कालपर्यंत मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जागतिक टीकेचे धनी बनलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज अचानक स्नोडेनचे रखवाले व म्हणून मानवाधिकारांचे रक्षणकर्ते बनल्याचे चित्र उभे राहिले आहे. आणि त्याच वेळी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा चेहरा मात्र तंतोतंत धाकटय़ा बुश महोदयांसारखा दिसू लागला आहे. एरवी ओबामा यांचा डेमोक्रॅटिक पक्ष हा मानवाधिकार वगरे मुद्दय़ांवर बऱ्यापकी डावा असतो. परंतु एडवर्ड स्नोडेन याच्या मुद्दय़ावरून ओबामा एवढे अडचणीत सापडले आहेत, की त्यांचे सगळे वागणेच आता रिपब्लिकन पक्षास साजेसे भासू लागले आहे. पुढच्या महिन्यात ५ आणि ६ तारखेला रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे जी-२० राष्ट्रांची शिखर परिषद भरणार आहे. त्या वेळी ओबामा आणि पुतिन यांची स्वतंत्र बठक होणार होती. परंतु पुतिन यांनी स्नोडेन याला राजाश्रय दिल्यामुळे संतापलेल्या ओबामांनी ती बठकच रद्द केली. हा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरणार आहे. रशिया-अमेरिका शिखर परिषद झाली असती, तर त्या काळापुरता पुतिन यांच्यावर माध्यमांचा झोत राहिला असता. रशियात सध्या त्यांच्याविरोधात फार काही बरे बोलले जात नाही. किंबहुना परवाच एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या असंतुष्ट संचालकाने सुरू असलेला कार्यक्रम गुपचूप मध्येच थांबवून पुतिन यांच्या अत्याचारांचा माहितीपट प्रसारित करून खळबळ उडवून दिली होती. अशा परिस्थितीत ही परिषद पुतिन यांना फायद्याची ठरली असती. तसे आता होणार नाही. पण त्याचा लाभ ओबामा यांनाही होणार नाही. विकिलिक्सचे ज्युलिएन असांज, त्यांना अमेरिकेच्या गोपनीय केबल्स पुरवणारा ब्रॅडले मॅिनग आणि आता ‘एनएसए’च्या गोपनीय हेरगिरी कार्यक्रमाचा गौप्यस्फोट करणारा स्नोडेन यांच्यासारख्या जागल्यांच्या विरोधात ओबामा प्रशासनाने घेतलेली भूमिका कितीही कायदेशीर असली, तरी ती असंख्य अमेरिकी नागरिकांच्या दृष्टीने अतिरेकी आहे. डेमोक्रॅटिक नेते आणि मार्टनि ल्युथर किंग यांचे सहकारी, काँग्रेस सदस्य जॉन लुईस यांनी तर स्नोडेनची कृती ही ‘अहिंसक’ आणि ‘सविनय कायदेभंगा’ची असल्याचे सांगून ओबामा यांना घरचाच अहेर दिला आहे. अर्थात सर्वच स्तरांतून ओबामा यांच्या निर्णयाला विरोध आहे, असे नाही. तसे होतही नसते. रशियाप्रमाणे अमेरिकेतील अनेक नेते अजूनही शीतयुद्धाच्या कालखंडातून मानसिकदृष्टय़ा बाहेर आलेले नाहीत. तेव्हा ओबामांनी ‘स्नोडेनाय स्वाहा, पुतिनाय स्वाहा’ असा पवित्रा घेऊन रशियाचा मुखभंग केला ते चांगलेच झाले असे जॉन मॅक्केन यांच्यासारख्यांना वाटणे स्वाभाविकच आहे. आपल्याकडे या घटनेची तुलना भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या प्रस्तावित भेटीशी नक्कीच केली जाईल. पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण सभा आहे. तेव्हा न्यूयॉर्कमध्ये ही भेट होणार आहे. परंतु पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झालेले असताना, मनमोहन सिंग यांनी शरीफ यांना भेटू नये, अशी विरोधकांची मागणी आहे. तसे झाल्यास पाकिस्तानी लष्कराचे मनसुबे सफल झाले असेच म्हणावे लागेल. परंतु तो वेगळ्या चच्रेचा विषय आहे. येथे एकच बाब लक्षात घेण्यासारखी आहे, की ओबामांनी पुतिन यांच्याशी भेट रद्द केली असली, तरी चच्रेची अन्य दारे बंद केलेली नाहीत. अखेर अमेरिकेच्या अध्यक्षांनाही आपले वैयक्तिक रागलोभ आणि राजकीय दबाव दूर ठेवून मुत्सद्देगिरीला वाट करून द्यावीच लागते.