बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी (शुक्रवार, १९ डिसेंबर १९१३) या तिथीला श्रीमहाराज आणि ज्यांचा अवघा प्रपंचच महाराजमय झाला होता, असे भाऊसाहेब केतकर हे सकाळीच एके ठिकाणी गेले होते. शाळानिरीक्षक म्हणून अधेमधे गोंदवल्यास येणारे काळे यांनी अत्यंत आग्रहानं महाराजांना आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी भोजनासाठी बोलावलं होतं. आदल्याच दिवशी संध्याकाळी श्रीमहाराज भाऊसाहेबांच्या बिऱ्हाडी गेले होते. महाराजांची खालावत असलेली प्रकृती पाहून भाऊसाहेबांनी त्यांना थोडी विश्रांती घ्या, म्हणजे बरे वाटेल, असं सांगून पाहिलं होतं. त्यावर श्रीमहाराज म्हणाले होते, ‘‘भाऊसाहेब, या लोकांसाठी (आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी) खटपट करायला कोणी तयार होत नाही. हे सगळे हिंगजिऱ्याचे गिऱ्हाईक आहेत, केशरकस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही. प्रत्येकाला प्रपंचासाठी देव पाहिजे. देवासाठी देव पाहिजे, असं म्हणणारा हा खरा कस्तुरीचा चाहता. असा मनुष्य भेटणं कठीण जातं. म्हणून सामान्य माणसांनाच आपण तयार करीत राहिलं पाहिजे. या कार्यात मला रामानं पुष्कळ यश दिलं आहे. देह हा कष्टासाठीच असल्यामुळे त्याचं सुख वा दु:खं सारखंच मानावं!’’ कालचे महाराजांचे हे उद्गार काळे यांच्या घरी गेल्यावरही भाऊसाहेबांच्या मनात घोळत होतेच. काही तरी आणण्यासाठी म्हणून काळे आत गेले तेव्हा महाराज म्हणाले, ‘‘भाऊसाहेब, मला आता जाणे जरूर आहे. मी सोमवारी जाणार!’’ भाऊसाहेबांना या शब्दांनी धक्काच बसला. ते म्हणाले, ‘‘आपल्या मांडीवर मरण येणे हा उत्सव आहे. आपल्या चरणापाशी अंतकाळ यावा, या इच्छेनं मी इथं येऊन राहिलो आहे.’’ त्यावर श्रीमहाराज उद्गारले, ‘‘तसा योग दिसत नाही.’’ त्यावर भाऊसाहेबांनी विचारलं, ‘‘मी पुढे काय करू?’’ श्रीमहाराज म्हणाले, ‘‘तुम्ही बारा वर्षे इथेच राहा.’’ तोच काळे बाहेर आले आणि विषय तिथेच थांबला. त्या दिवशी रात्री पायाला सूज असतानाही दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून उभं राहत श्रीमहाराजांनी रात्री एकपर्यंत भजन व निरूपण केलं. या दिवशीही कालच्याचप्रमाणे महाराजांनी नामाचं माहात्म्य सांगितलं. कालही महाराज म्हणाले होते की, ‘‘आपलं चित्त नामामध्ये गुंतलं म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतं. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदु:खाची बाधा उरली नाही. आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचात उचित प्रयत्न केल्यावाचून राहू नये, पण प्रपंचालाच सर्वस्व मानून भगवंताला विसरू नये.’’ श्रीमहाराजांना शब्द दिल्याप्रमाणे भाऊसाहेब नंतर बारा र्वष गोंदवल्यास राहिले. राम नसलेल्या अयोध्येत भरतानं श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून ज्या विरक्त वृत्तीनं आणि रामस्मरणात राज्यकर्तव्यं पार पाडलं त्याच वृत्तीनं भाऊसाहेब गोंदवल्यास राहिले. महाराजांशिवायच्या गोंदवल्याची रयाच जणू गेली होती आणि भक्तांचा ओघ आटला होता. या स्थितीत या बारा वर्षांत भरताप्रमाणेच भाऊसाहेबांसह काही मोजक्या भक्तांनी वियोगभक्तीचा कळस साधला.