गुजरातमधील लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या चार जागांच्या पोटनिवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या भाजपचे उमेदवार निवडून येणे यात खरे तर काहीच ‘बातमी’ नाही. मोदींचा करिश्मा आणि गुजरात काँग्रेसची दुरवस्था पाहता हे होणारच होते. तेव्हा या विजयाने सोनिया गांधी सोडाच, काँग्रेसच्या उमेदवारांनाही आश्चर्याचा वगैरे धक्का बसला नसणार. तो कोणाला बसलाच असेल, तर तो भाजपमधील मोदीविरोधी गटनेत्यांनाच. मोदींनी एक जागा जरी गमावली असती, तरी भाजपमधील ब्लॉगपुरुषांना मोदींच्या मार्गात एखादा वेगनियंत्रक सहजी टाकता आला असता. विजयाच्या या षट्पदीनंतर मोदींच्या गळ्यात पक्षाच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाची माळ घालण्यावाचून पक्षाच्या मुखंडांसमोर आता पर्याय राहिलेला नाही. गोव्यात भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या बैठकीत तो निर्णय होईल. तसे न झाल्यास, ते का झाले नाही यावर आपल्याच पक्षकार्यकर्त्यांचे बौद्धिक घेताना सर्वच नेत्यांना पळता भुई थोडी होईल, यात शंका नाही. मोदींमध्ये आज समस्त भाजपाईंना उद्याचा पंतप्रधान दिसतो आहे. या स्वप्नाची भ्रूणहत्या करणारांना, मग ते बाबरीनिर्दालक महारथी लालकृष्ण अडवाणी असले, तरी भाजप कार्यकर्ते माफ करणार नाहीत. संघ स्वयंसेवकांचे मात्र काही सांगता येत नाही. तीन महिन्यांच्या सद्भावना यात्रेची रंगसफेदी केलेले विकासाधिष्ठित मोदीत्व आणि गोहत्याबंदी, वंदे मातरम् आणि सूर्यनमस्काराचा आग्रह धरणारे हिंदुत्व यांपैकी आपण कोणाचे समर्थन करावे या द्विधावस्थेतून संघ अद्याप बाहेर आलेला दिसत नाही. तथापि संघासमोर शिवराजसिंह चौहान या ‘अ-उग्रउर्मट’ संघपुत्राचा पर्याय केव्हाही आहेच. मोदी यांनी पोटनिवडणुकीत सहा जागा जिंकल्या असतानाच, रालोआतील त्यांचे ‘निकटतम प्रतिद्वंद्वी’ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना बिहारमधील एकुलती एक पोटनिवडणूकजिंकता आलेली नाही. मोदी ब्रिगेडसाठी हीसुद्धा एक समाधानाची बाब ठरली आहे. तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममतांची भांडकुदळ अरेरावी, झालेच तर चिटफंड घोटाळ्यांसारखे अनेक तृणमूल नागरिकांना देशोधडीला लावणारे भ्रष्टाचाराचे प्रकरण गाजत असूनही त्याचा तृणमूल काँग्रेसच्या विजयावर काहीही परिणाम झालेला नाही. या पोटनिवडणुकीत एक महाराष्ट्रातील सहानुभूतीच्या लाटेमुळे पदरात पडलेला निकाल वगळता काँग्रेसला सगळीकडेच माती खावी लागली आहे. अर्थात त्यावर, नितीशकुमार यांनी ‘जय-पराजय हे होतच असतात,’ अशी जी प्रतिक्रिया दिली आहे, तसेच काँग्रेसजन म्हणू शकतात. कर्नाटकचे निकाल ही जशी २०१४ च्या निकालांची नांदी नव्हती, त्याचप्रमाणे या पोटनिवडणुकीच्या निकालांतसुद्धा आगामी लोकसभा निकालांचे प्रतिबिंब पाहता येणार नाही. कुठल्याही पोटनिवडणुकीचा चेहरा हा तद्दन स्थानिकच असल्याचे आजवरच्या इतिहासाने दाखवून दिलेले आहे. अगदी गुजरातचे उदाहरण जरी घेतले, तरी तेथील पोरबंदर मतदारसंघातील विठ्ठल रादडिया या भाजपच्या उमेदवाराचा विजय हा भाजपचा वा मोदींचा किती, केंद्रातील काँग्रेसच्या धोरणांच्या विरोधातील किती आणि स्वत: रादडिया यांचा किती हा प्रश्न येतोच. टोल चुकवण्यासाठी नाक्यावरील कर्मचाऱ्यावर बंदूक रोखणाऱ्या या माजी काँग्रेस नेत्याला आणि त्यांच्या सुपुत्रालाही पावन करून घेत उमेदवारी देण्याची पाळी मोदींवर यावी आणि तो भाजपचा विजय गणला जावा हा मोठा विनोदच आहे. यावर काँग्रेसने आजवर जे केले तेच मोदींनी केले, तर त्यात काय बिघडले, असे मोदी ब्रिगेड म्हणू शकते. पण मोदींच्या षट्पदीला लागलेली ही ठेचच आहे.