श्रीरंजन आवटे (नेहरूवाद) poetshriranjan@gmail.com

‘नेहरूवाद’ हा राजकीय सिद्धान्त नसेल, पण लोकशाहीविषयीची अविचल निष्ठा, धर्मनिरपेक्षतेवरल्या विश्वासातून फुलणारा सर्वसमावेशक राष्ट्रवाद, समाजवादी विकासाचे प्रारूप, आधुनिकतेबाबतची दृष्टी आणि वैश्विक भान यांची ही शिदोरी स्वातंत्र्यानंतरच्या देशासाठी पोषक ठरली.. आधुनिक भारतासाठी चार विविध विचारवाटांचा पुनशरेध घेणाऱ्या यंदाच्या सदरातली ही दुसरी वाट..

Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
Bharat Jodo Abhiyaan
भारत जोडो अभियानाची निवडणूकपूर्व राजकीय मशागत आघाडीच्या पथ्यावर!
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात
citizenship question in the constituent assembly constituent assembly debate on
चतु:सूत्र : नागरिकतेचा पैस

अलीकडच्या काही वर्षांत ‘सर्व प्रश्नांचं मूळ नेहरूंमध्येच आहे,’ असं बिंबवण्यासाठी पराकाष्ठा सुरू आहे; मात्र या अपप्रचाराच्या तोफेतूनही नेहरूंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार आणि समग्र जीवनदृष्टी याच बाबी अधोरेखित होत राहतात. त्यामुळेच त्यांच्या काळाहूनही आज नेहरूंचं संदर्भमूल्य अधिक जाणवतं  आहे.

विसाव्या शतकाच्या मध्यावर विशेषत: दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अनेक वसाहती स्वतंत्र झाल्या. यापैकी बहुतांश राष्ट्रांमध्ये एकाधिकारशाही, लष्करशाही निर्माण झाली. लोकशाही हेलकावे खाऊ लागली. त्या राष्ट्रांच्या स्वातंर्त्योत्तर राजकीय प्रवासाच्या आलेखावर नजर टाकली असता भारताचं वेगळेपण ठळकरीत्या लक्षात येतं.

या अभूतपूर्व वेगळेपणात नेहरूंचा सिंहाचा वाटा आहे. स्वातंर्त्यपूर्व काळात नऊ वर्षे तुरुंगात असलेला हा माणूस स्वतंत्र भारताचा १७ वर्षे पंतप्रधान होता. त्यामुळे ‘नेहरू’ हा स्वातंर्त्यपूर्व भारताला स्वातंर्त्योत्तर भारताशी जोडणारा पूल ठरला. या भक्कम पुलामुळे स्वातंर्त्य आंदोलनानं तयार केलेल्या मूल्यात्मक अधिष्ठानाच्या वारशामध्ये सलगता राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या राजकीय लढय़ाचं संचित नेहरू जाणून होते आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही आधीच्या राजकीय प्रक्रियेपासून, मूल्यात्मक आदर्शापासून फारकत न घेता देश पुढे झेपावत राहिला. कोणत्याही प्रकारचे विभ्रमण न घडता स्वातंर्त्योत्तर भारताचा स्वयंप्रज्ञ प्रवास सुरू झाला. या मूल्यात्मक पायाभरणीत नेहरूवाद निर्णायक राहिला आहे. 

राज्यशास्त्रातील काटेकोर सिद्धांतानुसार ‘नेहरूवाद’ ही स्वतंत्र विचारप्रणाली आहे काय, असल्यास तिचे व्यवच्छेदक घटक कोणते, यावर वादविवाद होऊ शकतील; मात्र नेहरूंच्या समग्र जीवनदृष्टीतून त्यांची वैचारिक भूमिका स्पष्ट होते. नेहरूंच्या जीवनपटाचा विचार करता तीन प्रमुख भूमिका त्यांनी पार पाडल्या असं लक्षात येतं. स्वातंर्त्ययोद्धा, धोरणकर्ता आणि राजकीय विचारवंत या तीन भूमिकांमधून नेहरूंचा विचार समजून घेता येतो. ‘ग्लिम्प्सेस ऑफ वल्र्ड हिस्ट्री’, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘युनिटी ऑफ इंडिया’ यांसारख्या पुस्तकांसह त्यांच्या आत्मचरित्रातून नेहरू-विचार उलगडतो तर काँग्रेस अधिवेशनांमध्ये वेळोवेळी झालेले ठराव, पत्रव्यवहार, भाषणं या सगळय़ातून त्यांची मांडणी समोर येते.

वसाहतवादविरोधी सक्रिय लढय़ातूनच साम्राज्यवादाविषयीचं नेहरूंचं आकलन  आकाराला आलं. दोन महायुद्धांच्या दरम्यान त्यांचं वैश्विक भान अधिक टोकदार झालं. त्यातून त्यांनी फॅसिझमला नि:संदिग्ध विरोध केला. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला नेमकी काय भूमिका घ्यायची, याविषयी मतमतांतरं असताना नेहरूंचं समकालीन जागतिक राजकारणाचं भान ध्यानात येतं. साम्राज्यवादाला विरोध करत असताना फॅसिस्ट शक्तींची मदत घेणे किती घातक असू शकतं, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. त्यामुळेच साम्राज्यवादातून येणाऱ्या गुलामीला सुस्पष्ट विरोध करतानाच फॅसिझमलाही त्यांनी स्फटिकस्वच्छ नकार दिला होता. स्वातंर्त्योत्तर काळातही जग अमेरिका आणि रशिया या दोन ध्रुवांभोवतीच्या गटांमध्ये विभागलेलं असताना दोन्हींपासून समान अंतर राखत अलिप्ततेची भूमिका मांडत आणि तरीही स्वंयप्रज्ञ वाट चोखाळत नेहरूंनी देशाला नवी दिशा दिली. रशियाकडे पारडं झुकत असूनही आपलं स्वतंत्र स्थान टिकवण्याची मुत्सद्दी कसरत नेहरूंनी केली.

नेहरूवादाची घडण विसाव्या शतकातल्या अशा व्यापक पटलावरच्या राजकीय स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वंकष मांडणीचा विचार करता नेहरूवादाचे सहा प्रमुख घटक आहेत : लोकशाहीविषयीची अविचल निष्ठा, धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व, सर्वसमावेशक राष्ट्रवाद, समाजवादी विकासाचे प्रारूप, आधुनिकतेबाबतची दृष्टी आणि वैश्विक भान.

नेहरूंनी साम्राज्यवाद आणि फॅसिझमला विरोध करतानाच लोकशाही मूल्यांचा पुरस्कारही केला. नव्या राष्ट्राच्या निर्मितीचे अधिष्ठान लोकशाही मूल्यांवर असले पाहिजे, याकरता ते आग्रही होते. हुकूमशाहीला त्यांनी केलेला विरोध केवळ शाब्दिक स्वरूपाचा नव्हता तर तो प्रत्यक्ष त्यांच्या कृतीतून दिसत होता.

देशातल्या वाढत्या धर्माधतेमुळे नेहरू अतिशय अस्वस्थ होते. विशेषत: १९२० नंतर धार्मिक जमातवादाने अक्राळविक्राळ रूप धारण केलेले होते. एकीकडे हिंदूू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या हिंदूुत्ववादी संघटना तर दुसरीकडे जमात-ए-इस्लामी, मुस्लीम लीग यांसारख्या इस्लामवादी संघटना अशा जमातवादी संघटनांच्या उदयातून देशातली उभी फूट दिसत होती. या पार्श्वभूमीवर नेहरूंचं धर्मविषयक चिंतन मौलिक ठरतं. एका बाजूला गांधी धार्मिक, पारंपरिक अवकाशासोबत मुख्यप्रवाही राजकारणाची विधायक जोडणी करत असताना दुसऱ्या बाजूला नेहरू धर्माविषयी अधिकाधिक कठोर, चिकित्सक होत गेलेले दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर अखेरीस धर्मातरापर्यंत जातात.  काँग्रेसच्या कराची अधिवेशनाच्या ठरावात ‘राज्यसंस्था धार्मिक बाबतीत तटस्थता राखेल’ असा उल्लेख दिसतो. नेहरू धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविषयी अत्याग्रही होते, याचे अनेक दाखले दिसतात.

संकुचित अस्मितांवर आधारित राष्ट्रवादाचे विविध आविष्कार दिसत असताना नेहरू सर्वसमावेशक राष्ट्रवादाची मांडणी करतात. आक्रमक राष्ट्रवादाने जगभर काय ऱ्हास करून ठेवला, याची नेमकी कल्पना असल्यानं अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांच्या समर्थनार्थ ते हिरिरीने बोलतात. गांधींच्या आगमनानंतर स्वातंर्त्यचळवळ अधिक समावेशक आणि जनसामान्यांची झाली होती. समतावादी चळवळीच्या मंथनातून परिघावरील समूहांना राजकीय भान आलं होतं. नेहरू स्वत: अभिजन वातावरणात वाढले असले तरी स्त्रिया, दलित, वंचित, परिघावरील समूह या सर्वाचा मुख्यप्रवाही राष्ट्रीय मंथनात सक्रिय सहभाग असावा यासाठी ते आग्रही होते.

स्वतंत्र देश निर्माण झाला तेव्हा ‘१५० वर्षे ब्रिटिशांनी काय केले,’ अशा वल्गना नेहरूंनी केल्या नाहीत. त्यांच्यापाशी समाजवादी विकासाचे निश्चित असे एक प्रारूप होते. स्वातंत्र्यापूर्वीच १९३८ साली राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन केली गेली होती. नेहरू तिचे अध्यक्ष होते. पुढे नियोजन आयोगाच्या माध्यमातून विविध समाजवादी योजना राबविल्या गेल्या. नेहरू रशियाकडे झुकले होते आणि रशियन क्रांतीने भारावले होते तरीही त्यांचे मार्क्‍सवादी आकलन पोथीनिष्ठ नव्हते. त्यामुळेच मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारताना भारताच्या संसदीय लोकशाही चौकटीला अनुकूल ठरेल अशा समताधिष्ठित समाजाचं स्वप्न ते पाहात होते.

परंपरा आणि आधुनिकता या द्वंद्वातून पुढे कसं जायचं हा सनातन प्रश्न नेहरूंसमोरही होताच. पाश्चात्त्य शिक्षणातून त्यांची याबाबतची समज विकसित झालेली असली तरी भारतीय राजकीय मातीत त्यांची वाढ झालेली होती. ‘पूर्व आणि पश्चिम संस्कृतीचे मी एक विचित्र मिश्रण झालो आहे. मी सगळीकडचा आहे पण माझं कोणतंच घर नाही’ असं नेहरूंनी स्वत:विषयी आत्मचरित्रात नोंदवलं आहे. विविध संस्कृतीच्या सम्मीलनातून आणि टकरावातून आधुनिकतेची सकारात्मक दृष्टी नेहरूंना प्राप्त झाली आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा त्यांनी अंगीकार केला.

वासाहतिक काळातही नेहरू स्वातंत्र्योत्तर जागतिक पटाचा विचार करत होते. केवळ देशापुरता विचार न करता विश्वबंधुत्वाचा दृष्टिकोन कसा रुजेल असा त्यांचा ध्यास होता. हा ध्यास केवळ आंतरराष्ट्रीय संबंधांपुरता आणि राष्ट्रीय हितापुरता नव्हता तर तो शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी, सौहार्दपूर्ण अवकाशासाठी होता. म्हणून तर गौतम बुद्धाची वाट त्यांना खुणावत होती. बुद्धाकडे जाण्याचा मार्ग सांगताना नेहरू भाषणात म्हणतात : बुद्धाच्या मार्गाने आपण गेलो तर िहसा आणि भीती यांचं ग्रहण दूर होऊन शुभ्र निळय़ा आकाशात शांततेची कबुतरं विहरू लागतील. बाबासाहेबांनी तर बुद्धाचं बोट हाती धरलं. अहिंसेच्या तत्त्वज्ञानामुळे गांधींचं बुद्धासोबत नातं तयार झालं.

आम्ही निघून गेलो तर अराजक निर्माण होईल, असं सांगणाऱ्या लॉर्ड माऊंटबॅटनला गांधी ठणकावून सांगतात की आम्ही आमच्या भविष्याचे शिल्पकार असू. नेहरू स्वातंत्र्याच्या मध्यरात्री नियतीशी असलेला काव्यात्म करार सांगतात आणि त्या काव्यात्मतेला अर्थ देतात  बाबासाहेब आंबेडकर!

पं. नेहरू १३ डिसेंबर १९४६ ला संविधानाच्या उद्देशिकेचा ठराव मांडतात आणि इंडियाची ‘डिस्कवरी’ करणाऱ्या या माणसाला ‘आयडिया ऑफ इंडिया’ गवसते..  म्हणून तर विन्स्टन चर्चिलही एड्विन अर्नोल्डच्या बुद्धावरच्या ‘द लाइट ऑफ एशिया’ कवितेचा संदर्भ देत नेहरूंच्या प्रकाशमय पर्वाला शुभेच्छा देतात आणि नारायण सुर्वेसारखा कवी ‘नेहरू गेले त्यावेळची गोष्ट’ या कवितेत, उजेड घेऊन जाणाऱ्या हातगाडीवाल्याला सांगतो- ‘आता कशाला उजेड वाहतोस, पुढे काळोख दात विचकत असेल’ !  नेहरू म्हटल्यावर एडविना माऊंटबॅटन आणि चीन एवढंच आठवणाऱ्या अनेकांना ना प्रेम कळतं ना आंतरराष्ट्रीय राजकारण. आज काळोख दात विचकत असताना कोणत्याही सुजाण नागरिकाला सर्वसमावेशकतेचं, ‘आयडिया ऑफ इंडिया’चं स्वप्न हाती देणाऱ्या नेहरूवादाची आठवण येणं स्वाभाविक आहे. 

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अध्यापन करतात.