|| गिरीश कुबेर
अफगाणिस्तानात आज जे घडते आहे, त्याची पूर्वपीठिका उमगण्यासाठी अहमद रशीद यांची ‘तालिबान’, ‘जिहाद’ आणि ‘डिसेंट इन्टु केऑस’ ही तीन पुस्तके वाचणे आवश्यकच. विशेषत: ‘तालिबान’ या पुस्तकातून ‘पंजशीरचा सिंह’ म्हणवला जाणारा अहमदशहा मसूद याची ओळख होते; ती आज तालिबान्यांविरुद्ध उभा राहणारा त्याचा मुलगा अहमद मसूद याच्यापर्यंत घेऊन जाते…

पश्चिम आशियावर प्रेम जडण्यास कारणीभूत असलेले जे काही मोजके लेखक आहेत त्यापैकी एक अहमद रशीद. त्यांचे ‘तालिबान’ हाती घेतले तेव्हा ९/११ घडायचे होते. ‘तालिबान’ पुस्तकाचा जन्म आणि ९/११ हे एकाच वर्षातील. एखाद्या प्रवासाला निघावे आणि थोड्याच वेळात समोरच्या वाहनात बॉम्बस्फोट व्हावा तसा अनुभव ‘तालिबान’ वाचणे सुरू असताना ९/११ घडल्यामुळे आला. त्या हल्ल्यात पुन्हा तालिबानचाच हात असल्याचे सुरुवातीला बोलले गेल्यामुळे हे पुस्तक आणि ते वाचले गेले तो काळ कायमचा स्मरणात राहिलेला आहे.

अहमद रशीद हे तेव्हा ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’साठी या प्रदेशाचे वार्तांकन करीत. आपल्या बातमीदाराने त्याच्या अभ्यासविषयावर निवांतपणे लिहायला हवे असे मानणारी आणि तसे लिहू देणारी जी काही भारदस्त नियतकालिके आहेत त्यातील हे एक. रशीद सारख्या लेखकांमुळे ‘जर्नल’ वाचायचीही सवय लागली. ‘द न्य़ूयॉर्कर’मध्ये त्यावेळी ‘अ‍ॅनल्स ऑफ सिक्युरिटी’ या सदरात सेमूर हर्ष लिहीत आणि ‘जर्नल’मध्ये रशीद. दोघांचाही विषय साधारण एक. पाश्चात्त्य सत्तांचा पश्चिम आशियाच्या वाळवंटातील साहसवाद. या सर्व विषयाची एक दमदार आणि भरभक्कम पाश्र्वाभूमी तयार करण्यात रशीद यांच्या ‘तालिबान’चा वाटा अत्यंत महत्त्वाचा.

मुल्ला ओमर, गुलबुद्दीन हेकमत्यार, रशीद दोस्तम, अब्दुल्ला अब्दुल्ला, नजीबुल्लाह, वकील अहमद मुत्तावकील आणि या रक्तलांच्छित नाट्यातील माझे सर्वात आवडते अहमदशहा मसूद अशा अनेकांची ओळख ‘तालिबान’ करून देते. त्यांच्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह. ‘तालिबान’चा एकाक्ष प्रमुख मुल्ला ओमर याच्या विस्तारवादास आव्हान दिले ते अहमदशहा मसूद याने. ‘पंजशीरचा सिंह’ असे (पंजशीर हा अफगाणिस्तानातील महत्त्वाचा प्रांत) मसूद याचे वर्णन केले जायचे. मसूद माझे आवडते, कारण अफगाणिस्तानच्या मातीत पाय रोवून हा माणूस तालिबानच्या धर्मातिरेकास विरोध करत राहिला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला, अफगाणिस्तानच्या मोहम्मद दाऊदखान सरकारविरोधात उठाव करणारा, गुलबुद्दीन हेकमत्यार आणि त्यांचे पाठीराखे जेव्हा काबुलवर हल्ला करायला आले तेव्हा आपल्या ‘सैन्या’सह त्यांना रोखणारा अहमदशहा मसूद हा त्या मातीतला विलक्षण द्रष्टा. हेकमत्यारला अमेरिकेने पोसले ते त्याच्या क्रौर्यसामथ्र्यासाठी. माणसाला जिवंत ठेवून त्याची सालटी ओरबाडून काढण्याच्या ‘कौशल्या’साठी हेकमत्यार ओळखले जात. पुढे अफगाणिस्तानचा संरक्षणमंत्री बनलेल्या रशीद दोस्तम याने त्याच्या काही विरोधकांना जीपच्या मागे फरफटवत मारले. तालिबानच्या काळात एखादी ‘पापी’ स्त्री वा गुन्हेगार विरोधक यांस दगडांनी ठेचून ठार मारण्याचा सोहळा होत असे. रशीद यांच्या ‘तालिबान’मध्ये हे सगळे आहे. या पुस्तकाच्या बाहेर येत कायमचे मनात घर करून राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अहमदशहा मसूद.

झाले असे की, ज्या दिवशी अमेरिकेत ९/११ घडले त्याच्या दोन दिवस आधी-  म्हणजे ९ सप्टेंबरला-  मसूद यांच्या तखर प्रांतातल्या गुहेत दोन पत्रकार त्यांच्या मुलाखतीसाठी आले. हे दोघेही बहुधा ट्युनिशिया या देशाचे. मोरोक्को वगैरेतलाही कार्यानुभव त्यांना होता. अफगाणिस्तानात मसूद यांच्याआधी बुऱ्हानुद्दीन रब्बानी आणि अब्दुल रशीद सैय्यफ या नेत्यांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या होत्या. म्हणजे पत्रकार म्हणून त्यांची ओळख निश्चित झालेली होती. मसूद यांचीही मुलाखत रेकॉर्ड करणार होते ते. कॅमेऱ्याचा सेटअप वगैरे पार पडला. पुढे मुलाखत किती नोंदली गेली माहीत नाही. पण टीव्ही कॅमेऱ्यातल्या बॉम्बचा स्फोट झाला. एक ‘पत्रकार’ आणि मसूद यांचा सहकारी तिथल्या तिथेच मारला गेला. दुसरा ‘पत्रकार’ पळून जाण्याच्या बेतात असताना मसूद यांच्या सुरक्षारक्षकांकडून मारला गेला. मसूद गंभीर जखमी होते. त्यांना जवळच्या भारतीय लष्करी तळावरच्या रुग्णालयात नेले जात असताना हेलिकॉप्टरमधेच ते गेले. वय वर्षे फक्त ४८. हे दोन ‘पत्रकार’ म्हणजे तालिबानने पाठवलेले मारेकरी होते.

नंतर बरोब्बर दोन दिवसांनी ११ सप्टेंबरला ‘९/११’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या भीषण दहशतवादी हल्ल्यात न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचे विख्यात मनोरे जमीनदोस्त झाले. त्याआधी सात महिने अहमदशहा मसूद युरोपीय देशांत जाऊन जाऊन सांगत होते की तालिबान-पाकिस्तान ही अभद्र युती तोडा! अमेरिकेस ते बजावत होते तालिबानविरोधात मोहीम हाती घ्या नाहीतर तालिबान तुमच्या उरावर बसेल!!

शेवटी तसेच झाले. आणि आज तालिबान पुन्हा अफगाणिस्तानात सत्ता काबीज करीत असताना अहमदशहा मसूद यांचा मुलगा अहमद मसूद तालिबानच्या विरोधात उभे राहायचा प्रयत्न करतो आहे. त्यांना आव्हान देतो आहे. त्याच्या वडिलांना जी मदत मिळाली नाही ती अहमद मसूद यास मिळणार का, हा प्रश्न.

अहमदशहा मसूद म्हणजे इस्लामी जगताचा चे गव्हेरा! गंमत म्हणजे चे हा त्याचाही नायक होता. मसूद याच्या व्यक्तिमत्त्वात एक रोमँटिक अशी गंमत असणार असा एक माझा समज.  दोन-अडीच वर्षांपूर्वी लंडनला समारंभात यजमानाने एका अफगाणी तरुणाची ओळख करून दिली. अहमद रशीद यांची पुस्तके संग्रही असल्याने या तरुणाशी बोलण्यासाठी बराच ऐवज होता. त्यात बोलताना अर्थातच अहमदशहा मसूद यांचा उल्लेख माझ्याकडून झाला. तर तो तरुण म्हणाला: हो, ते माझे काका ! हे ऐकल्यावर मी त्याला मारलेल्या मिठीने तो निश्चित गांगरून गेला असणार. असो.

ही सर्व अहमद रशीद यांच्या ‘तालिबान’ या पुस्तकाची पुण्याई.

त्यानंतर मी रशीद यांचे लिखाण सातत्याने वाचत आलेलो आहे. ‘तालिबान’च्या प्रकाशनानंतर ९/११ घडले आणि अहमदशहा मसूद हे मारले गेले. त्यानंतर २००२ साली आलेल्या ‘जिहाद’ या पुस्तकात अहमद रशीद मध्य आशियातील वाढत्या इस्लामी धर्मांधांचा विस्तृत तरीही रोचक आढावा घेतात. अगदी तपशिलात शिरून माहिती पुरवण्याचे रशीद यांचे कौशल्य या पुस्तकातही दिसते. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पुस्तकासाठी मात्र सात वर्षांचा खंड आहे. २००९ साली ‘डिसेंट इन्टु केऑस’ आले. त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन या पुस्तकाने साजरा झाला असणार असे त्यावरील माझी नोंद सांगते. अन्य दोन पुस्तकांच्या तुलनेत ‘डिसेंट’चा एकसंध परिणाम नाही. कदाचित पूर्वप्रकाशित, काही नव्याने लहिलेल्या अशा लेखांचे संकलन असल्यामुळे तसे झाले असावे. कदाचित मधल्या काळात या विषयावर अन्यांचेही बरेच काही वाचले गेल्याचाही हा परिणाम असेल. अर्थात तरीही ‘डिसेंट’ची उपयुक्तता अजिबात कमी नाही. या विषयाचा उगम आणि नंतरचा प्रवास ज्यांना कोणास अभ्यासायचा असेल त्यांच्या संग्रही ही तीनही पुस्तके आवश्यक.

अफगाणिस्तान पुन्हा तालिबान्यांच्या हाती गेले आणि ही पुस्तके किती दूरचे दाखवत होती, हे कळून आले. आज पुन्हा एकदा अहमद रशीद यांना वाहिन्या, नियतकालिके यांच्याकडून बोलण्या-लिहिण्यासाठी वाढती मागणी आहे. म्हणजे, या दोन दशकांत जग होते तेथेच कसे राहिलेले आहे हेच यातून दिसते. उलट या काळात ‘तालिबान’ एक ‘साचा’ (टेम्प्लेट) बनून गेली आहे आणि अन्य धर्मीय तिचे अनुकरण करताना दिसू लागले आहेत. वाइटाकडून अतिवाइटाकडे असा हा जगाचा प्रवास. या प्रवासात काय वाढून ठेवले आहे याचे ‘मार्गदर्शन’ अहमद रशीद यांच्या या पुस्तकातून होते. म्हणून रशीद हे संहाराचे समालोचक ठरतात.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber