प्रियदर्शिनी कर्वे (पर्यावरण-विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, न्याय )

पर्यावरण दिनासाठी संयुक्त राष्ट्रांनी यंदा ‘नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन’ ही मध्यवर्ती कल्पना ठरवली आहे. परिसंस्थांतील अन्नजाळे लक्षात घेऊन त्या पुनरुज्जीवित करताना,  त्या ‘नैसर्गिक’ असू देणेही महत्त्वाचेच..

Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

५ जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीचा विषय आहे, नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन. विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये स्थानिक हवामानानुसार सूक्ष्मजीवांपासून ते माणसांपर्यंत सर्वाच्या परस्परावलंबित्वाच्या नात्यातून निर्माण झालेली नैसर्गिक व्यवस्था, अशी ढोबळमानाने परिसंस्थेची व्याख्या करता येईल. माणूस शेती करायला लागल्यापासून नैसर्गिक परिसंस्थांची मोडतोड सुरू झाली. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणानंतर या प्रक्रियेचा वेग आणखीच वाढला. परिणामी अनेक प्रजाती नष्ट झाल्या, अनेक प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आणि जागतिक तापमानवाढ, नवनवीन रोग, जीवनावश्यक संसाधनांची कमतरता अशा विविध विनाशकारी समस्या उद्भवल्या. यामुळेच नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करण्याची निकड निर्माण झाली आहे.

पण म्हणजे नेमके काय करायचे? एक मोठा वर्ग असा आहे, की जो ५ जून म्हणजे पावसाळ्याची सुरुवात आणि पर्यावरण दिन ही दुहेरी पर्वणी साधून वृक्षारोपण मोहिमांमध्ये भाग घेण्यासाठी धावतो. बहुतेकदा माळरानावर खड्डे खणून त्यात रोपटी लावणे यापलीकडे काही कार्यक्रम आपल्याला का सुचत नाहीत? शासनातर्फेही दरवर्षी कोटय़वधी वृक्षांची लागवड करण्याचे आदेश निघतात; पण शासनातर्फेच विविध प्रकल्पांच्या नावाखाली पूर्ण वाढलेले आणि नैसर्गिक परिसंस्था समृद्ध करत असलेले कोटय़वधी वृक्ष कापून काढले जात असतात. नवीन लागवड ही या हानीची भरपाई करू शकत नाही.

भारत सरकारमधील वनखाते ही ब्रिटिशांची निर्मिती होती. वनांपासून उत्पन्न मिळवणे हा यामागील एककलमी कार्यक्रम होता. भारतीय उपखंडातील वनांचा सर्वाधिक ऱ्हास ब्रिटिशांच्या या खात्याने केला. आदिवासींनी नैसर्गिक वने वाचवण्यासाठी दिलेले लढे मोडून काढले गेले. दुर्दैवाने स्वतंत्र भारतातही वनखात्याची संस्कृती फारशी बदलली नाही. वनखात्याच्या अखत्यारीतील जागांवर एकतर आर्थिकदृष्टय़ा उपयुक्त मानल्या जाणाऱ्या वृक्षांची एकसुरी शेती केलेली दिसते, किंवा भराभर वाढून हिरवे आच्छादन निर्माण करणाऱ्या, स्थानिक परिसंस्थेशी काहीही संबंध नसलेल्या, झाडांची लागवड केलेली दिसते.

आज ओसाड दिसत असलेला प्रदेश उद्या हिरवागार वनाच्छादित झाला तर चांगलेच होईल, असे काहींना वाटू शकते. माणसांनी मनात आणले, तर भरपूर ऊर्जा आणि पाणी वापरून संपूर्ण सहारा वाळवंटही हिरवे करता येईल. पण यामुळे नैसर्गिकरीत्या विकसित झालेल्या अमेझॉनच्या जंगलांची हानी होईल. अमेझॉनच्या जंगलांमधली जी मूळची स्थानिक माती आहे, त्यात फॉस्फरसची कमतरता आहे. दरवर्षी वाऱ्याबरोबर सहारा वाळवंटातील वाळू उडून दक्षिण अमेरिकेत येते, हे वाळूचे कण अमेझॉनच्या जंगलात पडतात आणि त्यामुळे तिथल्या मातीतील फॉस्फरसची कमतरता भरून काढली जाते. सहारा वाळवंट वृक्षाच्छादित झाले, तर तिथली वाळू उडून इतस्तत: पसरणार नाही आणि यामुळे अमेझॉनच्या जंगलांचे स्वरूप बदलेल. सहारा वाळवंटाचा पांढरा चमकदार वालुकामय प्रदेश सूर्यप्रकाश परावर्तित करत असतो. हा भाग जर हिरव्या वृक्षराजीने आच्छादला गेला, तर सूर्यकिरणे परावर्तित होण्याऐवजी शोषली जातील आणि जागतिक तापमानवाढीच्या प्रक्रियेला हातभार लागेल. याच कारणासाठी जागतिक तापमानवाढीमुळे ध्रुवीय प्रदेशातील हिमाची जागा हरित आच्छादन घेऊ लागले आहे, ही बाबही वैज्ञानिकांना चिंतेची वाटते.

थोडक्यात म्हणजे कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहाणे, यातच सर्वाचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे, त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही, असे अल्बर्ट आईनस्टाईन यांनी म्हटले होते.

मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली आहे, तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच कशी भरून निघेल? माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाटय़ाने आपल्या मूळपदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षांत आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनस्र्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो. उदा. माती धुपून गेल्याने पावसाचे पाणी अजिबातच थांबत नसेल, तर एखादा दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतारावर उथळ खड्डे घेणे, इत्यादी. अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतींची लागवड आणि जोपासना करावी लागते. स्थानिक हिरवाईने जीव धरला की, स्थानिक कीटक, पक्षी, प्राणी येतात आणि परिसंस्था समृद्ध होऊ लागते.

अन्नजाळ्याचा पाया आणि शिखर

शैवाले, गवते, झुडुपे, झाडे, वृक्ष, इ. सर्व वनस्पती आपापल्या परिसंस्थांमध्ये उपयुक्त पर्यावरणीय सेवा पुरवतात. मातीची धूप थांबवणे, जमिनीत पाणी मुरण्याला हातभार लावणे, आजूबाजूच्या हवेत आद्र्रता धरून ठेवणे व तापमान कमी करणे, स्थानिक पातळीवर हवेतील व पाण्यातील प्रदूषके शोषून घेणे तर जागतिक पातळीवर वातावरणातील कार्बन डायऑक्साइड काढून घेऊन जैवभाराच्या रूपाने दीर्घकाळासाठी साठवणे, सूक्ष्मजीव, कीटक, पक्षी, प्राणी, आणि माणसांसाठीही अन्न, अधिवास, ऊर्जा, औषधी, इ. पुरवणे, अशा अनेक प्रकारे वनस्पती परिसंस्था समृद्ध करतात. आवश्यकतेनुसार वनस्पतींची लागवड आणि जोपासना करणे म्हणजे परिसंस्थेतील अन्नजाळ्याचा पाया मजबूत करणे. याउलट अन्नजाळ्याच्या शिखराच्या मदतीनेही परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करता येते. याचे जगप्रसिद्ध उदाहरण अमेरिकेतील यलोस्टोनचे आहे. या परिसरातून नामशेष झालेले लांडगे १९९५ साली इथे पुन्हा सोडले गेले. लांडग्यांमुळे हरिणांच्या वाढलेल्या संख्येवर नियंत्रण आले. त्यामुळे गवत आणि वृक्ष वाढू लागले. झाडे मोठी झाल्यावर पक्षी आले, आणि नद्यांच्या आजूबाजूला बीव्हर वावरू लागले. त्यांच्यामुळे नद्यांमधली जीवसृष्टी पुन्हा बहरली. वाढलेल्या गवत तसेच झाडांमुळे नद्यांच्या किनाऱ्यांची धूप थांबली आणि प्रवाहांचा वेग मंदावला. एक समृद्ध नैसर्गिक परिसंस्था दशकभरात पुनरुज्जीवित झाली.

तेव्हा नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्वप्रथम अजून शाबूत असलेल्या नैसर्गिक परिसंस्थांच्या तुकडय़ांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यानंतर उघडेबोडके डोंगर, माळराने, इ. ठिकाणी नैसर्गिक परिसंस्थेला स्वत:हून पुनप्र्रस्थापित होण्याची संधी द्यायला हवी. हे करत असताना, जिथे खरोखर गरज असेल त्याच ठिकाणी फक्त मर्यादित प्रमाणात स्थानिक परिसंस्थेशी सुसंगत वनस्पतींची लागवड करावी. स्थानिक शासनयंत्रणा आणि जागरूक नागरिक यांना यासाठी समन्वयाने काम करावे लागेल.

माणसांचेही ‘पुनरुज्जीवन’..

शेते, गावे, शहरे, इ. कृत्रिम परिसंस्था माणसांनी निर्माण केल्या आणि स्थानिक नैसर्गिक परिसंस्थांना त्यांचे प्रतिस्पर्धी मानले. आधी मानवनिर्मित परिसंस्थांमधून निसर्गाला आणि मग नैसर्गिक परिसंस्थांमधून माणसांना हद्दपार करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. हा दृष्टिकोनही आता बदलायला हवा. एकाच शेतामध्ये वृक्ष, वेली, झुडपे, गवते, अशी स्थानिक नैसर्गिक परिसंस्थेशी सुसंगत मिश्रशेती करता येते. एकच एक पीक घेण्यापेक्षा आर्थिकदृष्टय़ाही हे जास्त सुरक्षित आहे.

घरांच्या, इमारतींच्या भोवतालील कुंपणांच्या आतील मोकळ्या जागी माणसांचा वावर नियंत्रित ठेवणे शक्य असते. त्यामुळे सर्वत्र काँक्रीटीकरण, कृत्रिम कुरणे किंवा आखीव बागा करण्यापेक्षा काही तुकडय़ांमध्ये तरी स्थानिक नैसर्गिक परिसंस्थेला मोकळीक देणे शक्य आहे. वृक्ष, टेकडय़ा, तळी, नद्या, झरे, इत्यादींना काँक्रीटमुक्त ठेवूनही नगररचना करता येते. हे खरे स्मार्ट शहरीकरण ठरेल. आदिवासी समुदायांना मुख्य प्रवाहात आणताना मुख्य प्रवाहाने त्यांच्या अनुभवसिद्ध शहाणिवेकडून शिकायलाही हवे आहे. नैसर्गिक परिसंस्थांची बलस्थाने आणि मर्यादा समजून घेत त्यांच्याशी सुसंगत जीवनशैली जगणारे आदिम मानवी समुदाय हे त्या परिसंस्थांचे संरक्षक होते. वैज्ञानिक दृष्टिकोन (उदा. वनौषधींच्या मौखिक ज्ञानाची वैज्ञानिक चिकित्सा, प्रमाणीकरण व दस्तऐवजीकरण) आणि समुचित तंत्रज्ञान (उदा. सौर व जैव ऊर्जेवर आधारित ऊर्जासाधने) त्यांच्या वशंजांना निसर्गाशी असलेले नाते अबाधित ठेवून अधिक सन्मानजनक जीवनशैलीकडे नेऊ शकतात. थोडक्यात म्हणजे मानवी परिसंस्थांनी नैसर्गिक परिसंस्थांचा गळा घोटण्याऐवजी त्यांच्या गळ्यात गळा घालणे आवश्यक आहे. यातून नैसर्गिक परिसंस्थांचे आणि माणसांचेही पुनरुज्जीवन होईल.

टीप : ५ मे २०२१ रोजी प्रसिध्द झालेल्या ‘झाडे आणि ऑक्सिजन’ या लेखात ‘ओझोनचा थर हा आपल्याला अपायकारक असणारे सूर्याचे अवरक्त किरण पृथ्वीपर्यंत येण्यापासून थोपवतो’,

असे लिहिले गेले आहे, ते ‘..अतिनील किरण पृथ्वीपर्यंत येण्यापासून थोपवतो’, असे पाहिजे.

लेखिका पर्यावरणनिष्ठ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असून समुचित एन्व्हायरो-टेकच्या संस्थापक आहेत.

ईमेल : pkarve@samuchit.com