रवींद्र महाजन (एकात्म मानववाद) auraent@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकात्म मानववाद, नेहरूवादी ‘मिश्र अर्थव्यवस्था’, गांधीवाद तसेच आंबेडकरवाद हे विचारप्रवाह भारतीयांच्या विवेकबुद्धीला आजही प्रेरणांचा प्रकाश देणारे.. त्या प्रकाशवाटांचा पुनशरेध घेणारे यंदाचे ‘चतु:सूत्र’! त्यापैकी हा पहिला लेखांक..

जगात भांडवलशाही तसेच मार्क्‍स, लेनिन यांनी मांडलेला कम्युनिझम हे प्रमुख विचारव्यूह वा कल्पनाप्रणाली दिसतात. हे विचारव्यूह व त्यांच्या वेगवेगळय़ा आवृत्त्या हे निर्दोष, मानवजातीच्या प्रश्नांवर कालोचित उपाय सुचवणारे वा काळाच्या कसोटीवर टिकणारे आहेत का, याचे उत्तर नाही असेच दिसते. या दोन्हीतील दोष आणि धोके टाळून सर्वहितकारी जीवनपद्धती, समाजरचना असू शकते का?

उपलब्ध पर्यायांचा तसेच आपल्या परंपरेचा डोळस अभ्यास करून पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी मुंबईमधील आपल्या चार भाषणांमध्ये (२२ एप्रिल ते २५ एप्रिल १९६५) ‘एकात्म मानववाद’ हे राष्ट्रीय जीवनदर्शन सार्वजनिकरीत्या सादर केले. त्याचे इंग्रजी नाव इंटिग्रल ह्युमॅनिझम असे झाले. त्यापूर्वी या विषयावर अनेक चर्चा व अभ्यासवर्ग झाले होते. ११ फेब्रुवारी १९६८ रोजी त्यांचा अकाली मृत्यू झाला. यामुळे त्यांना हा विषय आणखी विशद करता आला नाही. त्यानंतर अनेक विचारकांच्या सहभागाने एकात्म मानववाद हा विषय पुढे जात राहिला व पुढे एकात्म मानव दर्शन असे त्याचे समर्पक नामकरण झाले.

पं. दीनदयाळ उपाध्याय

कुशाग्र बुद्धी व तरल संवेदना घेऊन २५ सप्टेंबर १९१६ रोजी दीनदयाळ उपाध्याय हे भगवतीप्रसाद व रामप्यारी यांच्या पोटी जन्मले. त्यांचे मूळ गाव मथुरेजवळील नांगला चंद्रभान हे खेडे. त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी, राजस्थानमधील धनकिया या गावी झाला. मॅट्रिकच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळवून ते पहिले आले. त्यांनी कानपूर येथून बी.ए. व आग्रा येथून सुवर्णपदकासह एम.ए.पूर्ण केले. बी.एड्. व एम.एड्.ही उत्तीर्ण झाले.

१९३७ साली कानपूर येथेच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला. डॉ. हेडगेवारांशीही त्यांची तेथेच गाठ-भेट झाली. संघविचार व कार्यपद्धती त्यांना खूपच भावली. पूर्ण विचारांती त्यांनी आपले जीवनसर्वस्व संघ व मातृभूमीच्या सेवेसाठी देण्याचे ठरवले. त्यांची असामान्य क्षमता लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रधर्म मासिक, पाञ्चजन्य  साप्ताहिक व स्वदेश  दैनिक यांची जबाबदारी देण्यात आली.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना केली. श्रीगुरुजींशी (रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक) चर्चा झाल्यावर त्यांनी दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी आणि नानाजी देशमुख या संघप्रचारकांना जनसंघाच्या कामात सहभागी होण्यास सांगितले. दीनदयाळ उपाध्याय यांची तल्लख बुद्धिमत्ता, विचारांची स्पष्टता, अजातशत्रू स्वभाव, संघटनकुशलता यांमुळे श्यामाप्रसाद अत्यंत प्रभावित झाले. ते म्हणत, ‘असे आणखी दोन दीनदयाळ मला मिळाले तर देशाचे राजकीय भविष्य मी बदलून टाकीन.’ श्यामाप्रसाद यांचा १९५३ मध्ये मृत्यू झाल्यानंतर भारतीय जनसंघाचे महामंत्री म्हणून पक्षाची एक प्रकारे पूर्ण जबाबदारी दीनदयाळ उपाध्याय यांच्यावरच आली. त्यांचे व इतरांचे अविरत प्रयत्न तसेच कार्यकुशलता यामुळे काँग्रेसला पर्याय म्हणून जनसंघ पुढे आला.

स्वातंत्र्योत्तर परिस्थिती

इंग्रजांचे राज्य होते तोपर्यंत देशातील सर्व आंदोलनांचे उद्दिष्ट ‘स्वराज्य प्राप्त करणे’ होते. स्वराज्यात आम्ही कोणत्या दिशेने वाटचाल करू यावर विशेष सविस्तर विचार कमी झाला.

महात्मा गांधींनी १९०९ मध्ये ‘हिंदू स्वराज्य’ लिहून त्यात स्वातंत्र्यानंतर भारताचे चित्र कसे असेल यावर स्वत:चे विचार मांडले होते.  लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ लिहून या आंदोलनामागील तात्त्विक भूमिकेचे विवेचन केले होते. स्वामी विवेकानंद व योगी अरिवद यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र रेखाटले होते. अरिवदांचा एकात्म दृष्टिकोन (इंटिग्रल अप्रोच) व त्यातून एकात्म मानववाद (इंटिग्रल ूमॅनिझम) अशी मांडणी झाली होती.

मानवेंद्रनाथ रॉय यांचा रॅडिकल ूमॅनिझमही १९४७ पासून पुढे आला. काँग्रेस वा अन्य पक्षांनी वेळोवेळी ‘कल्याणकारी राज्य’, ‘समाजवाद’, ‘उदारमतवाद’ इत्यादी ध्येयांचा उच्चार केला. आर्थिक विकासासाठी जमशेटजी टाटा, घनश्यामदास बिर्ला, कस्तुरभाई लालभाई यांनी १९४४ साली ‘बॉम्बे प्लान’ मांडला. त्याच वर्षी श्रीमन्नारायण अग्रवाल यांनी महात्मा गांधींच्या प्रस्तावनेसह ‘द गांधीयन प्लान ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया’ ही योजना मांडली.

 पण अशा पर्यायांवर साधक-बाधक चर्चा झाली वा विकास पद्धतीसंबंधी राष्ट्रीय सहमतीकडे वाटचाल झाली असे घडले नाही. राज्यकर्त्यांच्या योजनेबरहुकूम राष्ट्रविकासगाडा सुरू राहिला.

पूर्वतयारी

कोणत्या दिशेस जावे हा राष्ट्रापुढील यक्षप्रश्न होता. सुमारे ८०० वर्षांपूर्वी पारतंत्र्यामुळे जेथे आपल्या राष्ट्रजीवनाचे सूत्र तुटले, तिथून आपण पुन्हा पुढे चालावे हे योग्यही नाही व ते शक्यही नसते.

‘स्वत्वा’चा विचार करणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्वराज्य हे विकासाचे साधन होऊ शकत नाही. स्वत्वातूनच आपली ताकद कळेल व सुयोग्य विकास होईल. राष्ट्रीय स आत्मविश्वास यांच्या अभावामुळे अनेक सामाजिक आणि विशेषत: राजकीय नेते पाश्चिमात्यांची नक्कल करण्यात गुंतले. नक्कलनवीस नेहमीच दुय्यम दर्जाचे राहतात या न्यायाने आपल्या विकासाचा प्रवास रखडला.

मूलगामी व सर्वंकष विचार करण्याचा दीनदयाळ उपाध्याय यांचा िपड होता. त्यांना श्रीगुरुजींचे मार्गदर्शन मिळत होते. बापुराव मोघे, दत्तोपंत ठेंगडी, इ. सहकाऱ्यांबरोबर राष्ट्रीय जीवनदर्शनासंबंधी सतत चर्चा होत होत्या. १९२१ मध्ये प्रकाशित झालेले  बद्रीसाह ठुलधारिया यांचे पुस्तक श्रीगुरुजींनी त्यांना दिले. यात राष्ट्रव्यवहारासंबंधी प्राचीन भारतीय चिंतनाचे सार होते. हे पुस्तक लो. टिळक व म. गांधी यांनीही नावाजले होते.

राष्ट्रकारण व राजकारणातले अर्थशास्त्राचे महत्त्व ओळखून दीनदयाळ यांनी अर्थव्यवहारासंबंधी सुमारे ५०० पुस्तके वाचली. पाश्चात्त्य अर्थविचार व व्यवहार यातील त्रुटी तसेच आपल्या देशाच्या गरजांसंबंधी उपाययोजना याचा त्यांना अंदाज आला. त्यांनी ‘टू प्लान्स’ हे पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांचा आढावा घेणारे २०० पानी पुस्तक लिहिले. त्याचा दर्जा व सूक्ष्म विश्लेषण पाहून योजना आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांनी सर्व सदस्य तसेच अधिकाऱ्यांना ते वाचण्यास सांगितले.  ‘भारतीय अर्थनीति विकास की एक दिशा’ हा ग्रंथही त्यांनी सिद्ध केला.

प्रथम त्यांनी ‘सिद्धान्त और नीति’ हा दस्तावेज भारतीय जनसंघासाठी तयार केला. त्यावर चर्चा होऊन तो स्वीकारला गेला. नंतर संपूर्ण राष्ट्रव्यवहारासाठी त्यांनी ‘एकात्म मानववाद’ या पक्षातीत राष्ट्रीय जीवनदर्शनाची मांडणी केली.

एकात्म मानववादाची ठळक वैशिष्टय़े :

(१) मूलभूत सूत्रे :

 १.१ सर्व सृष्टी एकात्म : अस्तित्वाचे सारे आविष्कार एकाच चैतन्यतत्त्वातून विकसित

१.२ वैयक्तिक आत्मिकतेकडून वैश्विक आत्मिकतेपर्यंत उन्नयन

१.३ त्रिगुणात्मकता : सृष्टीमध्ये सतत बदल हेच शाश्वत तत्त्व. सत्त्व (प्रकाश, ज्ञान), रज (क्रियाशीलता) व तम (आळस, जडता) हे तिघेही आपसांत अनेक संमिश्र रूपे निर्माण करत राहातात 

 १.४ चतुर्विध मानवी व्यक्तिमत्त्व: शरीर-मन-बुद्धी-जीवात्मा या चारही मितींचा सम्यक विचार

१.५ पुरुषार्थचतुष्टय़ : इच्छापूर्ती करण्यासाठी केलेला प्रयत्न – व्यष्टिगत व समष्टीगत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पैलू

(२) समग्रता : राष्ट्रजीवनाच्या सर्व बाबींचा एकत्र व सर्वंकष विचार

(३) संतुलन व समन्वय : परस्परविरोधी भासणाऱ्या गोष्टींचे संतुलन व सर्व हितांचा सुयोग्य समन्वय

(४) धारणक्षमता : सृष्टीचे शोषण नव्हे दोहन, निसर्गाच्या धारणक्षमतेच्या मर्यादेत उत्पादन, समतापूर्ण वितरण, संयमित उपभोग

(५) धर्म हा नियामक : व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाची धारणा करणारी जीवनदृष्टी व नियमसमूह. रिलीजन, मजहब वा केवळ उपासना पद्धती किंवा कर्मकांड नव्हे.

(६) चिती व विराट : व्यक्तीचा जीवात्मा तसाच स्वयंभू राष्ट्राचा जीवात्मा ही चिती. त्यानुसार कार्य करण्याने भरभराट होते. राष्ट्राची चितीनुसार जागृत कार्यशक्ती म्हणचे विराट. याने मोठी कार्ये घडू शकतात.

(७) अर्थायाम व स्वदेशीचा पुरस्कार : अर्थाचा अभाव व प्रभाव दोन्हीतून मुक्ती, त्यासाठी स्वदेशी

(८) विकेंद्रीकरण : सर्व क्षेत्रांत सर्व स्तरावर अधिकार व जबाबदारी यांचे शक्यतो विकेंद्रीकरण

(९) स्वायत्त व्यवस्था : संरक्षण, कायदा-सुव्यवस्था इ. सोडून सर्व राष्ट्रव्यवहार स्वायत्त संस्थांद्वारा

(१०) संपूर्ण रोजगार : सर्वाना रोजगार हा विकासाचा केंद्रीय घटक केवळ आनुषंगिक निष्पत्ती नसावी

(११) तंत्रज्ञान : परंपरागत व आधुनिक तंत्रज्ञानातून समुचित तंत्रज्ञान

(१२) पूर्णत्व : गुणवत्ता, कार्यक्षमता, उत्पादकता, नवता यात सर्वोच्चतेचा ध्यास

 पुढील लेखांमधून या वैशिष्टय़ांचा व हे कसे साधावयाचे याचा परामर्श घेतला जाईल

लेखक अभियांत्रिकी अधिस्नातक, व्यवस्थापन सल्लागार, तसेच स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ. भा. सहसंयोजक आहेत

मराठीतील सर्व चतु:सूत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chatusutra integral humanism pt deendayal upadhyay zws
First published on: 05-01-2022 at 02:19 IST