scorecardresearch

भारत आणि रत्न

आयुष्यभराच्या तपश्चर्येचा आणि इतरांचे आयुष्य उंचावण्याच्या साधनेचा सन्मान ‘भारतरत्न’ या उपाधीने करावयाचा असतो. याचे भान सचिनोन्मादात वाहून जाणाऱ्यांना

आयुष्यभराच्या तपश्चर्येचा आणि इतरांचे आयुष्य उंचावण्याच्या साधनेचा सन्मान ‘भारतरत्न’ या उपाधीने करावयाचा असतो. याचे भान सचिनोन्मादात वाहून जाणाऱ्यांना नाही आणि ते यावे अशी तो उन्माद जाणीवपूर्वक जोपासणाऱ्या बाजारपेठ नियंत्रकांची इच्छा नाही.
बुद्धी गहाण टाकून लोकप्रियतेच्या मागे वाहत जाणे भारतीयांना आवडते. एखाद्यास लोकप्रियतेच्या शिखरावर बसवायचे आणि आपल्या इच्छाआकांक्षांचे ओझे त्या नायकाच्या खांद्यावर टाकून स्वत: निवांत पुख्खे झोडत बसायचे हे आपले व्यवच्छेदक लक्षण. ते सर्वच भारतीय समाजास लागू पडते. असा नायक मग आपल्यासाठी जणू अपरिहार्यच आहे असा समज करून दिला जातो आणि आपणासही असा समज करून घेणे आवडते. परिणामी या आणि अशा नायकाविना उर्वरितांचे जगणे हे निराधार आणि निर्थक ठरते आणि सर्वच संबंधित मग अशा नायकांचे गोडवे गाण्यात रममाण होतात. हे असे गोडवे गाणारे बऱ्याच अंशी लबाड असतात आणि अन्य सामान्यांना त्याचा पत्ताही नसतो. सचिन रमेश तेंडुलकर या व्यक्तीचे हे असे झाले आहे. जगण्याच्या अन्य क्षेत्रांत कोणतेही आशादायक असे काही घडत नव्हते त्या काळात सचिन बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरला आणि या भारतवर्षांच्या उद्धारासाठीच जणू कोणी हा अवतार पृथ्वीतलावर आलेला आहे, असे आपणास वाटू लागले. तोपर्यंत मध्यमवर्गाच्या अपूर्ण आशाआकांक्षांचे विरेचन अमिताभ बच्चन याच्या रूपाने पडद्यावर होत होते. त्यालाही असाच महानायकाचा दर्जा या समाजाने दिला होता. परंतु तो महानायक पुढे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि काहीही कारण नसताना बोफोर्स आदी प्रकरणाचे शिंतोडे आपल्या उंची अंगरख्यावर त्याने उडवून घेतले. त्यात या नायकाने आपले लांब हात विसावण्यासाठी मदत घेतली ती अनिल अंबानी वा अमर सिंह यांच्या हाताची. या सगळ्यामुळे नाही म्हटले तरी या बच्चनपुत्राची अमित आभा झाकोळलीच. या चुका टाळता आल्या असत्या, तर अमिताभ बच्चन यासदेखील भारतरत्न दिले जावे अशी मागणी पुढे येती आणि जनमताच्या रेटय़ावर नाचण्याची वाटच पाहणारे राजकीय पक्ष ती वाया जाऊ देते ना. अमिताभच्या चुका सचिनने टाळल्या आणि कोणाच्या अध्यात ना मध्यात ही आदर्श व्यक्तिमत्त्वासाठीची पहिली कसोटी तो सातत्याने अव्वल गुणांनी उत्तीर्ण होत गेला. त्याचे चातुर्य इतके की आसपास सट्टेबाजीचे आणि खेळातील भ्रष्टाचाराचे अगणित प्रकार घडत असताना क्रिकेटचा देव म्हणवून घेणाऱ्या या नायकाने मौन पाळणेच पसंत केले. त्या अर्थाने सचिन हा हिंदूंच्या अगणित पण निरुपयोगी देवांसारखाच वागला. खेळातील हा भ्रष्टाचार निपटून टाकण्यासाठी वा निदान गेला बाजार कमी व्हावा यासाठी त्याने तसूभरही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे कोणालाही कसलाही धोका निर्माण झाला नाही. आपल्याकडील व्यवस्थेस अशी निधरेक व्यक्तिमत्त्वे नेहमीच आवडतात. त्यामुळे सचिनचे ‘भारतरत्न’ नक्की होतेच. ते त्याला मिळाले. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेर राहून मैदानातील खेळाडूंना नाचवणाऱ्या तमाम राजीव शुक्लांनी एकमेकांना टाळ्या देत सचिनचे ‘भारतरत्न’पद साजरे केले असेल. सचिनला पदरी ‘बाळगणाऱ्या’ अंबानींच्या बहुमजली इमल्यासही त्यामुळे रोषणाईची आणखी एक संधी मिळेल. विविध उत्पादनांच्या उत्तमतेची ग्वाही देणाऱ्यास ‘भारतरत्न’ दिले गेल्याने त्या कंपन्याही आनंदित झाल्या असतील हा मनमोहन सिंग सरकारच्या निर्णयाचा आणखी एक फायदा. आणि या सगळ्याचा दूरान्वयानेही संबंध नसणारे निव्वळ क्रिकेटवेडे ‘आपल्या’ सचिनला सर्वोच्च सन्मान मिळाल्याने खूश झाले असतील. परंतु वयाच्या अवघ्या चाळिशीत डोक्यावर आलेला ‘भारतरत्न’पदाचा भार वागवत सचिनला उर्वरित आयुष्य काढावे लागणार आहे, याची जाणीव या सचिनवेडय़ांना नसावी. खेरीज, उद्या एखाद्या परदेशी कंपनीच्या उत्पादनाची जाहिरात सचिनने केल्यास ती कंपनी ‘भारतरत्न’ सचिनने आपल्या उत्पादनास पाठिंबा दिल्याचे सांगेल, तेव्हा ते योग्य की अयोग्य? आयुष्यभराच्या तपश्चर्येचा आणि इतरांचे आयुष्य उंचावण्याच्या साधनेचा सन्मान ‘भारतरत्न’ या उपाधीने करावयाचा असतो. याचे भान सचिनोन्मादात वाहून जाणाऱ्यांना नाही आणि ते यावे अशी तो उन्माद जाणीवपूर्वक जोपासणाऱ्या बाजारपेठ नियंत्रकांची इच्छा नाही.
त्याचमुळे सचिन आणि प्रा. सीएनआर राव यांच्यासारख्या संशोधकांस एकाच पंगतीत बसवून त्यांच्या मुखी भारतरत्न पदाचा घास भरवण्याचा निर्बुद्धपणा आपल्याकडे होऊ शकतो. राव यांची सारी हयात विज्ञान संशोधनासाठी गेली आणि त्यासाठी कोणतीही मानमरातब वा कौतुक पदरात पडण्याची शक्यता नसतानाही ते आपले काम करीत गेले. ते करण्यात त्यांना आनंद होता. त्या आनंदात भारतासारख्या विज्ञानदुष्ट देशाचे काही भले व्हावे अशी इच्छा होती. त्याचमुळे अत्यंत कमी मोबदल्यात ते आपले मूलगामी काम करीत राहिले. सचिनबाबत हे असेच म्हणता येईल काय? त्याच्या खेळाने भारतीयांस आनंद दिला यापलीकडे अधिक काय झाले? खेळाचा प्रसार झाला असे म्हणावे तर क्रिकेट त्याआधीही भारतात लोकप्रिय होताच. सचिनच्या येण्याने तो अधिक लोकप्रिय आणि बाजारस्नेही झाला, इतकेच. राव ज्या संस्थेचे प्रतिनिधित्व करतात ती इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ही संस्था भारतीय उद्योग क्षेत्राचे पितामह जमशेटजी टाटा यांनी देशास उज्ज्वल भवितव्य प्राप्त व्हावे यासाठी स्वत:ची खासगी संपत्ती विकून उभी केली. जागतिक दर्जाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या धर्तीवर भारतातही सर्व विज्ञान शाखांना कवेत घेणारी मोठी संस्था तयार व्हावी म्हणून द्रष्टय़ा टाटा यांनी आपली मालमत्ता विकली आणि निधी उभा केला. आज देशात विज्ञानप्रसाराचे महत्त्वाचे कार्य ती संस्था करते. याउलट सचिन दोन संस्थांचे प्रतिनिधित्व करतो. पहिली भारतीय क्रिकेट नियामक संस्था ही जनतेच्या पैशाचे खासगीकरण करते आणि दुसरी मुंबई इंडियन्स ही धनाढय़ उद्योगपतीच्या पत्नीच्या खासगी निधीतून(?) चालवली जाते. दोन्ही संस्थांनी क्रिकेटच्या बाजारीकरणास यथाशक्ती हातभार लावला. परंतु जेथे खेळाची साधने नाहीत, मैदाने नाहीत तेथे ती पोहोचावीत यासाठी काही केले असे नाही. राव यांच्या कार्याचे वर्णन करताना काही अर्धवट माध्यमांनी त्यांचा उल्लेख विज्ञानाच्या क्षेत्रातील सचिन असा केला. वास्तविक सचिन याचा उल्लेख क्रिकेटच्या मैदानावरील राव असे करणे एक वेळ क्षम्य ठरले असते. राव यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे तर क्रिकेटचे जग हे दहा देशांपलीकडे नाही. यातही लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे अमेरिका, फ्रान्स वा चीन, जर्मनी या देशांतही राव यांच्या संशोधन कार्याचा यथोचित सन्मान होतो आणि जागतिक कीर्तीच्या संशोधनांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या देशांत क्रिकेट औषधाइतकेदेखील खेळले जात नाही.  
या पाश्र्वभूमीवर ‘भारतरत्न’ कोणत्या निकषांवर दिले जाते हेही एकदा नक्की केले जावे. केवळ करमणूक करणाऱ्यास ते दिले जाणार असेल तर अशांच्या पंगतीत सीएनआर राव आदींना बसवण्याचे औद्धत्य तरी टाळले जावे. काही मूलभूत कार्याच्या गौरवार्थ ते दिले जाणार असेल तर तशांच्या पंगतीत सचिनसारख्यास बसवण्याचा निर्बुद्धपणा टाळायाला हवा. वस्तुत: एमजी रामचंद्रन यांच्यासारख्या तद्दन बाजारू नटास केवळ राजकीय सोयीसाठी ‘भारतरत्न’ ठरवून आपण या उपाधीची शोभा आधीच कमी केली आहे. १९८७ साली एमजीआर यांचे निधन झाले आणि ८८ साली ते ‘भारतरत्न’ झाले. याउलट डॉ. आंबेडकर वा सरदार पटेल यांच्यासारख्यांना ‘भारतरत्न’ ठरण्यासाठी मरणोत्तर अनुक्रमे ३४ आणि ४१ वर्षे लागली.
तेथून आपला लंबक अचानक उलटय़ा दिशेला गेला असून वयाच्या अवघ्या चाळिशीतील सचिनला ‘भारतरत्न’ ठरवण्यात सरकारने शहाणपणा दाखवला असे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरावे. लोकाग्रहास बळी पडण्यात प्रत्येक वेळी शहाणपण असतेच असे नाही. भारताच्या प्रेरणा आणि ही रत्ने यांत फारकत असता नये.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bharat and ratna

ताज्या बातम्या