श्रद्धा कुंभोजकर

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

इतिहास  राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

जगण्याच्या कोणत्या नोंदी कोणत्या तात्पर्यासह वाचकांपर्यंत पोहोचवायच्या याच्या किल्ल्या सांस्कृतिक सत्ता हाती असणाऱ्या धुरीणांकडे असतात असे म्हणता येईल; पण आपण त्याच नोंदींमध्ये वाहत जावे की इतरत्रही पाहावे, हे आपण ठरवू शकतो..

गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी आणि त्यांचं तात्पर्य इतरांना सांगण्याच्या निकडीनं माणसं अनेक वाटा चोखाळतात. साहित्य, संगीत कला यांसारखीच इतिहासकथन ही त्यातली एक वाट आहे. पण कोणत्या गोष्टीकडे नजरा खेचून घ्यायच्या आणि कोणती कथनं चूपचाप सतरंजीखाली ढकलायची याचं एक राजकारण असतं. मोर आणि बदकांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याची संधी मिळते तेव्हा अनारोग्य आणि अर्थसंकट हे उपेक्षेच्या अंधारात अंग चोरून उभे असतात यात नवल नाही. दुसरीकडे कोणत्या गोष्टी ऐकून घ्यायच्या आणि कोणाच्या सांगण्याकडे काणाडोळा करायचा याचंही एक सांस्कृतिक राजकारण असतं. अशा वेळी वेगवेगळ्या घटकांनी इतिहास घडवताना दिलेलं योगदान नोंदवणं हा, सत्याचा अपलाप होऊ नये यासाठीच्या लढाईचा एक भाग असतो.

उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भल्याभल्या बुद्धिवंतांनी सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीच्या विचारांना मर्यादित मांडणीमध्ये जखडल्याचं लक्षात येतं. ‘या दोनही चळवळी ठरावीक जातींच्या कुंपणात काम करत होत्या आणि महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर या चळवळी हतप्रभ झाल्या’ अशा धाटणीची मांडणी काही जण करतात. या दोन्ही नेत्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या नोंदी तपासल्या तर स्पष्ट होतं की विशिष्ट वैचारिक पायावर या चळवळी उभ्या केलेल्या असल्यामुळे त्यांतील विविध जातीधर्माच्या कार्यकर्त्यांनी संस्थापक नेत्यांच्या पश्चातदेखील त्यांचा वैचारिक वारसा बहुप्रवाही पद्धतीनं पुढे नेला. इथे ‘नोंदी तपासल्या तर’ हा कळीचा मुद्दा आहे. त्यामागचं सांस्कृतिक राजकारण उलगडण्यासाठी दोन दाखले पाहता येतील.

धोंडिराम नामदेव कुंभार यांची जोतिराव फुले यांच्याशी पहिली भेट झाली ती परिस्थिती दयनीय होती. जोतिरावांनी शूद्रातिशूद्रांसाठी शाळा चालू केली होती. हे सहन न होऊन पुण्यातील सनातन्यांनी इ. स. १८५६ मध्ये १००० रुपयांची खुनाची सुपारी देऊन जे दोन मारेकरी जोतिरावांवर पाठवले, त्यातील एक म्हणजे धोंडिराम नामदेव कुंभार. रात्रीच्या अंधारात मारेकरी समोर उभे ठाकले असताना, ‘‘मला मारून तुमच्या कुटुंबाचं कल्याण होत असेल, तर जरूर मारा,’’ असं म्हणणाऱ्या जोतिरावांमुळे दोनही मारेकऱ्यांचं हृदयपरिवर्तन झालं. धोंडिराम हे जोतिरावांच्या सल्ल्यानं काशीला जाऊन वेदविद्येत पारंगत होऊन पुण्याला परतले. सत्यशोधक समाजाच्या ‘सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्थी’- या विचारानुसार शेकडो गावांत सामान्य जनतेला मार्गदर्शन करण्याचं काम ते करत राहिले. जोतिरावांच्या निधनानंतरही ‘दीनबंधु’ या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये इ. स. १८९० च्या दशकातील अनेक अंकांमध्ये वाचकांनी पत्रं लिहून पंडित धोंडिराम हे आम्हाला ‘ब्रह्मराक्षसाच्या कचाटय़ातून’ सोडवण्याचं काम करतात याबाबत कृतज्ञता व्यक्त केलेली दिसते.

या लोकप्रियतेच्या असूयेपोटी त्यांची तक्रार शंकराचार्याकडे केली गेली. परंतु साताऱ्याजवळ दहिवडी गावी जेव्हा पंडित धोंडिराम शंकराचार्याना भेटले, तेव्हा त्यांच्या पांडित्याचा प्रत्यय शंकराचार्याना आला. या भेटीचे तपशील इतिहासकारांनी विस्मृतीत ढकलले असले तरी धोंडिरामांनी आपण होऊन त्याची काव्यगत नोंद ठेवली होती. लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत जतन केलेल्या ‘तमाशा’ नावाच्या लहानशा पुस्तिकेत ते पाहायला मिळाले. पंडित धोंडिराम नामदेव। आहे ही सत्य ज्ञानाची पेव। येतां महाराजांना अनुभव। उतरला चेहरा। सत्यवादी मिळाला म्हणे आम्हां आज पुरा। ब्रह्मवृंदात आनंदाने, दिली मग द्वाही फिरवुनी। राहा धोंडीराम वंदुनी। आठवण धरा। सत्यशोधकांचा अनुभव घ्या करा त्वरा। धोंडीराम सांगतील त्यावत् । राहाटी चालवा समस्त। शिक्कामोर्तबासहित। सुचविते झाले। धर्माधिकारी शृंगेरी कुडलगीवाले।

याउपरही ‘ऐसा कैसा लेख तुम्ही दिला?’ असं शंकराचार्याना विचारणाऱ्या ब्रह्मवृंदाच्या अर्जामुळे २ डिसेंबर १८९४ रोजी पंडित धोंडिराम यांना धर्मकार्याचं ज्ञान आहे की नाही याचा सर्वासमक्ष सामना झाला. त्यात धोंडिरामांनी प्रतिपक्षाची दैना उडवल्यामुळे शंकराचार्यानी त्यांना आपले सरसुभे नेमून ‘शिक्क्यासह करून दिला तांब्याचा पत्रा’ अशी अधिमान्यताही दिली.

प्रश्न असा आहे की जोतिरावांच्या पश्चात सत्यशोधकी विचारांचा वारसा तेवत ठेवणाऱ्या पंडित धोंडिरामांसारख्या माणसाचं उदाहरण समोर असतानाही इतिहासलेखक आणि वाचकांनी तिकडे दुर्लक्ष का केलं असावं? याचं उत्तर असं की सांस्कृतिक राजकारणापोटी असा ऐतिहासिक स्मृतिभ्रंश घडवला जातो.

याचाच दुसरा दाखला ‘आम्हीही इतिहास घडवला’ या ऊर्मिला पवार आणि मीनाक्षी मून यांनी लिहिलेल्या पुस्तकातून मिळतो. आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांची ऐतिहासिक कामगिरी मांडणाऱ्या या महत्त्वाच्या पुस्तकात काही कार्यकर्त्यांच्या मूळ मुलाखती वाचता येतात. या मुलाखतींमधून बायकांनी आंबेडकरी चळवळीत आणि एकंदर सर्व माणसांना समानतेची वागणूक मिळावी यासाठीच्या लढय़ामध्ये पुढाकार घेऊन केलेलं काम लक्षात येतं. विदर्भामध्ये एरणगावला एका दलित माणसाची हत्या झाली होती. तेव्हा नागपूरला दौऱ्यावर आलेल्या इंदिरा गांधींच्या गाडीला आडवं येऊन चंद्रिका रामटेके या तरुण कार्यकर्तीनं अत्याचाराचा जाब विचारला होता- ‘‘ऐसा अत्याचार आप के राज में होता रहेंगा क्या?’’ चंद्रभागा जाधव या कोकणातल्या राजापूरजवळच्या माजलगावच्या माहेरवाशिणीचं सांगणं असं – ‘‘आमाला कोन खालीपना देईल तर आपण आवाज उठवायला पायजेल. असं वाटायचं.. आमच्या राजापुरास गंगा येते.. मग आमाला गंगेच्या पान्याला हात लावायची आडकाटी का? एकदा मी उटले नि माजी सोबतीन आयरेबाई हिला संगं घेतलं नि आमी राजापूरच्या आजूबाजूला १०-१२ गावांतनं फिरून बाई मानूस जमवलं.. सगल्या मिलून आमी गंगेवर गेलो नि ‘बाबासाहेब आंबेडकर की जय’ असं जोरजोरात वरडत सर्व बायका मिलून गंगेच्या पान्याला हात लावला. गंगेवर आंगूल करणारी सगली मानसं टकामका आमच्याकडे बगीत हुती. पन कोन काय नाय बोललं.. मग काय, आमच्या गावातल्या पोराबालांना चेव आला. धावून सगले गंगेवर आंगूल कराय आले.’’

इ. स. १८९७ मध्ये सत्यशोधक पंडित धोंडिरामांनी एका पुस्तिकेतून प्रकाशित केलेलं आत्मनिवेदनपर काव्य आणि  इ. स. १९५६ नंतरही आंबेडकरी विचारधारेनुसार तगणाऱ्या स्त्रियांच्या कथनांना उपेक्षेच्या अंधारात अंग चोरून उभं राहण्याची वेळ का येते? जगण्याच्या कोणत्या नोंदी कोणत्या तात्पर्यासह वाचकांपर्यंत पोहोचवायच्या याच्या किल्ल्या कुणाकडे असतात? तर सांस्कृतिक सत्ता हाती असणाऱ्या धुरीणांकडे या किल्ल्या असतात असं म्हणता येईल.

मिशेल फूको या तत्त्वज्ञानं लिहिलेल्या ‘समाजाला वाचवलंच पाहिजे’ (सोसायटी मस्ट बी डिफेन्डेड) नावाच्या पुस्तकात असं सांगितलंय की, पिढीजात सत्ताधीशांच्या थोरवीवर प्रकाशझोत टाकून जनतेच्या नजरा दिपवणे हा इतिहासाचा एक उद्देश असतो. पण त्यामुळे झोताबाहेर राहणाऱ्यांचं म्हणणं जनतेला दिसत नाही. अशा वेळी काऊंटरहिस्टरी – प्रतिइतिहास लिहून जनता दाखवून देते की, डोळे दिपवणारा भूतकाळ आमच्या पिढय़ान्पिढय़ांनी पाहिला नसेल, तरीही आता आम्ही काळोखातून बाहेर येऊन आमची कहाणी आणि आमचा इतिहास सांगत आहोत.

त्यामुळे युद्ध ही केवळ सीमेवर घडणारी गोष्ट नसून आपल्या रोजच्या जगण्यामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रभुत्वासाठीच्या लढाया लढल्या जात असतात. इतिहासाची पुस्तकं असोत, समाजमाध्यमं असोत, इलेक्ट्रॉनिक माध्यमं असोत – प्रभुत्वशाली इतिहासलेखनाला छेद देण्यासाठी ही विविध माध्यमं वापरता येऊ शकतात. हादेखील प्रकाशझोतातले आणि झोताबाहेरचे यांच्या दरम्यानच्या भूमिकायुद्धाचा भाग आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो, तरी समाजाला जिवंत ठेवणं हा हेतू ठेवला, तर आपल्या परीनं काही तरी वाटा उचलू शकतो. भले इतिहासाची पुस्तकं काही गोष्टी दडवतील, परंतु आपण कुणी लिहून ठेवलेल्या कहाण्या, गाणी वाचू शकतो. माध्यमं सीमेवरील युद्धाचे पडघम वाजवतील, तरी आपण शेजारच्या आजारलेल्या माणसांचं म्हणणं ऐकू शकतो. आपल्या फोनच्या पडद्यावर मोर, बदकं आणि सिनेकलाकार येतील, आपण तो बाजूला ठेवून आपली गोष्ट लिहू शकतो, दुसऱ्याची वाचू शकतो.

अपनी कहानी छोड जा,

कुछ तो निशानी छोड जा,

मौसम बीता जाए..

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त इतिहासाचे अध्यापन करतात. लेखातील मते वैयक्तिक.

ईमेल : shraddhakumbhojkar@gmail.com