आपल्या सवयींचा उगम आपल्या मनातच आहे आणि आपल्या मनोधारणेनुसारच त्या पक्क्य़ा होत असतात. तेव्हा सर्वच सवयी सोडण्याची साधकाला असलेली निकड तात्पुरती बाजूला ठेवून, चुकीच्या सवयी मोडण्याबाबत विचार केला तरी एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, सवयी जर मनातूनच उत्पन्न झाल्या असतील तर चुकीच्या सवयींची दुरुस्ती करण्यासाठी मनातच उतरावं लागेल. मन सुधारल्याशिवाय शरीराच्या चुका टाळता येणार नाहीत. हे अध्यात्मच आहे आणि अनुभवानं सांगतो, अध्यात्मशास्त्रासारखं श्रेष्ठ मानसशास्त्र दुसरं नाही! या ‘मानसशास्त्रा’च्या दीर्घ प्रवासाला आपण निघणार आहोतच पण त्याआधी स्थूल बाजूने थोडा विचार करू. अध्यात्माच्या वाटेवर पहिली पावलं टाकणाऱ्याचा स्वत:च्या मनाशी संघर्ष सुरू असतोच, तसंच कधीकधी त्याला वाटतं की, मनाला असलेल्या सवयी आहेत तशा राहिल्या तरी काय बिघडलं? त्या सवयी असूनही मला आत्मज्ञान मिळवता येईल की! थोडक्यात, मनाविरुद्ध जाण्याची त्याची इच्छा नसते. ‘महाराजांनी माझ्या मनासारखं करावं’, ही मूक प्रार्थना त्याचंच लक्षण आहे. तेव्हा मनाच्या सवयींनुसार जगूनच आत्मज्ञानसुद्धा प्राप्त करून घेऊ, असा आपला भ्रम असतो. प्रत्यक्षात हे मन श्रेयस जे आहे, हिताचं जे आहे त्यापासून मला परावृत्त करीत प्रेयस जे आहे, आवडीचं जे आहे, सवयीचं जे आहे तिथं नेऊ पाहात असतं. श्रीतुकाराम महाराज म्हणतात, ‘‘मन गुंतलें लुलयां। जाय धांवोनि त्या ठायां।।१।। मागें परतवी तो बळी। शूर एक भूमंडळीं।।२।। येऊनियां घाली घाला। नेणों काय होईल तुला।।३।। तुका म्हणे येणें। बहु नाडिले शाहाणे।।४।।’’ मन विषयांना लाचावलं आहे आणि तिकडंच ते वारंवार खेचलं जातं. जो मनाला त्याच्या सवयीपासून मागे परतवतो तोच या जगात खरा शूर आहे. या मनाला चुचकारून, मनाच्या कलाने घेत साधना करायची ठरवलीत तर ते कधी घाला घालील, याचा नेम नाही. अनेक भल्या भल्या ज्ञानी, तपस्वी, योग्यांना या मनानं पुरतं नाडलं आहे! मनामागे फरपटत जाण्यामुळेच जे खरं कल्याणाचं आहे, त्यापासून आपण दुरावत राहिलो. त्या मनाच्या सवयींच्या सापळ्यातून आपल्याला सुटायचं आहे. ही तपश्चर्या आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. भूक, मैथुन, निद्रा या माणसाच्या उपजत नैसर्गिक प्रेरणा आहेत. शरीराच्या त्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या नियंत्रित करणं हे सोपं नाही. प्रारंभिक पातळीवर तर आवश्यकही नाही आणि नैसर्गिकही नाही. तेव्हा मनाला सवयींतून सोडवण्याचा शुभारंभ या उपजत प्रेरणा मारून टाकण्याच्या प्रयत्नांनी होऊ नये. त्याचबरोबर हेही खरं की या गोष्टीच नव्हे तर देह-मनाच्या कोणत्याच सवयींच्या ताब्यातही आपल्याला राहायचं नाही. उलट आपल्या देह-मनाच्या सर्वच गोष्टी आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत. ही गोष्ट साधीसोपी नाहीच आणि तिचा अभ्यास अतिरेकी पद्धतीनेही होता कामा नये. हे ज्याला साधेल त्यालाच तुकोबांनीही ‘शूर एक भूमंडळी’ म्हटलं आहे. हा अभ्यास स्वबळावर मात्र अशक्यच आहे.