सगुण व अशाश्वत जगाच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी शाश्वताच्या सगुण रूपाचा आधार प्रथम आवश्यक आहे. श्रीगोंदवलेकर महाराजही सांगतात, ‘‘आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच, पण त्याच्यापलीकडे असणारा असा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुणमूर्ती होय. लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की, आपण त्याच्यापुढे त्या वस्तूसारख्या इतर, पण बाधक नसणाऱ्या वस्तू टाकतो. त्याचप्रमाणे, सगुणोपासनेचा परिणाम होतो. दृश्य वस्तूंवर आपले प्रेम आहे; जे दिसते तेच सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते; म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल’’(प्रवचने, २ ऑक्टोबर- सगुणभक्ती). यातले, ‘आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल’, हे जे शेवटचे वाक्य आहे ते फार सूचक आहे आणि त्याचा खरा अर्थ सगुणोपासनेविषयीच्या आपल्या चिंतनाच्या अखेरीस उकलेल. आता श्रीक्षेत्र गोंदावले इथेही श्रीरामरायाची मंदिरे आहेत. ‘माझ्या रामाला एकदा डोळे भरून पाहा’, असं श्रीमहाराजांनीही सांगितलं आहे. ‘जो आपला हात माझ्या हाती देतो तो हात मी रामाच्या हाती दिल्याशिवाय मी राहात नाही’, असंही श्रीमहाराजांनी आश्वासिलं आहे. त्यामुळे श्रीरामाची सगुणोपासना गोंदवल्याच्या वाटेवरचे सर्वचजण करतात. या सगुणभक्तीने सुरू होणारी जी उपासनेची वाटचाल आहे तिचा क्रमही श्रीमहाराज सांगतात तो असा- ‘‘सगुणभक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावे, नामात भगवंत आहे असे जाणावे, आणि भगवंताचे होऊन राहावे, हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे. साधुसंतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वत: अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे’’ (प्रवचने, २ ऑक्टोबरमधून). आता श्रीमहाराजांनी सगुणोपासनेचा हा जो क्रम सांगितला आहे त्याचे दोन ठळक भाग आहेत. ‘सगुणभक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावे’ हा पूर्वार्ध आहे तर ‘नामात भगवंत आहे असे जाणावे, आणि भगवंताचे होऊन राहावे’, हा फलस्वरूप उत्तरार्ध आहे. पूर्वार्धाचा पाया जितक्या वेगानं पक्का होत जाईल त्या वेगानं उत्तरार्ध सहज साधेल. या उत्तरार्धातूनच ‘आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल’ हे जे सूत्र आहे त्यापर्यंत पोहोचता येईल. तिथे पोहोचणारे भाग्यवंत फार थोडे. आपलं ध्येय मात्र तिथे पोहोचण्याचंच हवं. त्या सूत्राचा अर्थ आधीच सांगितल्याप्रमाणे सगुणोपासनाविषयक चिंतनाच्या अखेरीस आपण पाहूच. असो. या क्रमाकडे पाहिलं आणि संतांची चरित्रं डोळ्यापुढे आणली की दिसतं बहुतेकांनी आधी परमात्म्याच्या सगुण रूपाची भक्तीच अंत:करणपूर्वक केली. ज्याच्यावर आपलं प्रेम जडतं त्याचं नाम आपल्या अंत:करणात खोलवर असतं. ती आवडीची व्यक्ती दूर असली तरी तिचं नाम आणि तिच्या रूपाचं ध्यान आपल्याला असतं. संतांनी विठ्ठलाचं नामध्यान असंच केलं.

Story img Loader