डॉ. जयदेव पंचवाघ brainandspinesurgery60@gmail.com

‘.. म्हणून, आठवताना आपण वर पाहातो नि विचार करताना खाली..’ यासारखं म्हणणं हे ज्ञानासारखं दिसतं; पण असतं का तसं ते?

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
national science day celebration 2024
हम सायन्स की तरफ से है
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके

गणपती अथर्वशीर्षांत श्रीगणेशाला उद्देशून ‘‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी’’ अशी ओळ आहे. ज्ञान आणि विज्ञान या वेगळय़ा गोष्टी आहेत याची आठवणच प्राचीन स्तोत्रातल्या या वाक्यातून करून दिलेली आहे हे लक्षात येईल. या महत्त्वाच्या गोष्टीचा विसर पडल्याने काही तथाकथित शास्त्रज्ञांचा आणि ‘विचारवंतां’चा आपण ज्ञानी आहोत असा गैरसमज वारंवार होताना दिसतो. त्यांनी आपण विज्ञानी आहोत इतपतच समज करून घेतला तर खूप बरं होईल असं कधी-कधी वाटतं.

ज्ञान आणि विज्ञान यांत फरक काय आहे? विश्वाची संरचना काय, प्राण्यांच्या शरीराव्यतिरिक्त त्या शरीराला चलित करणारा आत्मा असा काही असतो का, आणि असलाच तर त्याचा शरीराशी संबंध कसा आणि कुठे येतो, अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणारं ते ज्ञान. विज्ञान म्हणजे एखादी गोष्ट नेमकी कशी चालते याचा शोध. उदाहरणार्थ प्रकाश हा विद्युतचुंबकीय लहरी आणि प्रकाशकण यांचा मिळून बनला आहे याची बुद्धीच्या जोरावर आलेली समज हे विज्ञान आहे, ज्ञान नव्हे. पण हेच ज्ञान आहे असा समज बऱ्याच जणांच्या मनात असतो. ज्ञान हा प्रकाश निर्माण करणारी कुठली शक्ती आहे का हा प्रश्न विचारते. आपल्या मेंदूमध्ये एखादी संवेदना समजण्याचा भाग मेंदूत नेमका कुठे आहे, चेतातंतूतील प्रवाह विद्युत ऊर्जेमार्फत कसा तिथे पोहोचतो यावर विवेचन म्हणजे विज्ञान, परंतु ही संवेदना होते म्हणजे नेमकी ‘कोणाला’ होते? ज्याला ही संवेदना होते ते तत्त्व अदृश्य आहे का ? शरीरात निश्चितपणे दाखवता येतं का? याचे उत्तर म्हणजे ज्ञान.

हजारो वर्ष विविध तथाकथित शास्त्रज्ञांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी आपल्याला ‘ज्ञान’ मिळाल्याचा दावा केला. इतिहासात हा शोध घेण्याचा प्रयत्न, पूर्वग्रह नसलेल्या भूमिकेतून झालेला, अगदी क्वचित बघायला मिळतो. गौतम बुद्ध हे अशा प्रामाणिक व दोनही बाजूंचे पूर्वग्रह नसलेल्या प्रयत्नांचं प्रतीक आहे. अगदी आजही विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक शास्त्रज्ञांच्या संशोधनाकडे बारकाईने बघितलं तर लक्षात येईल की यांच्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांची मतं किंवा गृहीतकं आधीच बनवलेली असतात. त्या गृहीतकांना सबळ पुरावा ठरू शकणाऱ्या गोष्टी एकत्र करून संशोधनाचा निष्कर्ष काढलेला असतो. यातली गंमत अशी आहे की जगात विरोधाभासी दिसणाऱ्या घटना इतक्या वारंवार आणि सहजतेनं घडत असतात की एखाद्या गृहीतकाला पुरावा ठरू शकणाऱ्या गोष्टी एक नव्हे तर शंभर मिळू शकतात.

तर्काच्या आधारावर बघितलं तर खरं आणि अंतिम ज्ञान ‘जगातल्या कुठल्याही व्यक्तीला पंचेंद्रियांद्वारे सहज सांगता येईल’ अशा स्वरूपात विज्ञानाला समजलं आहे असं म्हणता येणार नाही. याचे दोन अर्थ निघू शकतात. पहिला म्हणजे खरं ज्ञान वगैरे संकल्पना भाकड असून पंचेंद्रियांद्वारे उमगलं तेच अंतिम सत्य. म्हणजे ‘शरीरापलीकडे काहीही ज्ञान वगैरे नाही’ असं वाटणं हेच ज्ञान.

दुसरी शक्यता म्हणजे अनुभवाच्या आणि अनुभूतीच्या शक्यता पंचेंद्रियांच्या पुढे जाऊन निर्माण करता येतात आणि या योग्यता विशिष्ट  प्रक्रियांद्वारे जागृत करता येतात या गृहीतकाच्या आधारावर केलेले प्रयत्न. या प्रयत्नांची व्याख्याच अशी आहे, की यातले अनुभव व प्रचीती जर येत असतील तरी त्या पंचेंद्रियांद्वारे एकमेकांना नि:संशयपणे सांगता येणार नाहीत. म्हणजेच ‘स्वसंवेद्य आत्म्या’चा अनुभव आला असं जरी गृहीत धरलं तरी तो आपल्या भाषेत ‘प्रमाणित’ करता येणार नाही. थोडक्यात यावर फक्त चर्चा करून काही हाती लागण्याची सुतराम शक्यता नाही.

या दोन शक्यतांच्या पुढे कुठलंही प्रामाणिक तत्त्वज्ञान किंवा साहित्य जाऊ शकतं असं मला तरी वाटत नाही. आणि म्हणूनच खरं तर या दोन शक्यता दर्शवणाऱ्या या दोन वाक्यांत आपली पृथ्वीवरची चर्चा संपायला हवी. तुम्ही दोनपैकी एका मताचे असू शकता. काही हरकत नाही.

पण नाही! अनादी काळापासून निरनिराळय़ा देशांत विविध ढुढ्ढाचार्य विद्वानांनी, तत्त्ववेत्त्यांनी आणि प्राध्यापकांनी आपल्या कल्पनाविलासाचे गुलाबजाम थोडय़ाफार शास्त्रीय वाटणाऱ्या पाकात चिंब घोळवून लोकांना खाऊ घातले आहेत.

आता तुम्ही म्हणाल मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया करणारा माणूस अचानक असं का लिहायला लागला? याचं कारण असं की आज मी कवटीच्या अगदी मध्याला स्थित असणारी पोकळी आणि त्या पोकळीच्या मागे असलेल्या ग्रंथीबद्दल लिहिणार आहे. या बिचाऱ्या ग्रंथीचा वापर आत्मा व शरीर यांना जोडण्यासाठी वारंवार केला गेला. तर, या पोकळीला थर्ड व्हेंट्रिकल (तिसरी पोकळी) म्हणतात आणि ग्रंथीला पायनिअल ग्लँड. मेंदूतील पाणी (सेरेब्रोस्पायनल फ्लुईड) तयार करून ते एका पोकळीतून दुसरीकडे वाहत जाते. अशा चार पोकळय़ा असतात. त्यापैकी ही तिसरी पोकळी. याच्या अगदी मागेच एखाद्या लांबट स्ट्रॉबेरीसारखी पण छोटया आवळय़ाच्या आकाराची पण एक ग्रंथी असते. पाइन वृक्षाचे जे दाणे असतात (पाइन नट) तसा हिचा आकार म्हणून पायनियल ग्रंथी!

या दोनही भागांचा आणि आत्म्याच्या संकल्पनेचा जवळचा संबंध आहे. कसा ते आता सांगतो. इ. स. पूर्व ४०० वर्षांपूर्वी हेरोफिलस नावाचा शरीररचनेचा अभ्यासक व डॉक्टर होऊन गेला. त्याच्याविषयी पूर्वीच्या एका लेखात मी लिहिलं आहे. अलेक्झांड्रियामध्ये त्या काळात त्याने अनेक शवविच्छेदनं करून मेंदूतले अनेक भाग प्रथमच दाखवले. त्यात मेंदूतल्या पोकळय़ा आणि इतर भाग दाखवले. इ.स. १०० च्या आसपास गॅलन (गॅलेनस) हा त्या काळातला रोमन डॉक्टर होऊन गेला. हे लोक शरीराबरोबरच अतींद्रिय शक्ती, आत्मा वगैरेंबद्दलसुद्धा बोलायचे. तो कल्पनाविलासच असायचा. आणि मग तुझा कल्पनाविलास मोठा का माझा यावर हमरीतुमरीवरसुद्धा येत असत. गॅलनच्या आधीच्या तत्त्ववेत्त्यांनी असं ठाम प्रतिपादन केलं होतं की आत्मिक आणि मानसिक शक्ती मेंदूतल्या एका पोकळीतून दुसऱ्या पोकळीत वाहात जातात. त्या वाहण्याचे नियंत्रण पायनियल ग्रंथी करते. तिसऱ्या पोकळीतून चौथ्या पोकळीत जाण्यासाठी जो चिंचोळा मार्ग असतो, तो मार्ग पाहिजे तेव्हा चालू व बंद करण्याचं काम पायनिअल ग्रंथी करते. आता हे सगळं कोणी पाहिलं होतं का? अर्थातच नाही. वाटलं म्हणून लिहिलं, विद्यार्थ्यांना शिकवलं आणि आपल्या तत्त्वज्ञानाचा ‘आखाडा’ तयार केला. हे मान्य केलं तरच या आखाडय़ात प्रवेश.

गॅलनला वाटलं हे काही खरं नाही. आपण नवीन प्रमेय आत्मविश्वासपूर्ण मांडलं नाही तर आपला आखाडा तयार होणार नाही. त्यानं लिहिलं, अशा प्रकारे पायनियल ग्रंथी कार्य कशी करेल? ती तर त्या चिंचोळय़ा प्रवेशद्वारापासून खूपच दूर असते. ते काही नाही. लहान मेंदूचा व्हर्मिस (किडय़ासारखा दिसणारा) म्हणून जो भाग असतो तोच हे कार्य करतो.

गॅलनची त्या वेळच्या समाजावरची पकड इतकी घट्ट होती की त्याचं हे प्रतिपादन अनेक वर्ष कोणी खोडून काढू शकलं नाही. इ. स. ११०० च्या सुमारास तर एकाने त्यावर कडी केली. या इसमानं लिहिलं, गॅलनचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण त्यात अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली. मेंदूतील तिसऱ्या पोकळीत गहन विचार करण्याची आत्मिक शक्ती स्थित आहे आणि चौथ्या पोकळीत अनंत काळांच्या स्मृती. म्हणून माणूस काही आठवायचं असेल तर वर बघतो. त्या वेळी दोन पोकळय़ांमधील चिंचोळं प्रवेशद्वार उघडलं जातं व ही शक्ती वाहत वाहत वर येते. विचार करायचा असेल तर खाली बघतो कारण मग हे दार बंद होऊन विचारशक्ती वरच्या पोकळीतच अडकून कार्यरत होते.

अर्थात या व्यक्तींची टर उडवण्याचा माझा हेतू नाही, पण विद्वान म्हणून प्रस्थापित होण्याचं भयंकर खूळ जर बुद्धिमत्ता असलेल्या लोकांच्या डोक्यात शिरलं तर ते सत्याचा किती सहज विपर्यास करू शकतात हे काळजीपूर्वक अभ्यासणं गरजेचं आहे. शास्त्रीय जगात आणि शोधनिबंधांच्या दुनियेत आपल्या मताला किंवा गृहीतकाला साजेसे पुरावे ठरवून गोळा करून जे ‘पब्लिशिंग’चं पेव विशेषत: पाश्चात्त्य देशात दिसतं ते याच मनोवृत्तीचा भाग आहे. आणि म्हणूनच इथेसुद्धा खरंखुरं संशोधन बघायचं असेल तर डोळे उघडे हवेत. असो.

मूळ विषय पायनिअल ग्रंथीचा.

तर यापुढच्या काळात रिने देकार्त या फ्रेंच विद्वानाने त्याचे विचार १६३० च्या सुमारास लिहिले आहेत. तो म्हणतो, शरीरातील हालचालींवर या ग्रंथीचं नियंत्रण असतं. या ग्रंथीपासून सुरू होणारं ‘स्फुरण’ बोटीच्या शिडात हवा भरावी तसं मेंदूतील पोकळय़ा फुगवतो आणि हालचाली घडवून आणतो.

नशिबानं या काळात निरीक्षणाधारित विज्ञानाच्या आधारावर काम करणारे निकोलो मास्सा आणि आंद्रे व्हजालिएसारखे शास्त्रज्ञ होते ज्यांनी ठाम प्रतिपादन केलं की एक तर मेंदूतील पोकळय़ा हवेने नाही तर पाण्याने भरलेल्या असतात आणि दुसरे म्हणजे त्यातून कुठलीही आत्मिक शक्ती वगैरे वाहताना आम्ही बघितलेली नाही.

बिचारी पायनिअल ग्रंथी! अनेक विद्वानांचे आखाडे तयार करण्यात हिचा जन्म गेला. आज आपल्याला माहीत आहे, की ही एक अंत:स्रावी ग्रंथी असून मेलॅटोनिन नावाचं द्रव्य तयार करते. जागृत अवस्था व निद्रा यांचा समतोल राखण्यात या ग्रंथीचा हातभार आहे. या ग्रंथीपासून तयार होणाऱ्या गाठी मेंदूतल्या अगदी खोल भागात होतात. त्यांची लक्षणं वेगळी असतात. या ग्रंथीविषयी आणखी पुढच्या वेळी! लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.