श्रद्धा कुंभोजकर – इतिहास  राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

.. गतकाळातल्या अन्याय, विषमता, अंधानुकरण यांचं ओझं नको हे खरं; पण अन्याय झाला होता म्हणून एखाद्या कालखंडाचा इतिहासच खोडून टाकू पाहणारे किंवा त्याबरोबर न्याय होता हेही नाकारणारे नेमकं काय करत असतात? ‘इतिहासा’च्या नावाखाली गतवास्तवाचं हनन म्हणजे हिंसाच नाही का?

2nd March Panchang Shani Krupa In Abhijat Muhurta These Rashi among Mesh to meen Will Get Benefits Of Massive Income Horoscope Today
२ मार्च पंचांग: शनी कृपेने अभिजात मुहूर्तात ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचे योग; मेष ते मीन, कोण आहे नशीबवान?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
loksatta chatura Relationships Are You an Alpha Woman
नातेसंबंध: तुम्ही आहात का ‘अल्फा वूमन’ ?

डॉ. विश्राम रामजी घोले हे एकोणिसाव्या शतकातले सुप्रसिद्ध समाजसुधारक आणि सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष होते. अविद्य्ोने होणारे अनर्थ दूर करावे या विचारांनुसार त्यांनी आपल्या काशीबाई नावाच्या लहान मुलीला शाळेत घातलं होतं. पण स्त्रियांचं शिक्षण हे समाजविघातक आहे अशी खात्री असणाऱ्या काही लोकांना हे पाहवलं नाही. त्यांनी अजाण काशीबाईला काचा कुटून खायला घातल्या आणि तिचा जीव घेतला. या आघातानं कोसळून न जाता, आपल्या दुसऱ्या मुलीचं शिक्षण पूर्ण करतानाच काशीबाईची आठवण राहावी म्हणून डॉक्टर घोल्यांनी एक हौद बांधला आणि त्यावर छोटय़ा मुलीचा पुतळा उभारला. हा ‘बाहुलीचा हौद’ आज स्थलांतरित स्वरूपात पुण्यातल्या फरासखाना चौकीजवळ आहे.

इतिहासाच्या नजरेतून या हौदाकडे कसं पाहावं असा प्रश्न पडतो. कुणी म्हणेल की अशा अन्याय्य आणि अत्याचारी गोष्टींचा आठव जपण्याची मुळीच गरज नाही. ते सगळं विसरायला हवं. दुसरा म्हणेल की आपण समाज म्हणून कसे होतो आणि कसे नसायला पाहिजे हे लक्षात राहावं म्हणून तर आपण या हौदाची आठवण ठेवायलाच हवी. आणखी एखादी म्हणू शकेल की इतिहास हे माणसांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. तर माणसांनी वेगवेगळी आव्हानं पेलून कसे मार्ग काढले याची प्रेरक गोष्ट इतिहासाने सांगितली पाहिजे. त्यामुळे अज्ञानात आनंद मानणाऱ्या झुंडीनं त्या चिमुकल्या मुलीचा बळी घेतला याची हतबुद्ध करणारी आठवण ठेवण्यापेक्षा तिच्या वडिलांनी उमेद न गमावता इतर शाळकरी मुलामुलींना निर्भयपणे पाणी पिता यावं याची सोय केली याची स्मृती जगवायला हवी.

गतकाळाचे कवडसे शोधताना प्रतिगामी विचार करणाऱ्या झुंडी या सदासर्वदा अशा क्रूर वेशातच समोर येतात असं नाही. चार घटका मौज करणाऱ्या फार्सवजा नाटिकांमधूनही हे क्रौर्य खेळकरपणे डोकावतं. काशीबाईच्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी प्रकाशित झालेल्या ‘संगीत एज्युकेटेड छबकडी’ या नावाच्या ‘हास्यकारक आणि मनोरंजक’ म्हणवणाऱ्या पुस्तकातही मुलींना शिकवणाऱ्यांना सावध करण्याच्या मिषाने धमकावलेले दिसते.-  ‘‘फजितिचा कळस जहाला । दाखवुं कैसें मुख हें जगताला ॥  काळें लावियलें पोरटिनें उभय कुळां ।  शिक्षण तिजलागी दिधलें । म्हणूनियां फळ आलें ।..या पुढती, करि विनती, सावध व्हा, अनुभविला॥ ’’

या पार्श्वभूमीवर असा प्रश्न पडतो की आपल्याला जे अन्याय्य, हिंसक, हीन अभिरुचीचं वाटतं, ते इतिहास लिहिताना नजरेआड करावं का? जगाच्या इतिहासातले काही दाखले याबाबतीत दिशा दाखवू शकतात. दुसऱ्या महायुद्धात ज्यूधर्मीयांचा जो नरसंहार केला गेला, त्याची स्मारकं युरोपात जागोजागी आहेत. हॉलंडमधल्या ग्रोनिंगेनसारख्या छोटय़ा गावाच्या गावठाण भागात शब्दश: पावलोपावली ही स्मारकं दिसतात. अमुक नावाचा माणूस किंवा बाई या घरात राहात असे आणि त्यांना वयाच्या इतकाव्या वर्षी आउश्विट्झ किंवा रिगा किंवा तशाच कुठल्या छळछावणीत पाठवलं आणि ती किंवा तो मृत्यू पावला अशी छोटी स्मारकशिला चालता चालता फरसबंदीवर उठून दिसते, आणि पाऊल अडखळतं. आंतोन द बात्स या मानवी हक्क आणि इतिहास विषयाच्या प्राध्यापकमित्रानं सांगितलं की शतकानुशतकं आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतीप्रिय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या देशानं अशा दाहक स्मृती जपाव्यात की नाही यावर बरीच चर्चा झाली. शेवटी असं ठरलं की आज आपला देश कितीही प्रगत असला तरी कधीकाळी अलगदपणे हिंस्र विचारांच्या वावटळीत सापडला होता, याची आठवण ठेवणंच योग्य राहील. म्हणजे पुढच्या पिढय़ांना ती व्रणासारखी खूण शांततेच्या मार्गावर राहायला मदत करेल. या सगळ्यातून इतिहासाचं हे एक महत्त्वाचं सूत्र लक्षात येतं की आपल्या हाती आलेले पुरावे आपल्याला शरिमदा करतील, आवडणार नाहीत, रूढ समजुतीच्या विरुद्ध जातील, तरी आपल्याला त्यांचा क्षमाशीलपणे स्वीकार करावा लागतो.

तुकारामांनी वेगळ्या संदर्भात म्हटलं आहे, ‘‘आम्हांसी आपुले नावडे संचित।’’ आपल्या पाठीवर जे गतकाळाचं गाठोडं जमा झालेलं असतं, ते आपल्याला आवडत नसेल तर आपण तुकारामांसारखं तसं स्पष्टपणे सांगू शकतो. अन्याय, विषमता, अंधानुकरण अशा अनेक नकोशा गोष्टी घडल्या असतील तरी त्या हिंसेचे दस्तऐवज पुराव्यानिशी मांडायचे, पण तिथेच न घुटमळता आपल्या हाती असणारा जो वर्तमानकाळ आहे, त्यावर न्याय, समता, स्वातंत्र्य यांची रचना करणं हे तर आपल्याच हातात असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादं वंशपरंपरागत वतनच पुढं चालवलं असतं, तर त्यांना कुणी दोष दिला नसता. पण या संचिताला त्यांनी नकार दिला कारण त्यांना रयतेच्या भल्याची आस होती. ‘मुद्रा भद्राय राजते’ म्हणजे ‘लोकांचं भलं व्हावं यासाठी ही सत्ता राज्य करते’ या जाणिवेनं त्यांनी स्वराज्य निर्माण केलं.

मात्र हिंसेचे दस्तऐवज पाहतानाच दस्तऐवजांनी केलेल्या हिंसेचंही भान ठेवणं गरजेचं आहे. कागदांच्या चिठोऱ्यांच्या भरवशानं आपण एकेका व्यक्तीला, घटनेला, धर्माला, काळाला लेबल डकवून मोकळे होतो, हे त्यांच्या वास्तवाचं हनन म्हणजे हिंसाच आहे. अशा सोयीस्कर लेबलांमुळे माणूस कसाही वागला तरी त्याला त्याच्या मानीव प्रतिमेबाहेर जागाच दिली जात नाही. त्यामुळे ‘दफ्तरखाने म्हणजे आत्यंतिक हिंसेची ठिकाणं असतात’ हे मिशेल फूकोचं म्हणणं पटतं.

उदाहरण पाहायचं तर मुघल प्रशासन म्हणजे अन्याय्य राजवट असल्याची प्रतिमा अनेकविध दस्तऐवजांतून उभी केली जाते. या संदर्भात एका खटल्याचं उदाहरण उद्बोधक आहे. एका शैव माणसाचं घर एका मुस्लीम माणसानं भाडय़ानं घेतलं आणि नंतर ते बळकावलं. एका मौलवींसमोर खटला आला. ते दुसऱ्या दिवशी या घराबाहेर थोडय़ा दूर उभे राहिले. काही काळानं घरातून काम आवरून बाहेर पडलेल्या दासीला त्यांनी विचारलं, हे घर कुणाचं आहे? तिनं मूळ मालकाचं नाव सांगून सध्याच्या भाडेकरूचंही नाव सांगितलं. खटल्याचा निर्णय अर्थातच मूळ मालकाच्या बाजूनं लागला. यात रूढ प्रतिमेच्या विरुद्ध गोष्टी अशा – एका स्त्रीची साक्ष घेतली आणि ग्रा धरली गेली. आणि न्यायाधीशाचा आणि भाडेकरूचा धर्म एकच असतानाही दुसऱ्या धर्मीय माणसाच्या न्याय्य बाजूने निर्णय लागला. पण आपण जोवर घिसेपिटे कागदी दाखले नाकारून नवे पुरावे शोधत नाही तोवर मुघलकाळाचं आपलं आकलन अपुरंच राहतं.

दुसरं समकालीन इतिहासातलं उदाहरण घ्यायचं तर २०१२ मध्ये मेघालयात ‘नॉर्थ ईस्ट स्लो फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रोबायोडायव्हर्सिटि सोसायटी’ची स्थापना झाली. गावोगावच्या शेतकऱ्यांनी आणि खवय्यांनी एकत्रितपणे हे काम हाती घेतलं होतं. शाश्वत विकासाला हातभार लावेल अशा पद्धतीनं पिकं घ्यायची, आपापल्या संस्कृतीनुसार सवडीनं स्वयंपाक करायचा आणि त्याचा सावकाशपणे चारचौघांसोबत आस्वाद घ्यायचा असं या सोसायटीचं उद्दिष्ट होतं. केवळ तीन वर्षांत या समुदायानं जगप्रसिद्ध अशा टेरा माद्रे म्हणजे भूमिमाता महोत्सवाचं यजमानपद भारतात प्रथमच शिलाँग भवतालच्या ४१ गावांच्या मदतीनं भूषविलं. तिथेच न थांबता आजतागायत तिथे ‘माय राम्यू’ म्हणजे खासी भाषेत भूमिमाता महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. ईशान्येकडच्या राज्यांबाबत जी मानीव प्रतिमा निर्माण केली गेली आहे, तिच्याशी अशा सर्जक आणि शांततामय घडामोडी अजिबातच मेळ खात नाहीत. परिणामी सन्माननीय अपवाद वगळता कोणत्याच दस्तऐवजांत त्यांचं वर्णन मिळत नाही. कालांतरानं कुणी ईशान्येचा इतिहास लिहायचा म्हटला तर या भूमिमाता महोत्सवासारख्या रचनात्मक गोष्टी त्यात दिसणारच नाहीत. दस्तऐवजांत अनुल्लेख करूनदेखील तथ्यांचा गळा घोटला जातो तो असा.

एकूण काय, तर आपल्याला मिळालेला गतकाळाचा वारसा आपल्याला आवडला नाही, पटला नाही, सवयीच्या प्रतिमेशी जुळला नाही, तरी इतिहास लिहिताना आणि अभ्यासतानाही आपलं संचित नजरेआड न करता ते स्वीकारून मग त्याचा अन्वयार्थ लावणं इष्ट ठरतं असं वाटतं.

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त इतिहासाचे अध्यापन करतात.

ईमेल : shraddhakumbhojkar@gmail.com

याआधीच्या लेखात ( ३० जानेवारी) बेबी कांबळे यांचं आत्मकथन पुस्तकरूपानं सर्वप्रथम प्रकाशित झाल्याचा उल्लेख आला होता. ज्येष्ठ अभ्यासक प्रा. मनोहर जाधव यांनी त्याही आधी लेखांच्या स्वरूपात कुमुद पावडे यांचं आत्मकथन प्रकाशित झाल्याचं लक्षात आणून दिलं याबद्दल त्यांना धन्यवाद.         – लेखिका