प्रियदर्शिनी कर्वे ( पर्यावरण-विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, न्याय )

वृक्षतोडीमुळे हवेतील ऑक्सिजन कमी झाला आहे म्हणून वैद्यकीय ऑक्सिजन कमी किंवा महाग मिळतो आहे अशी अवैज्ञानिक माहिती सध्या समाजमाध्यमांतून पसरविली जात आहे. प्रत्यक्षात हवेतल्या ऑक्सिजनचे प्रमाण टिकून आहे ते फायटोप्लांक्टन या महासागरांच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या आद्य वनस्पतीमुळे!

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

कोविड- १९ महासाथीच्या दुसऱ्या लाटेने भारतातील आरोग्यव्यवस्थेचे आणि प्रशासन यंत्रणेचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत. पण सत्याला सामोरे जाण्यापेक्षा इतरांवर दोषारोप करण्याची वृत्तीच सर्व स्तरांमध्ये दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी यासाठी विज्ञान आणि पर्यावरणालाही वेठीला धरले गेले.

एका रुग्णालयाने कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडताना ‘तुम्ही अमुक इतका ऑक्सिजन वापरला आहे, तर आता तमुक तितकी झाडे लावा..’ असा सल्ला दिल्याची बातमी विविध माध्यमांमधून बरीच गाजली. सर्वत्र याबाबत प्रशंसेचा सूर उमटला. एका डॉक्टरने कोविड रुग्णाला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरही ‘ऑक्सिजनसाठी एक झाड लावा’ असा संदेश लिहून दिल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरले. जोडीला पिंपळ, तुळस इ. सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करतात, असे गेली कित्येक वर्षे फिरत असलेले सर्वस्वी ‘अवैज्ञानिक’ संदेशही नव्या जोमाने समाजमाध्यमांवर फिरवले गेले.

या साऱ्याचे कौतुक नाही ; तर निषेध करण्याची गरज आहे. वडाची साल पिंपळाला लावून वैद्यकीय यंत्रणांतील नियोजनाचे अपयश झाकायचे; आणि उलट सामान्य माणसालाच कानकोंडे करायचे, असा हा प्रकार आहे. वृक्षतोडीमुळे हवेतील ऑक्सिजन कमी झाला आहे म्हणून वैद्यकीय ऑक्सिजन कमी किंवा महाग मिळतो आहे असे म्हणायचे आहे का? मी एकहाती प्रयत्न करून दुसरे अ‍ॅमेझॉन वन जरी निर्माण केले तरी माझी फुप्फुसे निकामी होऊन मी व्हेंटिलेटरवर गेल्यास लागणारा वैद्यकीय ऑक्सिजन हा कारखान्यांनी तयार केला आणि वैद्यकीय यंत्रणांनी पुरवठा केला तरच मला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुळात झाडांचा आणि हवेतील ऑक्सिजन वायूच्या उपलब्धतेचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

वातावरणातील वायू

पृथ्वीच्या वातावरणातील ऑक्सिजनची दोन संयुगे सजीवसृष्टीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. एक म्हणजे वातावरणाच्या वरच्या स्तरात असलेला ओझोन आणि दुसरे म्हणजे ज्याला आपण प्राणवायू म्हणतो तो ऑक्सिजन वायू. ओझोनचा थर हा आपल्याला अपायकारक असणारे सूर्याचे अवरक्त किरण पृथ्वीपर्यंत येण्यापासून थोपवतो. आज पृथ्वीच्या पृष्ठभागावर वातावरणाच्या संपर्कात वावरणारे सर्व सजीव आपले जीवनव्यवहार चालू ठेवण्यासाठी इंधन म्हणून लागणारा प्राणवायू ेश्वसनाद्वारे हवेतून मिळवतात. हवेत २१ टक्के ऑक्सिजन वायू आहे. वातावरणाचा सर्वात मोठा घटक नायट्रोजन वायू आहे. याखेरीज इतर काही वायू अत्यंत अल्प प्रमाणात वातावरणाचा भाग आहेत. त्यापैकी एक आहे कार्बन डायऑक्साइड. संपूर्ण वातावरणाचे जर एक दशलक्ष भाग केले तर आजच्या घडीला त्यात कार्बन डायऑक्साइड फक्त चारशे भाग आहे. (तुलनेसाठी- ऑक्सिजन सुमारे दोन लाख भाग आहे.) त्यातही, नैसर्गिकरीत्या असणारे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अडीचशे भाग इतकेच आहे. त्यापुढली १५० भागांची भर ही औद्योगिकीरणामुळे पडलेली आहे.

नैसर्गिक ऑक्सिजनचे मूळ 

वातावरणाचा जिथे स्पर्शही होत नाही अशा जागीही काही सूक्ष्मजीव राहतात (उदा. पाण्याखाली वा प्राण्यांच्या आतडय़ांमध्ये!). त्यांना आपले जीवनव्यवहार चालवण्यासाठी हवेतून ऑक्सिजन घेण्याची गरज पडत नाही. किंबहुना, ऑक्सिजनयुक्त हवेचा संपर्कही त्यांच्यासाठी घातक ठरतो. हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव आहेत. एकेकाळी हे सूक्ष्मजीव पृथ्वीवर राज्य करत होते. त्यांना असे इथे तिथे लपून राहण्याची गरज नव्हती. कारण पृथ्वीच्या वातावरणात तेव्हा ऑक्सिजन नव्हताच. त्यावेळी पृथ्वीच्या वातावरणाचा मुख्य घटक होता- कार्बन डाय ऑक्साइड.

साधारण दोन ते अडीच अब्ज वर्षांपूर्वी एका नव्या सूक्ष्मजीवांची उत्क्रांती झाली. हे सूक्ष्मजीव हवेतील कार्बन डायऑक्साइड, जमिनीवरील पाणी व अंतराळातून येणारा सूर्यप्रकाश यांच्या साहाय्याने आपल्याला लागणारे अन्न स्वत: तयार करू लागले. या प्रक्रियेला ‘प्रकाशसंश्लेषण’ म्हणतात. आणि ऑक्सिजन वायू हा या प्रक्रियेतून उरणारा कचरा असतो. या जिवाणूंना नील-हरित जिवाणू (सायनोबॅक्टिरिया) म्हणतात. या जिवाणूंची वाढ इतक्या झपाटय़ाने झाली, की त्यांच्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण नगण्य इतके कमी झाले. या जिवाणूंनी बाहेर फेकलेला काही ऑक्सिजन वातावरणाच्या अगदी वरच्या स्तरात पोहोचला आणि तिथे सातत्याने होणाऱ्या वैश्विक किरणांच्या माऱ्यामुळे रासायनिक उलथापालथी होऊन ओझोन (ऑक्सिजनचे तीन अणू एकत्र येऊन तयार होणारा रेणू) तयार झाला. बाकीचा ऑक्सिजन वायू (ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र येऊन तयार होणारा रेणू) वातावरणाच्या खालच्या थरातच जमा होत गेला, आणि त्याचे प्रमाण वाढत वाढत २१ टक्क्यांपर्यंत गेले. पण यामुळे ऑक्सिजन वायू ज्यांच्यासाठी विषसमान होता अशा प्राचीन सूक्ष्मजीवांची मात्र अक्षरश: ‘दे माय धरणी ठाय’ अशी अवस्था झाली आणि त्यांना तगून राहण्यासाठी वातावरणाचा संपर्क होणार नाही अशा जागा शोधाव्या लागल्या. काही सूक्ष्मजीवांमध्ये मात्र हवेतील ऑक्सिजनचा वापर करून ऊर्जा मिळवण्याची श्वसनाची प्रक्रिया उत्क्रांत झाली.

वनस्पती आणि प्राणी पेशींची उत्क्रांती या साऱ्या घडामोडीनंतर झाली आहे. वनस्पती पेशींमध्ये प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न तयार करताना ऑक्सिजन बाहेर टाकणारे ‘क्लोरोफिल’ आणि श्वसनाद्वारे मिळवलेला ऑक्सिजन वापरून ऊर्जानिर्मिती करणारे ‘मायटोकाँड्रिया’ असतात, तर प्राणी पेशींमध्ये फक्त ‘मायटोकाँड्रिया’ असतात. क्लोरोफिल आणि मायटोकाँड्रिया हे एकेकाळी स्वतंत्र जिवाणू होते, पण आता ते पेशींचा भाग आहेत. पेशी उत्क्रांत झाल्यानंतर बहुपेशीय सजीव उत्क्रांत होण्याचा मार्ग मोकळा झाला. आज जी वनस्पती आणि प्राणीसृष्टी पृथ्वीवर आहे, ती यातूनच उभी राहिलेली आहे.

थोडक्यात म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात जो ऑक्सिजन आहे, तो झाडांनी नाही तर नील-हरित जिवाणूंनी निर्माण केलेला आहे. वनस्पती प्रकाशसंश्लेषण करतात हे खरे, पण वनस्पती श्वसनही करतात. प्रकाशसंश्लेषणासाठी प्रकाश आवश्यक आहे, त्यामुळे ते फक्त दिवसाच घडू शकते. श्वसन मात्र अहोरात्र चालू असते. जमिनीवरील वनस्पतींची उत्क्रांती होईपर्यंत हवेत कार्बन डायऑक्साइड खूपच कमी उरलेला होता. त्यामुळे झाडांच्या प्रकाशसंश्लेषणावर मुळात कच्चा माल कमी उपलब्ध असण्याची मर्यादा आहे.

हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण गेली कोटय़वधी वर्षे संतुलित राहिले आहे. या काळात जमिनीवरील हिरवाईच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत गेले आहेत. यातले काही नैसर्गिक आहेत, तर काही माणसांच्या जीवनव्यवहारांतील बदलांमुळे झालेले आहेत. पण या साऱ्या उलथापालथीत हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण तेवढेच राहिले आहे. कार्बन डाय ऑक्साइडच्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे. आणि काही मानवनिर्मित प्रदूषक आता आपल्या वातावरणाचा भाग बनले आहेत. नैसर्गिक परिसंस्था- विशेषत: जंगले- एकटी झाडे नव्हे- वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे व प्रदूषकांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम करू शकतात.

सर्व वनस्पती आणि प्राणी श्वसन करत असूनही हवेतल्या ऑक्सिजनचे प्रमाण कायम राहते त्याला कारणीभूत आहे- फायटोप्लांक्टन ही महासागरांच्या पृष्ठभागावर तरंगणारी आद्य वनस्पती. वनस्पतींच्या उत्क्रांतीतील अगदी सुरुवातीच्या या वर्गात अनेक प्रजाती आहेत. नील-हरित जिवाणू हेही या वर्गाचाच एक भाग आहेत. जगातील एकूण हिरवाईचे वजन केले तर फायटोप्लांक्टन त्यात फक्त एक टक्का आहेत. पण पृथ्वीवरील एकूण प्रकाशसंश्लेषणापैकी निम्मे प्रकाशसंश्लेषण यांच्यामार्फत केले जाते. त्यामुळे हवेतल्या ऑक्सिजनची काळजी वाटत असेल तर सागरी फायटोप्लांक्टनचे संरक्षण व संवर्धन करणे हे झाडे लावण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.

गोष्ट चांगलीच; पण..

याबाबतीत काही वाचकांना वाटेल की, झाडे आणि ऑक्सिजनचा संबंध नसला तरी यानिमित्ताने झाडांचे महत्त्व लोकांना पटत असेल तर चांगलेच आहे. पण चांगली गोष्टही तिच्यामागील योग्य कारणे समजून घेऊन केलेली असेल तरच टिकाऊ होते. नैसर्गिक परिसंस्था टिकवणे का महत्त्वाचे आहे हे सर्वाना समजले असते तर जागा दिसेल तिथे हाताला येतील ती रोपटी लावून वृक्षारोपण सोहळे करायचे, आणि त्याचवेळी जैवविविधता जतन करण्यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींचे सर्वसंगनमताने लचके तोडायचे असे घडले नसते. झाडांचा आणि हवेतल्या ऑक्सिजनचा संबंध नाही, हे सर्वज्ञात असते तर वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता ही आमच्या नियोजनाच्या अभावामुळे नाही, तर तुम्ही तुमच्या परिसरातली झाडे तोडली म्हणून निर्माण झाली आहे असा निर्लज्ज युक्तिवादही केला गेला नसता.

लेखिका पर्यावरणनिष्ठ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असून ‘समुचित एन्व्हायरो-टेक’च्या संस्थापक आहेत.

ईमेल : pkarve@samuchit.com