तारक काटे vernal.tarak@gmail.com

महिला बचतगटांपासून सुरू झालेले काम आता गाववन-गावकुरण,  नकदी पिकांऐवजी अन्नपिके, रासायनिक खतांचा वापर टाळणे, इथवर येऊन पोहोचले आहे. हे श्रेय संबंधित संस्थेइतकेच निर्णयप्रक्रियेतील सर्व सहभागींचेही आहे..

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

गांधींच्या स्वप्नातले खेडे होते स्वयंपूर्ण. ज्यात होती प्रत्येक प्रौढाच्या हाताला वर्षभर काम मिळण्याची आणि जगण्याच्या मुख्य गरजा पूर्ण होऊन निरामय आरोग्य व जीवनाचा सार्थक आनंद घेण्याची शाश्वती. अशा गावातील विकेंद्रित अर्थकारण स्थानिक संसाधनाच्या सुयोग्य वापरांवर बेतलेले आणि लघुउद्योगांवर आधारलेले असेल. ही गावे सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा तळच्या वर्गातील दलित, गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्थित काळजी घेणारी; महिलांना स्वयंविकासाच्या संधी देऊन गावाच्या सामाजिक व आर्थिक विकासात त्यांचा सहभाग स्वीकारणारी; गावातील वाद व तंटे गावातच सोडविणारी असतील. स्वातंत्र्यानंतर भारतात अशी खेडी विकसित व्हावीत ही गांधींची इच्छा होती.

मात्र या संदर्भात आज स्थिती काय आहे? ग्रामीण समाज जातिपातींनी छिन्नभिन्न झाला आहे, पक्षीय राजकारणाने पोखरला आहे, गावातील दारिद्रय वाढले आहे आणि हाताला काम नसल्यामुळे लोक रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे गांधीचे गावाचे स्वप्न आपल्याला केवळ आदर्शवत आणि म्हणूनच मृगजळासारखे भासू लागते.

आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामविकासाचे खूप प्रयत्न झालेत. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करून गावाचा विकास साधणारी राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, मेंढालेखा ही यातलीच काही एकेका गावाची उदाहरणे आहेत. काही ठिकाणी सेवाभावी संस्थांनी अनेक गावे मिळून देखील ग्राम विकासाचे प्रयत्न केले आहेत. परंतु ते बहुधा शिक्षण, आरोग्य, आदिवासी अथवा शेती अशा एकेकटय़ा विषयाभोवती केंद्रित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर  गांधींच्या कल्पनांचा समग्र विचार करून गावपरिसरातील निसर्ग संवर्धनाद्वारे गावाचा विकास साधतांना गरीब, दलित, महिला, अपंग अशा आर्थिक-सामाजिकदृष्टय़ा तळच्या वर्गातील सर्व शोषित घटकांचा जाणीवपूर्वक समावेश करून आणि त्यांच्याच सक्रीय सहभागाने समतामूलक परिवर्तन कसे घडू शकते असे आपल्या देशातील एक उदाहरण आपण बघणार आहोत.  

आंध्रप्रदेशातील अनंतपूर हा दक्षिण भारतातील सगळय़ात शुष्क जिल्हा, जो सतत दुष्काळाने होरपळलेला असतो. येथील वार्षिक पर्जन्यमान केवळ ३८० मिमी आहे. इतिहासकाळात हा प्रदेश समृद्ध अशा विजयनगर साम्राज्याचा भाग होता. त्याकाळी तो जंगलाने व्यापला होता व येथील शेतजमीन अतिशय सुपीक होती. परंतु काळाच्या ओघात अर्र्निबध वृक्षतोड आणि जमिनीच्या गैरव्यवस्थापनामुळे जमिनीची धूप होत जाऊन येथील डोंगर बोडके झालेत, समृद्ध जंगलांचे रूपांतर खुरटय़ा झुडुपांनी वेढलेल्या गवताळ प्रदेशात झाले आणि शेतजमीन हळूहळू निकृष्ट होत गेली. त्यामुळे गेल्या बऱ्याच दशकांमध्ये हा प्रदेश सततचे दुष्काळ, अनुत्पादक शेतजमीन आणि बेरोजगारी अशा समस्यांनी ग्रस्त झाला. अशा परिस्थितीत १९८९ साली ग्रामीण परिवर्तनाची तळमळ असलेले आणि सामाजिक समतामूल्यांवर निष्ठा असलेले मेरी व्हत्तमत्तम व सी.के. ऊर्फ बबलू गांगुली असे दोन सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण भागात रचनात्मक काम करण्याच्या उद्देशाने या भागात आले. त्या काळी नुकतेच प्रकाशित झालेले मासानाबू फुकुओका या जपानी लेखकाचे ‘वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन’ (एका काडातून क्रांती)  हे पुस्तक त्यांच्या वाचण्यात आले. निसर्गाला नीट समजून घेऊन आणि त्यात ढवळाढवळ न करताही उत्तम शेती करता येते हा त्यांच्या विचारांचा व शेती प्रयोगाचा गाभा होता. हे दोघे सामाजिक कार्यकर्ते या विचाराने भारावून गेले आणि त्यांनी अशा पर्यायी पद्धतीने शेती करण्याचा विचार पक्का केला. १९९२ साली त्यांनी ‘तिम्बक्तू कलेक्टीव्ह’ ही संस्था स्थापन केली आणि याद्वारे त्यांचे ग्रामविकासाचे कार्यही सुरू झाले (तेलुगू भाषेत तिम्बक्तूचा अर्थ आहे ‘क्षितिज’).

गावपरिसरातील सामान्य जनतेशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रथम महिलांचे बचतगट स्थापून त्याद्वारे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचे आणि सोबत त्यांचे आत्मभान वाढविण्याचे कार्य सुरु केले. या गटांच्या माध्यमातून गावातील महिला केवळ आर्थिक व्यवहारातच नव्हे तर गावातील निर्णयप्रक्रियेत आत्मविश्वासाने भाग घेऊ लागल्या. गावातील विकासासाठी स्थानिक पातळीवर ज्या ज्या संस्था उभ्या करण्यात आल्यात त्यातील संचालक मंडळांमध्ये महिलांची एक तृतीयांश संख्या अनिवार्य केल्यामुळे अशा योजनांच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत महिलांची धडाडी दिसून आली. आताच्या स्थितीत आर्थिक पातळीवर महिलांचे चार ‘बचत महासंघ’ कार्यरत आहेत आणि ते आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण झाले आहेत. यातील सर्व सदस्य व संचालक महिलाच आहेत. २०२१ साली या महासंघांची एकत्रित सदस्य संख्या २४ हजार २३३ होती, तर त्यांचे भागभांडवल ३५.२४ कोटी रुपयांचे होते.

बचत गटांद्वारे महिलांचे सक्षमीकरण सुरू असतानाच गावातील लोकांमध्ये परिसर विकासाच्या संदर्भात प्रबोधनकार्य सुरू झाले. त्यातून उभे राहिले ते आजूबाजूच्या ओसाड व भकास माळरानाचे हरित वनात रूपांतर करण्याचे आव्हान आणि ते पेलण्यासाठी लोकसहभागातून झालेले अथक प्रयत्न. हे कार्य एखाद्या  गावात सीमित न राहता आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये हळूहळू पसरत गेले. या लोकपरिश्रमातून २०१६ सालापर्यंत जवळपास नऊ हजार एकर गावसंलग्न पडिक जमिनीचे रूपांतर हिरव्या रानात झाले आणि येतील उघडे डोंगर परत हिरवे झाले.  माती व पाणी व्यवस्थापनाच्या योजनांमुळे मातीची धूप थांबून जमिनीतील भूजलाची पातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे पाणी व इंधनाची उपलब्धता, मातीतील ओलाव्याचे स्थिरीकरण, वनस्पतीसाठीच्या पोषक तत्त्वांचा चक्रीय वापर (न्यूट्रियन्ट रिसायकिलग), परागीकरण यासारख्या नैसर्गिक परिसंस्था सेवांचा (इकोसिस्टम सव्‍‌र्हिसेस) लाभ होऊ लागला. या परिणामस्वरूप हवामानाच्या लहरीपणाचा आणि दुष्काळाचा जो तडाखा लोकांना बसायचा त्याची तीव्रता कमी झाली. हे सर्व काम सर्व गावांनी मिळून स्थापलेल्या ‘कल्पवल्ली वृक्षसंगोपन संस्थे’मार्फत झाले. गाववन विकास आणि गावकुरण विकास या सोबतच त्यांच्या रक्षणाचीही जबाबदारी लोकांनी परस्पर सहकार्यातून स्वीकारली. या नवनिर्मित वनांतून गौण वनउत्पादनांद्वारे लोकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या, तर कुरणविकासामुळे या भागातील पशुपालन वाढले. कल्पवल्ली कार्यक्रमातून या जंगलापैकी सहा हजार एकर क्षेत्रातील वनस्पती व प्राण्यांच्या दुर्मीळ जातींना हानी पोचणार नाही व येथील जैवविविधतेचे रक्षण होईल याची काळजी घेतली जाते.

अरासायनिक शाश्वत शेतीच्या प्रसारासाठी प्रथम बबलू आणि मेरी यांनी त्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके उभी केली व त्यांत गावातील महिलांचा सहभाग घेतला. या विषयावर योग्य प्रशिक्षण देऊन या महिलांना त्यांनी आपापल्या शेतीत शाश्वत शेतीचे प्रयोग करण्यासाठी प्रेरित केले. यातून शेतकरी कुटुंबांचा आत्मविश्वास वाढत जाऊन हळूहळू अशा शेतीचा प्रसार होऊ लागला. आता दोन हजार ६७ शेतकरी कुटुंबे त्यांच्याकडील जवळपास दहा हजार एकर जमिनीवर अशी शेती करीत आहेत. या भागात आधी रासायनिक खताच्या आधारे भुईमूग घेतला जायचा. आता त्याऐवजी  पावसाच्या पाण्यावर येणारी ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी परंपरागत भरडधान्ये; तूर, मूग, मोट यासारखी कडधान्ये आणि भात, मका व एरंडी अशी पिके घेण्यास सुरुवात झाली. पीकविविधता वाढल्यामुळे शेतीसुरक्षितता आणि ही बहुतांशी अन्नपिके असल्यामुळे शेतकरी कुटुंबांची पोषणसुरक्षा वाढली. सामूहिक पद्धतीने खरेदी-विक्री करण्यासाठी १९७२ अल्पभूधारक कुटुंबांचा सहभाग असलेली ‘धरणी  शेती व बाजार सहकारी संघ’ कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची खरेदी आणि शेतमालाची विक्री जाते. त्यामुळे व्यापारांच्या मार्फत होणाऱ्या विक्रीच्या तुलनेत लाभाचे प्रमाण जास्त आहे.

या ग्रामविकास कार्यक्रमात भूमिहीन व्यक्तींसाठी तसेच अपंगांसाठी स्वतंत्र सहकारी संस्था असून त्या गरजू व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी तसेच कौशल्य विकासासाठी आर्थिक व इतर मदत करतात. तसेच या गावांमध्ये सुरू करण्यात आलेल्या व्यवसायांमध्ये त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतात.

हा कार्यक्रम आता या परिसरातील १७९ गावांमध्ये पसरला आहे व जवळपास एकूण २२ हजार ८७९ गरीब कुटुंबांना त्याचा लाभ मिळत आहे. तिम्बक्तू कलेक्टिव्हच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या सर्व कामांचे वैशिष्टय़ म्हणजे यातील निर्णयप्रक्रियेमध्ये सामान्य लोकांचा सहभाग असून कामाच्या नियोजनात व अंमलबजावणीतही लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जातात. याद्वारे सामूहिक नेतृत्व पुढे येईल हे कटाक्षाने पाळले जाते. तसेच जाती व िलग भेदापलीकडे जाऊन समानतेचे सूत्र राबविण्यावर भर दिला जातो. या ग्रामविकास कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यात गावातील गरीब, दलित, अपंग अशा सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा सर्वच वंचित घटकांना विकासाच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक सामावून घेण्यावर भर दिला आहे. ही एक प्रकारे गांधींच्या कल्पनेतील गावाचीच पाऊलवाट आहे.

लेखक जैवशास्त्रज्ञ असून शाश्वत विकास व शाश्वत शेती या  विषयांचे अभ्यासक आहेत.