ज्या खात्याची सूत्रे हाती घ्यायची, तेथे साफसफाई सुरू करायची, असा खाक्या असलेल्या महेश झगडे नावाच्या सनदी अधिकाऱ्याची कारकीर्द झगडय़ांनी भरलेली आहे. आपण जनतेला उत्तरदायी आहोत या भावनेतूनच प्रशासनाने काम केले पाहिजे, असा थेट विचार मांडणारा अधिकारी जेथे जेथे नियुक्ती झाली, तेथे तेथे नकोसाच होतो. जनतेला हवेसे वाटणारे अधिकारी संबंधित यंत्रणांना मात्र नकोसे का होतात, हे एक कोडेच असते. हे कोडे झगडे यांच्यासोबतच प्रत्येक खात्यात फिरत राहिले. पुणे महापालिकेत आयुक्त असताना, अनधिकृत बांधकामांच्या विरोधात त्यांनी मोहीम उघडली, आणि पुणेकरांना सुखावल्यासारखे वाटू लागलेले असतानाच त्यांची बदली झाली. अन्न व औषध प्रशासन हा फारसा चर्चेतला विभाग नव्हता. झगडे या विभागाचे आयुक्त झाले आणि तेथेही त्यांनी सफाई मोहीम सुरू केल्याने औषध विक्रेते आणि प्रशासन यांच्यातील झगडय़ात झगडे हेच बळी ठरले. अन्न व औषध प्रशासनात त्यांनी निर्माण केलेले सफाईचे वारे आता झगडे यांच्यासोबत परिवहन खात्यात घोंघावू लागले आहेत. हे खाते भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे आगार आहे, आणि दलालाकरवी संबंधितांचे हात ‘ओले’ केल्याखेरीज एक कागदही पुढे सरकत नाही, असा अनुभव नसलेली अशी व्यक्ती शोधावीच लागेल. ‘दलाल’ हाच या खात्यातील शक्तिशाली दुवा असतो, त्याला डावलून पुढे जाणे शक्यच नसते, अशा तक्रारी वर्षांनुवर्षे सुरू असतानाही, दलालांची सद्दी संपविण्याचा विचारदेखील कधीच केला गेला नाही. त्यामागे अनेक उघड आणि छुपी कारणेही आहेत. दलाल हा ‘दुवा’ असतो, यातच त्याचे गुपित दडलेले असल्याने तो हटविला तर ओल्या हातानिशी कामाची सवय झालेल्या परिवहन विभागाची प्रस्थापित व्यवस्थाच मोडकळीस येईल व कागद जागेवरून हलणारच नाही, ही अवस्था असताना महेश झगडे यांनी व्यवस्थेलाच धक्का दिला आहे. खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी आरटीओच्या कार्यालयात खिडकीसमोर ताटकळलेल्यांच्या रांगेत उभे राहून पहिला धक्का दिला होता. काही दिवस त्याचा परिणाम दिसला, पण एखाद्या धक्क्याने मोडकळीस यावी एवढी ही व्यवस्था तकलादू नसल्याने, खिडकीबाहेरच्या रांगांवर दलालांचीच हुकूमत सुरू राहिली. कदाचित, या व्यवस्थेलाच झगडे सरावतील असा यंत्रणेचा अंदाज असावा. पण प्रादेशिक परिवहन कार्यालयांभोवतीचा दलालांचा विळखा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेऊन झगडे यांनी या अंदाजास धक्का दिला आहे. या धक्क्याची तीव्रता मोठी आहे, हे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची प्रतिक्रिया आणि नंतरचे घूमजाव यावरूनच स्पष्ट झाले आहे. झगडे यांनी सुरू केलेल्या सफाई मोहिमेसोबत आता नवे झगडेही सुरू झाले आहेत. पण हे झगडे निर्णायक ठरणार की पुन्हा झगडे यांचा प्रशासकीय बळी घेऊन ते शमणार, याकडे पुन्हा या यंत्रणेचे लक्ष लागले आहे. आता झगडे बदलतात की खात्याच्या कारभारात बदल होतो, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. झगडे यांची एखादी तरी स्वच्छता मोहीम सुफळ व्हायला हवी, असे वाटणारे अनेक जण असतील. सरकारवर त्याचा काही परिणाम होतो का, याची उत्सुकतादेखील अनेकांना लागली असेल. झगडे यांची बदली झाली, तर स्वच्छता मोहीम हा प्रकार केवळ कागदी घोडय़ांची दौड आणि धूळफेक मोहीमच ठरेल.