न्यायाधीशांच्या नवलकथा

कुठल्याही न्यायाधीशांची मुलाखत घेण्यापूर्वी गॅडबॉइस यांनी प्रचंड पूर्वतयारी केली.

जॉर्ज गॅडबॉइस

न्याय, पर्या-विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र : अभिनव चंद्रचूड

जॉर्ज गॅडबॉइस (ज्यु.) या अमेरिकी विद्वानाने १९ सरन्यायाधीशांसह अनेकांच्या मुलाखती मिळवून ज्या प्रकारे टिपल्या त्या नवलकथांपेक्षा कमी नव्हेत! त्यांची कथा या वर्षीच्या चतु:सूत्रातील ‘न्याय’सूत्राच्या आजच्या या अखेरच्या लेखात…

जॉर्ज गॅडबॉइस ज्युनिअर नावाचे एक प्रसिद्ध अमेरिकी अभ्यासक १९८० च्या दशकात भारतात आले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील ६६ निवृत्त आणि कार्यरत न्यायाधीशांच्या (वा त्यांच्या नातेवाईकांच्या) मुलाखती घेतल्या. त्या गटातले १९ न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश होते. त्या अनेकानेक मुलाखतींत गॅडबॉइस यांना न्यायाधीशांनी थक्क करणाऱ्या गोष्टी सांगितल्या.

उदाहरणार्थ, न्यायमूर्ती एस. सी. रॉय यांची सर्वोच्च न्यायालयात नेमणूक होण्याच्या काहीच महिन्यांनंतर त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या पत्नीने गॅडबॉइस यांना सांगितले की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे बोलणे रॉय यांच्याशी झाले होते. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत झाल्यानंतर, रॉय यांना इंदिरा यांनी अलाहाबादमध्ये त्यांच्या एका कौटुंबिक मालमत्तेच्या संदर्भात काहीतरी कायदेविषयी काम करण्यासाठी सांगितले होते. मात्र, रॉय यांचे निधन झाल्यानंतर लगोलग काही लोक रॉय यांच्या घरी आले आणि त्या प्रकरणाचे सगळे दस्तऐवज घेऊन निघाले… हेतू हा की, इंदिरा यांनी रॉय यांना कसले काम सुपूर्द केले होते हे कोणाला कळू नये. सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांनी गॅडबॉइस यांना सांगितले की एक केंद्रीय कायदेमंत्री (जे स्वत: वरिष्ठ वकीलही होते), यांच्याशी त्यांचे पटत नसे. त्या कायदेमंत्र्यांनी एकदा सर्वोच्च न्यायालयापुढे असणाऱ्या एका प्रकरणात हृदयविकारची खोटी लक्षणे दर्शवून त्या प्रकरणाची सुनावणी तहकूब करून घेतले, मात्र त्यानंतर तात्काळ ते दिल्ली उच्च न्यायालयात जाऊन दुसऱ्या प्रकरणात बाजू लढवू लागले!  

कुठल्याही न्यायाधीशांची मुलाखत घेण्यापूर्वी गॅडबॉइस यांनी प्रचंड पूर्वतयारी केली. त्या न्यायाधीशांबद्दल जे काही वाचणे शक्य होते ते त्यांनी वाचून घेतले. यामुळे मुलाखत घेताना त्यांना अशी माहिती मिळाली, जी सामान्य माणसाला मिळू शकली नसती. उदाहरणार्थ, सरन्यायाधीश यशवंतराव (वाय. व्ही.) चंद्रचूड यांनी गॅडबॉइस यांना सांगितले की, १९८० च्या दशकात चंद्रचूड यांनी मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एम एन चांदुरकर यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात करण्यासाठी शिफारस केली होती. मात्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांची नियुक्ती फेटाळली; कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक एम. एस. गोळवलकर (गुरुजी) यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी न्या. चांदुरकर हे उपस्थित राहिले होते आणि त्यांनी गोळवलकर यांचे कौतुक केले होते. वास्तविक, गोळवलकर हे एकेकाळी न्या. चांदुरकर यांच्या वडिलांचे मित्र, त्या नात्याने ते अंत्यविधीस गेले होते. सरन्यायाधीश आर. एस. पाठक यांनी गॅडबॉइस यांना सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. पी. एस. चावला यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात करण्यास अन्य एका न्यायमूर्तींनी कसून विरोध केला होता; कारण न्या. चावला हे या न्यायमूर्तींचे शेजारी, आणि न्या. चावला यांनी त्या न्यायमूर्तींच्या पाळीव कुत्र्याला गोळी मारण्याची धमकी दिली होती!

गॅडबॉइस हे अमेरिकेच्या केंटकी विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक होते. न्यायाधीशांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती प्रत्येकी किमान ४५ मिनिटे ते काही तासांपर्यंत चालल्या. काहींशी ते एकापेक्षा जास्त वेळा बोलले. प्रत्येक मुलाखतीनंतर गॅडबॉइस हे निवासस्थानी जाऊन न्यायाधीशांनी त्यांना दिलेला तपशील काटेकोरपणे लिहून ठेवायचे. मुलाखतीत झालेल्या बारीकसारीक गोष्टींची नोंदही गॅडबॉइस करायचे. उदाहरणार्थ, अशाच एका टिपणात गॅडबॉइस यांनी लिहिले आहे की, न्या. नटराजन हे खूप अगत्यशील असायचे आणि त्यांनी गॅडबॉइस यांना पिण्यासाठी कलिंगडचा रस दिला होता. त्यांनी असेही गमतीने लिहिले आहे की, न्या. सरकारिया हे इंग्रजीत वकील म्हणताना ‘लॉयर’ या शब्दाचा उच्चार निव्वळ उच्चारचुकीमुळे ‘लायर’ (खोटे बोलणारा) असा करायचे. गॅडबॉइस हेही नोंदवतात की, न्या. व्यंकटचलय्या यांच्या टेबलावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे दोन सुप्रसिद्ध न्यायाधीश- बेंजामिन कार्दोझो आणि ओलीवर वेन्डेल होम्स, यांचे चित्र असायचे आणि व्यंकटचलय्या हे त्या न्यायाधीशांची जणू पूजाच करायचे.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे इतके सगळे न्यायाधीश गॅडबॉइस यांना मुलाखत देण्यासाठी तयार का झाले? यामागची कारणे अनेक होती, असे गॅडबॉइस यांच्या नोंदींतूनही लक्षात येते. अर्थातच, गॅडबॉइस यांचे नाव त्या काळात अभ्यासू म्हणून गाजलेले होते. ‘इंडियन लॉ रिव्ह्यू’ , ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’, लॉ अ‍ॅण्ड सोसायटी रिव्ह्यू’ यांसारख्या प्रख्यात नियतकालिकेत गॅडबॉइस यांचे लेख प्रसिद्ध झाले होते आणि अनेक न्यायाधीशांनी ते वाचलेही होते. यासंदर्भात एक रोचक कहाणी आहे. गॅडबॉइस यांना न्या. तुळजापूरकर यांची मुलाखत घ्यायची होती. मात्र गॅडबॉइस न्या. तुळजापूरकर यांच्या कार्यालयात (चेम्बरमध्ये) मध्ये गेले तेव्हा तुळजापूरकरांनी गॅडबॉइस यांना, ‘मुलाखत देणार नाही’ असे स्पष्टच सांगून त्यांना परत जायला सांगितले. त्या काळात न्या. तुळजापूरकर हे एकंदरच अभ्यासक लोकांकडे जरा साशंकतेने पाहात; कारण प्राध्यापक उपेंद्र बक्षी यांनी न्या. तुळजापूरकर यांच्या काही व्याख्यानांवर टीकास्त्र सोडणारा एक जंगी लेख त्या काळी लिहिला होता. तरीही एप्रिल १९८३ मध्ये गॅडबॉइस यांनी तुळजापूरकर यांना एक पत्र लिहिले, ज्यात त्यांनी परत एकदा तुळजापूरकर यांना मुलाखत देण्याची विनंती केली. न्या. तुळजापूरकर उलटटपाली ‘क्षमस्व’ म्हणाले, मात्र गॅडबॉइस यांची विनंती त्यांनी पुन्हा एकदा नाकारली, परंतु त्यानंतर न्या. ग्रोव्हर आणि न्या. वेंकटरमय्या या दोघांनी मिळून गॅडबॉइस यांच्या वतीने न्या. तुळजापूरकर यांच्याकडे रदबदली केली आणि अंतिमत: न्या. तुळजापूरकर हे गॅडबॉइस यांना मुलाखत देण्यासाठी तयार झाले. जुलै १९८३ मध्ये न्या. तुळजापूरकर यांची दोन तासांची एक उत्कृष्ट मुलाखत गॅडबॉइस यांनी घेतली.

मात्र काही न्यायाधीशांना असेही वाटले असेल की, या विख्यात अमेरिकी प्राध्यापकाची ओळख करून घेतलेली बरी! साहजिकच, त्या काळात अंतरजाल नव्हते आणि अमेरिकेच्या न्यायिक प्रकरणांचा अभ्यास करणे हे (तिथली निकालपत्रे इथे मिळतच नसल्याने) खूप अवघड असायचे. या पार्श्वभूमीवर काही न्यायाधीशांनी गॅडबॉइस यांच्याकडून अमेरिकेच्या एखाद्या न्यायालयाच्या निकालपत्राची प्रत वा तिथल्या एखाद्या अध्यक्षाने लिहिलेल्या पुस्तकाची प्रत मागून घेतली. उदाहरणार्थ, न्या. बहारुल इस्लाम यांनी जेम्स ए. गारफील्ड या भूतपूर्व (मार्च ते सप्टेंबर १८८१ मधील) अमेरिकी राष्ट्राध्यक्षांविषयीच्या ‘फ्रॉम लॉग केबिन टू व्हाइट हाउस’, या चरित्राची प्रत गॅडबॉइस यांच्याकडून मागून घेतली. गॅडबॉइस यांनी न्या. इस्लाम यांना सांगितले की ते त्या पुस्तकाची प्रत भारतातील ‘अमेरिकन सेंटर’मार्फत मिळवण्याचे प्रयत्न करतील वा केंटकीला परत जाऊन त्या पुस्तकाची छायाप्रत करून त्यांना पाठवतील. काही न्यायाधीशांची मुले अमेरिकेत राहायला गेली होती आणि त्या न्यायाधीशांना कदाचित वाटले असेल की केंटकी विद्यापीठ त्यांना अमेरिकेत व्याख्यान देण्यासाठी बोलावेल आणि त्यांना त्यानिमित्ताने आपल्या मुलांना भेटण्याची संधी मिळेल.

तर काही न्यायाधीशांना आपल्या मुलांना अमेरिकेत धाडण्यासाठी मदत गॅडबॉइस यांच्याकडून पाहिजे होती. उदा. – न्या. एम. एन. दत्त यांचा सुपुत्र त्या वेळी कोलकात्यात कायद्याचा अभ्यास करीत होता आणि न्या. दत्त यांनी गॅडबॉइस यांना विचारले की, त्यांच्या सुपुत्राला जर अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण घ्यायचे असेल तर त्याला काय करावे लागेल. न्या. विवियन बोस यांच्यासारखे काही न्यायाधीशही होते ज्यांची रुची गॅडबॉइस यांच्या संशोधनात होती. ‘तुम्ही न्यायाधीशांची जी यादी तयार करीत आहात; त्याच्या ५० प्रती मला तुम्ही बनवून द्याल का? त्याचा जो काही खर्च असेल तो मी करण्यास तयार आहे’, असे बोस यांनी गॅडबॉइस यांना एका पत्रात लिहिले आहे.

पी. बी. गजेंद्रगडकर आणि एम हिदायतुल्ला यांसारख्या विख्यात न्यायाधीशांनी आपल्या आत्मचरित्रात गॅडबॉइस यांचा उल्लेख केला आहे. न्या. आर बी मिश्रा यांनी तर गॅडबॉइस यांना आपल्या मुलाखतीत सांगितले की, गॅडबॉइस यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल त्यांच्यापेक्षाही (न्या. मिश्रा यांच्यापेक्षा) जास्त माहीत होते.

प्रत्येक मुलाखतीचे टिपण, स्वत:च्या टिप्पण्यांसह गॅडबॉइस यांनी नंतर टाइपरायटरवर लिहून काढत. टाइपरायटरवर लिहिलेली ही टिपणे आजही गॅडबॉइस आणि त्या काळाचे स्मरण करून देतात. फेब्रुवारी २०१७ मध्ये, वयाच्या ८० व्या वर्षी दुर्धर आजाराने गॅडबॉइस यांची प्राणज्योत मालवली.

 निधनापूर्वी प्रस्तुत लेखकाला गॅडबॉइस यांनी, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी झालेल्या मुलाखतींची ही टिपणे सुपूर्द केली. प्रस्तुत लेखकाचे ‘सुप्रीम व्हिस्पर्स’ हे पुस्तक याच टिपणांवर आधारित आहे.

लेखक मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्ता असून,  कायद्याचे साक्षेपी अभ्यासक आहेत.

abhinav.chandrachud@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतु:सूत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: George gadbois jr a well known american scholar akp

Next Story
माघारीचे मर्म
फोटो गॅलरी