scorecardresearch

निसर्गाच्या समृद्धीतून मानवाची समृद्धी

गांधींच्या आयुष्यकाळात त्यांनी एखाद्या विषयावर व्यक्त केलेले मत पुढे कालानुरूप बदलत गेले. 

|| गांधीवाद : तारक काटे

आपल्या प्रश्नांची उत्तरे आयात न करता आपल्याच परिस्थिती आणि पर्यावरणातून शोधली तर शाश्वत मार्ग सापडतो हा विचार प्रत्यक्षात आणणाऱ्या एका देशाची गोष्ट. गांधीजी तरी ‘नयी तालीम’मधून यापेक्षा वेगळं काय सांगत होते?

वास्तविक गांधीवाद हा पोथीनिष्ठ किंवा बंदिस्त विचार नाही तर तो प्रवाही आहे. गांधींच्या आयुष्यकाळात त्यांनी एखाद्या विषयावर व्यक्त केलेले मत पुढे कालानुरूप बदलत गेले.  त्यामुळे आताच्या काळात त्या विचारांची समयोचितता तपासणे महत्त्वाचे ठरते. त्यांचे काही विचार तर सार्वकालिक सत्यच सांगतात. जसे, ‘माणसाच्या आवश्यक गरजांच्या पूर्तीसाठी निसर्गात पर्याप्त आहे, पण लोभासाठी मात्र नाही’ हे त्यांचे उद्धरण जगप्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्यय पर्यावरण विनाशामुळे उद्भवलेल्या भयावह परिस्थितीत आपण सध्या घेतच आहोत. गांधी माणूस व निसर्गाचे अद्वैत मानणारे होते. त्यात व्यक्ती आणि समष्टीच्या परस्परावलंबनाचा विचार होता. त्यामुळे आजच्या संदर्भात माणूसही वाचवायचा आणि निसर्गही हेच खरे आव्हान आहे. किंबहुना निसर्गाला बळकट करून आपल्या मूलभूत गरजांची पुरती करू शकतो का हा खरा प्रश्न आहे.

माझ्या लहानपणी शाळेतील धडय़ांमध्ये खेडय़ांमधील नदी, नाले, ओहोळ यातून बारमाही वाहणारे पाणी, गावाभोवती हिरवेगार डोंगर, गावासभोवतालचे गायरान, समृद्ध जंगल, शेतात डोलणारी बहुविध पिके असे वर्णन असे. असे दृश्य आता गावांमधून पूर्णपणे हरवले आहे. गावे ओसाड, वैराण आणि बकाल झाली आहेत आणि त्यामुळे माणसांची मनेदेखील. मधल्या काळात खेडय़ांची झालेली दुरवस्था आपण सर्वदूर बघतोच आहोत. निसर्गाला पुन्हा समृद्ध करून जगण्याचा शाश्वत आधार निर्माण करू शकू का असे एक उदाहरण आपण बघणार आहोत.

एका बदलाची कहाणी

ही कथा आहे दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबिया देशातील ‘गॅव्हिओटास’ या गावाची आणि कथानायक आहे ‘पावलो लुगारी’.

कोलंबिया हा उत्तर आणि दक्षिण अमेरिका या दोन खंडांना जोडणाऱ्या विषुववृत्ताजवळील देश. प्रागैतिहासिक कालखंडात अमेझॉनच्या समृद्ध सदाहरित पर्जन्यवनांनी व्यापलेला. परंतु जवळपास ३० हजार वर्षांपूर्वी झालेल्या हवामान बदलामुळे कोलंबियाच्या उत्तरपूर्वेकडील आणि व्हेनेझुएला देशाच्या पश्चिमेकडील जवळपास एक लाख ४५ हजार वर्ग किलोमीटर्स एवढा प्रचंड भूभाग खुरटय़ा झुडुपांनी आणि अतिविरळ वृक्षांनी व्यापलेल्या गवताळ प्रदेशात रूपांतरित झाला. या जवळपास निर्जन आणि बंजर जमीन असलेल्या भागाचे नाव आहे ‘लानॉस’.

कोलंबिया देश ६० ते ९० च्या दशकांत राजकीयदृष्टय़ा अतिशय अस्थिर आणि डावे व उजवे अशा दोन्ही प्रकारच्या क्रांतिकारी दहशतवाद्यांच्या तावडीत सापडून गृहयुद्धाने त्रस्त झालेला; त्यामुळे देशाचे अर्थकारण रसातळाला गेलेले. त्यात अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्यांचे माफियाराज. त्यामुळे लोकांच्या वाटय़ाला आली ती आत्यंतिक गरिबी, बेकारी, अनारोग्य आणि असुरक्षितता.

आपल्याजवळच उत्तरे

पावलो लुगारी यांचा जन्म १९४४ साली उच्चशिक्षित, अभिरुचीसंपन्न आणि समृद्ध अशा इटालियन कुटुंबात झाला. शालेय शिक्षण घरीच वडिलांच्या तालमीत झालेले. पुढे महाविद्यालयात न जाता मूळच्या हुशारीमुळे पदवी परीक्षा उत्तम गुणांनी उतीर्ण. चिकित्सक स्वभावामुळे आधुनिक विकासाच्या धारणेविषयी शंका. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संस्थेतर्फे मिळालेल्या छात्रवृत्तीमुळे फिलिपिन्समध्ये वर्षभर राहून तेथील विकासाच्या संदर्भातील विविध प्रकल्पांचा अभ्यास. आपल्याकडील समस्यांसाठी विकसित देशातील उत्तरे किंवा तंत्रज्ञान चालणार नाहीत, कारण ते येथील स्थानिक संदर्भ सोडून असल्यामुळे त्यांचा उपयोग केल्यास नवेच प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी आपल्या परिस्थितीशी सुसंगत उत्तरे आपल्यालाच शोधावी लागतील ही विचाराची ठाम दिशा. पावलोंना कोलंबियाच्या ‘लानॉस’ प्रदेशाचा हवाई दौरा करण्याची करण्याची संधी मिळाली आणि विस्तीर्ण पसरलेली उजाड भूमी पाहून त्यांना ती आपल्या भावी कार्याची कर्मभूमीच वाटली. लानॉसच्या परिसरात होत्या येथील मूळ आदिवासींच्या आणि शहरातील वाढत्या हिंसाचारामुळे परागंदा झालेल्या लोकांच्या तुरळक वस्त्या. लानॉससारखा प्रदेश जर राहण्या-जगण्यायोग्य सुसह्य करता आला तर शहराकडे जाणारे लोंढे थांबविता येतील आणि लोकांना शांत परंतु सार्थक जीवन जगण्याचा पर्याय देता येईल हा विचार पक्का झाला आणि येथून सुरू झाली एका नव्या स्वप्नवत प्रयोगाची सुरुवात.

आव्हाने आणि दिशा

७० च्या दशकात पावलोंनी ‘गॅव्हिओटास फाऊंडेशन’ची स्थापना करून  लानॉसच्या माळरानात वसाहत उभी करण्यासाठी खूप मोठी जागा मिळविली. यानंतर पावलोंनी बोगोटाच्या विद्यापीठामधून आपल्यासारखे आगळे स्वप्न पाहणाऱ्या काही वेडय़ा सहकाऱ्यांचा शोध घेतला. त्यात होता एक हुशार यांत्रिकी अभियंता आणि दुसरा मृदा शास्त्रज्ञ. यात पुढेही अशा वेडय़ांची भर पडत गेली. शिवाय विद्यापीठाच्या सहकार्याने अभियांत्रिकी विभागातील तल्लख बुद्धीचे विद्यार्थी वर्षभरासाठी मिळवायचा प्रयत्न झाला. शहरी झोपडपट्टय़ांतील काही साहसी मुलेही सामील झालीत व ती पुढे इथेच स्थायिक झाली.

 या तांत्रिक चमूने परिसरातील आव्हाने स्वीकारायला सुरवात केली. येथील पाणी अतिशय आम्लीय असल्यामुळे लोक पोटाच्या विकारांनी त्रस्त होते. अथक प्रयत्नांनंतर असा हातपंप विकसित झाला की जो भूपृष्ठातील शुद्ध पाणी खोलवरून सहजरीत्या खेचू शकेल. येथील निकृष्ट जमिनीत कुठलेही पीक घेणे अवघड. त्यासाठी येथील गवत व माती मिश्रणाचे वाफे करून त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि बोरॉन यासारखी पोषक द्रव्ये अत्यल्प प्रमाणात घालून विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्याचे हायड्रोपोनिक तंत्र विकसित झाले. कोलंबियात ढगाळी वातावरणात पाणी गरम करण्यासाठी ‘सौरउष्मक’ आणि या भागातील वाऱ्याच्या वेगाशी सुसंगत अतिशय कार्यक्षम पवनचक्की शोधल्या गेली. या काळात संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमातून गॅव्हिओटासला संशोधन निधी मिळाला व त्यातून पुढील दहा वर्षांत परिसरातील विविध गरजांसाठी उपयुक्त अशी अनेक तंत्रे निर्मिली गेली.

‘नई तालीम’चीच आवृत्ती

 गॅव्हिओटासला परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाली. पावलोंचा भर होता पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेत शिकण्यावर. आजच्या शिक्षण पद्धतीत पदवी मिळविण्याच्या भरात प्रत्यक्ष ज्ञानार्जनाचा उद्देशच हरवून जातो. आपल्याला विशेषज्ञांपेक्षा हरहुन्नरी लोकांची गरज आहे की जे नेहमीपेक्षा वेगळा विचार करू शकतील आणि जीवनातील प्रत्येक प्रश्नाला भिडू शकतील. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी सर्व गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. गांधीजीसुद्धा त्यांच्या ‘नई तालीम’मधून आणखी वेगळे काय सागंत होते? राजकारणापासून संपूर्ण अलिप्तता आणि नि:शस्त्रता ही पथ्ये पाळली गेल्यामुळे दहशतवाद्यांचा त्रास त्यांना जाणवला नाही. 

पुढे बेलिसारिओ बेटान्कुर हे राष्ट्राध्यक्ष निवडले गेले आणि देशभर गरिबांसाठी घरे, ग्रामीण पुनरुत्थारण यासारखे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात हाती घेतले गेले. त्यांना गॅव्हिओटासच्या कामाची माहिती असल्यामुळे येथे विकसित झालेल्या तंत्रांचा देशभर प्रसार होण्यासाठी मोठे काम मिळाले. लानॉसमधील अनेक तरुणांना तंत्रज्ञ म्हणून प्रशिक्षित करण्यात आले व त्यातून देशभर आणि लानॉसमध्ये  बऱ्याच मोठय़ा प्रमाणात तंत्रप्रसाराचे काम करण्यात आले. परंतु ९० च्या दशकात खासगीकरण आणि भांडवली अर्थव्यवस्थेवर भर देणारे सरकार आले आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणाचे प्रयत्न रोडावले. त्याची झळ गॅव्हिओटासलाही पोचली व अशी वेळ आली की दैनंदिन खर्च भागविणे अवघड झाले.

पावलोंनी सहकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगून बिकट परिस्थितीची जाणीव दिली. आधीच्या काही वर्षांत येथील निकृष्ट जमिनीवर तग धरू शकेल अशा वनस्पती शोधताना सूचिपर्ण (पाईन) वृक्षांची एक स्थानीय जात आढळली.  त्याची लागवड करण्याचे नवे तंत्र विकसित करून हेक्टरी हजार वृक्ष याप्रमाणे गेल्या पुढील दहा वर्षांत आठ हजार हेक्टर्सवर जवळपास ८० दशलक्ष झाडांची लागवड करण्यात आली व त्या परिसरातील विस्तीर्ण क्षेत्रात हिरवेगार जंगल उभे झाले. या जंगलामुळे वातावरणातील  कर्ब जमिनीत मुरविण्यास मदत झालीच, शिवाय पावसाचे दहा टक्के जास्त पाणी जमिनीत मुरू लागले. त्यामुळे भूपृष्ठाखालील मोजके शुद्ध पाणी रोज काढून व ते बाटलीबंद करून ते विकण्याची व्यवस्था झाली. या वृक्षांपासून राळ मिळवून त्यावर प्रक्रिया आधारित उद्योग उभे करून अर्थार्जनाची कायम सोय करण्यात आली. या वृक्षांच्या मधल्या जागेत पामवृक्षांच्या लागवडीतून मिळणाऱ्या फळांमधून खाद्यतेल मिळविण्यात आले. विशेष म्हणजे पाईन वृक्षांची एकल लागवड झाली असली तरी मधल्या जागेत इतर वनस्पती, कीटक, प्राणी, पक्षी अशा जवळपास २५० जीवांची विविधता निसर्गाने निर्माण केली.

निसर्गसंवर्धनातून संपन्न आणि स्वयंपूर्ण झालेली ही २०० कुटुंबाची वसाहत ३० किलोमीटर्स परिसरातील जवळपास दोन हजार कुटुंबांना शाळा, इस्पितळ आणि अर्थार्जनाचा आधार देत आहे. या वसाहतीत वीज, निवास आणि आरोग्यसोयी मोफत आहेत. स्पर्धेऐवजी परस्पर सहकार्य हाच या समुदायाचा आधार आहे.

आजच्या भांडवलशाही व्यवस्थेतील संपत्ती एक तर निसर्गाला लुटून किंवा आभासी पद्धतीने शेअर बाजारातून निर्माण होते; तिचा लाभ काहीच व्यक्तिसमूहांना होतो. मात्र निसर्ग व समाज यांनी परस्परांना मजबूत करत गेल्यासच खरी संपत्ती निर्माण होते व जगण्याचा शाश्वत आधार गवसतो.             

लेखक जैवशास्त्रज्ञ असून शाश्वत विकास व शाश्वत शेती या

 विषयांचे अभ्यासक आहेत.

vernal.tarak@gmail. com

मराठीतील सर्व चतु:सूत्र ( Chatusutra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Situation human prosperity through the richness of nature akp

ताज्या बातम्या