जहाँआरा हिने. मात्र, औरंगजेबाचे हे रूप काही तिला नवीन नव्हते.
औरंगजेब आपल्या मोठय़ा भावाचा, दारा शुकोहचा, काटा काढण्यास उत्सुक असून राजगादी बळकावयाची त्याची महत्त्वाकांक्षा जहाँआराने कळत्या वयापासूनच ओळखली होती. परंतु दोघांनीही तिचे म्हणणे मनावर घेतले नाही. अखेरीस व्हायचे तेच झाले. या दरम्यान जहाँआराचे वयाच्या पंधराव्या वर्षीच खोंदामीर नावाच्या हिरेव्यापाऱ्याशी लग्न झाले. प्राणप्रिय आई मुमताज तिला सोडून गेली. शहाजहानने तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ यमुनेच्या तीरावर ताजमहाल उभारण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्याने अहमद लाहौरी ऊर्फ इसा या त्या काळातील प्रख्यात वास्तुरचनाकाराला पाचारण केले. शहाजहानने जहाँआरालाच इसाला मदत करायला  सांगितले. प्रेमाची साक्ष म्हणून ज्या ताजमहालची उभारणी केली जात होती त्याच्याच साक्षीने इसा-जहाँआरा यांची प्रेमकथा फुलत गेली. पाषाणहृदयी नवऱ्यापेक्षा कोमलहृदयी कविमनाचा इसा जहाँआराला जास्त भावला. विशेष म्हणजे शहाजहाननेही त्याला काही हरकत घेतली नाही. पुढे औरंगजेबाचे क्रौर्य, दारा शुकोहचा खून करून सम्राटपदावर त्याने मिळवलेला कब्जा, शहाजहान व जहाँआराचा तुरुंगवास, इसा-जहाँआराची ताटातूट, तुरुंगातून निसटून इसा व मुलगी अर्जुमंदला भेटायला जाण्यासाठी केलेला खटाटोप, विजापूरच्या सुलतानाकडे त्यांची झालेली भेट, त्यांच्या सुटकेसाठी जहाँआराने सुलतानाला दिलेला प्रस्ताव, पुन्हा तिघांची ताटातूट, शहाजहानचा अंत आणि अखेरीस जहाँआरा, इसा आणि अर्जुमंद यांचे पुनर्मीलन असा हा सर्व प्रवास अमेरिकन लेखक जॉन शोर्स याने उत्तमरीत्या बांधला आहे. ओघवती शैली हाच या पुस्तकाचा गाभा आहे. विलक्षण नाटय़, पती-पत्नी, पिता-मुलगी, प्रियकर-प्रेयसी, आई-मुलगी, भाऊ-बहीण या नात्यांतील वैविध्यता रेखाटताना लेखकाने वापरलेले शब्द, त्यांची वीण घट्ट आहे. त्यामुळे कुठेही सलगतेचा धागा तुटत नाही.
सुरुवातीलाच मुघल साम्राज्यातील आग्रा शहराचे वर्णन लेखकाने केले आहे. केवळ राजमहालातीलच नव्हे तर परिसरातील लोकजीवनही रेखाटल्याने त्यात आपलेपणा वाटतो. शहाजहानच्या जनानखान्यातही (हराम) आपण डोकावतो. त्यातील स्त्रियांची जीवनशैली, त्यांची मानसिकता अधिक स्पष्ट होते. ज्येष्ठ पुत्र या नात्याने दाराच आपला वारसदार या ठाम समजुतीने शहाजहानने त्याला वेळोवेळी दिलेले झुकते माप आणि उपदेश व त्याच वेळी औरंगजेबाकडे हूड बुद्धीचा म्हणून केलेले दुर्लक्ष यातून औरंगजेबाच्या मनातील असूया उत्तरोत्तर वाढतच जाते आणि त्याची अखेर शहाजहानला तुरुंगात खितपत पडण्याने होते. जहाँआराला मात्र या सर्वाची जाणीव आधीच होती. पण दोघांनाही सावध करण्याचा तिचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरतो.
प्राणप्रिय पत्नीच्या निधनाने व्याकूळ झालेल्या सम्राटाची अवस्था, त्याच्या मनाची घालमेल, राज्यशकट हाकण्यावरून त्याचे उडालेले लक्ष याचा बारीकसारीक तपशील लेखकाने दिला आहे. इसाला पाचारण करतानाच मोठय़ा विश्वासाने जहाँआराला त्याचा मदतनीस म्हणून नेमणे हाही सम्राटांच्या मानसिकतेला छेद देणारा पलू म्हणावा लागेल. एकीकडे सम्राटाची मुलगी असूनही नवऱ्याच्या घरात यत्िंकश्चित किंमत नसलेली जहाँआरा नवऱ्याचा सर्व जाच मूकपणे सहन करते. आई, मुमताजने दिलेला सल्ला (पुरुष हे जळत्या निखाऱ्यासारखे असतात, तुम्ही त्यांना काळजीपूर्वक सांभाळले तर त्यामुळे तुमचा दाह होत नाही, परंतु तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ते तुम्हाला जाळून टाकतात.) ती तंतोतंत पाळते. मात्र, तरीही तिच्या समंजसपणाचा कायम गरफायदा घेतच तिचा नवरा खोंदामीर तिला छळत राहतोच. ताजमहालाच्या उभारणीत इसाला मदत करताना त्याच्यातील कलासक्त पुरुष, कविमनाचा सुहृद त्यामुळेच तिला अधिक भावतो आणि जहाँआरा त्याच्याकडे आकृष्ट होते. सम्राटालाही आपल्या मुलीवरील अन्यायाची जाणीव असते म्हणूनच तो इसा-जहाँआराच्या प्रेमाला मूकसंमती देतो. एवढेच नव्हे तर कामातून एकांत मिळावा यासाठी त्यांना वेगवेगळ्या मार्गाने लाहोरला पाठवून तेथील एका निवांत स्थळावर त्यांची भेट घडवून आणण्यात पुढाकारही घेतो. पुढे  शहाजहान जहाँआराची माफीही मागतो.
या सर्वात प्रामुख्याने लक्षात राहते ते औरंगजेबाचे क्रौर्य. कायमच दाराला झुकते माप देणाऱ्या पित्याविषयी त्याच्या मनात प्रचंड असंतोष असतोच. तो या ना त्या मार्गाने त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न करतोही, मात्र प्रत्येक वेळी जहाँआरा दाराचा बचाव करते. औरंगजेबाच्या या स्वभावाविषयी सांगूनही दारा त्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा त्याला औरंगजेबाचे खरे रूप कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. औरंगजेब आणि जहाँआरा यांच्यातील नातेही ‘लव्ह-हेट’ स्वरूपाचे आहे. सम्राटाला पदावरून दूर करण्याच्या काही दिवस आधीच औरंगजेबाच्या महालात कोब्रा नाग सापडतो. औरंगजेबाला तो डसणार तेवढय़ात जहाँआरा तलवारीने त्याचे दोन तुकडे करते. औरंगजेबाने अनंत यातना देऊनही ती त्याचा भाऊ या नात्याने बचाव करते, मात्र तिचे हे उपकार औरंगजेब तिच्यावर अनंत अत्याचार करून फेडतो!
इसावरील प्रेमाची कबुली मात्र जहाँआरा पित्याखेरीज कोणासमोरही देत नाही. त्यामुळेच औरंगजेबाच्या राज्यात त्यांची ताटातूट होते तेव्हा ती तुरुंगात इसाच्या आठवणीने व्याकूळ होते. शहाजहान तिची मानसिकता जाणतो. तो तिला तुरुंगातून पळून जाण्यात मदत करतो. त्यात त्याचा विश्वासू सहकारी निझाम त्याला मदत करतो. तो जहाँआराला घेऊन दक्षिणेत येतो व तिथे इसा-जहाँआरा यांची भेट होते. मात्र, त्यांच्या सुटकेसाठी जहाँआरा विजापूरच्या सुलतानाला औरंगजेबाला कटकारस्थान करून ठार मारण्याचे वचन देते. तोपर्यंत त्यांना विजापुरातच ठेवून जहाँआरा पुन्हा आग्य्राला परतते. पण, तिचे िबग फुटून ती पुन्हा औरंगजेबाच्या कैदेत बंदिस्त होते. तिथेच तिचा नवरा खोंदामीर तिच्यावर अनंत अत्याचार करतो. तुरुंगातच शहाजहान अखेरचा श्वास घेतो. मात्र, मरण्यापूर्वी जहाँआरा पुन्हा या नरकयातनांतून मुक्त होऊन स्वच्छंद आयुष्य जगेल असे वचन तिच्याकडून घेतो. जहाँआरा पुन्हा औरंगजेबाच्या तावडीतून सुटते आणि अखेरीस कलकत्त्याला इसा, अर्जुमंद आणि तिचे पुनर्मीलन होते.
या पुस्तकामुळे एक सार्वत्रिक समजही खोटा ठरवला गेला आहे. आणि तो म्हणजे ताजमहालच्या निर्मितीनंतर शहाजहानने त्याचा निर्माता असलेल्या इसाला ठार मारले, हजारो कामगारांचे हात छाटून टाकले. अर्थात ही कादंबरी आहे. त्यामुळे यातील सर्व घटनाक्रम आणि तपशील सत्य आहे की नाही यावर इतिहासाच्या जिज्ञासू अभ्यासकांनी प्रकाश टाकायला हवा. मात्र ही कादंबरी विलक्षण वाचनीय आणि थरारक आहे, हे नक्की.
बिनीथ अ मार्बल स्काय – अ नॉव्हेल ऑफ द ताज : जॉन शोर्स
प्रकाशक : रुपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : ३५८, किंमत : २९५ रुपये.