तारक काटे

गांधीवाद

loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

गांधीजींनी सुचवलेली नयी तालीम ही श्रम आणि बुद्धी यांची सांगड घालणारी  शिक्षणपद्धती रुजवण्याचे आपल्याकडचे प्रयत्न अपयशी ठरले. कारण ते मुळात तेवढय़ा गांभीर्याने आणि तेवढय़ा सक्षम लोकांनी पेललेलेच नव्हते.

  • ‘‘बुद्धी आणि श्रम यांची फारकत केल्यामुळे खेडेगावांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे’’.
  • ‘‘नयी तालीमचा यावर विश्वास आहे की ज्ञान आणि कर्म या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. त्यामुळे लक्षातही येत नाही की ज्ञान-कार्य चालले आहे की कर्म-योग चालू आहे’’
  • ‘‘नयी तालीमचे काम हे माझ्या जीवनातील अखेरचे काम आहे: आणि परमेश्वराने ते पूर्ण होऊ दिले तर साऱ्या हिंदुस्तानचे रूपच बदलून जाईल’’

गांधीजींच्या वरील तीन विधानांवरून त्यांच्या ‘नयी तालीम’ या पर्यायी शिक्षण पद्धतीविषयक मूलभूत चिंतनाची दिशा, खेडय़ांच्या सुधारणेसाठी या शिक्षणाचे महत्त्व आणि हा विचार प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठीची तळमळ दिसून येते. 

गांधीजींनी जीवनाच्या जवळपास प्रत्येक अंगाचा सखोल विचार केला, त्यासंबंधी प्रत्यक्ष कृतींद्वारे प्रयोग करीत राहून आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली व यातून स्वत:ला अनुभवसंपन्न केले. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मूलभूत चिंतनामागे मानवजातीच्या कल्याणाची आस तर आहेच, शिवाय त्याची व्यावहारिकता तपासण्याची दक्षताही आहे. यामुळेच स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व करतानाच्या अतिशय व्यग्र काळात देखील गांधीजींनी समकालीन सामाजिक परिस्थितीचे भान राखत राजकीय परिवर्तनासोबतच सुयोग्य सामाजिक बदलांचा विचार करून त्यानुसार आपल्या सहकाऱ्यांना आणि अनुयायींना अनेक कृतिशील कार्यक्रम  दिले. अस्पृश्यता निवारण, हिंदु-मुस्लीम सहयोग, राजकीय-सामाजिक कार्यात स्त्रियांचा सहभाग, ग्रामीण स्वच्छता, ग्रामोद्योग, पर्यायी शिक्षण यासारख्या अनेक कार्यक्रमांना दिशा दिली. त्या काळातील महाराष्ट्रातील जनमानसात आदराचे स्थान असलेल्या व समाजाप्रति समर्पित अशा लोकमान्य टिळक आणि सुधारक गोपाळराव आगरकर या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक परिवर्तन या मुद्दय़ावर मतभेद होऊन त्यांचे मार्ग वेगळे झालेले दिसतात. या पार्श्वभूमीवर गांधींचे या दोन्ही विषयांचे भान राखून त्यांना सारखेच महत्त्व देण्याचे कार्य उठून दिसते.

गांधींच्या नयी तालीम या कल्पनेवर आजवर विपुल लिखाण झाले आहे. त्यात नयी तालीमचा इतिहास, या कल्पनेमागील मूलभूत विचार, त्यासंबधी देशात झालेले प्रयोग, या प्रयोगांचे यशापयश इत्यादी मुद्दय़ांचा अंतर्भाव आहे. गांधींचे सहकारी आचार्य काकासाहेब कालेलकर, आचार्य कृपलानी, आचार्य विनोबा भावे, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. झाकीर हुसेन, डॉ. आर्यनायकम यासारख्या विद्वानांनी नयी तालीमच्या संदर्भात विस्तृत विवेचन केले आहे किंवा प्रत्यक्ष अंमलबजावणीत  भाग घेतला आहे. महाराष्ट्रातील दोन प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, प्रा. राम जोशी व प्रा. रमेश पानसे, यांनी अनुक्रमे ‘गांधीजींचा शिक्षण-विचार’ या लेखाद्वारे (साधना साप्ताहिक: ८ मार्च १९९७) आणि ‘नयी तालीम: गांधीप्रणीत शिक्षणविषयक प्रयोगांचा इतिहास’ या ग्रंथाद्वारे (डायमंड पब्लिकेशन्स, पुणे,२००७) या विषयाचा विस्तृत आढावा घेतला आहे. प्रस्तुत लेखासाठी या दोन लेखनकृतींचा संदर्भ घेतला आहे.

१९०९ मध्ये विलायतेतून परत येताना बोटीच्या प्रवासात लिहिलेल्या ‘हिंदूस्वराज्य’ या पुस्तिकेत गांधीजींनी पाश्चिमात्य संस्कृतीवर जी कडाडून टीका केली आहे, त्यात प्रचलित शिक्षणपद्धतीवरही कोरडे ओढले आहेत. भारतात त्या काळी देण्यात येणारे शिक्षण हे केवळ पुस्तकी व घोकंपट्टी करायला लावणारे आहे; तसेच ते बैठे व्यवसाय व नोकऱ्या यालाच प्राधान्य देणारे असून शारीरिक श्रम करणाऱ्यांकडे तुच्छतेने पाहणारे आहे असे त्यांचे मत होते. या शिक्षण पद्धतीमुळे समाजात अशिक्षित – सुशिक्षित आणि ग्रामीण – शहरी असा भेद निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शारीरिक श्रमाची लाज वाटून ती शहरातील पोशाखी व्यवस्थेकडे धाव घेतात. एका बाजूला ग्रामीण भागात कोसळत चाललेले पारंपरिक व्यवसाय, नवीन व्यवसायांची निर्मिती नाही; त्यामुळे रोजगारावाचून अधिकाधिक दरिद्री होत जाणारी खेडी, तर दुसऱ्या बाजूला नोकरी शोधणाऱ्यांची गर्दी वाढत चालल्यामुळे शहरे अधिकाधिक बकाल होत गेलेली. यावर मात करण्यासाठी श्रमाधारित शिक्षण पद्धतीचा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणातून अर्थोत्पादनाचा अनुभव देणाऱ्या शिक्षणाचा विचार गांधीजींनी नयी तालीममधून मांडला. यातून त्यांना अशी नवी ग्रामीण व्यवस्था घडवायची होती की जी शहरी शोषणापासून मुक्त, ग्रामोद्योगातून स्थानिकांना रोजगार पुरविणारी आणि समता व न्याय यावर आधारित नवा समाज निर्माण करणारी असेल. यातून निर्माण होणारी नवी पिढी उपजीविकेच्या बाबतीत स्वावलंबी असेल आणि जीवनाच्या सर्व समस्यांना भिडण्याचा त्यांना आत्मविश्वास असेल. देशातील त्या काळातील खेडय़ातील दारिद्रय, शोषण आणि दुरवस्था त्यांनी जवळून पाहिली असल्यामुळे भविष्यातील खेडी आत्मनिर्भर होण्यासाठी नव्या पिढीची मदत होईल असे त्यांना वाटत होते.

नयी तालीमची बीजे गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात आहेत. टॉलस्टॉय फार्म आणि फिनिक्स फार्म येथे असलेल्या कुटुंबीयांच्या आणि स्वत:च्याही मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. या मुलांच्या अनौपचारिक शिक्षणाची जबाबदारी गांधीजींनी स्वत:वर घेतली आणि प्रत्यक्ष कृतीतून जीवन शिक्षण या संदर्भात नवे प्रयोग सुरू केले. १९१५ साली भारतात परतल्यावर देखील त्यांचे स्थापलेल्या कोचरब व साबरमती आश्रमात पर्यायी शिक्षण पद्धतीवर प्रयोग आणि चिंतन सुरूच होते. या आश्रमांच्या नियमावलीत सत्य, अिहसा या मूल्यांच्या पालना सोबतच स्वच्छता, सूतकताई, शेती, दूधउत्पादन, चर्मोद्योग व श्रमावर आधारित कृती कार्यक्रमावर भर होता. याशिवाय धर्मभेद, जातीभेद, अस्पृश्यता अशा सामाजिक प्रश्नांवर मात करण्याचा प्रयत्न होता. अशा रीतीने आश्रमात राहणाऱ्या नव्या व जुन्या पिढय़ांमधील स्त्री – पुरुषांवर आणि विशेषत: मुलांवर नवे संस्कार रुजविण्याचे कार्य सुरू होते. सोबतच नव्या भारतासाठी उपयुक्त अशा पर्यायी शिक्षणाच्या संदर्भात गांधीजींचे अनेक प्रयोग व चिंतन सुरूच होते. याला खरे स्वरूप आले १९३७ साली. या काळात भारतातील ११ प्रांतांपैकी आठ प्रांतात काँग्रेसची प्रांतिक सरकारे सत्तेवर आली होती. शिक्षण हा राज्य सरकारांच्या अधिकारक्षेत्रातील विषय असल्यामुळे शालेय शिक्षणासंबंधी अधिक विचार करण्याकरिता २२-२३ ऑक्टोबर १९३७ मध्ये वर्ध्याला काही मोजक्या  शिक्षणतज्ज्ञांची परिषद भरविण्यात आली. या परिषदेतील उद्घाटनपर भाषणात गांधीजींनी आपले पर्यायी शिक्षणाचे विचार मांडले व त्याची व्यवहार्य अंमलबजावणी कशी व्हावी यावर परिषदेत विचार व्हावा असे सुचविले. या संदर्भात डॉ. झाकीर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीच्या शिफारसींमध्ये सात ते १४ वयोगटातील मुलांना सात वर्षांचे मोफत व सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण असावे, सर्व विषयांची ज्ञानपातळी आणि दर्जा त्या काळच्या मॅट्रिकच्या तोडीचा असावा, हे शिक्षण मातृभाषेतून असावे आणि सगळय़ात महत्त्वाची शिफारस म्हणजे सर्व शिक्षण अर्थोत्पादक अशा एखाद्या हस्तव्यवसायाद्वारे द्यावे. हे व्यवसाय शिकवीत असताना त्याच्याशी संबंधित इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित या विषयांचीही सांगड घालावी, हे मुद्दे होते. कृतीद्वारे मिळणाऱ्या शिक्षणाचा जीवनाशी मजबूत सांधा जुळलेला असेल तर पुढील अडचणींना सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास यातून मिळेल असा गांधीजींचा विश्वास होता. हे व्यवसाय कौशल्य केवळ यांत्रिकपणे न शिकविता शिकण्याच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत राहून आणि त्यांची जिज्ञासा जागवत ठेवत, त्यांच्या विचारांना चालना देत, प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून काढून घेत त्यांचा ज्ञानघटक वाढविणे हा उद्देश होता. कृतीद्वारा ज्ञान मिळाले तर ते जास्त काळ लक्षात राहते. कृती आणि ज्ञान यातील अनुबंध अथवा समवाय (को रिलेशन) साधण्याची ही नावीन्यपूर्ण पद्धत होती. प्रा. रमेश पानसे यांच्या मते गेल्या ४० वर्षांत झालेले मेंदू संशोधन व शिक्षण यांचा संबंध साधणारी आणि प्रत्यक्ष प्रयोगाच्या आधारे सिद्ध झालेली ‘मेंदू-आधारित शिक्षणाची’ एक नवीन विचारधारा आता शिक्षण व्यवहारात रुजली आहे. त्या संदर्भात नयी तालीमच्या संकल्पनेत गांधीजींनी हाताने करावयाचे श्रम आणि बुद्धीने करावयाचे (बौद्धिक) कार्य अशा दोन्हींची घातलेली सांगड ही या आधुनिक शिक्षण प्रणालीशी जुळणारी आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे (आधुनिक मेंदुविज्ञान नयी तालीम: सर्वंकष, अंक १, २०२१).

डॉ. झाकीर हुसेन समितीने तयार केलेली नयी तालीम आधारित आणि वर्धा शिक्षण योजना, बुनियादी शिक्षण अथवा जीवन शिक्षण अशा विविध नावांनी ओळखली जाणारी ही पर्यायी शिक्षण व्यवस्था भारताच्या अनेक भागात रुजविण्याचा प्रयत्न झाला. परंतु काही वर्षे चालून ती अनेक कारणांनी बंद पडली. कारण ती गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे राबविलीच गेली नाही. स्वातंत्र्यानंतर ज्यांच्या हातात सत्तेची सूत्रे गेली, त्या राजकारणी आणि नोकरशहांचाही यावर फार विश्वास नव्हता. ही योजना असफल होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या शिक्षकांद्वारे ही योजना राबविण्यात येणार होती ते आवश्यक त्या तोडीचेच नव्हते.

जागतिक अर्थतज्ज्ञ गुन्नार मिर्दाल यांच्या मते गांधीजींच्या मूलोद्योग आणि जीवनशिक्षण पद्धतीत बदलत्या परिस्थितीला अनुरूप सुधारणा कराव्या लागल्या तरी भारतात शालेय शिक्षणासाठी ही पद्धत अत्यावश्यक आहे. युरोपातील जर्मनीसारख्या आर्थिकदृष्टय़ा अतिशय प्रबळ आणि अतिविकसित देशात देखील शालेय शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव केला गेला आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या गरजांच्या अनुरूप शिक्षण पद्धत न स्वीकारता ब्रिटिशांचीच पद्धत सुरू ठेवली आहे. त्यामुळे परीक्षेतील वाढत्या गुणांच्या मागे लागलेली, केवळ स्थायी नोकऱ्यांच्याच शोधात असलेली आणि आत्मविश्वास गमावलेली बेरोजगार तरुणांची फळीच आपण निर्माण करीत चाललो आहोत ही आजची वस्तुस्थिती आहे.

vernal.tarak@gmail.com