आपण बुद्धिजीवींचा समाज?

मांडणी करणारेही संगणक, सेलफोन तंत्रज्ञानाचा वापर करूनच स्वत:चे विचार घाऊक प्रमाणात पसरवत आहेत! 

श्रुती तांबे : समाजशास्त्र. इतिहास. राज्यशास्त्र. अर्थशास्त्र.

निव्वळ डेटा निर्माण करणाऱ्या आणि वापरणाऱ्या समाजाला ‘नवा बुद्धिजीवी समाज’ मानता येईल का?

हातावर जिवंत कबुतर बसवून, फोन सेल्फी मोडवर ठेवून पिंटूनं गाणं सुरू केलं- ‘जो जो हस हसके बातें करते हैं.’ ओठांवर हलकं स्मित, हातावर कबुतर, नजर सेलफोन कॅमेऱ्यावर सावधपणे ठेवलेली आणि एक कान खालच्या मजल्यावरून मालक/ सुपरवायजर आरडाओरडा करत बोलावणार नाहीत ना, यावर. पंजाबात काम करणारा राजस्थानी पिंटू हा वेटर, मेसबॉय, केटरर, व्यवस्थापक/ हाऊसकीपर आपल्या खेडय़ातल्या प्रियेसाठी सतत टिकटॉक व्हिडीओ बनवतोय. पिंटूचे दररोजचे कमीत कमी पाच तास सेलफोनवर मीडिया आस्वाद, मीडिया निर्मिती, मीडिया विनिमय यात जातात. शिवाय त्याला आता यूटय़ूबवर रेसिपीज बघायचाही नाद लागलाय. पिंटू हे एक प्रातिनिधिक उदाहरण. त्याची उपजीविका शारीर श्रमांवर आधारित आहे. पण बाकी खासगी जीवन मात्र स्मार्टफोनमय झालं आहे. इथंच तो गाणी ऐकतो, तो क्लिप्स बघतो, तयार करतो, एक प्रकारे सतत तो डेटा निर्माण करीत असतो. पण ना पिंटू स्वत:ला डेटा निर्मिती करणारा मानतो, ना त्याच्या आसपासचं कोणी त्याच्याकडे तसं पाहतात. तसंच आपण पाहतोय, वापरतोय ती माहिती खरी की खोटी, फेक की अधिकृत की राजकीय स्वार्थासाठी मुद्दाम ताजी ताजी बनवलेली- हे तो तपासत नाही. मग अशा लाखो पिंटूचा आपला समाज नक्की कसा आहे?

एकीकडे आज फार मोठय़ा प्रमाणात बुद्धिवंतांविषयीची केवळ असूया, तुच्छताच नाही, तर तीव्र विरोध दिसतो आहे. ते जणू आपल्या समाजाचे शत्रूच असावेत, अशी मांडणी दैनंदिन बातम्यांमध्ये- चर्चामध्ये दिसू लागली आहे. सुपरपॉवर होऊ इच्छिणाऱ्या, परम संगणक बनवणाऱ्या, अवकाश तंत्रज्ञानात पुढे जाऊ पाहणाऱ्या भारतीय समाजात हे चित्र दिसू लागलं आहे. ही मांडणी करणारेही संगणक, सेलफोन तंत्रज्ञानाचा वापर करूनच स्वत:चे विचार घाऊक प्रमाणात पसरवत आहेत!

स्विगी बॉयला डेटा वापरणारा किंवा फार तर माहितीजीवी म्हणता येईल. विमानतळांवरचे बोìडग पास तपासनीस कंत्राटी कामगार, रेल्वे स्टेशनवरचे तिकिटं देणारे कंत्राटी कामगार, हे कोणत्या प्रकारचं काम करतात? त्यांना पांढरपेशा म्हणायचं, की ब्ल्यू कॉलर्ड मजूर की पिंक कॉलर्ड? भारतीय समाज हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा डेटावर अवलंबून असलेला आणि म्हणून बुद्धिजीवी समाज आहे, हे सांख्यिकीवर आधारलेलं वाक्य आपल्याला अविश्वसनीय वाटतं, याची मला खात्री आहे.

‘भारतीय आयटी उद्योग हा भारतीय आर्थिक प्रगतीचं इंजिन आहे,’ हे शासकीय अहवालातलं वाक्य आपल्याला पटू शकतं. नव्हे, भारताच्या प्रगतीची कसोटी म्हणून मोठमोठाल्या भारतीय आयटी कंपन्यांची नावं समोर टाकली जात असतात. परंतु वास्तुरचना, बँकिंग, खाणंपिणं, शिक्षणव्यवस्था, वस्तूंची खरेदी-विक्री ते लग्नकार्य, समारंभ नियोजन या सर्वच ठिकाणचे व्यवहार आता ‘जीपीएस, ऑनलाइन, रेंज, पिन, ट्रान्झ्ॉक्शन, सेंड केलाय’ या भाषेत होऊ लागले आहेत. हे करणारी माणसं अर्थातच नॉलेज इकॉनॉमी आणि नॉलेज सोसायटीचा अविभाज्य भाग आहेत; पण हे आपण मान्य केलेलं नाही. बुद्धीच्या जोरावर जगणाऱ्या समाजाला बुद्धिजीवी म्हणतात. मग आजचा आपला समाजही बुद्धिजीवी समाज आहे का?

मान्युएल कास्टल्सनं ‘नॉलेज सोसायटी’ या संकल्पनेची मांडणी केली, तेव्हा २०२० मध्ये जगातील वेगवेगळ्या कोपऱ्यांत माहिती तंत्रज्ञानावर आधारित बदलांमुळे कोणकोणती मूलभूत फेरमांडणी होणार आहे, पूर्वेकडील देशांतल्या तरुण-तरुणींचं आयुष्यच बदलणार आहे याची कल्पनाही त्याच्यासह अनेकांना नव्हती.

युनेस्कोच्या ‘टुवर्ड्स नॉलेज सोसायटीज’ (२००५) या अहवालात, जगात मोठय़ा प्रमाणावर तयार होणाऱ्या डेटावर प्रक्रिया करून ती ज्ञानात परावíतत करून पुढे नेणाऱ्या समाजाला ‘ज्ञानजीवी समाज’ म्हटलं जातं. आज स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक जण नकळतपणे अखंड काही तरी माहिती निर्माण करीत आहे. परंतु ही माहिती कच्चा माल म्हणून वापरून त्याचे वर्गीकरण करून त्यापासून संपत्ती निर्मिती करणं, हे आताच्या उत्पादन पद्धतीचं मर्म आहे. सध्याची आर्थिकदृष्टय़ा प्रगत राष्ट्रं कच्चा डेटा मिळवून त्याच्या प्रक्रियेत भांडवल गुंतवत आहेत. कास्टल्सने आंतरजालाशी निगडित नसणाऱ्या जगाला वंचिततेचं कृष्णविवर म्हटलं होतं. भारतात अनेकांकडे डेटा कनेक्शन केवळ तात्पुरतं असतं. ‘बॅलन्स संपलाय’, हे आपल्या सामाजिक आरोग्याविषयीचं नाही, तर दैनंदिन सेलफोन वापराविषयीचं वाक्य आहे. आंतरजालाशी तुटक जोडणीतून ‘सलग ज्ञाननिर्मिती’ अर्थातच संभवत नाही. भारतात आजही बहुसंख्य लोक आंतरजालाच्या संपूर्णपणे बाहेर फेकलेले आहेत. काही त्या जगात आत-बाहेर करत आहेत आणि काही प्रदेश जिथं अजूनही मोबाइल टॉवर नाहीत, ते वंचिततेच्या कृष्णविवरात आहेत.

कुतूहल, सभोवताल समजून घेण्याची तीव्र इच्छा आणि माहितीची न भागणारी तहान हे आज जगभरच्या कोटय़वधी लोकांचं महत्त्वाचं लक्षण झालं आहे, असं गूगल सर्च इंजिनच्या वापराविषयीच्या आकडेवारीवरून दिसतं. सिनेइतिहासापासून जीवशास्त्रीय तथ्यांपर्यंत आणि आदिमानवाच्या जगण्यापासून ते अण्वस्त्रांपर्यंत असंख्य विषय जगभरचे लोक सर्च करत आहेत- शाळांतले शिक्षक, त्यांचे विद्यार्थी, डॉक्टर आणि रोगी, नोकरशहा, राजकारणी, त्यांचे पित्ते, संशोधक, पोलीस, विक्रेते, जाहिरातदार, जाहिरात बनवणारे- कोणी मागे नाही. थोडक्यात, सगळे जण जणू शोधयात्री. यात भारतीयांची संख्या महाप्रचंड. चिनी, दक्षिण कोरियातल्या आणि जपानी कंपन्यांनी जे नवे फोन तयार केले, त्याचे सर्वात जास्त ग्राहक भारतीय आहेत. आज भारतात ८० कोटी मोबाइलधारक आहेत. ४०,००० पेक्षा जास्त आयटी कंपन्या आहेत! त्याहीपुढे भारतात किती संगणक, किती आयटी-आधारित सेवा (आयटीईएस) कंपन्या, किती डेटा डाऊनलोड/अपलोड होतो, ती आकडेवारी गरगरवणारी आहे. गेल्या काही वर्षांत मोबाइल कंपन्यांनी फुकट नेटपॅक-डेटा देऊन हे प्रमाण आणखी वाढवलं आहे.

ज्या समाजातील बहुसंख्य लोकांची उपजीविका बुद्धीवापर, तंत्रज्ञानवापर, माहिती आणि ज्ञाननिर्मिती यावर अवलंबून आहे, त्या समाजाला काय म्हणावं? बुद्धिजीवी या शब्दाची जुनी व्याख्या जेव्हा निर्माण झाली, तेव्हा आपला समाज शेतीवर अवलंबून होता. त्या समाजात शेतीभाती करता करता तत्त्वं, मूल्यांची खोलवर जाण असणारे, मनन, चिंतन करणारे अनेक जण होते; परंतु संपूर्ण समाज मात्र श्रमजीवी होता. इंग्रजी काळात मूठभर लोक इंग्रजी शिक्षण घेतलेले, वाचन, लिखाण, मनन, चिंतन यावर उपजीविका करणारे होते. त्यांना बुद्धिजीवी म्हटले जाई. ही मंडळी सारासार विचार करणारी, योग्य भविष्याची दिशा देणारी, शेतीवर आधारलेल्या समाजात वैचारिक नेतृत्व देणारी होती.

गेल्या २५ वर्षांत भारतही, सगळ्यात मोठा सावकार असणाऱ्या वर्ल्ड बँकेनं सक्ती केल्यावर अर्थव्यवस्थेच्या जागतिक फेरमांडणीत सामील झाला आणि मोठय़ा बदलांना सुरुवात झाली. सरकारी अनुदानं बंद झाल्यामुळे शेती परवडेनाशी झाली. त्यानंतर मोठय़ा प्रमाणात शेती विकणं सुरू झालं. शहरीकरणकेंद्री प्रक्रियांनी वेग घेतल्यामुळेही लाखो तरुणांनी शहराकडे स्थलांतरित होणं स्वीकारलं. आपल्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी दाखवते की एकीकडे शेती क्षेत्राचा भाग कमी झाला, तर औद्योगिक उत्पादनाचाही भाग आता सातत्याने कमी होताना दिसत आहे. तिसरीकडे सेवा क्षेत्राचा भाग वाढत आहे. गेल्या २५ वर्षांत भारतात संगणक क्षेत्रातलं शिक्षण घेतलेल्यांची संख्या जवळजवळ एक कोटी आहे. यात अगदी जुजबी संगणक चालवण्याची माहिती आणि कौशल्यापासून ते सॉफ्टवेअरतज्ज्ञांपर्यंतचे सर्व आले. यापैकी बरेच कुशल तंत्रज्ञ परदेशांत स्थायिक झाले आहेत. याच काळात दवाखाने, मल्टिस्पेशालिटी क्लिनिक्स वाढली, कॉलेजं, विद्यापीठांचा विस्तार झाला. स्थलांतरितांच्या अन्नापासूनच्या गरजा भागवणाऱ्या कंपन्या आल्या. साहजिकच सेवा क्षेत्राचा अभूतपूर्व विस्तार झाला.

अर्थात यात एक मोठा ‘पण’ आणि ‘परंतु’ आहेच. बुद्धिजीवी समाजाची आजवर आपण मान्य केलेली लक्षणं होती- वाचन, लिखाण, मनन करणारा, आरामखुर्चीत बसून इतरांच्या जगण्यावर टिप्पणी करणारा आत्ममग्न, मध्यमवर्गीय असा, विवेकबुद्धी वापरणारा समाज. आजच्या बुद्धिजीवी समाजाचं चरित्र पूर्णत: वेगळं आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे मोठय़ा प्रमाणात माहितीचं विकेंद्रीकरण, लोकशाहीकरण झालं आहे. कडूबाई गात असलेली डॉ. आंबेडकरांवरची गाणी असतील, शेती क्षेत्रातल्या घोर संकटांपासून ते उच्चशिक्षणातल्या शोकांतिकेपर्यंतचं चित्र रेखाटणारी गाणी किंवा टिकटॉक व्हिडीओचं जग असेल- एक मोठा मुक्तिदायी पट खुला झाला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ‘मला हवं ते मी बोलणार, गाणार, मांडणार’, असा एक नवा जिवंतपणा दिसतो आहे. असं असलं, तरी यातला बहुसंख्याक समाज हा केवळ डेटा-वापरकर्ता आहे हे कटू सत्य आहे. साहजिकच हा समाज आणि ज्ञानजीवी, बुद्धिजीवी समाज यातले मोठे अंतर आपण कसं ओलांडणार आहोत, हा खरा प्रश्न आहे. तसंच असे माहितीचे साठे वाढवणाऱ्यांना, डेटावापरकर्त्यांना समुदायात एकत्र करून त्यांच्या निनावी, बिनचेहऱ्याच्या झुंडी विशिष्ट दिशेनं वळवण्याचं सामर्थ्यही ‘आयटी सेल्स’कडे आहे.

विरोधाभास अनेक आहेत. एक तर ज्ञानजीवी समाजाच्या कालखंडात केवळ माहितीच्या वापर/ निर्माणावर समाधानी राहता येणार नाही. डेटाआधारित भांडवली वसाहतवादाला उत्तर देण्यासाठी भारताने धोरणीपणा दाखवायला हवा. दुसरं, खुल्या ज्ञाननिर्मितीसाठी समाजात संपूर्ण खुलेपणा लागतो. तो केवळ लोकशाहीत मिळू शकतो. त्यासाठी सध्या आपल्या समाजात असणारी लोकशाहीविषयीची उदासीनता दूर व्हावी लागेल. तिसरं म्हणजे, आजची जागतिक भांडवलशाही ही माहितीचा व्यापार करणारी असल्याने झकरबर्ग, मर्केल किंवा ट्रम्प भारतप्रेम दाखवतात. परंतु पूर्वी ब्रिटिशांनी जसा आपल्याकडे कापूस, नीळ, चहा, ताग वगरे त्यांच्यासाठी फायद्याच्या असणाऱ्या पिकांचा आग्रह धरला आणि त्याआधारे त्यांचे उद्योगधंदे पुढे गेले, तसंच काहीसं आज होत आहे. आज परदेशी कंपन्यांची मानवी व्यवहारांच्या डेटाची मोठी गरज- कच्चा माल आपण उपलब्ध करून देत आहोत. जे आपल्याला समाजमाध्यमांमुळे मिळालेले लोकशाही स्वातंत्र्य वाटते, तेच आपल्या डेटावर नफा मिळवणाऱ्यांचे साधन आहे. तीच विदा वापरून आपल्याला जवळून ओळखणारं तंत्रज्ञान आपल्याला अंकित करत आहे, हा या आजच्या बुद्धिजीवी समाजासमोरचा सर्वात मोठा धोका आहे.

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त समाजशास्त्राचे अध्यापन करतात. ईमेल : shruti.tambe@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New intellectual society phone selfie smart phone transaction gps online range pin send akp

ताज्या बातम्या