श्रद्धा कुंभोजकर

इतिहास  राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

आपण संकटांशी मुकाबला करताना एकत्रितपणे करतो की रंग- रूप- देश- भाषा यांचे भेदाभेद पाळत प्रयोगसिद्ध ज्ञानावर अविश्वास दाखवतो, हा कळीचा प्रश्न आहे. आपल्याला विवेकाच्या, चिकित्सेच्या मार्गाची निवड करायची असेल, तर त्या-त्या विषयातल्या तज्ज्ञांच्या ज्ञानावर डोळसपणे भरवसा ठेवला पाहिजे..

घरातलं माणूस साथीच्या रोगानं मरणासन्न आहे. सरकारी आरोग्य खात्याचे लोक त्याला संसर्गजन्य रोगांच्या दवाखान्यात न्यायला गाडी घेऊन आलेत. घरच्यांचा तीव्र विरोध. सरकारी कर्मचारी आणि घरातल्या माणसांची मारामारी होते.. हे कालपरवाच्या बातम्यांमधलं दृश्य वाटेल. पण तसं नाही. २० सप्टेंबर १९०१ रोजी कोल्हापूर संस्थानात प्लेगची साथ आलेली असतानाची ही घटना आहे. फरक हा, की छत्रपती शाहू महाराज ही बातमी समजताच तिथे गेले. नातेवाईकांशी बोलले. त्यांच्या शंकांचं समाधान केलं. आणि रोगी दवाखान्यात सुखरूप पोहोचला. जिवावर बेतलं तरी दुसऱ्याच्या ज्ञानावर अविश्वास दाखवण्याच्या वृत्तीचं निराकरण कसं करता येतं याचं हे एक उदाहरण झालं.

इतिहासात डोकावलं तर अनेक समाजधुरीणांनी त्या त्या वेळी या अविश्वासाचं निराकरण वेगवेगळ्या पद्धतींनी केलेलं दिसतं. ‘रोगराईमुळे कामगार लोक आजारी होऊन महसूल बुडतो’ असं मत मांडणाऱ्या आचार्याना कौटिल्यानं आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथामध्ये ठाम नकार दिला. आणि ‘रोगराईचा प्रतिकार करणं सहज शक्य आहे’ असा विश्वास व्यक्त केला होता. कुपाशास्त्री नावाच्या एका भोंदू वैद्याकडून ‘आम्ही पढलो नसतां वैद्यक करीत होतो .. अत:पर कोणास औषध देऊ तरी सरकारचे गुन्हेगार.’ असा माफीनामा माधवराव पेशव्यांनी लिहून घेतला होता. छत्रपती शाहू महाराजांनी सहकुटुंब प्लेगची लस टोचून घेऊन प्रजेलाही ती टोचून घेण्याचं आवाहन केलं होतं. माधवरावांकडे आर्मेनियन वैद्य,  निजामांच्या दरबारी भरमाण्णा नावाचा वैद्य, रघुनाथरावांकडे मुस्तफा हकीम होता. हे पाहिलं की या राज्यकर्त्यांनी जातधर्माच्या पलीकडे जाऊन त्या त्या चिकित्सकांच्या ज्ञानावर विश्वास ठेवला होता असं दिसतं.

प्रश्न असा आहे की, असे दाखले असतानाही विज्ञानाची प्रयोगसिद्ध पद्धत वापरून कमावलेल्या ज्ञानावर बरेच लोक विश्वास का ठेवत नाहीत? याउलट ‘गो कोरोना गो’ यांसारख्या निरुपयोगी सद्भावना कशा काय लोकप्रिय होतात? तर असं दिसतं की, ज्ञान कोण देतंय ते पाहून त्यांचे शब्द हाच त्या ज्ञानाच्या सत्यतेचा पुरावा किंवा प्रमाण मानणं ही एक परंपरा आहे. तिला ‘बाबावाक्यं प्रमाणम्’ असं म्हणता येईल. यात ज्ञान निर्माण करण्याच्या प्रक्रियेपेक्षा व्यक्तीवर भरवसा असतो. याउलट इतिहासलेखनशास्त्र, आणि एकूणच सगळी आधुनिक शास्त्रं मात्र कितीही अधिकारी व्यक्ती असेल तरी तिच्या नुसत्या शब्दांवर विश्वास न ठेवता ‘शास्त्रकाटय़ाची कसोटी’ लावून तथ्यं निश्चित करतात आणि मग सिद्धांत मांडताना दिसतात. प्रत्यक्ष प्रमाण मानणारी ही एक वेगळी परंपरा आहे. या दोन परंपरांचा वादसंवाद भारतीय इतिहासात अखंडितपणे चालू राहिल्याचं दिसतं.

आजपासून सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या अथर्ववेदामधली सूक्तं वाचली, तर मानवी शरीराच्या धमन्यांपासून ते प्रसूतिमार्गापर्यंतच्या अनेक अवयवांची माहिती या लोकांना असल्याचं लक्षात येतं. कृमींमुळे म्हणजे अगदी लहानशा जीवांमुळे ज्वर आणि इतर व्याधी होतात याचीही जाण त्यांना होती. या ज्ञानपरंपरेच्या बरोबरीनं

हतो राजा क्रिमीणाम् उतषां स्थपतिर्हत:..

अथो ये क्षुल्लका इव सर्वे ते क्रिमयो हता:

‘कृमींचे राजे, त्यांची घरं बांधणारे स्थपती, नातेवाईक आणि छोटे छोटे सगळे कृमी (याचाच वेदातला उच्चार क्रिमी) मरून गेले’ अशा मंत्रांमधून उपाययोजना नव्हे तर धीर देणारी सद्भावनाही व्यक्त केलेली दिसते.

बाबावाक्यं प्रमाणम् मानणारी (शब्दप्रामाण्याची) परंपरा आणि चिकित्सा- विवेचन करण्याची ज्ञानपरंपरा या दोन्ही प्रवाहांची सरमिसळ होत भारताचा इतिहास घडत गेला.

चिकित्सा आणि विवेचन करत, ‘करके देखो’ म्हणत ज्ञानाचा शोध घेण्याच्या पद्धतीमुळे शब्दप्रामाण्याला किंवा ‘तो सांगतोय म्हणजे ते खरंच असणार’ या वृत्तीला आव्हान दिलं जातं. यामुळेच कदाचित प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ज्ञानाची कवाडं बंद करण्याच्या प्रवृत्तीचा उदय झाला असावा. एकलव्याला जातीपायी ज्ञान नाकारलं गेलं. गार्गीनं देवतांबद्दल प्रश्न विचारल्यामुळे तिला ‘तुझं मस्तक ठिकाणावर राहू दे’ अशी जरब दाखवली गेली. घरच्यांची शिक्षणाची पार्श्वभूमी नसल्यामुळे वर्गात उत्तर देताना अडखळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ांना शिक्षकांच्या उपहासामुळे आत्मविश्वास गमवावा लागला. याला ज्ञानशास्त्रीय हिंसाचार असं म्हणता येतं. म्हणजे प्रत्यक्ष शारीरिक हिंसा न करता दुसऱ्याची ज्ञान निर्माण करण्याची क्षमता नष्ट करणे. शब्दप्रामाण्याच्या परंपरेचे पाईक याकामी तरबेज असतात.

मात्र दिलासादायक गोष्ट अशी, की एका बाजूला समाजात या ज्ञानशास्त्रीय हिंसाचाराचं अस्तित्व असतानादेखील दुसरीकडे ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी चिकित्सा आणि विवेकाचा प्रवाहही जिवंत राहिलेला दिसतो. चिकित्सा या शब्दाची व्युत्पत्तीच ‘केतुम् इच्छा’ अशी आहे. म्हणजे जाणून घेण्याची तयारी. योग्य ते प्रश्न विचारत राहाणं, त्यांची उत्तरं संवेदनशीलपणे ऐकून घेणं, ती आपल्याला आवडोत अथवा न आवडोत, नीट तपासून, समजून घेणं आणि हे सगळं करून मिळवलेल्या ज्ञानाचा गरवापर होणार नाही हे पाहणं ही या प्रवाहाची वैशिष्टय़ं म्हणता येतील. वेगवेगळ्या प्रदेशांत बोलल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या संस्कृत भाषेचा आणि बोलींचा उपहास न करता त्यांचं वेगळेपण नोंदवत  पाणिनीनं संस्कृत भाषेचं पहिलं व्याकरणशास्त्र लिहिलं. इब्न खाल्दून या इतिहासलेखनशास्त्राच्या प्रणेत्यानं कोणताही पुरावा मिळाल्यावर डोळे मिटून त्याच्यावर विश्वास न ठेवता त्यातील पूर्वग्रहांना बाजूला सारण्याची गरज मांडली. सत्यकाम जाबालाला आणि त्याच्या आईलाही त्याचे वडील कोण हे माहीत नव्हतं. पण त्यानं हे प्रांजळपणे सांगितल्याबरोबर गौतम ऋषींनी त्याचा शिष्य म्हणून आनंदानं स्वीकार केला अशी गोष्ट उपनिषदांत येते. अमर्त्य सेन यांनी तर त्यांच्या एका लेखातून असं दाखवून दिलं आहे, की भारतात एकाच वेळी वापरली जाणारी अनेकविध पंचांगं म्हणजे वेगवेगळ्या ज्ञानपरंपरांचं साहचर्य कसं राखता येतं याचं उदाहरण म्हणता येतील. गुढीपाडवा आणि आíथक नववर्ष यांच्या पाश्र्वभूमीवर हा विचार सहज पटण्याजोगा आहे.

आज मानवजातीसमोर वेगवेगळ्या कारणांनी नरसंहार होण्याइतकी गंभीर आव्हानं उभी आहेत. अशा वेळी आपण संकटांशी मुकाबला करताना एकत्रितपणे करतो की रंग- रूप- देश- भाषा यांचे भेदाभेद पाळत प्रयोगसिद्ध ज्ञानावर अविश्वास दाखवतो, हा कळीचा प्रश्न आहे. आपल्याला विवेकाच्या, चिकित्सेच्या मार्गाची निवड करायची असेल, तर त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांच्या ज्ञानावर डोळसपणे (इथे डोळसपणे हेही महत्त्वाचं) भरवसा ठेवला पाहिजे. संबंधित विषयाचं ज्ञान किंवा अभ्यास नसताना समाजाला गोमूत्रमार्गदर्शन करणाऱ्यांचे विचार तपासून घेऊन माधवराव पेशव्यांनी कुपाशास्त्रींना जो न्याय दिला त्याची आठवण ठेवायला हवी. याबरोबरच तज्ज्ञ मंडळींनीही ज्ञानलवदुर्वदिग्ध होऊन टेंभा न मिरवता डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा आदर्श समोर ठेवायला हवा.

डॉक्टर रखमाबाई या प्रसूतितज्ज्ञ होण्याचं शिक्षण घेऊन रुग्णालयात रुजू तर झाल्या, पण मुंबईतील महिलांना त्यांच्या ज्ञानाची खात्री वाटेना. त्यावर हार न मानता रखमाबाईंनी एक गाभण शेळी रुग्णालयात पाळली. तिच्या तब्येतीची हालहवाल मुंबईच्या वृत्तपत्रांतून दरमहा छापून आणली. सरतेशेवटी त्या शेळीचं बाळंतपण सुखरूप पार पाडल्यानंतर त्याचाही रिपोर्ट वृत्तपत्रांमध्ये दिला. तेव्हा कुठे हळूहळू स्त्रियांना त्यांच्या ज्ञानाची खात्री पटली. एकूण पाहिलं तर चिकित्सक ज्ञानपरंपरेतून आलेल्या तज्ज्ञांनी सर्वसाधारण लोकांना समजेल अशा पद्धतीनं आणि शक्य त्या सर्व माध्यमांतून ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्यांच्या अविश्वासाचं निराकरण केलं पाहिजे. सर्वसाधारण लोकांनी विचारलेल्या शंकांचा उपहास न करता त्यांना वैधता देऊन, सन्मानानं उत्तरं दिली पाहिजेत. नाही तर इतक्या कष्टांनी निर्माण केलेलं ज्ञान समाजापर्यंत पोहोचणारच नाही.. मग,

‘बोलाचीच कढी बोलाचाच भात।

बोलोनियां तृप्त कोण जाहला। ’

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त

इतिहासाचे अध्यापन करतात.

ईमेल : shraddhakumbhojkar@gmail.com