श्रद्धा कुंभोजकर ( इतिहास  राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.)

इतिहास समजून घेऊ पाहणाऱ्या सर्वानीच केवळ एकाच प्रकारच्या पुराव्यावर अवलंबून न राहता ज्या घटनेचा अभ्यास करायचा त्या काळातील वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यक्षदर्शी पुरावे एकमेकांशी पडताळून पाहायला हवेत.. नाही तर ‘चंपावती’ म्हणजे चपाती हे कळणार नाहीच आणि व्यावसायिक कलाकृतींना इतिहासाचं पाठय़पुस्तकच मानण्याची गल्लतही सुरूच राहील..

इतिहासाचा गैरवापर करून माणसामाणसांमध्ये अमंगळ असे भेदाभेद निर्माण केले जातात, आपण त्यांच्या पलीकडे पाहायला हवं, असं आपल्या याआधीच्या लेखाचं सूत्र होतं. खरोखरच भेदांच्या पलीकडे जाऊन माणसांना समजून घ्यायचं असेल तर त्यांचं म्हणणं नीट ऐकून घ्यायला हवं. इतिहासाच्या क्षेत्रात हे दुसऱ्याचं म्हणणं नीट ऐकून घेण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु जर एखादा खटला न्यायालयात चालू असेल आणि फडर्य़ा वकिली भाषेत फिर्यादींना आपलं म्हणणं न्यायमूर्तीसमोर मांडता येत नसेल, तर? तर जी गत होते, तसंच इतिहासामध्ये अधिकृत मानले जाणारे शिलालेख, दस्त, नाणी अशा पक्क्या पुराव्यांनिशी आपलं म्हणणं शाबीत करणं अनेक जनसमूहांसाठी अवघड ठरतं. अशा वेळीदेखील माणसं बोलतात, आपलं म्हणणं सांगतात. फक्त आपण त्यांची भाषा समजून घेणं गरजेचं असतं.

‘जिणं आमुचं’ हे बेबी कांबळे यांचं आत्मचरित्र आधुनिक काळातलं मराठीमधलं दलित स्त्रीचं पहिलं आत्मकथन मानलं जातं. घरातली गाडगीमडकी कुत्र्यांनी खाली पाडली, चमचा पळवून नेला आणि शिळ्यापाक्या अन्नाचीही नासाडी झाली अशा करुण परिस्थितीचं वर्णन परगावी राहणाऱ्या नवऱ्याला तर कळवायचंय, पण घराची प्रतिष्ठाही सांभाळायची आहे, अशी कसरत करताना बायको पत्र सांगते.. ‘हं, लिव्ह बाबा, कुत्तेखानाची फौज आली. राजमहालात गडबड झाली, आंबरनाथ पडला धरणी, परुळनाताला जखम झाली. आन् चंपावतीला काडून नेली.’

उपहास, विनोद, वक्रोक्ती अशी वेगवेगळी नावं दिली असली, तरी त्यांचा अर्थ होतो- कोणत्याही कारणामुळे, दबावामुळे किंवा समाजाच्या भीतीपोटी आपलं म्हणणं थेट रोखठोकपणे सांगण्याऐवजी, आडवळणानं का होईना, पण सांगणं. जे घडतं आहे, ते कोणत्या तरी पद्धतीनं दुसऱ्याला कळवता येणं आणि त्यानं ते नीट समजून घेणं, ही इतिहासलेखनातली अतिशय आवश्यक अशी प्रक्रिया आहे. कारण शेवटी ‘इतिहास’ या शब्दाची फोडच मुळी ‘इतिह आस’ म्हणजे ‘असं घडलं असं सांगतात’ अशी आहे. म्हणजे नुसतं घडणंच नाही, तर जे झालं ते सांगणं हाही इतिहासाचा अविभाज्य घटक आहे. अशा परिस्थितीत या बायकोचं म्हणणं कागदावर मांडणारा जो ‘लिव्हनारा बाबा’ आहे, ती कळीची भूमिका इतिहासकार, पत्रकार, जनतेचे प्रतिनिधी, अशा सर्वानीच निभावायची असते असं म्हणता येईल.

मात्र ‘लिव्हनारे लोक’ किंवा सत्य मांडण्याची जबाबदारी असणारेच सत्य लपवतात असंही आपल्याला पाहायला मिळतं. याबाबतची जुनीच तक्रार साधारणपणे पंचवीसशे वर्षांपूर्वी रचलेल्या ईशावास्य उपनिषदातही मांडलेली दिसते. सत्याचं तोंड हे सोन्याच्या झाकणानं दाबून टाकलं जातं. त्यामुळे सत्य काय हे दृष्टीस पडावं यासाठी सूर्यानं ते झाकण बाजूला करावं अशी विनवणी हे उपनिषदकार करतात-

‘हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखम्।

तत् त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये॥’

आजच्या संदर्भानं पाहिलं तरी, सत्याचा शोध घेताना इतिहासकाराची वाट अडवून अनेक सोनेरी प्रलोभनं उभी असतात. कधी वैयक्तिक स्वार्थ, कधी एका विशिष्ट ओळखीचं वा अस्मितेचं गौरवीकरण, कधी एखाद्या समुदायाला मुद्दाम ऐतिहासिक स्थानापासून वंचित करणं, अशा अनेकविध हेतूंमुळे इतिहासामधलं सत्य झाकोळलं जाताना दिसतं.

आजच्या एकविसाव्या शतकामधल्या जगण्याचे आणि ज्ञान निर्माण करण्याच्या प्रक्रियेचे पेचदेखील या सत्याबाबतच्या गोंधळामध्ये भर घालताना दिसतात. अनित्यता, तात्पुरतेपणा हे आजच्या जगण्याचे स्थायिभाव आहेत. त्यामुळे ऐतिहासिक सत्यांची मांडणी करताना त्यातली बरीच तथ्यं आणि त्यांचे अन्वयार्थ हे शाश्वत नसणारच हे आपल्याला मान्य करावंच लागतं. ज्या व्यक्ती, घटनांना एके काळी आपण इतिहासातले महत्त्वाचे नायक, महत्त्वाच्या घटना म्हणून समजून घेतलं, त्यांच्या बाबतीत अगदी विरुद्ध जाणारी कथनेदेखील आज अभ्यासानिशी मांडली जातात. अमुक एका थोर मानल्या गेलेल्या व्यक्तीचं वर्तन एका विशिष्ट बाबतीत अजिबातच थोर नव्हतं किंवा अमुक एखादी घटना ही देशाच्या इतिहासाला वळण देण्याइतकी महत्त्वाची होती, पण आधी तिला कुणी तशा नजरेनं पाहिलं नाही असंदेखील लक्षात येतं. अशा वेळी वेगवेगळ्या लोकांच्या, घटनांच्या, समुदायांच्या स्मृती समाजापुढं मांडणारा ‘लिव्हनारा बाबा’ जर आपलं काम नीट करत असेल, आणि आपण त्या स्मृती काय सांगतात, हे नीट समजून घेतलं, तर आपलं इतिहासाचं कथन हे अधिकाधिक परिपूर्ण होऊ शकतं.

पण आज होतंय असं की, भूतकाळाची कहाणी मांडण्याची असंख्य नवनवीन साधनं सर्वाच्या हातात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे टॉलीवूड, बॉलीवूड, हॉलीवूड चित्रपटांपासून ते अ‍ॅमेझॉन/नेटफ्लिक्स सीरिज ते विविध दृश्यप्रतिमा वापरून केल्या जाणाऱ्या मीम्स आणि वेबलॉग्सपर्यंत अनेक माध्यमांतून आपल्या कानीकपाळी गतकाळ आदळत असतो. एका अर्थी जितकी माध्यमं वाढतील, तितक्या ताकदीनं आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून गतकाळाची मांडणी करणं ही इतिहास समजून घेण्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण आजवर ज्यांना फारसं बोलू दिलं गेलं नाही आणि ज्यांचं म्हणणं फारसं कुणी ऐकायला उत्सुकही नव्हतं, त्यांचेही आवाज इंटरनेट तंत्रज्ञानावर आधारलेल्या नव्या माध्यमांमुळे आपल्या कानी येऊ शकत आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, तर नंदुरबार पट्टय़ातील आदिवासी स्वत:चं मनोरंजन कशा प्रकारे करत असतील? या प्रश्नाला माझ्यासारख्या बाहेरच्या व्यक्तीला बरीच कमी माहिती असते. पण त्या भागाची जाणकार असणाऱ्या लक्ष्मीनं जेव्हा ‘नंदुरबारमधील सोंगाडय़ा पार्टी’ या विषयावर वर्गात निबंध सादर केला, इतकंच नाही तर व्यावसायिक पद्धतीनं तयार केलेले, हजारो लोकांनी पाहिलेले या सोंगाडय़ा पार्टी कार्यक्रमांचे यूटय़ूब व्हिडीओ वाचकांच्या निदर्शनास आणले, तेव्हा माझ्या तरी ढोबळ धारणांना चांगलाच धक्का बसला होता. आजवर न ऐकलेल्या कहाण्या ‘लिव्हनारे बाबा’च नाही तर मुलीदेखील पुढे आल्या की आपल्या इतिहासाबाबतच्या आणि वर्तमानाबद्दलच्याही समजुतीत भर पडत जाते.

आपली कहाणी मांडणाऱ्यांची वाढती संख्या जशी आपल्याला सहज पाहता येते, तसंच या कहाण्या मांडण्याच्या माध्यमांचादेखील विस्फोट म्हणावा इतकी संख्या आणि प्रकार वाढलेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून गतकाळावर आधारलेल्या कथा सांगणारे चित्रपट, कथा-कादंबऱ्या लोकप्रिय झालेले दिसतात. इतकंच नाही, तर आपल्या समाजातले अनेक लोक या कलाकृतींना, चित्रपटांना गतकाळ समजून घेण्याचं एकमेव साधन मानतात. इतिहासाची अभ्यासक म्हणून जर कशावर आक्षेप घ्यायचाच झाला तर मी असं म्हणेन की, या व्यावसायिक कलाकृतींकडे गतकाळाची गोष्ट सांगणारा मनोरंजक पट म्हणून न पाहता इतिहासाच्या पाठय़पुस्तकासारखं पाहिलं, तर गल्लत होते. ‘घडीघडी मेरा दिल धडके’ म्हणणाऱ्या नायिकेला हृदयविकाराचा त्रास होतोय असं एखाद्या प्रेक्षकानं ठरवलं, तर ते जितकं हास्यास्पद ठरेल, तितकंच एखादा मसालेदार बॉलीवूड सिनेमा पाहून महाराष्ट्राचा इतिहास शिकू पाहणं हास्यास्पद ठरेल. व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर बोलभांड माध्यमांतून इतिहास या नावाखाली प्रसृत केली जाणारी मिथकेदेखील कधी हास्यास्पद, तर कधी स्पष्टपणे विखारी असतात. अशा वेळी इतिहास समजून घेऊ पाहणाऱ्या सर्वानीच केवळ एकाच प्रकारच्या पुराव्यावर अवलंबून न राहता ज्या घटनेचा अभ्यास करायचा त्या काळातील वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यक्षदर्शी पुरावे- जसं की नाणी, शिलालेख, उत्खनन, कागदपत्रं, वाङ्मय, चित्रं, मूर्ती, चित्रपट आणि सध्याच्या काळाचा अभ्यास करताना तर इंटरनेटवर आधारलेली डिजिटल साधनंदेखील- अभ्यासायला आणि एकमेकांशी पडताळायला पाहिजेत.

तर मग एकीकडे माध्यमांचा भडिमार आणि दुसरीकडे लोकांचं जगणं मांडणाऱ्या कहाण्यांची उत्साहवर्धक संख्या यातून सत्याची आस धरणाऱ्या माणसानं काय करावं? याचं उत्तर पावणेदोनशे वर्षांपूर्वी मिर्झा गालिबनं रचलेल्या काव्यामध्ये शोधता येईल :

‘मैंभी मूँहमें जुबान रखता हूँ।

काश पूछो के मुद्दआ क्या है।’

आपली कहाणी सांगणारे अनेकानेक लोक असतील, पण आपण समर्पक असे प्रश्न या कहाण्यांना विचारायला हवेत. त्यातूनच अनेक नवे लिहिणारे हात पुढे येतील. असं असं घडलं याची कहाणी सांगणारी विश्वासार्ह माध्यमं लोकप्रिय होतील. इतिहासाला नवनवीन आशयसूत्रं सापडत जातील.

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त इतिहासाचे अध्यापन करतात. ईमेल : shraddhakumbhojkar@gmail.com