व्यवस्थेचीच ‘जुगाड’बाजी

घरापासून दारापर्यंत आणि गावापासून देशापर्यंत सर्वत्र ‘जुगाड’ करू पाहणारी आपली वृत्ती. पण या जुगाडनीतीचा नकारात्मक अर्थ बाजूला ठेवत तिच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर ती आपल्याला काही संकटांतून तारू शकते,

घरापासून दारापर्यंत आणि गावापासून देशापर्यंत सर्वत्र ‘जुगाड’ करू पाहणारी आपली वृत्ती. पण या जुगाडनीतीचा नकारात्मक अर्थ बाजूला ठेवत तिच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर ती आपल्याला काही संकटांतून तारू शकते, याचे भान आणि प्रत्यक्ष प्रत्यय देणारे हे पुस्तक जुगाडनीतीचे उदात्त रूप समोर आणते.
शहरवासीयांचे रोजचे जगणे जणू ‘जुगाड’च बनले आहे. रोजच्या झकाझकीत पदोपदी येणाऱ्या प्रश्न-अडचणींना प्रत्येकाची परिस्थिती सुसह्य़ बनेल अशी उत्तरे मग तयार होतात. जगण्यातील जुगाड हा असा.
‘जुगाड’ हा उत्तर भारतातील हिंदी बोलीतला एक खास शब्द. गरजेतून निर्माण झालेली कल्पकता यासाठी तो वापरात येतो. म्हणजे पाहा, प्रत्येक कुटुंबात सरासरी दोनपेक्षा जास्त मोबाइल फोन वापरात आहेत, तरी ‘मिस कॉल’ अर्थात संभाषण न होता इच्छित संदेश फुकटात समोरच्याला पोहोचतोच; घराघरात एक ना अनेक चीजवस्तूंचे होणारे रिसायकलिंग हाही जुगाडच. इतके की लग्नादी समारंभात अहेर मिळालेल्या भेटवस्तूंचे रिसायकलिंग होतेच, पण त्या गिफ्ट्स ज्या चकचकीत वेष्टनांतून येतात त्यांचेही रिसायकलिंग निर्विकारपणे होत असते. थोडक्यात, जुगाड आपल्या अंगवळणी पडला आहे आणि तो संस्कृतीचाच अविभाज्य घटक बनला आहे. अगदी टीकेला सामोरी जाताना केंद्रातील विद्यमान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारची ताजी राजवट हे जुगाड राजकारणाचे फलित असेही मग सहजपणे म्हणता येईल, म्हटले जाते.
चालढकलीचा तोडगा, आहे त्या स्थितीत निभावून नेणे इथपासून ते गाजराची पुंगी वाजली, नाही तर मोडून खाल्ली धाटणीची जुगाडबाजी काहीसा नकारात्मक अर्थ ध्वनित करणारी आहे. परंतु मानवी जीवनातील प्रतिकूलता-अभावांना शह देणारा पुढे आलेला निष्कपट उपाय-उतारा आहे आणि व्यापक जनसमुदायाचे जीवन सुकर करणारे शाश्वत महत्त्वही तो मिळवतो. या अर्थाने ‘जुगाड’चे उदात्त रूप नावी रॅजो, जयदीप प्रभू आणि सिमॉन आहुजा या लेखकत्रयींचे याच शीर्षकाचे पुस्तक पुढे आणते. समोरच्या संकटावर शोधलेला स्वत:चा मार्ग पुढे जाऊन समाजहिताचे, सार्वजनिक महत्त्वाचे काम कसे करते, याचे शेकडय़ाने मासले असलेले हे पुस्तक अलीकडच्या काळातील ‘बिझनेस बेस्ट सेलर’ प्रकाशन असले तरी पुस्तकात वर्णिलेली अभावग्रस्ततेला मात देत जनसामान्यांच्या शोधकतेतून साकारली गेलेली उद्यमशीलता तुमच्या-आमच्यासाठी प्रेरक निश्चितच आहे. ‘मॅनेजमेंट गुरूंना पिरॅमिडच्या तळभागाची दखल घ्यावयास लावणारे हे आधुनिक अंजन’, असा या पुस्तकाचा गौरव खुद्द रतन टाटा, किशोर बियाणी, राणा कपूर वगैरे प्रतिष्ठित उद्योगपतींनी केला आहे.
२००१ मध्ये भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या गुजरातच्या एका खेडय़ातील मनसुख प्रजापती मातीच्या घडय़ांमधून विजेविना चालणारा आणि केवळ अडीच हजारांत मिळणारा फ्रिज (मिट्टी कूल) तयार करतो आणि ग्रामीण भागातच नव्हे तर विकसित जगतातही कुतूहल निर्माण करतो. शोध-संशोधने प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञांकडूनच नव्हे, तर कसलेही शिक्षण, तंत्रज्ञान, भांडवल गाठीशी नसलेल्यांकडूनही होतात. भारतात आपल्या आसपास, चीन, ब्राझील, आफ्रिकेतील केनिया वगैरे देशांतील अभावग्रस्तांची ही जुगाडबाजी म्हणजे २१व्या शतकाने दिलेला बदल व नवनिर्माणाचा मंत्रच ठरेल, असा या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॅनेजमेंट तज्ज्ञ असलेल्या लेखकत्रयींचा निष्कर्ष आहे. किंबहुना उभरत्या अर्थव्यवस्थांमधील नावीन्यता या विषयाला धरून अमेरिकेच्या फॉच्र्युन ५०० सूचीतील कंपनीने पुरस्कृत केलेल्या शोध प्रकल्पासाठी हे तिघे एकत्र आले आणि त्यानिमित्ताने त्यांनी जे पाहिले, अनुभवले, नोंदवून घेतले त्याचे फलित ‘जुगाड’च्या रूपात पुढे आले आहे.
उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये लघू व सूक्ष्म उद्योगांना व्यक्तिगत स्तरावर जुगाडशिवाय पर्यायच उरत नाही. पण एकएकटय़ा प्रयोगांचे एकत्रित रूप व परिणामकारकता पाहता, पाश्चिमात्यांच्या महागडय़ा संशोधन व विकास प्रारूपाला तो निश्चितच एक किफायती पर्याय ठरतो. गरज ही शोधांची जननी जसे आहे, तसे सुस्थापित विकसित राष्ट्रांमधील सद्यस्थिती ही आळसालाच शोधाची जननी बनविणारी ठरत असल्याचे दिसते. महाकाय कंपन्यांकडे प्रचंड संसाधने, जगद्व्यापी पसारा, शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांची फौज दिमतीला आहे तरी जे अपेक्षिले ते साध्य करणे त्यांना शक्य होत नाही. उदाहरण द्यायचे तर अमेरिकेच्या वाहन उद्योगाने संशोधन व विकास (आर अ‍ॅण्ड डी) यावर २००७ सालात तब्बल १६ अब्ज डॉलर (सुमारे ८०,००० कोटी रुपये) खर्ची घातले. दरसाल सरासरी याच दराने जनरल मोटर्स, क्रायसलर, फोर्ड या अमेरिकी कंपन्या संशोधनावर खर्च करत असल्या तरी १९९८ पासून २००९ पर्यंत या तीन कंपन्यांचा एकत्रित बाजारहिस्सा ७० टक्क्यांवरून ४४.२ टक्क्यांवर घरंगळत आला. उल्लेखनीय म्हणजे संशोधनाबाबत मितव्ययी वा जवळपास नगण्य खर्च असलेल्या कोरियन, चिनी व भारतीय स्पर्धक कंपन्या आणि त्यांची नावीन्यपूर्ण रचना व किफायती उत्पादनांनी बाजारातील या बडय़ांचा वाटा कमावला आहे. आज अवस्था अशी आली की, जनरल मोटर्स व क्रायसलरला अमेरिकी सरकारपुढे दिवाळखोरीपासून बचावासाठी अर्ज करावा लागला आणि डिसेंबर २००९ मध्ये सरकारला या कंपन्यांना ८२ अब्ज डॉलरची मदत द्यावी लागली. वाहन उद्योगासारखीच गत अमेरिकेच्या दुसऱ्या महाकाय बौद्धिक भांडवल असलेल्या औषधी क्षेत्राची आहे.
२००८मध्ये जागतिक वित्तीय अरिष्टाच्या भीषणतेतही भारत-चीनने अनुक्रमे सात व नऊ टक्क्यांचा विकासदर नोंदवला. नंतरच्या काही वर्षांत गोल्डमन सॅक्सने त्या वेळी अंदाजलेल्या अनुक्रमे तीन व पाच टक्क्यांपेक्षा भारत-चीनच्या अर्थव्यवस्थांची सरस प्रगती राहिली. केंद्रातील सरकारची निर्णयहीनता, धोरणलकवा, भ्रष्टाचार, अनागोंदी असली तरी जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, २०११ अखेर भारताचे नवीन व्यवसायांच्या नोंदणीत जागतिक क्रमवारीत नववे स्थान होते. भारताकडे काळे सोने अर्थात तेल विहिरी नसतील; सोने-हिऱ्यांच्या सोडाच, तांबे-जस्ताच्याही खाणी नसतील, पण त्यापेक्षा मौल्यवान आम भारतीयांच्या अंगभूत प्रेरणा आणि जुगाड याद्वारेच हे शक्य झाले. किंबहुना भारतीय अर्थव्यवस्थेचा आजवरचा प्रवास हा भल्याबुऱ्या संदर्भात सुरू राहिलेल्या ‘जुगाड’बाजीचा प्रत्यय आहे. लायसन्स परमिट राज, कथित समाजवादाच्या कच्छपी जाऊन स्वीकारलेली आर्थिक-उद्योगधोरणे, मिळकतीच्या ९७ टक्क्यांपर्यंत घास घेणारी पाशवी करप्रणाली अशी प्रचंड प्रतिकूलता असताना, देशात खासगी भांडवलदारी व उद्योजकता फळली- फोफावलीच. शक्य होईल तितके कायद्याने अन्यथा ‘काय द्याचे ते बोलून’ कामे करून घेणारे टाटा, बिर्ला, अंबानी यांचा वाढ-विस्तार सुरूच होता.
व्यवस्थात्मक प्रतिकूलतेला उत्तर म्हणून जुलमी नियम-कानूंना कवेत घेणारी अथवा नियमातील पळवाटा शोधून ईप्सित साध्य करणारी कल्पकता हा जुगाडच नव्हे काय? आज आर्थिक धोरणात उदारता आली आहे, नियंत्रण-नियमांची काटेकोर रचना आहे, तरी व्यवस्थेतील पोकळ्या-उणिवांचा लाभ घेणाऱ्या लबाडांची वानवा नाही. ‘जुगाड’कडे पाहण्याचा दृष्टिकोन असा परिस्थितिसापेक्ष आहे. व्यवस्था जितकी सडलेली, विषम व अत्याचारी तितके जुगाडचे परिमाण हे अधिकाधिक अनीतिमान बनते. व्यवस्थेतील दरुगधीची साफसफाई, तिचे मुडदूसलेपण दूर करणारी तरतरी हवी असेल तर ती जुगाडाद्वारे जरूर आणली जाईल. पण आजवर जुगाडबाजीवर तरलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेलाही प्रचंड दारिद्रय़, विषमता, बेरोजगारी या समस्यांवर चिरस्थायी, शाश्वत उत्तर शोधावेच लागेल.

जुगाड इनोव्हेशन : ए फ्रुगल अ‍ॅण्ड फ्लेक्झिबल अ‍ॅप्रोच टू इनोव्हेशन फॉर द ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी : नावी रॅजो, जयदीप प्रभू, सिमॉन आहुजा,
प्रकाशक : रँडम हाऊस इंडिया, नवी दिल्ली,
पाने : ३१७, किंमत : ४९९ रुपये.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Book review of jugaad innovation a frugal and flexible approach to innovation for the 21st century

ताज्या बातम्या