आंबेडकरवाद

|| सुरज मिलिंद एंगडे

girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

आधुनिक काळातील भारतात रुजलेल्या विचारप्रवाहांचा शोध आंबेडकरवादापाशी येतो तेव्हा प्रथम आठवतात अनेक कविता, आत्मकथनं… ‘स्वत:सकट सारे आरपार पाहा’ हा आग्रह मांडणारी! स्वत:ला ‘आंबेडकरवादी’ म्हणवणाऱ्या चार पिढ्यांनंतरही ‘आंबेडकरवादा’चं सैद्धान्तीकरण तयार नाही, पण संशोधन मात्र सुरू आहे. आंबेडकरवादी भूमिका तळागाळातही दिसते आहे…

‘लोकसत्ता’शी लेखक म्हणून जुळताना एका नव्या विचाराला जुळत आहे असे वाटत आहे. वाचक म्हणून माझा आणि लोकसत्ता या दैनिकाचा  संबंध तसा जुना, पण आमचे संबंध घरचे नव्हते. आमची मैत्री ही कॉलेज व नगरपालिकेच्या ग्रंथालयातली. घरी अनेक वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके, दिवाळी विशेषांक, याखेरीज राष्ट्रीय किंवा अधूनमधून आंतरराष्ट्रीय पत्रिकासुद्धा यायच्या. वाचनाची सवयही घरीच लागली. वर्तमानपत्राची एवढी सवयर, किंबहुना व्यसन लागले होते की, दररोज सकाळी डोळे उघडले की दोन चित्रं सारखी डोळ्यांना दिसत राहायची :  एक म्हणजे १४ इंचच्या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ दूरचित्रवाणी संचातून भोंग्यासारख्या आवाजात गर्जत येणाऱ्या सकाळच्या बातम्या आणि दुसरे म्हणजे पेपर वाचण्याची धडपड. वडील, र्मिंलद एंगडे हे सूर्याशी चांगली मैत्री करून होते. म्हणून सूर्याला जयभीम ठोकल्याशिवाय त्यांची सुरुवात व्हायची नाही. विनोदाचा भाग सोडला तर वडिलांची खास सकाळची मैत्री ही दूधवाले मामा आणि पेपरवाले काका यांच्याशी होती. आमची ऐपत ही काही एका वर्तमानपत्रापेक्षा जास्त घेण्याची नव्हती पण विचारवंतांच्या माजाची कमालच न्यारी असते… आमच्या घरी चार-पाच पेपर यायचे. त्यामध्ये प्रामुख्याने व महागडा, एक दिवस जुना ‘मटा’- त्या काळात फार वाचला जाणारा मुंबईचा पेपर. नांदेडमध्ये त्याकाळी बोटावर मोजण्याइकेच लोक तो पेपर वाचायचे. त्या मोजक्या वाचकांमध्ये खासगी बँकेतला चपराशी र्मिंलद हा एक होता. सोबत विभागीय, जिल्हास्तरीय आणि शहरी वर्तमानपत्रे यांचा संगोड घरात असायचाच… हे सारे पेपर, त्यातले माहितीचे कण, सकाळच्या वातावरणात रानातल्या दवाप्रमाणे एक हलकी रेषा घराच्या आकाशात काढायचे. नळाचे पाणी भरत- भरत चहा तयार व्हायचा आणि नजीकच्या बेकरीतले समोसे त्या आचाऱ्याच्या पायाने तुडवलेल्या मैद्याच्या पिठातले असणार, हे ओळखता यायचे. वडील आजारामुळे घरबंद होते. पण सकाळचा वाचनाचा उपक्रम म्हणजे एका कामगारवर्गीय दलित वस्तीतली जणूकाही वळणदार स्वाक्षरीच. पटांगणात दोऱ्याच्या खाटांवर बसून वर्तमानपत्रातल्या अनेक बातम्या, किस्से, व्यंगचित्रं, आंतरराष्ट्रीय घडामोडी यावर कमीअधिक प्रमाणात चर्चा व्हायची. पण वडिलांची नजर संपादकीय पानावर बारकाईने असायची. ही पाने वाचणारे त्यांच्या सोबतीला अगदी कोणीही नसायचे. बाकीच्या पानांवर चर्चा करण्यासाठी अनेक जण उपलब्ध असायचे पण विचारवंतांचे विचार, तज्ज्ञांची अभ्यासू निरीक्षणे व संपादकांचे मनोगत यावर चर्चा करण्यासाठी तेव्हा आसपासचे कोणीही उत्सुक नव्हते आढळले. वडिलांनी मला व अनेकांना त्यामध्ये रुची घेण्यासाठी प्रेरित केले. पण आमच्या चवी या ठरलेल्या होत्या. कोणाला शहराच्या राजकारणापुरतीच आवड, कोणाला खेळ, कोणाला करमणूक तर कोणाला ठळक बातम्या. वडिलांनी मला आवर्जून सांगितले होते की, संपादकीय हे वर्तमानपत्राचा गाभा आहे. संपादक ही व्यवस्थित व निर्भीडपणे आपले विचार मांडणारी एक जमात आहे… त्या वेळी मी दुर्लक्ष केले. काही वर्षांनंतर मला संपादकीय पान वाचण्याची आवड लागली. तेव्हा मी एकटा नव्हतो. आमच्या कॉलेजमध्ये एका वर्तमानपत्रासाठी स्पर्धा लागायची आणि तो पेपर म्हणजे लोकसत्ता !

 विधि महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर जशी मानसिक वाढ होत गेली, वैचारिक समज वाढत गेली. तसतसा विचाराच्या भुकेला व सामाजिक सांस्कृतिक कुतूहलाला आसरा लोकसत्ताच्या संपादकीय पानातून मिळत गेला. त्या वेळचे संपादक कुमार केतकर यांचे एखाद्या विषयावरचे विचार वाचले नाहीत तर तो विषय अपूर्ण राहिला आहे असे वाटायचे. माझे मित्र अ‍ॅड. अमोल भिसे यांची लोकसत्ताच्या विचारांशी, या दैनिकाच्या तत्कालीन राजकीय भूमिकांशी विशेष ओढ होती. त्यांनीच लोकसत्ताचा पुरस्कार आमच्या मित्र गटात केला. संपादकीय वाचल्यानंतर आमच्या वैयक्तिक चर्चा संदर्भासहित घडायच्या. भारताचे, महाराष्ट्राचे व जगाचे अर्थकारण व राजकारण हे आम्हाला लोकसत्ताने दिले. त्याची ओढ ही काही कमी झाली नाही. मुंबईत आल्यावर तर लोकसत्ताचा एक दरारा होता. त्या वर्तमानपत्राचा मी एक वाचक असल्याचा मला विशेष अभिमान होता. एखाद्या पिशवीत किंवा काखेत लोकसत्ता पाहिले की, समविचारी व्यक्तीला भेटल्यासारखे वाटायचे !

भेट – अभेट

मराठी संस्कृतीची ओढ व मराठी राजकारणातले किस्से यांनी कधी त्यांची माझ्यावरली पकड कमी होऊ दिली नाही. भारत सोडून गेल्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणाचे अद्यतन वर्तमान वेळोवेळी कळायचे. पण प्रश्न असा होता की, निवडायचे काय? इंग्रजी की मराठी? मी इंग्रजीचा सहारा आपल्या विचारांना तयार करण्यासाठी घेतला. मराठी ही मग घरच्यांच्यासोबत बोलण्यासाठी व मित्रांच्या गप्पागोष्टी इथवर राहिली.

जगभराच्या भरारीत व बौद्धिक क्षेत्रात नाव कमावल्यावरही मराठीचे प्रेम हे कुजबुज करीत होते. त्याचा तोडगा मी अनेक मुलाखती मराठीत देऊन केला. अनेक वेळा बातम्यांच्या द्वारे आपले मनोगत मांडले. पण शब्दांची जाण व त्याची प्रचीती यांची जादूच वेगळी आहे. शब्द संग्रहणात्मक असतात. आपल्याआत साध्या अर्थाखेरीज बरेच काही धरून ठेवणारे शब्द.  या शब्दांचे विश्व केवळ भूगोलात अडकलेले नाही, त्यांचे गांभीर्य तुम्हाला स्पर्श करणारे असते. दीडएक वर्षांपूर्वी मला ‘लोकसत्ता’च्या विद्यमान संपादकांचा फोन आला. त्यांचा आग्रह होता की मराठी लेखन झालेच पाहिजे. या विचारविश्वाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इथल्या विचारसरणीत तुझाही प्रभाव महत्त्वाचा आहे, असायला हवा, हे त्यांचे सांगणे पटत असूनही त्यावेळी मी नकार दिला. पण तो नकार हा वर्षभरानंतरचा होकार होता. ज्या लोकसत्ताचे कौतुक करत मी माझे तरुणाईतले भारतातले दिवस घालवले, त्याच वर्तमानपत्रात संपादकीय पानावरून आता मला अनेक पिढ्यांतल्या वाचकांशी संवाद करता येईल. ‘चतु:सूत्र’ या सन्माननीय सदरात दर महिन्याला लेख छापून येतील.

मला ‘आंबेडकरवाद’ या समुद्रव्याप्त विषयाचे सूत्र दिले आहे. आंबेडकर आणि आंबेडकरांचे अनेक प्रामाणिक अभ्यासक, विचारवंत भारतभरात आहेत. त्यातले अनेक जण तर, संशोधनपर लिखाण करणारे थोर विचारवंत आहेत. नवीन संशोधने होत आहेत. मला या विषयावर लिखाण करण्याची इच्छा नव्हती पण ‘लोकसत्ता’तल्या अन्य संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चांमध्ये नकाराची संधी असूनही ती घेतली नाही. कारण या सहकाऱ्यांचे म्हणणे होते : या सदरात आंबेडकरवाद केवळ आंबेडकरांभोवती ठेवायचा नाही. किंबहुना तो ‘वाद’ व्यक्तिकेंद्रितही ठेवायचा नाही.

आंबेडकरवादाची अनेक सूत्रे आहेत. आंबेडकरांनंतर आता चौथी पिढी स्वत:ला त्यांचे वैचारिक अनुयायी म्हणवून घेताना आढळत आहे.  त्यांच्या गरजा या विभिन्न आहेत. त्यांना लागणारे अस्त्रही वेगळे आहे. मात्र जातीने बळकट केलेल्या व्यवस्थेला त्यांना तुडवायचे आहे.

आंबेडकरवादाचे ‘थिअरायझेशन’ अर्थात शास्त्रीय सैद्धांतीकरण अद्याप झालेले माझ्या वाचनात आले नाही. मीच अनेकदा या समुद्रात हात घालण्याचा प्रयत्न केला. पण पुढे घेऊन जाऊ शकलो नाही. त्याची अनेक कारणे आहेत. त्यात प्रमुख कारण हे की, आंबेडकरांच्या मेंदूचे बलाढ्य विश्व. माझी अवस्था व अवाका तयार नव्हता व आजही नाही. एखाद्या व्यक्तीचे राजकारण किंवा पुढल्या काळात त्यांच्याविषयी झालेले लिखाण त्यांच्या ‘र्रींडग लिस्ट’ मधून आढळते. डॉ. बाबासाहेबांची मात्र अख्खी ग्रंथालये आहेत.

बाबासाहेबांच्या चरित्रावर मी काम करीत आहे. या कामाला वेळ लागणार आहे. पण या सदरामार्फत अनेक विषयांना  हात घालताना आपण, समता मूलक, जातविरहित समाज तयार होण्यासाठी ब्राह्मणवादाचा व ब्राह्मणशाहीचा कशा प्रकारे विनाश होईल हे आंबेडकरवादाचे एक महत्त्वाचे सूत्र ठरते, हे लक्षात ठेवू आणि त्यासाठी आपण सर्वांनी विचार करू. ‘ब्राह्मणवाद’ असा काही भारतीय वाद आहे का, असा प्रश्न जे विचारतील, त्यांना ‘आंबेडकरवाद’ असा काही वाद आहे का, हाही प्रश्न पडेलच. एक खरे की, ब्राह्मणवादातून आलेल्या प्रश्नांचा तोडगा कदाचित आंबेडकरवाद असू शकतो!

लेखक हार्वर्ड विद्यापीठात संशोधक आहेत व ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पदवीचे अभ्यासक आहेत. surajyengde@fas.harvard.edu / suraj.yengde@history.ox.ac.uk