दिल्लीवाला

नूपुर शर्मा यांनी नको त्या वेळी वादग्रस्त विधान करून पंतप्रधान मोदींच्या उत्साहावर पाणी फिरवलं आहे. केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण होत असताना, पक्षाने मोदी उत्सव साजरा करायचा ठरवला असताना नूपुर शर्मा यांनी घोळ घातला. त्यामुळे आता परराष्ट्र खात्याची पळापळ सुरू आहे. कधी इराणची तर कधी सौदी अरेबियाची समजूत काढण्याचं काम करावं लागत आहे. नूपुर प्रकरण निस्तरण्यासाठी सरकारी स्तरावर जे काही करावं लागत असेल ते केलं जातंय, पण पक्ष म्हणून भाजपलाही काही तरी करावं लागणार होतं. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही मुत्सद्देगिरी करायचं ठरवलेलं दिसतंय. शनिवारी नड्डांनी काही देशांचे राजदूत, उच्चाधिकारी यांची भेट घेतली. गेल्या आठवडय़ातही त्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. जूनमध्येच आणखी दोन बैठका होणार आहेत. वेगवेगळय़ा देशांच्या सरकारी प्रतिनिधींच्या बौद्धिक बैठका भाजप आणि संघाकडून अधूनमधून घेतल्या जातात. आत्ता नड्डांच्या बैठकांनी वेळ अचूक साधलेली आहे. या बैठका पूर्वनियोजित होत्या, त्या नूपुर प्रकरणामुळे आयोजित केल्या गेलेल्या नाहीत, पण आता या बैठकांचा वापर नूपुर प्रकरणामुळं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी केला जात आहे. देशांचे राजदूत बदलत असतात, नव्या राजदूतांना वा राजनैतिक अधिकाऱ्यांना भाजप म्हणजे काय हे समजावून सांगितलं पाहिजे, त्यांना भाजप आणि संघाबद्दल अधिकाधिक माहिती दिली तर पूर्वग्रह दूर करता येऊ शकतात, हे उद्देश बाळगून त्यांचं बौद्धिक घेतलं जातं. नूपुर प्रकरणानंतर या राजदूतांना भाजपचा धर्म-संस्कृती, परंपरा याबद्दल दृष्टिकोन काय हे समजावून सांगितलं जाणार आहे. देशात सर्व धर्माचा आदर केला जातो, हे सरकारी स्तरावर परराष्ट्र खाते देशांना समजावून सांगत आहे, तेच नड्डा या बैठकीतून करणार आहेत.

nashik bjp marathi news, bjp dindori lok sabha election 2024
कोणता समाज, घटक नाराज आहे ? दिंडोरी लोकसभेसाठी भाजप निरीक्षकांकडून चाचपणी
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध
Case against Congress workers for burning effigy of Prime Minister
पुणे : पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

फांदी तुटायला..

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यापासून भाजपने इतक्या नेत्यांची नावे चर्चेत ठेवली आहेत की, नेमके किती राष्ट्रपती निवडायचे आहेत असाच प्रश्न कुणालाही पडावा. मोदी-शहांनी भाजपवर आपली पकड बसवल्यानंतर समोरच्यांना गाफील ठेवायचं आणि मग, अचानक असे निर्णय घेऊन टाकायचे की, सगळे अचंबित होऊन जातील, अशीच कामाची पद्धत ठेवली आहे. रामनाथ कोविंद राष्ट्रपती होणार असं कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं का? पण, ते झाले. राज्यसभेचे सदस्य असताना त्यांच्या शेजारी बसणाऱ्या सदस्यांनाही कोविंद कोण हे कदाचित माहीत नसावेत. त्यामुळे ध्यानीमनी नसलेली व्यक्ती अचानक राष्ट्रपती पदावर बसेल, असं या वेळीही होऊ शकते. बऱ्याच नावांची चर्चा असली तरी, प्राधान्य महिला उमेदवाराला आणि आदिवासी समाजातील भाजप नेतृत्वाला दिलं जाण्याची शक्यता मांडली जाते आहे. प्रत्यक्षात जे काही होईल ते होईल, पण भाजपमधील एक व्यक्ती राष्ट्रपती होण्याची आतुरतेने वाट पाहात आहे ती म्हणजे व्यंकय्या नायडू. नायडू राज्यसभा एखाद्या शाळामास्तराप्रमाणं चालवतात, सदस्यांना विद्यार्थी समजून त्यांना डाफरतात, त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. हे शाळामास्तर राष्ट्रपती झाले आणि पंतप्रधानांनाच विद्यार्थी समजायला लागले तर कसं होणार..? खरं तर मोदींचं आणि नायडूंचं फारसं सख्य नाही. नायडू मोदींच्या सरकारात मंत्री होते तेही नाइलाजाने. नवा चमू बनवायचा असल्यानं मोदींनी त्यांना उपराष्ट्रपती केलं आणि सरकार-पक्ष या दोन्हीपासून कोसो लांब ठेवलं. पण पंतप्रधानांचा हा सूचक इशारा लक्षात घेऊन नायडू काही शांत राहायला तयार नाहीत. ते प्रसारमाध्यमांतून, देशभरातील कार्यक्रमांतून लोकांच्या नजरेत राहतात. पण तुम्ही काहीही न करता अनेकांच्या नजरेत येऊ शकता आणि त्यातून लाभ होण्यापेक्षा नुकसानच हाती लागतं, हा अनुभव  नायडूंनी नुकताच घेतला. उपराष्ट्रपती म्हणून ते कतारला गेले तर नेमके तेव्हाच भाजपच्या वादग्रस्त प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची कीर्ती देशोदेशी पसरली, त्या कतारमध्येही नावारूपाला आल्या. नूपुर यांनी वादग्रस्त विधान करावं, त्याचे पडसाद उमटावेत, आणि त्याच वेळी नायडूंनी कतारमध्ये सरकारी पाहुणे म्हणून जावं हा केवढा योगायोग.. नायडू तिथं गेले अन् कतारनं नूपुर प्रकरणावरून आपली नाराजी व्यक्त केली. तिथल्या अमिरानं नायडूंचा भोजन समारंभच रद्द करून टाकला. कावळा फांदीवर बसायला अन् ती तुटायला एकच गाठ पडणं या म्हणीचाच हा प्रत्यय.. आता नायडूंनी उपराष्ट्रपतीपदाचा आधीचा कार्यकाळ लक्षात ठेवायचा, की हा शेवटचा हा अनुभव लक्षात ठेवायचा?

शक्तिप्रदर्शनाची आधीच तयारी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी बोलावलेलं आहे. सोनिया गांधींना करोनाचा संसर्ग झाल्यामुळं त्यांची चौकशी नंतर होईल, पण राहुल गांधी सोमवारी चौकशीला सामोरे जातील. गांधी कुटुंबातील सदस्य चौकशीला जाण्याआधीच काँग्रेसने शक्तिप्रदर्शनाची तयारी केलेली आहे. काँग्रेसने सर्व खासदारांना सोमवारी दिल्लीत हजर राहण्याची सूचना दिलेली आहे. २०१५ मध्येदेखील सोनिया आणि राहुल हे नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनासाठी न्यायालयात गेले होते. त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचं काँग्रेसच्या मुख्यालयात जोरदार स्वागत झालेलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती आताही होण्याची शक्यता आहे. हे शक्तिप्रदर्शन होईलच, पण काँग्रेसने देशभर ‘ईडी’च्या कारवायांची पोलखोल करण्यासाठी पत्रकार परिषदा घेण्याचं ठरवलेलं आहे. लोकांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेस ‘भारत जोडो’ मोहीम राबवणार असून २ ऑक्टोबरला कन्याकुमारीपासून यात्रा सुरू होईल. त्याची राहुल गांधींच्या उपस्थितीत तयारी केली जात आहे. आणि तरीही महासचिवांच्या आणि प्रदेशाध्यक्षांच्या बैठका घेऊन शक्तिप्रदर्शन करूनच काँग्रेसला पक्षाची ताकद दाखवायची आहे.

तलवारी म्यान?

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं नूपुर शर्मावर केलेल्या कारवाईमुळं भाजपमध्ये नाराजी आहे, हे लपून राहिलेलं नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे नूपुर शर्मा यांचं समर्थन केलं होतं, पण मोदी-शहांच्या नजरेत भरण्यापेक्षा गप्प राहावं असा व्यावहारिक विचार करून त्यांनी तलवारी म्यान केलेल्या आहेत. त्यात प्रवक्त्यांची फार कोंडी झाली आहे. दोन-चार दिवसांपूर्वी भाजपनं नवी मार्गदर्शक सूची प्रवक्त्यांच्या हातात दिली. धर्म आदी संवेदनशील विषयांवर भाष्य करायचं नाही वा भाष्य करताना भान राखायचं; मोदींच्या विकासाच्या योजनांवरच बोलायचं; प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षाची परवानगी घ्यायची; एखाद्या विषयावर काय बोलायचं, काय बोलायचं नाही हे पक्षाला विचारून ठरवायचं.. खरं तर या सूचनांमध्ये नवं काहीच नाही. कुठल्याही पक्षाच्या प्रवक्त्याला खबरदारीच्या याच सूचना दिलेल्या असतात. भाजपनं आपल्या प्रवक्त्यांना विशेष बाब म्हणून सूचना दिल्यानं त्याची नाहक चर्चा झाली. एरवीही विषय आणि त्याचं राजकीय गांभीर्य लक्षात घेऊन काय भूमिका घ्यायची आणि काय बोलायचं हे निश्चित केलेलं असतं. पक्षाच्या माध्यम विभागातील समन्वयक-प्रमुख प्रवक्त्यांशी संपर्क साधून विषयाची चौकट निश्चित करत असतात. पक्षाने ठरवून दिलेल्या चौकटीत प्रवक्त्याने बोलणं अपेक्षित असतं. नूपुर शर्मा यांनीही भाजपची ही चौकट मोडली नव्हती, अशी चर्चा होत होती, पण आता या प्रसंगानंतर तेजस्वी सूर्यासारख्या फायरब्रॅण्ड नेत्यांचं कसं होणार, या नेत्यांनाही तलवार म्यान करावी लागणार का, असेही विचारले जात होते. तेजस्वी सूर्या नुकतेच ऑस्ट्रेलियाला जाऊन आले. तिथं त्यांना ‘नूपुर प्रकरणा’नं गाठलं. त्यांनीही आधी इथे भारतात इस्लाम, हलाल अशा वेगवेगळय़ा गोष्टींवर टिप्पणी केली होती. मुस्लिमांच्या घरवापसीचाही विचार बोलून दाखवला होता. ते देशाबाहेर जाण्याआधीच त्यांची मतं सातासमुद्रापार पोहोचली.  तिथे ऑस्ट्रेलियात त्यांच्याविरोधात निदर्शनं झाली. बोलताना थोडा संयम बाळगा, असं आता भाजपकडून सगळय़ांनाच सांगितलं जातंय, पण कोणीच बहुधा ऐकत नसावं. नूपुर शर्मा यांनाही सबुरी दाखवण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी ऐकलं नाही. मग महाभारत घडलं..