सुरज मिलिंद एंगडे

आंबेडकरवादाच्या तत्त्वज्ञानाला सामाजिक बाजू आहेच, पण आध्यात्मिक अंगही आहे..

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

आंबेडकरवाद काय असू शकतो यावर याआधीच्या लेखात विचार करताना, या वादाच्या काही मूलभूत रचना व विचारांची जाणीव करून घेतली. वादाचे रहस्य काय असते त्याचे स्वरूप कसे बांधले जाते याकडे आपण पाहिले. या लेखात आपण त्या सैद्धान्तीकरणाचा पुढचा क्रम पाहू. आधीचा व हा, असे दोन्ही लेख एकत्रित वाचल्यास ही जाणीव वाढणे अधिक सोपे होईल. ‘आंबेडकरवाद’ या कल्पनेला सैद्धान्तिक अस्तित्व येण्याआधीपासून काही संकल्पनांच्या, आकांक्षांच्या आणि जाणिवांच्या रूपाने ‘आंबेडकरवाद’ अस्तित्वात होता आणि आहे. आंबेडकरवादाचे सैद्धान्तिक रूप समजण्यासाठी त्याचे- किंवा आकांक्षांचे, संकल्पनांचे आणि जाणिवांचे क्लासिफिकेशन अर्थात वर्गीकरण करावे लागेल.

आंबेडकरवाद हा पाया गृहीत धरला तर त्याच्यावर अवलंबून राहणारे दोन गट दिसतात. एक सामाजिक आणि दुसरा आध्यात्मिक. प्रत्येक गट हा वेळ आणि जागा – स्थळ आणि काळ (टाइम अ‍ॅण्ड स्पेस) यांनी बांधलेला आहे. या दोन कोनांच्या बाहेर जर आपण आकलण्याचा प्रयत्न केलात तर असे समजून येईल की सामाजिक क्षेत्र आणि आध्यात्मिक विश्व हे एकच आहेत आणि अनेक वेळा- वेळ आणि जागा यांना धरून विचार न केल्याने चुकीचे अर्थ लावले जातात. प्रत्येक शास्त्राचा सिद्धान्त हा काळाने बनलेल्या आधारांवर आपले विवेचन मांडतो. पण या सिद्धान्तामागचे ‘शास्त्र’ कधीच काळाला बांधील नसते. म्हणून तर, ते तत्त्वज्ञानाचा भाग मानले जाते. त्यासाठी आंतरिक आणि बाह्य (इंटर्नल आणि एक्स्टर्नल ) अशा दोन्ही प्रकारच्या अनुभवांच्या ‘मेथडॉलॉजी’च्या पुढे त्यांना जावे लागते.

सामाजिक दृष्टीचा आंबेडकरवादाच्या अस्तित्वावर भरपूर प्रभाव आहे. समाज व समाजातील मानव बनण्याची प्रक्रिया यावर आधारलेले अनेक बिंदू सामाजिक व्याकरणाचा भाग असतात. तर आध्यात्मिक पातळीची समज ही अनुभवावर आधारलेली असते. अध्यात्माचा अपलाप किंवा त्याला खोटे ठरवण्याचा डाव जास्त वेळ चालत नाही. आंबेडकरवाद ही अध्यात्माने भरपूर असलेली उमज आहे.

पुढे सामाजिक आणि आध्यात्मिक गटांची विभागणी आणखी दोन गटांत होते. सामाजिक परिप्रेक्ष्यात आपल्याला राजकारण आणि अर्थनीती समजते. अध्यात्मामध्ये सांस्कृतिक विश्ववाद आढळतो. या साऱ्या गटा-उपगटांची बेरीज आपल्या एका आशयाकडे घेऊन जाणारी असू शकते. पण जोपर्यंत त्यांची सांगड घातली जात नाही तोवर अर्धवट किंवा अपुरे असे अनुभव आपल्याला पाहावयास मिळतात. तत्त्वज्ञानाच्या भाषेत जर त्याला मांडायचे असेल तर आध्यात्मिकतेतील विश्ववादाची कल्पना समजून घ्यावी लागते.

आंबेडकरवाद हे वैचारिक सखोलतेचे शास्त्रीय विवेचन आहे. न्याय, समता, धर्म, आध्यात्मिकता, आणि जागतिक भेदभावाच्या विरोधात लढण्यासाठीचा एक जाहीरनामाच (मॅनिफेस्टो) आहे. आंबेडकरवाद हा कट्टरवाद नसून खुल्या पटांगणात सुसंवादाचा मार्ग आहे. माणुसकीला जिथे प्राधान्य व नैतिकतेला संस्काररूपी व्यवस्था लाभते तिथे आंबेडकरवादाचे बीज उमलत असते. आंबेडकरवाद हा जगातील अनेक वादांचे पैलू ल्यालेला आहे. जिथे अन्याय आणि असमानता आढळते तिथे आंबेडकरवाद आपले उग्र रूप धारण करतो, परंतु मुळात आंबेडकरवाद हा हजारो वर्षांच्या चिकट व सुदृढ असलेल्या दमनकारी व्यवस्थेला माणूसपणाची जाग आणण्यासाठी मारलेली गंभीर, चिकित्सक हाक आहे. आंबेडकरवाद दिशा देणारी एक बहुप्रणाली आहे. या प्रणालीत प्रेम, करुणा आणि दया यांचे केंद्रिबदू आहेत. क्षमाशीलता हे या विचाराचे गमक आहे. हा विचार आंबेडकरांच्या वैचारिक पूर्वजांनी त्यांना वारसा म्हणून दिला आहे. ‘आंबेडकरवाद’ आहे, म्हणूनच अखिल दलित समाजात प्रेमाचा, करुणेचा झरा आणि मानव-उपयोगी नीतितत्त्वांचे आचरण करण्याची प्रेरणा रक्तात सळसळत आहे. आंबेडकरवाद हे उत्तर नाही, ते अनेक न विचारलेल्या प्रश्नांचे संक्षेपण आहे. ते तुम्हाला तुमच्या जीवनाचे सार्थक शोधण्यास उद्युक्त करते. तुमच्या जीवनाला अनेक कारणे देते. आंबेडकरवादात मुक्ती आहे, कारण हा विचार कर्मठ बुद्धीला एका नवीन जगाचा आदर्श दाखवणारा आहे. उदारपणा आणि प्रगतिशीलता हे या विचाराचे प्रामाणिक कार्यवाह आहेत. आंबेडकरवादाचा अर्थ जीवनकेंद्री आहे. ते जीवन केवळ मानवापुरतेच सीमित नसून अन्य जीवांसोबत करुणेने सहजीवन जगण्यासाठी मानवजातीला दिलेला तो एक सुहृदयी स्पर्श आहे. दलित विश्ववाद हा आधुनिक मताने आंबेडकरवादाच्या विचारात आढळू शकतो.

आंबेडकरांना त्यांच्या हयातीत अनेक टोकदार बाणांना सामोरे जावे लागले होते. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांच्या विरोधकांचे लक्ष एखाद्या घारीप्रमाणे होते. बाबासाहेबांना वेळोवेळी त्यांच्या लिखाणावर, भाषणावर  प्रतिक्रिया प्रसारमाध्यमातून मिळायची. त्यांची कधी खिल्ली उडवली जायची  तर कधी अर्धवट समज असलेली टीका व्हायची. म्हणून आंबेडकरवादाचे स्वरूप हे काही टीकेच्या वर्तुळापासून अलिप्त राहणारे आणि ‘आधी आमच्यात या, मग कळेल’ असा हेका टीकाकारांपुढे धरणारे नाही. उलट, आंबेडकरवाद हा टीकेच्या टोकावर तयार झालेला एक वैश्विक सदाचार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशाला पित्यासमान आहेत. त्यांच्या लेखणीतून या देशाच्या विविधतेला एक होण्याचा मार्ग लाभला. देशाला जर यापुढे न्यायचे असेल तर आंबेडकरवादाचे पितृतुल्य स्वरूप अंगीकारणे हा एक उत्तम प्रायोगिक उपाय ठरू शकतो. आंबेडकरवाद जातीच्या बालिश मानसिकतेच्या बाहेरचा विचार आहे. यामध्ये सर्व जातींचे समान प्रतिनिधित्व असणे हे आशादायी असू शकते. पण डॉ. आंबेडकरांचे मूलगामी कार्य हे वंचित, शोषित समाजाला प्रतिनिधित्व देऊन त्यांच्यामध्ये आत्मसन्मान रुजवणे अशाच स्वरूपाचे आहे.

लेखक, विचारवंत सुधाकर शि. गायकवाड यांनी ‘आंबेडकरवाद : एक सैद्धान्तिक मांडणी’ या लेखात (‘आंबेडकरी विचारप्रणाली आणि परिवर्तन’ या पुस्तकात हा लेख आहे) ‘इव्होल्यूशनरी बायॉलॉजिझम’ आणि ‘इव्होल्यूशनरी फिलॉसॉफिझम’ या दोन मुख्य प्रवाहांच्या मध्ये विचार करताना आढळतात. त्यांना आंबेडकरवादाचा शोध बुद्धांच्या तत्त्वज्ञानापासून करायचा आहे व त्याप्रमाणे ते बुद्धांची ‘अनिच्च’ कल्पना आंबेडकर विचाराशी जुळविताना दिसतात. त्यांचे लक्ष हे बदल व बदलावर आधारित जग रचना याकडे जास्त आहे. ते बदल हे नैसर्गिक व विज्ञानाच्या नियमांशी संलग्न आहेत. म्हणून आंबेडकरवादाची प्रेरणा ही मानव व मानवी कल्याणरूपी दिसते. गायकवाड मन व स्वतंत्रता याला केंद्रस्थानी महत्त्व देतात.

मानवाची रचना ही सामाजिक असते. समाजामध्ये वावरणारे अनेक घटक – महिला, पुरुष, मुले, जनावरे, झाडे, पर्यावरण याला मानवी हात लागलेला आहे. त्यामुळे ते मानवरूपी मांडले आहे. जरी यापैकी एखादा अधोरेखित घटक हे निसर्गाच्या प्रक्रियेचे फलित (आउटपुट) असतील तरीही त्यांच्या मध्ये सामाजिक ऊर्जेचा हात आहे. त्यामुळे मानव बनण्याची प्रक्रियाही केवळ नैसर्गिक किंवा दैववादाप्रमाणे केवळ अलौकिक बाबींवर आधारलेली नसून त्यामध्ये जगण्याची नितांत इच्छा असणारी धडपड ही मानवाचे सूत्र ठरवते. आंबेडकरवादी   सिद्धान्तामध्ये आपल्याला मानवेतर घटकदेखील जगण्यासाठी धडपडताना दिसतात. मग आपल्यात आणि प्राणी – झाडे यामध्ये मूलभूत फरक कुठला? तो फरक तत्त्वज्ञानाच्या आजवरच्या इतिहास- प्रवासात  मधोमध असलेल्या प्रश्नांमध्ये आढळतो. तो म्हणजे जाणणे, जाणवणे व अनुभवणे. या त्रिकोणाच्या परिणामी येणाऱ्या ‘व्यक्तिनिष्ठ भाना’मुळे अर्थात ‘सब्जेक्टिव्ह कॉन्शसनेस’मुळे मानवप्राणी निराळा ठरतो.

मनाच्या तत्त्वज्ञानातून आविष्कृत झालेले हे व्यक्तिभान करुणेला जास्त महत्त्व देते. करुणा ही सर्वाना प्राप्त असते. तिचे संगोपन, वाढ, वृद्धी ही मात्र व्यक्तीआधारित असते. ज्यांचे अनुभव त्या त्या व्यवस्थेशी बांधलेले असतात तसा तसा करुणेचा आचर होतो. अनुभव हा व्यक्ती घडण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा साचा आहे. ज्यांना जसे अनुभव आले तसे त्याचे उत्तर आपल्याला त्यांच्या आचरणात दिसते. अनुभव हे खासगी अथवा सामाजिक असतात. अध्यात्मात अनुभवाची परिभाषा किंवा  मोजमाप नसेल, पण आचरण हा त्या अध्यात्माच्या परीक्षेचा उत्तम मार्ग आहे.

आंबेडकरवाद करुणा या कल्पनेला अध्यात्म व व्यवहार यांमध्ये एकजीव करून बांधते. तत्त्वज्ञान – थिअरी ते अभ्यास – आचरण असा जो प्रवास (प्रॅक्सिस) आहे तो आंबेडकरवाद तटस्थपणे करताना दिसतो. करुणा ही गोरगरीब, वंचितांमध्ये जास्त प्रगतिशील असल्याचे का पहायला मिळते? याचे उत्तर आपल्याला आंबेडकररूपी ‘पॉलिटिकल प्रॅक्सिस’मध्ये आढळते. विचार, विचारांची ताकद, त्यांची मर्यादा, नवे सूत्र, संपादित करून त्याला सामाजिक प्रयोगशाळेत अभ्यासून मग संगत आणि सहवासात कसे उतरवायचे याचे समतोल अध्ययन आंबेडकरवादात मिळते. त्यामुळे आंबेडकरवादाला फक्त एकसाची दृष्टिकोनात न बांधता तो आपल्यात असलेल्या गाठी व मनाच्या सखोलतेत पाहावयास मिळेल. अगदी थोडक्यात सांगायचे तर, आंबेडकरवाद ही सर्वामध्ये आढळणारी करुणा होय.

suraj.loksatta@gmail.com