श्रद्धा कुंभोजकर

article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी
Indian Diet and exercise Plan for Weight Loss How to start your weight loss journey as a beginner
वजन कमी करण्याची सुरुवात कशी करावी? काय खावे? कोणता व्यायाम करावा? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Manoj Jarange Patil assured the High Court that the agitation will be carried out in peaceful way
आंदोलन सर्वतोपरी शांततापूर्ण मार्गाने करणार, मनोज जरांगेंची उच्च न्यायालयात हमी

इतिहास राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

जगण्याच्या सर्वच पातळ्यांवर सहभाव असायला हवा. इतिहास समजून घेणं हा सहभाव अंगीकारण्याचा एक मार्ग असू शकतो. संघर्ष आणि लढायांची रक्ताळलेली, रोमहर्षक वर्णने तपशीलवार सांगणारा मनोरंजक विषय म्हणजे इतिहास, हा समज मागे पडून, आपण समाज म्हणून कसे घडत गेलो याचा शास्त्रोक्त, संवेदनशील अभ्यास म्हणजे इतिहास हे उमगायला हवं. यंदाच्या ‘चतु:सूत्रा’तील ‘इतिहास’- सूत्राच्या समापनलेखातील ही अपेक्षा ‘आदर्श’ वाटेल; पण ती इतिहासदत्तही आहे..

जनता आणि राजसत्ता यांच्यामधील ताणतणाव भारतीय इतिहासात नवे नाहीत. त्यातून वेळोवेळी मार्ग निघाल्याची अनेक उदाहरणंही आहेत. १६८५ सालच्या हिवाळ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी वाई प्रांताच्या अधिकाऱ्यांना सुनावलं होतं, ‘‘मुलकाचा तहरह लावणी संचणी .. देसमुखाचे मते करीत नाही. येणेकरून कितेक रयेतीचा दिलासा राहात नाही. हे गोस्टीने गैर फायदाच हो (तो). तरी यैसी गोस्टी सर्वथा न करणे.’’ जनतेला समाधान वाटावं, आपला मुलूख मामूर म्हणजे समृद्ध व्हावा यासाठी ज्या पद्धती, नियम आवश्यक असतील, ते करावे ही या पंचविशीतल्या तरुण राज्यकर्त्यांला उमजलेली गोष्ट कळण्यासाठी समाजासोबत नाळ जुळलेली असायला हवी. जगण्याच्या सर्वच पातळ्यांवर सहभाव असायला हवा.

इतिहास समजून घेणं हा सहभाव अंगीकारण्याचा एक मार्ग असू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खोतीची अन्याय्य पद्धत रद्द करण्याच्या लढय़ाच्या सुरुवातीला १९२९ साली चिपळूणला शेतकरी परिषद भरली होती. त्यात डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या सहभावाची मांडणी केलेली दिसते.

‘‘मीदेखील मजूर वर्गापैकी एक असून, इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या चाळींत राहतो. इतर बॅरिस्टरप्रमाणे मलादेखील बंगल्यातून राहाता आले असते, पण माझ्या शेतकरी व अस्पृश्य बंधूंकरिता चाळीत राहूनच काम केलें पाहिजे. याबद्दल मला केव्हांहि वाईट वाटत नाही.. शेतकऱ्यांचे जीवन चारी बाजूंनी संकटांत राहिले तरी धनिकांना व खोतांना त्याची पर्वा नसते. अशा वेळी श्रमजीवी शेतकऱ्यांच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ सरकारने मिळवून दिले पाहिजे. अशा बाबतीत सरकारने गरिबांची दाद घेतली नाही तर ते सरकार सुधारलेले आहे असे म्हणता येणार नाही.’’

गतकाळात घडलेल्या गोष्टींची कुणी तरी आठवण ठेवतं, नोंद ठेवतं. त्या नोंदींची, पुराव्यांची खातरजमा आणि अभ्यास करून मग घडलेल्या गोष्टींचा अन्वयार्थ सांगताना जी कहाणी पुन्हा रचली जाते तिला इतिहास म्हणतात. गोष्टीवेल्हाळ अशा मानवी मनाला इतिहासाकडून बोध घेता येतो. प्रेरणा मिळते. संभाव्य धोक्यांचे इशारे मिळतात. वास्तवापासून दूर जाऊन मनाला रमवता येतं. आपण जे आहोत ते कसे बरं झालो? या प्रश्नाची अनेक उत्तरंही दिसतात. ही उत्तरं शोधताना अशाच परिस्थितीमधल्या दुसऱ्या माणसांचेही दाखले मिळत जातात. त्यातून ‘ते’ आणि ‘आपण’ यांपेक्षा माणूस म्हणून आपली ओळख आपल्याला कळत जाते. कदाचित केशवसुतांच्या शब्दांत ‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत’ असं जाणवतं.

कॉलिन कॅपरनिक या मिश्रवर्णीय अमेरिकन फुटबॉलपटूने कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या वांशिक अत्याचाराचा निषेध म्हणून राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहाण्याऐवजी एक गुडघा जमिनीला टेकवला. त्याच्यावर राष्ट्रप्रेमी नसल्याचे आरोप केले गेले, त्याला एकाही संघानं करारबद्ध केलं नाही, परंतु नायकी या प्रसिद्ध कंपनीनं ‘सर्वस्व गेलं तरी बेहत्तर, तत्त्वावर अढळ विश्वास ठेव.’ अशा वाक्यासह त्याला आपल्या जाहिरातीत घेतलं. बाजारतज्ज्ञांनी कंपनीला तोटा होईल अशी भाकीतं केली, पण त्याउलट कंपनीची विक्री वाढल्याचं दिसलं. समतेच्या तत्त्वाच्या पाठीशी उभं राहिल्यानं कंपनीचं काहीच वाकडं झालं नाही. वंशभेदाविरुद्ध नैतिक भूमिका घेतली तर बाजारपेठेत फायद्याला मुकावं लागेल हे सहभाव नाकारणारं आभासी द्वंद्व खोटं ठरलं.

भारताच्या इतिहासामध्ये अनेक आभासी द्वंद्वं उभी केलेली आढळतात, पण ती तथ्यांच्या कसोटीवर टिकत नाहीत. इतिहास लेखकालाच सहभावावर आधारलेलं इतिहासभान नसेल, तर वेगवेळ्या धर्मामध्ये, जातींमध्ये, लिंगभावांमध्ये, प्रदेशांमध्ये संवाद नव्हे, तर केवळ संघर्ष आणि तेढ असल्याचा समज निर्मिला जातो. सर्व राज्यकर्ते हे सतत लढायांमध्येच गुंतलेले असावेत असा समज करून दिला जातो. हे भ्रम सर्वसामान्य वाचकांच्या मनात रुतून राहातात. आणि इतिहास म्हणजे संघर्ष आणि लढायांची रक्ताळलेली, रोमहर्षक वर्णने तपशीलवार सांगणारा मनोरंजक विषय असा समज होतो. तो आपण समाज म्हणून कसे घडत गेलो याचा शास्त्रोक्त आणि संवेदनशील अभ्यास असतो हे सहजासहजी मानलं जात नाही. खरं तर तपशिलांची जंत्री आवेशात रटणारे लोक सांगतात तो इतिहास नव्हे. तपशिलांची खातरजमा आणि अभ्यास करून मग त्यांचा जो अन्वयार्थ लावला जातो, त्याला इतिहास म्हणता येतं.

हे इतिहासभान जपण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनी वाचकांसोबत सातत्यानं संवाद साधायला हवा. प्रस्तुत सदराच्या निमित्ताने असा संवाद करताना वाचकांच्या विचक्षण नजरेची जाणीव होत राहिली. जाणूनबुजून वापरलेल्या साध्या आणि ‘केलं- दिसलं’ अशा अनौपचारिक भाषेचं वाचकांनी खुलेपणानं स्वागत केलं. ‘लेखासोबत हे चित्र का दिलं ते कळलं नाही’ असं मोकळेपणानं विचारलं. कुणाला एखाद्या लेखातला उपहास झोंबला. तर कुणी पुरावे मागितले आणि ते मिळाल्यावर खुलेपणाने आभारही मानले. जगभरातून अनेकांनी कौतुक केलं, इतिहासाचं आपापलं आकलन तपासून आपले समांतर अनुभव, प्रयत्न सांगितले. सहभावानं लिहिण्याची गरज या सदरलेखनामधून प्रकर्षांनं लक्षात आली. इतिहास हा मनोरंजनाचा किंवा आजच्या भांडणाची पाळंमुळं शोधण्याचा प्रकार नसून गतकालीन समाजाची ओळख करून देणारा शास्त्रीय प्रयत्न आहे असं बहुतेक वाचकांचंही म्हणणं दिसलं.

हे सगळं आदर्शवादी आहे का? तर होय. प्रत्यक्षात जगभरात इतिहासाचा गैरवापर करून स्वातंत्र्य, समता, बंधुतेऐवजी दास्य, विषमता, द्वेष यांना खतपाणी घातलं जाताना दिसतं. द्वेषावर आधारलेल्या सामूहिक स्मृती घडवल्या जातात. ‘त्यांच्या पूर्वजांनी आपलं पाणी गढूळ केलं म्हणून आज आपण त्यांना धडा शिकवायला हवा,’ असा संदेश दिला जातो.  पण विवेकाच्या साह्यने चिकित्सेचा मार्ग स्वीकारणं आणि तो सगळ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगणं हे त्यावरचं एक उत्तर आहे. द्वेषाणूचा संसर्ग घडवणारी मांडणी तपासण्यासाठी तिचं अंतरंग आणि बहिरंग परीक्षण करण्याची, चिकित्सेची तंत्रं खुलेपणानं सर्वानी समजून घेतली तर सामाजिक आरोग्यापुढला धोका कमी होतो असं वाटतं. ते आणि आम्ही यांमधला सहभाव हा या संसर्गावरचा प्रभावी उतारा ठरू शकतो.

परस्परविरोधी भासणाऱ्या गोष्टींमधून सहभावाच्या आधारानं सुवर्णमध्य काढता येणं हे एक महत्त्वाचं कौशल्य माणसांना भेदांच्या पलीकडे जायला मदत करू शकतं. दोन समूहांमध्ये धर्म, भाषा, चालीरीती, खानपान वेगळं असेलही- किंबहुना ते तसे असतातच. तरीही इतिहासाच्या मदतीनं काही समान गोष्टी शोधून त्यांच्या आधारानं सुवर्णमध्य काढल्याचा चपखल दाखला शिवचरित्र साहित्याच्या दुसऱ्या खंडात मिळतो. एरवी एकमेकांच्या स्पर्धक असणाऱ्या दखनी सत्तांनी मुघलांच्या आव्हानासमोर मात्र समान प्रादेशिक ओळखीच्या आधारानं एकीचं बळ कमावलेलं दिसतं. दिल्लीहून आलेल्या मुघलांच्या दूताने छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध लढताना गोवळकोंडय़ाच्या कुतुबशहाला मदत मागितली. तेव्हा दख्खनचं सामायिक वास्तव आणि भवितव्य लक्षात घेऊन कुतुबशहाने नकार दिला आणि तसंच वागण्याचा सल्ला विजापूरच्या सत्तेलाही दिला.. ‘‘उस बातकू हम जबाब दिये है, हमारी पादशाही वा दखणमेकी पादशाही जुदी नै, उनोकू हुवा तो हमनोकू हुवा.’’ – आमची सत्ता किंवा दख्खनमधल्या ‘महाराज छत्रपती संबाजी राजे पादशाहा’ यांची सत्ता या काही फार वेगळ्या नाहीत. त्यांना काही झालं म्हणजे आम्हांला पण झालंच.’

ऋग्वेदाच्या शेवटच्या ऋचेत म्हटलं आहे –

‘समानमस्तु वो मनो यथा व: सुसहासति।’ तुमची मनं जुळलेली, एकसारखी असोत. म्हणजे सगळं सुस होतं.

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त

इतिहासाचे अध्यापन करतात. लेखातील मते वैयक्तिक.

ईमेल : shraddhakumbhojkar@gmail.com