आपणच आपल्या मुखांनी केलेला नामोच्चार आपल्याच कानांनी ऐकला की दृष्टी भ्रूमध्यावर म्हणजेच भुवयांच्या मध्यभागी स्थिर होते. आता या कृतीनं काय साधतं, यात कोणती मोठी यौगिक क्रिया आहे, तिचा लाभ काय, तिचं वैशिष्टय़ काय, याचा विचार करू. ही समस्त सृष्टी ईश्वरानं निर्माण केली आणि त्याच्याच शक्तीच्या योगानं ती कार्यरत आहे. व्यक्ती आणि त्याची शक्ती जशी अभिन्न असते त्याचप्रमाणे ईश्वर आणि त्याची शक्ती अभिन्नच आहे. दिसायला शिव आणि शक्ती दोन आहेत, प्रत्यक्षात एकरूपच आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी ‘अमृतानुभावा’त याचं फार मनोज्ञ वर्णन केलं आहे. बरं, हे जग ईश्वरापासूनच निर्माण झालं. ईश्वर या जगाला व्यापून आहे. चराचरात आहे. अर्थात त्याची शक्तीही चराचरात आहे. आत्मा हा त्या परमात्म्याचाच अंश आहे. तेव्हा जी शक्ती चराचरात आहे ती प्रत्येक जिवातही असलीच पाहिजे. अनंत ब्रह्माण्डांनी व्याप्त अशा विश्वात जी महाशक्ती आहे तीच जिवात कुंडलिनीशक्तीच्या रूपात विद्यमान आहे. योगशास्त्रानुसार माणसाच्या देहात कमलपुष्पाच्या आकारासारखी सहा चक्रे आहेत. ही चक्रे जसजशी उघडत जातात तसतसा आत्मिक लाभ योग्याला मिळत जातो. आता ही चक्रे उघडतात म्हणजे काय? त्याची थोडी माहिती स्वामी विवेकानंदांच्या ‘राजयोगा’च्या आधारे घेऊ. त्यांच्या सांगण्याचा संक्षेप असा : ‘‘आपल्या मेरुदंडात अर्थात पाठीच्या कण्यात इडा व पिंगलानामक दोन ज्ञानतंतूंचे प्रवाह असून मेरुदंडातील मज्जेच्या मध्यातून जाणारा सुषुम्ना नावाचा पोकळ मार्ग आहे. या पोकळ मार्गाच्या खालच्या टोकाशी, योगी ज्याला कुंडलिनीचे कमल म्हणतात ते कुंडलिनी शक्तीचे निवासस्थान आहे. हे स्थान त्रिकोणाकृती आहे. तेथे ही कुंडलिनी शक्ती वेटोळे घालून बसली आहे. ज्या वेळी ही कुंडलिनी जागृत होते त्या वेळी ती या पोकळ मार्गाने, सुषुम्नामार्गाने वर जाण्याचा प्रयत्न करते. ती जसजशी पायरीपायरीने वर जाते तसतसे मनाचे जणू स्तरामागून स्तर उमलायला लागतात. ही कुंडलिनी जेव्हा मेंदूत जाऊन पोहोचते तेव्हा योगी शरीर आणि मन यापासून संपूर्णपणे अलग होऊन जातो. स्वत:च्या मुक्त आत्मस्वरूपाचा त्याला साक्षात्कार होतो.’’ (प्राणाचे आध्यात्मिक रूप/ राजयोग). तर योगशास्त्रानुसार जी सहा चक्रे आहेत त्यातली पहिली पाच ही पाठीच्या कण्यात आहेत. ही पाच चक्रे अशी- मूलाधारचक्र (शिश्न व गुद यांच्या शिवणीजवळ पाठीच्या कण्यात), स्वाधिष्ठानचक्र (लिंगाच्या मागे पाठीच्या कण्यात), मणिपूरचक्र (नाभीमागे पाठीच्या कण्यात), अनाहतचक्र (हृदयाच्या मागे पाठीच्या कण्यात) आणि विशुद्धचक्र (कंठाच्या मागे पाठीच्या कण्यात). शरीरशास्त्राच्या दृष्टीनेही पाठीच्या कण्याला महत्त्व आहे. स्वकर्तृत्ववान माणसाला आपणही ताठ कण्याचा माणूस म्हणून ओळखतो. कुंडलिनी शक्ती ही मूलाधारचक्रात असते. ती जागी होऊन ऊध्र्वगामी झाली तर प्रत्येक पातळीवर साधकाला अधिक आत्मसन्मुख करीत स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत आणि विशुद्ध चक्रापर्यंत सरळ जाते, पण अधोगामी झाली तर?