प्रियदर्शिनी कर्वे (पर्यावरण-विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, न्याय)

दीर्घ लॉकडाऊनकाळादरम्यान काही जणांची जी काही पर्यावरण-जाणीव जागी झाली, त्यातून माणूस हाच पृथ्वीला डसलेला विषाणू.. महासाथ ही शिक्षायासारखी विधानेदेखील होऊ लागली! या असल्या सांकेतिकतेच्या पुढे जाऊन  विचार कसा करायचा, याविषयीचे हे सूत्र पर्यावरण-विज्ञानाचे..

भारतातील शहरी उच्च मध्यमवर्गीयांना २०२० या वर्षांने  दोन अदृश्य शक्तींची जाणीव करून दिली. एक शक्ती म्हणजे शहरी श्रमिकांची ताकद. या ताकदीच्या आधारावरच आपले घरातील आणि घराबाहेरील दैनंदिन जीवन सुरळीत चालू आहे, याची या सर्वाना टाळेबंदीच्या काळात अचानक जाणीव झाली. या जाणिवेचे एक दृश्य प्रतिबिंब जाहिरातींमध्ये उमटले- आपल्या नोकरांशी अत्यंत ममत्वाने वागणारे मालक आणि त्यांच्या मेहरबानीमुळे आनंदित झालेले श्रमिक, अशा स्वरूपाचे चित्रण हल्ली काही उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये दिसते. या जाहिरातींचा अपेक्षित प्रेक्षक हा अर्थातच श्रमिक नाही, तर आर्थिक मंदीच्या काळातही खिशात बऱ्यापैकी पैसा बाळगून असलेला त्यांचा मालक आहे. शहरांत-महानगरांत वेगवेगळ्या आर्थिक स्तरांमध्ये जगणाऱ्या माणसांमधील नातेसंबंध या पराकोटीच्या सुलभीकरणापेक्षा किती तरी अधिक गुंतागुंतीचे आहेत. या साऱ्याची चिकित्सा समाजवैज्ञानिक करतीलच; तो काही माझा विषय नव्हे. पण शहरी उच्च मध्यमवर्गीयांना जो दुसरा साक्षात्कार झाला आहे, तो मात्र माझ्यासाठी चिंतनाचा विषय आहे.

लॉकडाऊनच्या काही आठवडय़ांमध्ये एकाएकी आपल्या घरांभोवती लोकांना विविध पक्षी, प्राणी, कीटक, इ. दिसू लागले, हवेतील प्रदूषण कमी झालेले जाणवले आणि नद्या आणि तलावांचे पाणीही अधिक नितळ झालेले दिसले. काही काळ टाळेबंदी जगभरात जवळजवळ सर्वत्रच होती. या काळात जागतिक पातळीवर वातावरण बदलाला कारणीभूत ठरणाऱ्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन काही अंशी कमी झाले असल्याची वैज्ञानिकांची वक्तव्ये प्रसारमाध्यमांनी ठळकपणे सर्वांपर्यंत पोहोचवली. या साऱ्याचाही भारतातील शहरी उच्च मध्यमवर्गीयांवर प्रभाव पडलेला आहे. आपल्या सामाजिक नातेसंबंधांबरोबरच आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाशी असलेल्या नातेसंबंधांची जाणीवही यामुळे जागी झाली आहे. पर्यावरण, जागतिक वातावरण बदल, इ. विषयांबद्दल उत्सुकता वाढली आहे, पर्यावरण रक्षणासाठी आम्ही काय करू शकतो आणि काय करायला हवे, असे प्रश्न लोक आपणहून विचारू लागले आहेत. हे सारे एका दृष्टीने उत्साहवर्धक असले, तरी या उत्साहाचा वरचा पापुद्रा खरवडला तर फारसे काही हाती लागत नाही.

पृथ्वीचा भूगोल आणि पृथ्वीचे वातावरण हे आजच्या स्थितीला येण्यासाठी जवळपास साडेचार अब्ज वर्षे लागली आहेत. आपल्या सौरमालेतील एकमेवाद्वितीय घटना म्हणजे पृथ्वीवर जीवसृष्टीची आणि त्यातूनच माणसाची उत्पत्ती आणि उत्क्रांती. जीवसृष्टीही आजच्या स्वरूपात येण्यासाठी सुमारे चार अब्ज वर्षांपासूनच्या घडामोडी कारणीभूत आहेत. होमो सेपियन ही आपली प्रजाती गेली किमान दोन लाख वर्षे पृथ्वीवर वावरत असावी, असे आज उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून दिसते. आपण ज्याला पर्यावरण म्हणतो, त्याचा आपण एक घटक आहोत आणि तरीही त्याच्यापेक्षा वेगळेही आहोत. आपली प्रजाती आणि आपली पृथ्वी यांचे नाते खूप जुने आणि जटिल आहे. पण जाहिरातदारांनी जसे शहरी सधन लोकांना नव्याने जाणवलेल्या सामाजिक नातेसंबंधांचे सुलभीकरण केले आहे; तसेच काहीसे सध्या आर्थिकच नाही तर राजकीयदृष्टय़ाही ताकदवान असलेल्या याच समाजगटाच्या नव्याने जाग्या झालेल्या पर्यावरणविषयक जाणिवांचेही अति सुलभीकरण केले जात आहे.

अर्धवट ज्ञान हे अज्ञानापेक्षा घातक असते. स्वत:ला फार तोशीस पडू न देता चुटकीसरशी जगाचे तारणहार बनण्याचे पर्याय या नवजागृत वर्गाला हवे आहेत. परिणामत: सांकेतिक कृतींचे पेव फुटले आहे. ज्यांची रोजीरोटीच पर्यावरणाच्या ऱ्हासावर अवलंबून आहे अशांनी घरात टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनवलेली चार झुंबरे टांगली तर त्यातून फारसे काही साध्य होणार नसते. पण पर्यावरणाविषयी नव्याने जन्मलेला हा जिव्हाळा नुसता बेगडीच नाही, तर असंवेदनशीलही आहे, ही अधिक चिंतेची बाब आहे.

‘माणूस’ हा पृथ्वीला डसलेला विषाणू आहे, कोविड १९ महामारी ही निसर्गाने क्रूरकर्मा ‘माणसा’ला दिलेली एक रास्त शिक्षा आहे, ही व अशा आशयाची वक्तव्ये गेल्या वर्षभरात अनेकांनी केली. यात काही पर्यावरणप्रेमी म्हणून बऱ्यापैकी नावलौकिक असलेले लोकही होते. माझा या साऱ्यांना एकच प्रश्न आहे- ‘माणूस’ म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुढे नेमके काय चित्र उभे राहाते? माणूस ही एकजिनसी प्रजाती आहे का?

जगातील सर्वात गरीब देशात झोपडीत राहाणारी आणि आपल्या चालण्याच्या आवाक्यात असलेल्या संसाधनांवर आपली आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवणारी आदिवासी महिला ते जगातील सर्वात संपन्न शहरात अवाढव्य घरात राहाणारा अनेक उद्योगधंद्यांचा अब्जाधीश मालक या दोन टोकांमध्ये जगातील सुमारे आठ अब्ज माणसे पसरलेली आहेत. ही झाली केवळ आर्थिक-सामाजिक विविधता. याशिवाय माणसामाणसांमध्ये सांस्कृतिक विविधताही आहेच.

या महामारीच्या काळात शहरांमधील दाटीवाटीच्या वस्त्यांमधल्या लहान घरांमध्ये राहाणाऱ्यांमध्ये आजाराचा प्रसार किती तरी जास्त प्रमाणात झाला. महामारीच्या नियंत्रणासाठी केलेल्या टाळेबंदीचा परिपाक म्हणून हातावर पोट असलेले लाखो लोक देशोधडीला लागले. याच्या उलट घरात बसून काम करू शकणाऱ्यांच्या पगाराचा ओघ चालूच राहिला. त्यांना समाजमाध्यमांत पर्यावरणावरच्या प्रेमाने थबथबलेल्या संदेशांवर आभासी हृदये, मुके आणि अंगठे यांची उधळण करण्याची उसंतही मिळाली. अर्थात देशोधडीला लागू शकले असते असे अनेक थोडी जिगर, थोडे चातुर्य आणि थोडी नशिबाची साथ यांच्या जोरावर तग धरून राहिले आणि आपल्या घरात आरामात राहू शकले असते अशा अनेकांनी रस्त्यावर उतरून पीडितांना मदतीचा हातही दिला. पण ही उदाहरणे अपवादात्मकच. मग निसर्गाला डसलेला हा ‘विषाणू माणूस’ नेमका कोण आणि शिक्षा नेमकी कोणाला मिळाली आहे? नैसर्गिक संसाधनांचा वाजवीपेक्षा जादा वाटा उचलणाऱ्यांनी आपल्या सुरक्षित कोषांमध्ये बसून वंचितांच्या वेदनांना, ‘‘बरी शिक्षा मिळाली’’- हे म्हणण्यातला विरोधाभास आणि असंवेदनशीलता आपल्याला जाणवत नाही का?

याच अनुषंगाने, २०२० मध्ये विज्ञानजगतात घडलेल्या एका ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख उचित ठरेल.

पृथ्वीच्या जन्मापासून तिच्यात झालेली स्थित्यंतरे समजून घेण्यासाठी भूगर्भ वैज्ञानिकांनी तिच्या आजवरच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. साधारण साडेअकरा हजार वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपल्यापासून पृथ्वीवरील हवामानाचे चक्र बऱ्यापैकी स्थिर राहिले आहे. या कालखंडाला होलोसिन कालखंड असे म्हटले जाते. स्थिर हवामानामुळे काही मानव समूहांनी भटकंतीचे जीवन सोडून शेती करायला सुरुवात केली, त्यातून विविध मानवी संस्कृती उभ्या राहिल्या. यातूनच आज बहुपेडी पण तरीही एकजिनसी अशी जागतिक पातळीवरील सामाजिक- आर्थिक- राजकीय व्यवस्था उदयाला आली आहे.

गेली काही दशके मात्र पृथ्वीचे वातावरण आपल्याला अनुकूल असलेल्या संतुलनापासून दूर जाते आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढ झाली आहे आणि हवामानाचे चक्र अस्थिर झाले आहे. याला मुख्यत: जागतिकीकरणाचा औद्योगिक रेटा आणि त्यामुळे वाढत असलेला खनिज ऊर्जेचा वापर कारणीभूत आहे. पृथ्वीचे वातावरण तर बदलते आहेच, पण आपल्या शेती, बांधकामे आणि खाणकामांमुळे जमिनीवरची व खालची भूशास्त्रीय रचनाही बदलते आहे. परिणामत: जीवसृष्टीचा नैसर्गिक समतोल ढासळला आहे आणि अनेक प्रजाती नामशेष होत आहेत. आपल्या प्रजातीचे अस्तित्वही यामुळे धोक्यात आहे.

‘होलोसिन कालखंड आता संपला असून पृथ्वीवरील परिस्थिती मानवाच्या प्रभावामुळे बदलत असण्याचा अँथ्रोपोसिन कालखंड सुरू झाला आहे,’ असा विचार विसाव्या शतकाच्या अखेरीस मांडला गेला होता. अधिकृतरीत्या असा कालखंड मानावा का हे ठरवण्यासाठी नेमलेल्या भूगर्भ वैज्ञानिकांच्या समितीने मागील वर्षी आपला निर्णय निश्चित केला. कदाचित २०२१ साली याबाबत अधिकृत घोषणा होईल.

ही केवळ वैज्ञानिक उत्सुकतेची बाब नाही, इतर क्षेत्रांमध्येही या निर्णयाचे पडसाद उमटत आहेत. व्यवहारात अँथ्रोपोसिनची संकल्पना स्वीकारताना, जगाच्या पाठीवर विखुरलेल्या वेगवेगळ्या मानव समूहांचा पृथ्वीवर पडणाऱ्या मानवी प्रभावातला वाटा सारखा नाही, याचा विसर पडता कामा नये. विविध अंगांनी केलेले अभ्यासही पृथ्वीच्या पर्यावरणीय संतुलनावरील आघातांसाठी जगभरातील कालच्या आणि आजच्या श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीयांना अधिक जबाबदार धरतात. मानवी अस्तित्वासाठी अनुकूल पर्यावरणीय परिस्थिती टिकवून धरण्यासाठी आपल्या सर्व आर्थिक, सामाजिक, राजकीय धारणांची पुनर्बाधणी करायला लागणार आहे. भारतातील शहरी उच्च मध्यमवर्गीयांमध्ये कोविड १९ महामारीने जागवलेली पर्यावरणविषयक जाणीव सांकेतिकतेमधून बाहेर पडून या दिशेने वळेल का?

लेखिका पर्यावरणनिष्ठ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असून ‘समुचित एन्व्हायरो-टेक’च्या संस्थापक आहेत.

 ईमेल : pkarve@samuchit.com