कुठे तो, अटलजी, अडवाणीजी, बलराज मधोक, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, जना कृष्णामूर्ती , बंगारू लक्ष्मण, कैलाशपती मिश्रा, सिकंदर बक्त, जगन्नाथराव जोशी, नानाजी देशमुख, वसंतराव ओक, प्रेमनाथ डोगरा, सुंदर सिंग भंडारी, उत्तमराव पाटील, राम कापसे, राम नाईक, वेद प्रकाश गोयल, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फ़ुंडकर, अण्णा जोशी, बाळासाहेब आपटे, वसंतराव भागवत, माधव गोविंद वैद्य, अगदी नितीन गडकरी, एकनाथ खडसे, प्रकाश जावडेकर यांच्या सारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा भाजपा आणि कुठे आजचा सत्ता हेच सर्वस्व मानणाऱ्या, सत्तेसाठी आपल्याच सहकाऱ्यांना- मित्र पक्षांना राजकारणातून उध्वस्त करणाऱ्या स्वार्थी आणि नशीबवान राजकारण्यांचा भाजपा.

खरंच भाजपा गेल्या ४६ वर्षात नखशिकांत बदलला. भाजपच्या मूळ कार्यकर्त्याच्या मनात आज ‘कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओतून, जगतात येथे सारे मनात नसून, तरी कसे हसतात गुलाब हे सारे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हीच भूमिका आहे. हे गीत त्या लाखो अनाम कार्यकर्त्यांचे आहे ज्यांनी विचार दिला, बळ दिले, आयुष्य दिले आणि मोबदल्यात मिळाले केवळ दुर्लक्ष.

जेव्हा विचारांची जागा व्यवहाराने घेतली जाते, तेव्हा लोकशाहीचा आत्मा हळूहळू विझत जातो आणि त्या विझणाऱ्या ज्योतीचे साक्षीदार हे कार्यकर्ते एकटेच उभे राहतात, काट्यांवर जगणाऱ्या गुलाबांसारखे बाहेरून हसत, आतून रक्त ओतत….बिच्चारे !

कशासाठी उतरावे तंबू ठोकून?

हा प्रश्न आज महाराष्ट्रातील एका बूथ कार्यकर्त्याच्या मनात घोळतोय ज्याने तीस वर्षे पक्षासाठी दिली. उन्हाळ्यात सायकलवर फिरला, पावसात भिजत प्रचार केला, घरादाराकडे दुर्लक्ष केले. तिकीट मागितले तेव्हा पक्षाने सांगितले “दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्याला द्यायचे आहे, तू समजून घे.” तो कार्यकर्ता समजून घेतो. कारण त्याला शिकवले गेले होते पक्ष हाच परमेश्वर. परंतु आतून तो विचारतो कशासाठी उतरावे तंबू ठोकून? कुठल्या युद्धासाठी? कुठल्या विचारासाठी? की केवळ दुसऱ्याच्या राज्याभिषेकासाठी?

कोण मेले कुणासाठी रक्त ओतून…

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून १९९२ नंतरच्या दंगलींत भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. अयोध्या आंदोलनात अडवाणींच्या रथापुढे चालणाऱ्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले गेले. त्यांच्या कुटुंबांनी उपासमार सहन केली. त्या बलिदानावर पक्षाची इमारत उभी राहिली. आज त्याच इमारतीत कालपर्यंत विरोधी पक्षात असलेले नेते मंत्रिपदांवर विराजमान आहेत. ज्यांनी रक्त ओतले ते दाराबाहेर उभे आहेत.

ज्यांनी कधी झेंडाही उचलला नाही ते व्यासपीठावर मिरवत आहेत. हे रक्त कुणासाठी होते? विचारासाठी की सत्तेसाठी? १९८४ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ दोन जागा मिळाल्या. तेव्हाही पक्षाचे कार्यकर्ते खचले नाहीत उलट, संघाच्या बूथपातळीवरील संघटनेने जमिनीवर काम सुरू ठेवले. “अबकी बारी अटलबिहारी” या घोषनेने त्यांनी देशाचा आसमंत दुमदुमून सोडला. हे केवळ मतांसाठी नव्हते हे एका सांस्कृतिक राष्ट्रवादाची अभिव्यक्ती होती जी संघाच्या दशकांच्या कार्यातून उगवली होती.

त्या काळातील भाजपचा कार्यकर्ता हा पगारी नव्हता. तो विचारांनी प्रेरित होता. बूथवर बसणारा, मतदारांची यादी पाठ असणारा, गल्लोगल्ली फिरणारा, पक्षाचे विचार सांगणारा हा कार्यकर्ता पक्षाची खरी ताकद होती. अटलजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हाही त्यांनी आघाडी धर्म सांभाळताना पक्षाच्या मूळ विचारांना धक्का लागू नये यासाठी सावधगिरी बाळगली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी सन्मान दिला आणि तुम्हाला किती मंत्रिपदे केंद्रात देऊ असे विचारले. त्यावर दिलदार बाळासाहेब ठाकरे यांनीही ,“तुम्ही ममता- समता- जयललिता यांना आधी सांभाळा. तुम्ही देश सांभाळा आम्ही महाराष्ट्र सांभाळतो. ” असे उत्तर दिले. असे संबंध होते अटलजी अडवाणीजी यांच्या काळात. या बलाढ्य नेत्यांनी सहकारी पक्षांना आदर दिला, परंतु स्वतःचे अस्तित्व विसरले नाहीत.

जगतात येथे सारे मनात नसून…

याच भाजपच्या प्रदेश कार्यालयापासून जिल्हा कार्यालयापर्यंत , ‘इव्हेन्ट’ नसेल तेव्हा एक विचित्र शांतता दिसते. कार्यकर्ते येतात, बसतात, काम करतात परंतु आतून ते रिकामे आहेत. ज्या विचारासाठी ते लढले तो विचार आता पक्षाच्या भाषणांत येतो परंतु कृतीत दिसत नाही.

अजित पवारांना उपमुख्यमंत्री करताना त्या कार्यकर्त्याला काय सांगायचे ज्याने वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध रस्त्यावर उतरून घोषणा दिल्या? ज्या देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पणे एबीपी माझाच्या मुलाखतीत, “राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, आपदधर्म नाही, शाश्वतधर्म नाही की दुसरं काही नाही” म्हणत कंठ शोष केला होता तेच देवेंद्र फडणवीस कोणतीही आवश्यकता नसताना त्याच अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून पहाटे पहाटे शपथ देतात आणि हे सत्ताकारण आहे म्हणून मिरवतात. हा होता का भाजपाचा वैचारिक पाया? मग सत्ता मिळावायचीच होती तर उद्धव ठाकरे यांचे मन वळवले असते तर किमान राज्यतल्या कार्यकर्त्यांना आनंद तरी झाला असता.

आज भाजपचा कार्यकर्ता पक्षात असतो, पक्षात जगतो पण मनात नसून. देह पक्षात आहे, आत्मा हरवला आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने एकट्याने बहुमत मिळवले हा ऐतिहासिक क्षण होता. देशात बदलाची लाट होती, काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध रोष होता आणि मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण होते. हा विजय पक्षाच्या संघटनेचाही होता. बूथ व्यवस्थापन, सदस्यनोंदणी, प्रचाराची व्यूहरचना सारे काही नियोजनबद्धपणे झाले.

परंतु या विजयाने एक धोकादायक व्यसन सुरू केले; विजयाचे व्यसन आणि हे व्यसन एकदा लागले की माणूस कोणत्याही मार्गाने विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. अमित शाह यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी येऊन एक वेगळीच रणनीती राबवली ती म्हणजे, राज्याराज्यात इतर पक्षांतील ‘जिंकू शकणाऱ्या’ नेत्यांना पक्षात ओढायचे आणि सत्ता काबीज करायची.

ईडी, सीबीआय आणि भाजप प्रवेश

देशात एक विनोदी परंतु अत्यंत कटू सत्य रूढ झाले आहे भाजपमध्ये प्रवेश म्हणजे गुन्हेगारी प्रकरणांमधून सुटका. ज्या नेत्यांवर ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स विभागाच्या कारवाया सुरू होत्या, ते भाजपत आले आणि जादूसारखे ते सारे खटले मंदावले, तपास थांबले. महाराष्ट्रात शिवसेनेच्या तत्त्वांशी नाते जोडलेले आमदार अचानक रातोरात भाजपाशी जुळवून घेतात याला विचारांचा मेळ म्हणायचे की सत्तेची भूक? अजित पवार, ज्यांच्याविरोधात सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे ढोल वाजवले जात होते, ते भाजपाच्या सोबत उपमुख्यमंत्री होतात आणि सारे आरोप जणू हवेत विरतात. हे कोणत्या विचारांच्या आधारे घडले? गोव्यात काँग्रेसचे आमदार घाऊकपणे भाजपमध्ये आले.

आसाममध्ये हेमंत बिस्वा सरमा जे काँग्रेसचे निष्ठावान नेते होते ते भाजपचे मुख्यमंत्री झाले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे नेते भाजपात आले, निवडणूक हरले तर पुन्हा तृणमूलमध्ये परतले. या साऱ्या प्रवासात भाजपाचा मूळ कार्यकर्ता जो दशकांपासून पक्षासाठी झटत होता केवळ मूकपणे पाहत राहिला.

तरी का रे हसतात गुलाब हे सारे…

तरीही हे कार्यकर्ते हसतात. व्यासपीठावर मोदींचे स्वागत करताना जल्लोष करतात. प्रचाराच्या वेळी जोशाने घोषणा देतात. हे हास्य म्हणजे गुलाबाचे हास्य आहे बाहेरून सुंदर, पण देठापासून काट्यांनी घेरलेले. हे हास्य खरे नाही ते अस्तित्वाचे हास्य आहे. मी पक्षात आहे, मी कार्यकर्ता आहे, मी उपयुक्त आहे हे स्वतःला सांगण्यासाठीचे हास्य. कारण जर हसणे थांबवले, तर आतला प्रश्न बाहेर येईल मी हे सारे कशासाठी केले? आणि त्या प्रश्नाचे उत्तर आता त्याच्याकडे नाही.

महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी भाजपाचे नाते वैचारिक होते दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या विचारांवर उभे होते. परंतु सत्तेसाठी शिवसेना फोडणे, मूळ उद्धव ठाकरे यांना बाजूला सारणे, मोदींनी उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणणे हे केवळ राजकीय नव्हते, तर तो वैचारिक विश्वासघात होता. महाराष्ट्रातील भाजपाचा मूळ कार्यकर्ता आज दिशाहीन आहे. त्याला कळत नाही की तो कोणत्या विचारासाठी लढतोय शिंदेंसाठी, अजित पवारांसाठी, देवेंद्रसाठी की भाजपाच्या मूळ विचारांसाठी? बिहारमध्ये नितीशकुमार यांची कथा तर भाजपाच्या नैतिक दिवाळखोरीच्या पराकोटीचे उदाहरण आहे.

नितीश भाजपासोबत येतात, जातात, पुन्हा येतात. त्यांनी भाजपाला ‘सांप्रदायिक’ म्हटले होते, संघमुक्त भारत करण्याचं त्यांनी ठरवलं होतं कदाचित त्यांनी ते करून दाखवलं म्हणून ते भाजपाच्या सोबत असावेत! संघमुक्त भारत झाला की नाही माहीत नाही पण नितीश कुमार यांनी संघमुक्त भाजपा नक्कीच करून दाखवला आणि म्हणून आज ते त्याच भाजपाचे विश्वासू मित्र आहेत !

भाजपाच्या कार्यकर्त्याला काय सांगायचे? काल जो शत्रू होता तो आज मित्र का? कार्यकर्त्याला तशीही काही किंमत नाही म्हणा. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलमधून आलेल्या नेत्यांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत पराभव झाल्यावर हे नेते पुन्हा तृणमूलमध्ये गेले. भाजपाचा जो मूळ कार्यकर्ता होता तो एकटा पडला उलट, त्याच्यावर हल्ले झाले. पक्षाने त्याला वाऱ्यावर सोडले.

कार्यकर्त्याचे अवमूल्यन.. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…

भाजपाचा जुना कार्यकर्ता आज एक विशिष्ट ओझे वाहतो. तो पक्षाचे ओझे वाहतो, परंतु पक्ष त्याची दखलही घेत नाही. बाहेरून आलेल्या नेत्यांचे स्वागत, त्यांच्यासाठी प्रचार, त्यांच्यासाठी मतदारसंघ फिरवणे हे सारे जुन्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर. आणि निवडणूक जिंकली की तो नेता मंत्री होतो. कार्यकर्ता पुन्हा कार्यालयात परततो. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ? हे नाते आता एकतर्फी झाले आहे. देणारा देतच राहतो, घेणारा घेतच राहतो.

भाजपाचा कार्यकर्ता हा संघाच्या शाखेतून आलेला होता. त्याने पक्षासाठी जगण्याचे व्रत घेतले होते. त्याने लाठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेला, कुटुंबाला दुय्यम स्थान दिले. परंतु आज त्याच कार्यकर्त्याला पक्षात तिकीट नाही. कारण परक्या पक्षातून आलेल्या नेत्याला तिकीट द्यायचे आहे. त्याचे मत विचारले जात नाही कारण निर्णय दिल्लीतून येतात. त्याचे योगदान मान्य केले जात नाही कारण जो नेता गर्दी आणतो त्याला किंमत आहे, विचारवंताला नाही. हे अवमूल्यन केवळ भावनिक नाही ते संघटनात्मक आहे.

आज भाजपात अंतर्गत लोकशाही नाही. जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष ही पदे दिल्लीतून ठरतात. स्थानिक कार्यकर्त्यांचा आवाज कुठेही पोहोचत नाही. पक्ष हा मोदी-शाह यांचे वैयक्तिक साम्राज्य बनत चाललेला आहे. अगदी. महाराष्ट्रातील मोजकी उदाहरणं द्यायची झाली तर आज भाजपात प्रमुख नेते झालेल्यांची नावे आठवून पाहा यात एकही भाजपा कार्यकर्ता सापडणार नाही.

अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, विजयकुमार गावित हे सारे काँग्रेसमधून भाजपात आले नारायण राणे तर शिवसेनेचे नेते होते आधी मग काँग्रेस मध्ये गेले. गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, अमल महाडिक, सीमा हिरे हे राष्ट्रवादीमधून भाजपात गेले त्यातही गणेश नाईक हे देखील आधी शिवसेनेत होते. आता नितेश राणे भाजपा कार्यकर्त्याला संघांचे महत्व पटवून देतात यासारखे भाजप कार्यकर्त्यांचे दुःख ते दुसरे काय असेल?

भाजपचा मूळ विचार होता सांस्कृतिक राष्ट्रवाद, हिंदुत्व, एकात्म मानवदर्शन, आर्थिक स्वावलंबन आणि प्रखर राष्ट्रप्रेम. या विचारांवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी वैचारिक आधार दिला होता. परंतु आज भाजपाची धोरणे पाहिली तर ती काँग्रेसच्या तुलनेत वेगळी आहेत का ? हा प्रश्न पडतो.

भाजपासमोर आज एक मोठा प्रश्न उभा

सत्ता मिळवणे हे एकमेव ध्येय असेल तर पक्ष म्हणून अस्तित्व राहील का? अटलजींच्या काळात भाजपाने आघाडी केली परंतु स्वतःची विचारधारा जपली. आज आघाडी आहे परंतु विचारधारा नाही. राजकारणात सत्ता हे साधन असते, साध्य नसते. जेव्हा सत्ता हेच साध्य होते तेव्हा पक्षाचा नैतिक आधार ढासळतो. संघटनाबांधणीकडे परत जाणे, मूळ कार्यकर्त्याला सन्मान देणे, विचारांशी प्रामाणिक राहणे हेच भाजपला दीर्घकालीन बळ देऊ शकते.

अन्यथा, जो पक्ष एकेकाळी विचारांच्या बळावर दोन जागांवरून बहुमताकडे गेला, तो उद्या सत्तेच्या लालसेपोटी पुन्हा दोन जागांवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात तर देवेंद्र फडणवीस यांनी संधी गमावली आहे असेच म्हणावे लागेल. त्यांची आधीची मुख्यमंत्री पदाची पाच वर्ष स्वपक्षातील खडसे, तावडे , मुंडे, बावनकुळे, महाजन, फुंडकर, असा अनेकांचा हिशोब करून त्यांना बाजूला करण्यात गेली त्यासाठी त्यांनी इतर पक्षांचीही मदत घेतली.

मध्यंतरी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्यात आणि सत्ता खेचून घेण्यात अडीच वर्ष आणि आताची त्यांची संपूर्ण ताकद सोबत घेतलेल्या शिंदे आणि पवार यांच्या पक्षांना शह देण्यात चालली आहेत. या राजकारणात भाजपाचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कोणतेही ठोस लक्षात राहिलं असे कार्य केले असे वाटत नाही. देवेंद्र आणि भाजपा यांनी संधी गमावली आहे.

भाजपा कार्यकर्त्यांची अवस्था कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे सारखी झालीय आणि महाराष्ट्र आणि देश भाजपाच्या हाती सत्ता देऊन पश्चात्ताप करून घेत आहे हेच सत्य आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

ॲड. हर्षल प्रधान, प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष