डॉ. जयदेव पंचवाघ

त्याला नोबेल पारितोषिक मिळायला हवं होतं का? ‘हो’च, पण ते मिळायला पाहिजे होतं ते मेंदूतल्या रक्तवाहिनी प्रतिमांकनासाठी..

Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास

न्यूरोसर्जरीच्या या लेखमालेतील पुढचा लेख लिहायला घेताना नेहमी एखादी अशी घटना घडते की, ठरवलेला विषय सोडून दुसराच लिहिण्याचा मोह आवरत नाही. परवा सकाळी मी हॉस्पिटलला पोहोचतच होतो तर इमर्जन्सीमधून मला फोन आला. चाळीस वर्षांची एक स्त्री मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन खोल ग्लानीत गेलेली होती. तिच्या सीटी स्कॅनमध्ये मेंदू व त्याभोवतीच्या आवरण यांच्यामध्ये रक्तस्राव झाल्याचं स्पष्ट दिसत होतं; याला ‘सब- अर्खनॉइड हॅमरेज’ (एसएएच) म्हणतात. याची अनेक कारणं असली तरी बहुसंख्य वेळा मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीचा पदर पातळ होऊन त्याला फुगा येणे आणि तो फुटणे हे कारण दिसून येतं. न्यूरोसर्जरीतली ही एक तातडीनं उपचार करावी लागणारी (इमर्जन्सी) केस. या विषयाच्या खोलात जाण्याची आता माझी इच्छा नाही, पण या आजारात जी अतिशय महत्त्वाची चाचणी तातडीने करावी लागते ती म्हणजे मेंदूतल्या रक्तवाहिन्यांचं प्रतिमांकन किंवा भाषेच्या सोपेपणाकरता आपण म्हणू, ‘चित्रांकन’. आज यालाच आपण ‘सेरेब्रल अ‍ॅन्जिओग्राफी’ म्हणून ओळखतो. याला ‘डीएसए’ असंही म्हणतात. ते का, हे पुढे पाहूच.

मेंदूतील रक्तवाहिन्यांचं चित्रांकन करण्याची पद्धत ज्यानं शोधून काढली त्याचं नाव एगास मोनीझ. हा शोध इतका महत्त्वाचा आहे की १९३० च्या दशकात शोधला जाऊन आजही ही तपासणी मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या आजारात वापरली जाते. हा शोध ज्या डॉ. एगास मोनीझनं लावला हा दुसऱ्या एका शोधासाठीही प्रसिद्ध आहे, पण ते नंतर.

१८९५ साली विल्हेम रोएंटजेन यांनी एक्स-रेचा शोध लावला याबद्दल मी आधी लिहिलं आहे. मेंदूच्या व एकूणच शरीरातल्या आजारांचे निदान मेंदू किंवा शरीर न उघडता बाहेरूनच करण्याच्या चाचण्यांचे जे शोध लागले त्यातला हा अगदी पहिला. त्यानंतर वॉल्टर डँडी या न्यूरोसर्जननं मेंदूच्या आतल्या पाण्याच्या पोकळय़ांच्या श्रृंखलेत कवटीला छिद्र पाडून बाहेरून हवा घालून आणि मेंदूमध्ये त्याचा संदर्भबिंदू तयार करून मेंदूतील काही आजारांच्या एक्स-रेवर निदान १९१८ नंतर कसं सुरू केलं हेसुद्धा आपण पाहिलं आहे. पण मेंदूला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचं चित्रांकन किंवा इमेजिंग करण्याची पद्धत मात्र तेव्हा उपलब्ध नव्हती.

एगास मोनीझ हा पोर्तुगीज न्यूरॉलॉजिस्ट (चेताविकारतज्ज्ञ). हा एक अवलिया इसम होता. डॉक्टर असला तरी पोर्तुगीज राजकारणात त्याचा सक्रिय सहभाग होता आणि अत्यंत महत्त्वाची पदं त्यानं भूषवली होती. नोविकारशास्त्रातसुद्धा त्याला विशेष गती होती. मेंदूच्या रक्तवाहिन्यांचं चित्रांकन करण्यामध्ये त्याला विशेष रस होता.

शोध लागला कसा ?

मेंदूतील गाठींमुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या शवविच्छेदनात, या गाठींमुळे आजूबाजूच्या रक्तवाहिन्या बाजूला विस्थापित होऊन ढकलल्या जातात हे त्याने अनेक वेळा पाहिलं होतं. यावरून त्याला गाठींचं निदान करण्याची कल्पना सुचली. जर या रक्तवाहिन्यांचं चित्रांकन व्यक्ती जिवंत असतानाच करता आलं तर त्यांच्या विस्थापित होण्याच्या ‘पॅटर्न’वरून मेंदूतील गाठींचं आणि इतरही आजारांचं निदान करता येईल याची त्याला खात्री वाटत होती. त्याचबरोबर मेंदूच्या रक्तवाहिन्यांना होणाऱ्या आजारांचे निदानसुद्धा काही अघटित होण्याआधीच करता येणं शक्य होईल असं त्याला वाटत होतं. अशा प्रकारचं चित्रांकन करता येण्याची एकच शक्यता होती आणि ती म्हणजे एक्स-रेमध्ये स्पष्ट दिसू शकणाऱ्या पदार्थाचं द्रावण मेंदूच्या रक्तवाहिन्यांतून आत ढकलायचं आणि लगोलग कवटीचे विविध कोनांमधून एक्स-रे काढायचे. हे द्रावण रक्तप्रवाहासह पुढे जात असताना रक्तवाहिन्यांना अधोरेखित करेल! प्रश्न असा होता की मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्धोकपणे वापरता येईल, ज्याचं सलाइनमध्ये सहजतेनं द्रावण बनू शकेल असा, आणि त्याच वेळी एक्स-रेमध्ये छाया स्पष्टपणे उमटेल असा पदार्थ कुठला?

मोनीझने वेगवेगळय़ा पदार्थाच्या द्रावणांचा उपयोग त्या काळी करून बघितला आणि शेवटी आयोडाइडयुक्त विशिष्ट द्रावण यासाठी वापरलं जाऊ लागलं. सन १९२८ च्या आसपासची ही घटना. गेल्या काही वर्षांत अधिक चांगली व निर्धोक द्रावणं यासाठी उपलब्ध आहेत. मोनीझच्या या शोधामुळे आजतागायत अगणित व्यक्तींचे प्राण वाचले आहेत आणि अजूनही वाचत आहेत.

एगास मोनीझच्या या शोधानंतर मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या चित्रांकनाचं जे पर्व सुरू झालं ते आजही चालू आहे. अर्थात गेल्या नव्वद वर्षांत त्यात अनेक बदल होत गेले. उदा.- ज्याला ‘डीएसए’ असं म्हणलं जातं, त्यात हे चित्रांकन करताना संगणकाच्या साहाय्यानं कवटीच्या हाडांची छाया वजा केली जाते म्हणजेच या चित्रांकनात कवटीच्या छायेचा अडथळा येत नाही म्हणूनच याला ‘सब्ट्रॅक्शन’ (वजा केलेली) अँजिओग्राफी (रक्तवाहिनी चित्रांकन) म्हटलं जातं.

मी लेखात आधी नमूद केल्याप्रमाणे मोनीझला मनोविकारशास्त्रातही रस होता. विशेषत: ज्या आजारांमध्ये व्यक्तीची समाजात संयमाने वागण्याची प्रवृत्ती कमी होऊन समाजविघातक आणि अनिर्बंध वर्तणूक दिसू लागते अशा प्रकारच्या आजारांवर नियंत्रण कसं आणता येईल या प्रश्नात त्याला विशेष रुची होती.

मनोविकारावर जालिमउपाय..

अनिर्बंध, अतिआक्रमक आणि समाजविघातक कृती करण्याच्या ऊर्मीवर काबू न ठेवू शकणाऱ्या व्यक्तींना तुरुंगात किंवा वेडय़ांच्या रुग्णालयात ठेवलं जात असे. कधीकधी साखळय़ांनी बांधून ठेवलं जाई. अशा मानसिक आजारांमध्ये वर्तणुकीत बदल होईल अशी चांगली औषधं तेव्हा उपलब्ध नव्हती. अशा, कायमच मेंदूच्या रागीट, तापट व अमर्यादित उद्दीपित स्थितीत असणाऱ्या व्यक्तीला अपघात होऊन मेंदूच्या पुढच्या भागाला (फ्रंटल लोब) इजा झाली तर त्या व्यक्तीचा स्वभाव तुलनेने शांत बनतो आणि समाजाला त्रास न देता चारचौघांत अशी व्यक्ती राहू शकते हे डॉ. मोनीझच्या पाहण्यात आलं. त्या काळच्या इतर ठिकाणांहून प्रसिद्ध झालेल्या काही संशोधनांतसुद्धा अशा प्रकारचं निरीक्षण नमूद केलेलं होतं. आपण इथे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मनोविकारांवरील रोगांवर चांगली औषधं तेव्हा उपलब्ध नव्हती.

१९३५ सालच्या चेताविकारशास्त्राच्या लंडनमध्ये झालेल्या परिषदेत जेकबसन आणि फुल्टन या दोघांचं चिम्पांझींच्या मेंदूवरचं संशोधन एगास मोनीझने ऐकलं. या चिम्पांझींचा फ्रंटल लोब हा मेंदूच्या पुढच्या भागातला काही हिस्सा शस्त्रक्रियेने काढून टाकला होता. त्यानंतर त्यांना राग येण्यासारख्या कितीही गोष्टी केल्या तरी त्याला फार आक्रमक व विध्वंसक प्रतिक्रिया न देता ते वागतात, असा या संशोधनाचा मथितार्थ होता. या परिषदेतल्या अनुभवावरून एगास मोनीझला हाच प्रयोग आक्रमक, विध्वंसक व तापट लक्षणं असलेल्या मनोविकाराच्या रुग्णांवर करून बघावा असं वाटलं.

त्याच्या एका न्यूरोसर्जन सहकाऱ्याबरोबर त्याने मानसिक आजारामुळे रुग्णालयात डांबून ठेवलेल्या काही रुग्णांवर असे प्रयोग केले.

या शस्त्रक्रियेला ‘फ्रंटल ल्युकॉटॉमी’ हे नाव पडलं. यात फ्रंटल लोबमध्ये तारेपासून बनवलेलं एक आयुध घालून तिथले चेतातंतू मुद्दाम कापले जायचे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमुळे सुरुवातीला बरेच समाजविघातक, आक्रमक व तापट लोक शांत झाले व त्यांना कुटुंबात राहणं शक्य होऊ लागलं असं डॉ. मोनीझने नमूद करून ठेवलं आहे.

अमेरिकेत तर डॉ. वॉल्टर फ्रीमनने ही शस्त्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी, बर्फ फोडण्याकामी वापरात येणारा लांब टोचा- ‘आइस पिक’- वापरात आणला. डोळय़ाच्या खोबणीच्या हाडातून तो मेंदूत ढकलला जायचा आणि दोनचारदा इकडून तिकडे फिरवला की या भागातले चेतातंतू कापले जायचे.

सुरुवातीच्या काळात ही शस्त्रक्रिया इतकी उपयुक्त वाटू लागली की अशा मनोशल्यकर्म किंवा ‘सायकोसर्जरी’ने मानसिक आजारांवर मात करता येईल असं वाटण्यापर्यंत मजल गेली. एगास मोनीझला १९४९ सालचा नोबेल पुरस्कार यासाठी देण्यात आला!

पण हळूहळू या प्रकारच्या उपचारातले प्रचंड धोके आणि त्यामुळे वैद्यकीय नीतिमत्तेला गेलेले तडे अगदी ठळकपणे दिसू लागले. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करून रुग्णाचं व्यक्तिमत्त्वच बदलून टाकण्याचे अधिकार हे अत्यंत धोकादायक असल्याचं निदर्शनाला आलं. तसंच यात जंतुसंसर्ग, मृत्यू असे वैद्यकीय धोकेही होतेच. आक्रमक, समाजविघातक विचारांना शांत करू शकतील अशी औषधंसुद्धा हळूहळू उपलब्ध होत चालली होती. एका चांगल्या विचाराने प्रेरित झालेलं पण नंतर हाताबाहेर गेलेलं कार्य अशा रीतीने बंद पडलं, नव्हे तर त्यावर कायदेशीर बंदी आली.

एगास मोनीझला नोबेल पारितोषिक मिळायला हवं होतं का? याचं उत्तर ‘हो’ असंच आहे; पण ते मिळायला हवं होतं मेंदूतल्या रक्तवाहिनी चित्रांकनासाठी.. अँजिओग्राफीच्या शोधासाठी!

अर्थात मोनीझच्या या प्रयोगामुळे मेंदूच्या शस्त्रक्रियेने विचार, भावना व वर्तणुकीत फरक करता येऊ शकतो हे ठळकपणे अधोरेखित झालं.

मात्र ‘सायकोसर्जरी’ची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली हे निश्चित. आजच्या काळातली सायकोसर्जरी अगदी प्राथमिक स्थितीत आहे असं म्हणावं लागेल; पण भविष्यात या विषयामध्ये प्रगती होण्याच्या अगदी निश्चित शक्यता आहेत. मेंदूतील विशिष्ट केंद्रांना पाहिजे तेव्हा उद्दीपित करता येण्यासारखे ‘स्टिम्युलेटर्स’ उपलब्ध झाले आहेत. तसंच अतिरिक्तपणे कार्यरत असणाऱ्या सूक्ष्म केंद्रांचं कार्य कमी करण्यासाठी रेडिओफ्रिक्वेन्सी लहरींचा उपयोग करण्यात येऊ शकतो. या तंत्रज्ञानांचा वापर सायकोसर्जरीत भविष्यात होऊ शकतो. एगास मोनीझला या शास्त्राचा आद्य संशोधक म्हणायला काहीच हरकत नाही.

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.

brainandspinesurgery60@gmail.com