जंगलात राहणाऱ्या शोषित व वंचितांच्या वतीने लढा द्यायचा आहे, असे भासवून शहरी भागातील सुशिक्षित तरुण-तरुणींना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून हिंसक कारवाया करून घेण्यात नक्षलवादी चळवळ बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे हे पुण्यातील घटनाक्रमावरून आता सिद्ध झाले आहे. विद्रोही अथवा व्यवस्थाविरोधी विचार बाळगणे यात गैर काही नाही, पण त्यासाठी हाती शस्त्रे घेणे, हिंसक कारवायांत सहभाग नोंदवणे निश्चितच राष्ट्रविरोधी आहे. मुळात नक्षलवादी चळवळच दुटप्पी नीतीवर आधारलेली आहे हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. समाजात वावरताना एक, तर प्रत्यक्ष हिंसक कारवाया करताना दुसरा मुखवटा बाळगायचा हेच या चळवळीचे धोरण राहिले आहे. व्यवस्थेवर राग असणारा तरुण या चळवळीच्या पहिल्या मुखवटय़ाला भुलून त्यांच्याकडे आकर्षित होतो. एकदा या चळवळीच्या अंतस्थ वर्तुळात शिरले की त्यातून मग बाहेर पडता येत नाही. पुण्यातील तरुणांच्या बाबतीत हेच घडले असण्याची शक्यता आहे, असे आता पोलीस अधिकारीच बोलून दाखवतात. शीतल साठे व सचिन माळी यांचे केवळ एकच रूप समाजासमोर होते. प्रत्यक्षात ते या चळवळीत अगदी मुळापर्यंत सक्रिय होते. समाजासमोर असलेल्या या रूपाचा फायदा घेत समर्पण, अटक आदींच्या माध्यमांतून सहानुभूती मिळवायची हाच या दोघांचा हेतू होता हे आता स्पष्ट झाले आहे. नक्षलवाद्यांची आजवरची रणनीतीसुद्धा अशीच राहिली आहे. सुदैवाने पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे या दोघांचा बुरखा फाटला आणि त्यांनी आणखी किती तरुणांना या हिंसेच्या दलदलीत खेचले याचीही माहिती समोर आली. यानिमित्ताने शहरी भागातील तरुण अजूनही या चळवळीविषयी रोमँटिसिझम बाळगून आहेत हे धगधगीत वास्तवसुद्धा समोर आले आहे. गेल्या तीस वर्षांपासून सक्रिय असलेले नक्षलवादी खरोखर आदिवासींच्या हितासाठी झटत आहेत की त्यांच्या नावावर आपला स्वत:चा अजेंडा राबवत आहेत अशा साध्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या भानगडीत न पडता या चळवळीची सोबत करणे म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात वावरण्यासारखेच आहे. या चळवळीविषयी आकर्षण बाळगून असलेला तरुण या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतो हे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. या तरुणांचे भरकटणे एक वेळ सहन करता येईल, पण त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या पुरोगामी राजकीय नेत्यांचे काय, हा यातून निर्माण झालेला कळीचा प्रश्न आहे. साठे व माळी यांना विधिमंडळासमोर आणून व त्यांना योग्य ती प्रसिद्धी मिळेल, याची व्यवस्था करून या नेत्यांना समाजाला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मुंबई, पुण्यात बसून राजकारण व समाजकारण करत या चळवळीकडे बघणे व प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन या चळवळीचे खरे स्वरूप बघणे यात खूप फरक आहे, हे या नेत्यांनी आता तरी समजून घेणे गरजेचे आहे. हिंसेच्या मार्गाने जाणाऱ्या तरुणांना परावृत्त करण्याऐवजी त्यांच्या पाठीशी राजकीय नेतेच उभे राहत असतील तर त्याला लोकशाहीतील शोकांतिकाच म्हटले पाहिजे.